मी जाता…..(भाग २- शेवटचा भाग)
रात्री उशीर झाला असला तरी अविनाशला सकाळी आठला एक सर्जरी होती आणि त्या नंतर लगेच दुसरी! अनेक तास फ्लाय केलेल्या पायलटला जशी प्रत्येक लँडिंगच्या वेळी एक anxiety असते तशीच प्रत्येक ब्रेन सर्जरी ही अगदी निष्णात सर्जनाच्या देखील डोक्याला हलका शॉट असते. साला जरा चुकीची नस दाबली गेली तर पेशंट थेट कोमात जाणार नाहीतर काहीतरी भयानक गुंतागुंत निर्माण होणार! परंतु हा डोक्याचा शॉट अनेक सर्जरी केलेल्या सर्जनच्या अंगवळणी पडून सर्जरी प्रोसेसचा भाग होऊन गेलेला असतो! सर्जरी एप्रन घालून अविनाश ot मध्ये पोहोचला. सहकारी डॉक्टर आणि नर्सेस नी सर्व तयारी करून ठेवली होती. अविनाश ऑपरेशन टेबलवर ठेवलेल्या भूल दिलेल्या आणि गोटा केलेल्या पेशंट समोर आला. चेहऱ्यावर मास्क लावून त्याने सवयीने हात पुढे केल्यावर सिस्टर ने हातात सर्जरीची नाईफ दिली. अविनाश नाईफ चालवणार इतक्यात त्याला कसलीतरी आठवण झाली. त्याने सिस्टर देवकीला प्रसादचे सगळे रिपोर्ट दोन्ही सर्जरी करून तो जायच्या आत त्याच्या टेबल वर ठेवायची सूचना दिली. सिस्टर देवकी घाईत ot मधून बाहेर पडली. अविनाश ने शांतपणे समोर असलेल्या पेशंटचा मेंदू खोलायला सुरुवात केली!
इथे सकाळी अंघोळ झाल्यावर प्रसादची ब्लड आणि युरिन सॅम्पल घेतली गेली. सिटी स्कॅन आधी पाणी देखील प्यायची परवानगी नव्हती. प्रसादला सिटी स्कॅन कक्षात नेण्यात आलं. अर्थात प्राजक्ता बरोबर होतीच. सिटी स्कॅनच्या मशीन मध्ये जाताना प्रसादला जाणीव झाली की त्याचा आजार गंभीर आहे. घरर आवाज करत सरकत प्रसादच डोकं स्कॅनर च्या पोकळीत शिरलं. प्रसाद ने डोळे मिटून घेतले होते. आज रेडिओलॉजिस्ट स्वतः स्कॅन साठी हजर होते! लक्ष ठेऊन होते. निरीक्षण करत होते. मशीन मधून बाहेर आल्यावर प्रसाद प्राजक्ताला म्हणाला “मला ह्यातून बरं व्हायचंय प्राजक्ता! माझ्या नंतर तुमचं काय होईल?” त्यावर प्राजक्ता म्हणाली “तू फार विचार करतोस ना म्हणून डोकं दुखतं तुझं. बाकी काही नाही. बघ रिपोर्ट नॉर्मल येतील आणि अविनाश उद्या तुला डिस्चार्ज देईल.”
वॉर्ड मध्ये आल्यावर जेवून काही औषधे घेऊन प्रसाद झोपी गेला. कदाचित त्या गोळ्यांमध्ये झोप येणारी एखादी गोळी होती! संध्याकाळी प्राजक्ताने डोक्यावर हात फिरवत प्रसाद ला जागा केला. तो उठतोय पाहून ती तोंडावर ओढणी दाबून लांब जाऊन उभी राहिली. प्रसादला समोर सिरीयस चेहऱ्याने उभा असलेला अविनाश दिसला. प्रसाद ने त्याला विचारलं-
प्रसाद- ए अवि, काय झालंय मला? असा सिरीयस का तू?
अविनाश थंडपणे म्हणाला-
अविनाश- पश्या तुझ्या मेंदूमध्ये ट्युमर आहे! तो रिमूव्ह करावा लागणार आहे!
हे ऐकल्यावर प्राजक्ता ने हुंदका दिला आणि ती धावत बाहेर गेली! प्रसाद प्रचंड हादरला होता!
प्रसाद- ए अवि, मी जगेन ना यार? अरे माझ्या नंतर घरच्यांचं काय होईल?
अविनाश- मी प्रयत्न करतो माझ्या बाजूने. पण मी तुझा मित्र आणि डॉक्टर दोन्ही आहे. जे आहे ते सांगतो. ग्रोथ मोठी आहे. सर्जरी क्रिटिकल आहे आणि नंतर पण ऑब्झरवेशन मध्ये राहावं लागेल. बाकी its nature. मेडिकल सायन्सला पण लिमिटेशन आहेत. त्या पलीकडे गॉड आणि miracle मोठी भूमिका निभावतात!
