इच्छा…

तो- हे घे तुझं डेअरी मिल्क. Happy ना?
ती- Very! वेडा आहेस ना तू. इतकं प्रेम करतोस माझ्यावर की…
तो- की आत्ता रात्री तीन वाजता चार किलोमीटर स्टेशन पर्यंत जाऊन डे अँड नाईट केमिस्ट कडून तुला हवं असलेलं डेअरी मिल्क आणून दिलं. बरोबर ना.
ती- हो..माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण केल्या आहेस तू आजवर..
तो- मी काही करत नाही. देव त्या माझ्याकडून पुऱ्या करून घेतोय. माझी फक्त एकच इच्छा आहे..पण…
ती चॉकलेट सोलून एक तुकडा स्वतः खात आणि एक त्याला भरवत म्हणाली-
ती- ऐक ना. माझी इच्छा आहे की आत्ता ह्या क्षणी जोरात पाऊस पडावा. मी तुझ्या मांडीवर डोकं ठेऊन छान आरडी ऐकावा. करशील का रे माझी ही इच्छा पूर्ण?
तो- करतो ना.
त्याने उठून आरडी लावला आणि तो तिच्या शेजारी येऊन बसला. तिने त्याच्या मांडीवर डोकं ठेवलं आणि बाहेर पाऊस कोसळू लागला! ती त्याच्याकडे प्रेमाने बघत होती. तिच्या डोळ्यातले अश्रू गालांवर ओघळत होते. काही क्षणात तिचे डोळे निस्तेज झाले. हातातलं चॉकलेट गळून पडलं!
तो तिच्याकडे बघत होता. एक दिवस हे होणार दोघांना माहीत होतं. गेली दोन वर्षे कॅन्सरशी सुरू असलेली तिची झुंज आज संपली होती. गेली दोन वर्षे देवाने खरच तिची प्रत्येक इच्छा त्याचा हातून पूर्ण केली होती. पण ती बरी व्हावी ही त्याची एकच इच्छा मात्र देवाने ऐकली नव्हती!
स्पीकर वर किशोर गात होता..”आनेवला पल जानेवाला है!” बाहेर पाऊस जोरात कोसळत होता. तिचा चेहरा मात्र त्याच्या अश्रूंनी चिंब भिजत होता! ©मंदार जोग
mandar jog

mandar jog

मंदार जोग ह्यांची कटिंग पिनाकोलाडा, वन बाय टू मार्गारिटा आणि कोनिएक कथा ही तीन पुस्तक प्रकाशित झाली असून त्यांच्या साडेचार हजार प्रती छापील आणी इबुक स्वरूपात विकल्या गेल्या आहेत. दृकश्राव्य, प्रिंट तसेच सोशल मिडीयावर मंदार जोग नियमित लिखाण करत असतात. लेखक ऑनलाईन ह्या संकल्पनेला सत्यात आणणाऱ्या टीमचा मंदार जोग एक हिस्सा आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!