..आठवणीतील पाऊस
” रिमझिम गिरे सावन सुलग सुलग जाये मग भिगे आज इस मौसम मै लगी कैसी ये लगन ” T.V च्या पडद्यावर पावसात चिंब भिजणारे अमिताभ आणि मौशमी पाहिलेकी माझे ही मन पावसात चिंब भिजून निघते. आणि मनाच्या हिरवळीवर आठवणींचे मोर थुई थुई नाचू लागतात.
पाऊस हा तसा सगळ्यांचाच आवडता असतो. जुन मध्ये येणारी पावसाची पहिली सर ….त्या बरोबर येणारा मातीचा गंध ….कसे अगदी मन मोहून टाकते. जुन महिन्यातील हलक्या सारी , जुलै ऑगस्ट मधील कोसळणारा पाऊस आणि मग सप्टेंबर मधील परतीचा पाऊस ….. पाऊस कुठल्याही रूपात येऊ दे तो नेहमी छानच वाटतो ……पाऊस पडून गेल्यावर लकाकणाऱ्या पाना प्रमाणे मन ही अगदी ताजे तवाने करून जातो हा पाऊस. …. .
लहानपणी पाऊस पडू लागला की घरच्या गच्चीत भिजायला खूप धमाल येत असे. कधी शाळेत जातानाच खूप जोरदार पाऊस पडत असे. मग दप्तर रेनकोट सांभाळून कसे बसे शाळेत पोचावे तर शाळेच्या भवती पाणी साठले असे. आणि शाळेला सुट्टी दिली असे. मग परत सर्व सांभाळत घरी या… थोडा वैताग येई तर …तर थोडे मन खुश पण होत असे …अचानक मिळालेल्या सुट्टीमुळे . … आमचे कॉलेज अगदी समुद्राच्या च्या जवळ होते. त्या मुळे पावसाच्या दिवसात कधीही मनात आले की आम्ही मस्त समुद्रकिनारी फिरायला जात असू. सुसाट वाऱ्यामुळे छत्री देखील उलटी होत असे…. सोबतीला मित्र मैत्रिणीच्या गप्पा … मग आणखी धमाल येत असे. आणि नंतर मग सत्कार हॉटेल मध्ये जाऊन “आईसक्रीम ” खाणे हा प्रोग्राम ठरलेला होता… मस्त धमाल मस्ती चे दिवस होते … तरुणपणी हाच पाऊस आणखी वेगळा वाटतो …. उगाचच कोणाची तरी आठवण करून देणारा किंवा कुणी तरी आपल्या सोबत हवे पावसात भिजण्यासाठी असे वाटणारा …..रोमँटिक पाऊस….
माझी मुलगी लहान असताना पाऊस आला की खिडकीतून बाहेर हात काढून ती बोलत असे ,” आई, पाऊ आला.” अजूनही ही पाऊस आला की खिडकीतूंन हात बाहेर काढलेली दोन वर्षाची छोटी मिहिकाच मला दिसते. आणि नकळत मन तिच्या लहानपणीच्या आठवणीत रमते.
खिडकीत बसून बाहेर पडणारा पाऊस पाहणे सुद्धा एक गंमत असते. घरांच्या छपरावरून पडणारा पाऊस, झाडाच्या पानावरुन ओघळणारा पाऊस, जोराच्या वाऱ्यासोबत धावणारा पाऊस ….एकच तो पाऊस आणि त्याची अनेक रूपे…. कधी असेच खिडकीत बसलेले असताना अचानक पावसाची सर येते आणि मग अचानक येणाऱ्या पावसापासून वाचताना लोकांची कशी तारांबळ उडते ते पाहताना सुद्धा गम्मत येते. …..बाहेर धो धो पाऊस , एक हातात वाफाळता चहा आणि एक हातात पुस्तक ….. ही तर माझ्यासारखे वाचनाचे वेड असलेल्यासाठी पर्वणी असते…. किंवा पावसात लॉन्ग ड्राईव्ह आणि रोमँटिक गाणी …. .. ही तर सगळ्या कपल साठी एक परफेक्ट डेट ची आयडिया असते. ..
माझ्या लहानपणी आमच्या गल्लीत खूप पाऊस आला की पाणी साचत असे. तळ मजल्यावर राहणाऱ्या लोकांच्या घरात पाणी जात असे मग ते आमच्या घरी येत. एक दोन दिवस त्यांचा मुक्काम आमच्याच घरी असे. बाहेर जोरदार पाऊस पडतोय. लाइट गेलेत , सर्वच जण घरात असत. बरेच दिवसानी सगळे असे घरात मग एक वेगळी गप्पांची मैफिल जमत असे. पाऊस पडल्याचा हा ही एक फायदा….. फॅमिली गेट together !!!
मला खूप आवडणारा पाऊस मात्र २६ जुलै २००५ ला मात्र साफ नावडता झाला होता. ….मी आणि माझी दोन वर्षाची मुलगी पावसात अडकलो होतो….आणि ब्रह्मांड आठवले… कसे बसे आम्ही घरी पोहोचलो …. तेव्हा पासून घरा बाहेर असले आणि पाऊस सुरु झाला की उगाचच भीती वाटते पावसात अडकून पडण्याची …..
- चाळिशीतली बर्फी - February 25, 2023
- अंगत पंगत - December 16, 2022
- ये उन दिनो की बात हैं…. - November 4, 2022