हे बोलून अविनाश निघून गेला! प्रसादची सर्जरी दुसऱ्या दिवशी सकाळी प्लान केली होती. प्रसाद प्राजक्ताला म्हणाला-
प्रसाद- प्राज, अवि म्हणाला की माझा भरोसा नाहीये. ए मला काही झालं तर माझ्या नंतर तुमचं काय होणार ग?
प्राजक्ता- प्रसाद, हा विचार नको करू आता. मी देवाची प्रार्थना करते आहे. तू पण कर.
हे बोलून प्राजक्ता ने घरातील पूजेची गणपतीची मूर्ती त्याच्या हातात दिली आणि म्हणाली-
प्राजक्ता- येते मी सकाळी. अथर्व वाट बघत असेल. आई बाबांना आणि वंस ना कळवलं आहे. उगाच येऊ नका सांगितलं आहे. प्राजक्ता गेली आणि प्रसाद मुठीत असलेल्या गणपतीची आराधना करत झोपी गेला. सकाळी आलेल्या हेल्पर ने त्याचा गोटा केला. प्रसादला ot मध्ये नेण्यात आलं. तिथे अविनाश आणि आणखी दोन डॉक्टर आणि नर्स होते. भूल देणारे डॉक्टर पुढे झाले आणि एक स्माईल करून त्यांनी प्रसादच्या हाताला जोडलेल्या आयव्ही नळीत भूल द्यायचं औषध सोडलं! क्षण भरात प्रसाद दुसऱ्या दुनियेत गेला!
प्रसादला शुद्ध आली तेव्हा दुपारचा एक वाजला होता. त्याने डोळे उघडल्यावर प्राजक्ता समोर उभी होती. त्याने क्षीण आवाजात विचारलं-
प्रसाद- झालं माझं ऑपरेशन?
प्राजक्ता- हो…
प्रसाद- मला पाणी दे. घसा सुकला आहे.
प्राजक्ता ने त्याला पाणी दिलं. खायला परवानगी नव्हती. आयव्ही मधून अन्न सप्लाय सुरू होता. प्रसाद अजूनही ग्लानीत होता. संध्याकाळी अविनाश आला. त्याने प्रसादला परिस्थिती समजावून सांगितली-
अविनाश- प्रसाद आम्ही ट्युमर रिमूव्ह केला आहे. पण तुला काही दिवस इथेच अंडर ऑब्झर्व्हेशन राहावं लागेल.
प्रसाद- पण अवि मी जगेन ना? अरे माझ्या नंतर ह्यांच काय होईल?
अविनाश- ती सध्या तुझं काय होईल ह्याकडे लक्ष दे. तू नसलास तरच ह्यांच काय होईल हा प्रश्न निर्माण होईल ना? पण तू आहेस ना अजून? सो तू मनातून बाकी विचार काढ आणि लवकर बरा व्हायची इच्छा मनात बाळग. Like i said, medial science has its limitations. Often patients recover thanks to their will power! सो आता तो विचार कर!
हे बोलून अविनाश गेला. प्रसाद प्राजक्ताला सर्व गुंतवणुकी, ऑफिस मधून मिळू शकणारा पीएफ ह्या बद्दल सांगू लागला. त्याला थांबवून प्राजक्ता म्हणाली-
प्राजक्ता- अविनाश काय म्हणाला ऐकलस ना? तू आहेस अजून. मग तू पुढेही कसा असशील ह्याचा विचार कर. तुझ्यानंतर आमचं काय हे आम्हाला ठरवू दे!
प्राजक्ता गेली. त्या नंतर जवळजवळ वीस दिवस प्रसाद हॉस्पिटल मध्ये होता. प्राजक्ता रोज सकाळी संध्याकाळ तासभर येत असे. बाकी आई वडील, बहीण, मित्र, कलीग, शेजारी सगळे येऊन भेटून गेले. त्याचा किती मोठा गोतावळा आहे ह्याची प्रसादला जाणीव झाली! बावीस दिवसांनी प्रसादला डिस्चार्ज होता.
डिस्चार्जच्या दिवशी सकाळी प्राजक्ता हॉस्पिटल मध्ये आली. सर्व फॉर्मलिटी संपवून प्रसादला घेऊन त्याच्या बहिणीच्या गाडीतून घराकडे निघाली. अविनाश ot मध्ये असल्याने त्याला भेटू शकला नाही. प्रसाद घरी आल्यावर त्याचे आई वडील, बहिणीचा नवरा, अथर्व आणि अविनाश त्याच्या स्वागताला हजर होते. अविनाशला तिथे पाहून प्रसादला आश्चर्य वाटलं.
प्रसाद- अवि तू? तू तर ot मध्ये होतास ना?
अविनाश- पश्या बस जरा.
