शाळा…

गेले चार दिवस बेशुद्ध असलेल्या शिंत्रे बाईंनी आज डोळे उघडले. वृद्धाश्रमातून म्युनिसिपल हॉस्पिटल मध्ये दाखल केल्यावर शुद्ध गेलेल्या त्यांना, स्वतःला एका अद्यावत इस्पितळात पाहून आश्चर्य वाटलं. समोर उभा असलेला डॉक्टर म्हणाला-
डॉक्टर- बाई मी अमोल भुस्कुटे. तुमचा विद्यार्थी. ओळखलं का?
बाईंना ओळख पटली. अमोल ने त्यांचा चष्मा त्यांच्या डोळ्यावर लावला. बाईंनी डोळे बारीक करून त्याला पाहिला.
बाई- भुस्कुटे म्हणजे ८९ ची बॅच ना रे?
अमोल- हो बाई बरोबर.
बाई- पण मी इथे कशी रे? मला तर आश्रमवाल्यानी सरकारी हॉस्पिटल मध्ये ठेवलं होतं.
अमोल- बाई आपला पाटील आठवतो का? आमच्या वर्गातला?
बाई- गणिताला घाबरणारा पाटील. बरोबर ना?
अमोल- हो बाई. तुम्ही त्याची स्पेशल तयारी करून घेतली होती दहावीच्या परिक्षेआधी. म्हणून पास झाला. आता तो पोलिसात आहे. तो त्या दिवशी एका केस साठी सरकारी हॉस्पिटल मध्ये आला होता आणि तुम्हाला त्याने ओळखलं. आणि मला फोन केला. मी म्हणालो लगेच इथे घेऊन ये. बाई मी एच ओ डी आहे इथे. मीच उपचार करतोय तुमच्यावर. उद्या आयसीयू मधून शिफ्ट करतो तुम्हाला. दोन दिवसात डिस्चार्ज देऊन घरी नेतो.
बाई- घर विकलं रे मी मिलिंदला अमेरिकेला शिकायला पाठवताना पैसे हवे म्हणून! भाड्यावर रहात होते. मिलिंदने तिथेच लग्न केलं आणि तिथेच राहतो. मी रिटायर झाल्यावर एकदा आला आणि  मला आश्रमात ठेवलं तब्बेतीची काळजी म्हणून. तिथले पैसे जेमतेम भरते मी. पण  इथलं बिल कस देऊ बाळा? मिलिंद तर माझे फोनही घेत नाही. विसरला आहे मला.
अमोल- बाई, बिलाची चिंता करू नका. आणि तुम्ही इथून माझ्या घरीच यायचं आहे. आश्रम विसरा आता. बाई तुम्ही इतकं छान शिकवलं म्हणून आम्ही आज आयुष्यात उभे आहोत. तुम्हाला इथे ऍडमिट केल्यावर मी आणि पाटील ने आमच्या शाळेच्या ग्रुप मध्ये ते सांगितलं. आम्ही सगळे भेटलो. आम्ही ठरवलं आहे की आता तुम्ही आमच्या घरी राहायचं. कोण तुम्हाला नेणार ह्यावर वाद झाले. सगळेच न्यायला उत्सुक आहेत. शेवटी असं ठरलंय की तुम्ही प्रत्येकाच्या घरी तीन तीन महिने राहायचं. आम्ही पंचवीस जण आहोत अजून कॉन्टॅक्ट मध्ये. म्हणजे तुमची सहा वर्षांची सोय झाली आहे आत्ताच.
बाई- पंचवीस त्रिक पंचाहत्तर. पंचाहत्तर महिने म्हणजे फक्त सहा वर्ष नाही रे भुस्कुटे. वरचे तीन महिने कसे विसरलास?
अमोल- (हसून) बाई माझं गणित अजूनही तसंच थोडं कच्चं आहे.
बाई- पण शास्त्रात तुला पैकीच्या पैकी होते दहावीला. बरोबर ना?
अमोल- हो बाई..
बाई- पण कशाला रे बाळा तुम्हाला त्रास. तुमचे संसार असतील. मी जाईन माझ्या आश्रमात परत.  राहिलेत किती दिवस माझे?
अमोल- ते मला नका सांगू. आयसीयू बाहेर जे पंचवीस जण उभे आहेत ना त्यांना सांगा.
अस म्हणून अमोल ने आयसीयूच दार उघडलं. पंचवीस शाळकरी मित्र मैत्रिणी आवाज न करता सावकाश आत येऊन बाईंच्या सभोवार उभे राहिले. त्यांच्या चेहऱ्यावर दिसत असलेलं प्रेम, आदर आणि आस्था बाईंना सगळं सांगून गेल्या. बाईंच्या डोळ्यात अश्रू तराळले. पोरांनीही हळूच डोळे पुसले. आज गुरू पौर्णिमा होती. बाईंना आज मुलांनी गुरू दक्षिणा दिली होती. आयसीयू मध्ये शांतता आणि मशिन्सची टिकटिक सुरू होती. पण बाई आणि मुलांच्या मनात परत एकदा मुलांच्या चिचिवाटाने गजबजलेली शाळा भरली होती!- © मंदार जोग
mandar jog

mandar jog

मंदार जोग ह्यांची कटिंग पिनाकोलाडा, वन बाय टू मार्गारिटा आणि कोनिएक कथा ही तीन पुस्तक प्रकाशित झाली असून त्यांच्या साडेचार हजार प्रती छापील आणी इबुक स्वरूपात विकल्या गेल्या आहेत. दृकश्राव्य, प्रिंट तसेच सोशल मिडीयावर मंदार जोग नियमित लिखाण करत असतात. लेखक ऑनलाईन ह्या संकल्पनेला सत्यात आणणाऱ्या टीमचा मंदार जोग एक हिस्सा आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!