लेकीच्या माहेरासाठी….
कालच माझ्या माहेरी म्हणजे गिरगांवला जाऊन आले. आता आई बाबाचे ही वय झालंय म्हणून छोटया मोठया कामासाठी बऱ्याच फेऱ्या होतात. मी तर खूषच असते माहेरी जायला मिळणार म्हणून. त्यानिमित्ताने त्यांच्या सोबत गप्पा होतात. एकत्र जेवण केल जात. लहानपणीच्या आठवणी जाग्या होतात. पूर्वी कसे अगदी दररोज एकत्र असायचो तेव्हा कधी त्याचे अप्रूप नव्हते पण आता मात्र असा एकत्र घालावेलला एक एक क्षण जपून ठेवावासा वाटतो. माहेरी गेल्यावर मिळणारी मायेचा सुगंध श्वासात भरून राहतो आणि सतत मनात दरवळत राहतो. माझ्या लग्नाला बरीच वर्षे झालीत. आता माझ्या मुलां आणि नवऱ्या मध्ये मी पूर्ण पणे रमली आहे. आता अगदी वारंवार माहेरी जावेसे वाटतं नाही पण तरीही माहेरी जायची आतुरतेने वाट पाहत असते. माझ्या वाटेकडे डोळे लावून बसलेले आई बाबांचे डोळेच परत परत माझी पावलं माहेरी वळवतात. एकदा तिकडे गेली की अगदी परत लहान झाल्याचा feel येतो. कसली जबाबदारी नाही, टेन्शन नाही. नुसते लाड करून घ्या. आई बाबांशी छान मनमोकळ्या गप्पा करा….. कितीही वेळ त्यांच्या सोबत घालवला तरी अपुराच वाटतो.
गिरगांव सारख्या ठिकाणी माहेर असल्यामुळे शॉपिंग भटकंती आणि खवय्येगिरी ही मनसोक्त करता येते. गिरगावात फिरताना सारे शाळेपासूनचे दिवस आठवतात. मैत्रीण सोबत केलेली धमाल आठवते. शेजारी पाजाऱ्या शी ही मनसोक्त गप्पा होतात. कधी आमच्या चिकिस्तक शाळेजवळून जात असलं आणि नेमकी शाळेची मधली सुट्टी असली की अगदी वाटतं आपण ही तो युनिफॉर्म घालावा आणि वर्गात जाऊन बसाव आणि परत ती सारी धमाल करावी……गिरगावातल्या साऱ्या गल्ली बोळात फिरताना किती तरी जुन्या स्मृती जाग्या होतात…..कधी जुने मित्र मैत्रिणी भेटतात कधी जुने शेजारी…..खूप छान वाटतं सगळ्यांना भेटून. मन कस आनंदी होते……
तर मी बोलत होते माहेरा विषयी. माहेर हा प्रत्येक स्त्री च्या मनातील हळवा कोपरा असतो. लग्नाला कितीही वर्ष झाली तरी हा माहेरचा कोपरा नेहमीच स्पेशल असतो. माझ्या माहेरचं कुणी माझ्या घरी भेटायला आल तरी मी खूप खुश असते. नवरा चिडवत असतो बघा माहेरची माणसं येणार म्हणून किती खुश आहे. त्याला मी मग बोलते तुझी लेक जेव्हा माहेरी येईल तेव्हा तुला कळेल मला काय वाटते ते ! अजूनही माहेरून निघताना डोळे पाणावतात. घशात आवंढा येतो….अरे किती पटकन गेले हे दिवस असे वाटते…. आई तर महिनाभर पुरेल इतका खाऊ बांधून देते. ह्या साऱ्या खाऊची स्पेशल चव आणि त्यातली माया फक्त एका माहेरवासिणीलाच कळू शकते…… मलाही एक मुलगी आहे काही वर्षांनी तिचेही लग्न होईल मग……… .. नुसत्या विचारानेही माझे व नवऱ्याचे डोळे पाणावतात……पण बहिणाबाईच्या कवितेतील एक ओळ आठवते “लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते “….आणि मग मी माझ्या लेकीच्या माहेरात नांदू लागते
- चाळिशीतली बर्फी - February 25, 2023
- अंगत पंगत - December 16, 2022
- ये उन दिनो की बात हैं…. - November 4, 2022