प्रसाद सोफ्यावर बसला. अविनाश बोलू लागला.
अविनाश- पश्या, मीट माय वहिनी प्राजक्ता. ती इन्श्युरन्स एजंट आणि इन्व्हेस्टमेंट कन्सल्टंट आहे. चार दिवसांपूर्वीच लायसन्स मिळालं आणि चार दिवसात वीस हजार कमिशन कमावलं आहे तिने. आणि हा अथर्व. प्राजक्ताचा मुलगा. त्याने भरपूर अभ्यास करून डॉक्टर व्हायचा निर्धार केला आहे. त्यासाठी जो खर्च लागेल तो उचलायला गरज पडल्यास प्राजक्ताला तिचे सासू सासरे, नणंद आणि दिर डॉ. अविनाश मदत करणार आहेत. लवकरच प्राजक्ता डिजिटल मार्केटिंगचा व्यवसाय सुरू करणार आहे. त्यासाठी तिचे ऑनलाईन फ्रेंड्स तिला मदत करणार आहेत. ह्यात तू कुठेही नाहीयेस.
प्रसाद हे ऐकून अवाक झाला.
अविनाश- तुझ्या नंतर हे असेच स्वतःच्या हिमतीवर जगणार आहेत. मित्रा काय आहे ना आपल्या नंतर काय ही भीती जाणाऱ्याला असते. जे मागे उरतात त्यांच्या दृष्टीने ती काळजी नसते तर एका महत्त्वाच्या निर्णयाची सुरुवात असते. जगात कोणाचंच कोणावाचून अडत नाही. हां, सुरुवातीला त्यांना गेलेल्याची उणीव जाणवते. पण आयुष्य त्यांना गेलेल्या व्यक्तिशिवाय स्वतःच्या हिमतीवर जगायचा मार्ग दाखवून त्यावर चालायची हिंमत देतं! त्यामुळे माझ्या नंतर काय ऐवजी मी असताना त्यांच आयुष्य जास्तीतजास्त आनंदी कसं करता येईल ह्याचा विचार करून त्यासाठी प्रयत्न करावे.
प्रसादच्या डोळ्यात पाणी आलं. तो उद्दिग्नपणे म्हणाला-
प्रसाद- यार…डोळे उघडले माझे. पण खूप उशिरा. माझ्या नंतर हे जगू शकतात हे पाहून टेन्शन संपलं माझं! तो वेडेपणा होता हे पण लक्षात आलं! पण काय उपयोग! आता पुढल्या जन्मात तुझा सल्ला लक्षात ठेवेन! हा जन्म तर संपेल लवकरच….
अविनाश- का संपेल? ठणठणीत आहेस की तू…
प्रसाद- (आश्चर्याने) प…पण माझा ट्युमर?
अविनाश- कसला ट्युमर? तुला काहीही झालेलं नाही. तुझ्या मनातला स्ट्रेस आणि टेन्शनचा ट्युमर घालवायला मी तुला मेंदूचा ट्युमर असल्याचं सांगून सर्जरी वगैरेच नाटक केलं!
प्रसाद- काय?
प्राजक्ता- हो…अविनाश आणि आम्ही सगळ्यांनी ठरवून हे केलं! तुला काहीही झालेलं नाहीये!
अविनाश- पण पश्या लक्षात ठेवायचं की तू आता नाहीयेस. म्हणजे आहेस. पण हे सगळे तुझ्या नंतरच आयुष्य जगणार आहेस. तुझ्यावर त्यांची जबाबदारी वगैरे नाहीये. त्यामुळे त्यांच्या आयुष्यात कोणतीही ढवळाढवळ करायची नाही कारण जगात नसलेले लोक तसं करू शकत नाहीत. बाकी प्राजक्ताचा मित्र बन आणि तिला आनंदी ठेव. सपोर्ट कर. तुझं आयुष्य आनंदाने जग कोणताही स्ट्रेस न घेता. अथर्वचा पण मित्र बन. तुझ्यानंतर ह्यांच काय ह्या प्रश्नाचं उत्तर तुला रोज बघायला मिळणार आहे. ते बघ. बाकी तू ठणठणीत आहेस.आनंदी रहा! फक्त विनाकारण चिंतेने निर्माण झालेला स्ट्रेस नावाचा ट्युमर तुझ्या मनातून मी आता काढला आहे!
प्रसादच्या डोळ्यात पाणी होत. त्याने हात पसरले. प्राजक्ता आणि अथर्व त्याच्या मिठीत सामावले! मागे हसत उभा असलेल्या अविनाशला पाहून प्रसाद ने हात जोडले!- © मंदार जोग
समाप्त
Latest posts by mandar jog (see all)
- व्हॅलेंटाईन डे- सर्व भाग (१ ते ६) एकत्र - February 18, 2024
- वारसा (भाग ७) - November 27, 2023
- वारसा (भाग ६) - October 30, 2023