कोकण यात्रा भाग ३ (शेवटचा भाग)
आज सकाळी लवकर हॉटेल सोडलं. मालगुंड पासून कऱ्हाटेश्वर वीस ते पंचवीस किलोमीटरवर आहे. पण ते अंतर पार करायला लागणारा वेळ जवळजवळ एक तास आहे अस map सांगत होता. त्याच कारण खराब रस्ता. आम्ही निघालो. आज जवळजवळ दहा बारा वर्षांनंतर कऱ्हाटेश्वराच दर्शन होणार होत. रस्ता patches मध्ये खराब आहे. पण कोकणातील सगळ्याच रस्त्यांची ती स्थिती आहे. गुळगुळीत असलेल्या रस्त्यावर अचानक एका ठिकाणी काही मोट्ठे खड्डे आहेत. रात्री गाडी चालवताना तर खूप काळजी घ्यावी लागते. राष्ट्रीय आणि स्टेट हायवे बरोबरच कोकणातील इतर रस्ते जे लहान लहान गावांना जोडतात ते सुद्धा चांगले होण आवश्यक आहे. आम्ही मजल दरमजल करत कऱ्हाटेश्वर मंदिराजवळ पोहोचलो. गाडी पार्क करून उतरलो आणि कमानीजवळ आलो. मंदिर अजून तसच आहे. माझ्या स्मृतीत कोरलं गेल आहे तसंच. पायऱ्या उतरून खाली जाऊ लागल्यावर डावीकडे गणपती आणि आणखी खाली कऱ्हाटेश्वर. आम्ही पोहोचलो तेव्हा पूजा सुरु होती. मंदिरात उदबत्तीच्या धुराचा आणि फुलांचा पवित्र वास भरून राहिला होता. आम्ही दर्शन घेतलं. आमच्या कुळाच, आमच्या अनेक पिढ्यांचं कल्याण आणि रक्षण करणाऱ्या कऱ्हाटेश्वरासमोर नतमस्तक झालो. त्याच रूप डोळ्यात आणि कॅमेऱ्यात साठवून घेतलं. इतक सुंदर दर्शन झाल्यावर मनाला जे अपरिमित समाधान मिळत ना ते शब्दात नाही सांगता येत. ते ज्याच त्याला अनुभवता येत. कऱ्हाटेश्वराचा परिसर खूप सुंदर आहे. आम्ही दर्शन घेऊन बाहेर येऊन आणखी खाली जाऊन गोमुखाजवळ गेलो. तिथून समोर दिसणार अप्रतिम दृश्य कॅमेऱ्यात कैद केलं. लवकरच परत यायचा निश्चय करून तिथल्या झाडावरून पडलेली काही प्राजक्ताची फुलं वेचून घेऊन आम्ही त्या दगडी पायऱ्या चढून पुढल्या प्रवासासाठी निघालो. आमच्या ह्या ट्रिपचा मुख्य हेतू देवदर्शन होता. तो आता पूर्ण झाला होता. आता मामाच्या घरी गुहागरला मजा करायला जायचं होत. गाडीत बसलो. कऱ्हाटेश्वर ते गुहागर अंतर साधारण छत्तीस किलोमीटर. पण वेळ दीड तास लागणार होता. त्यातही काही किलोमीटर फेरी ने प्रवास. आम्ही निघालो. गाडीत पसरलेला प्राजक्ताच्या फुलांचा वास मला माझ्या लहानपणीच्या कोकणच्या अंधुक आठवणीत घेऊन गेला.
आता नीट आणि सलग आठवत नाही. पण आम्ही खूप लहान असताना आई वडील, मी आणि भाऊ असे चौघे मुंबई ते रत्नागिरी विमानाने गेलो होतो. तो माझ्या आयुष्यातील पहिला विमान प्रवास! आता ती विमान कंपनी अस्तित्वात नाहीये. मला वाटत सध्या रत्नागिरीला विमानसेवाच उपलब्ध नाहीये. पण मला पक्क आठवतंय ATR पद्धतीच ते विमान मुंबईहून उडून रत्नागिरीच्या दिशेने निघालेलं. खिडकीत बसलेल्या मला खाली दिसत असलेले समुद्र किनारे. तेव्हा आम्ही रत्नागिरीत माझ्या आत्याच्या सासरी आणि राजापुरात आमच्या गुरुजींच्या घरी राहिलो होतो. आमचं घर तेव्हा पाहिलं होत. अर्थात आता तिथे ज्यांना ते विकल होत ते रहात होते. आत्याच सासरच घर थोड नवीन होत. तरीही दारात अंगण. बाहेर जास्वंदी, फणस ह्या बरोबर पेरुच झाड होत. मी स्वतः त्या झाडावरून पेरू काढल्याच माझ्या स्मरणात आहे. आणि राजापूरला आमच्या गुरुजींच घर टिपिकल कोकणात जशी सारवलेली घर असतात तस होत. घराशेजारी गोठा होता. आम्ही जायच्या दोनच दिवस आधी त्यांच्या म्ह्शीला रेडकू झालं होत. त्यांच्या अंगणात प्राजक्ताच झाड होत आणि सकाळी उठून बाहेर आल की अंगणात प्राजक्ताच्या शेकडो फुलांचा सडा पडलेला असायचा आणि त्याचा वास शेणाच्या आणि सरपणाच्या वासात मिसळून एक अप्रतिम वास निर्माण व्हायचा. मला आजही डोळे मिटल्यावर ती सकाळ, तो प्राजक्ताचा सडा आणि तो वास जसाच्या तसा आठवतो!
आम्ही जयगड जेट्टीवर पोहोचलो. आमचा पहिला नंबर लागला. फेरी यायला अजून अर्धातास अवकाश होता. सकाळपासून काहीच न खाता प्रवास झाल्यामुळे थोडी भूक लागली होती. खायला बरोबर आणलेला खाऊ होताच पण चहा प्यायची फार इच्छा झाली होती. बायको आणि कन्या चहा पीत नसल्याने मला एकट्याला गरज होती! तिथे हॉटेल वगैरे काहीच नाहीये. मी चहा शोधत थोडा पुढे गेलो तर एक लहानसा स्टोल दिसला. टिपिकल पाणी, वेफर, बिस्कीट, सिगारेट, चहा आणि कोल्ड ड्रिंकचा स्टोल. मी चहा घेताना मला आतून वड्यांचा वास आला. भूक चाळवली. बायको आणि कन्या गाडीतच होत्या. मी तीन गरमागरम वडापाव बांधून घेतले. वडापाव खाऊन जरा बर वाटलं. काही वेळात फेरी आली. गाडी फेरीत टाकणे हा प्रकार कन्या पहिल्यांदाच अनुभवत होती. आम्ही गाडी पार्क करून वर गेलो. वरच्या डेक वरून समुद्र, आपण सोडत असलेला किनारा आणि आता पोहोचत असलेला किनारा बघताना आयुष्यात घडणार्या अनेक स्थित्यंतरांची आठवण होत राहिली. आपण प्रत्येकाने आजवरच्या आयुष्यात कितीतरी लोक, जागा, शहरे, अनुभव, नोकऱ्या, गाड्या, वस्तू सोडून दुसऱ्या धरलेल्या असतात. ऐल तीरावरून पैलतीरावर प्रवास सुरूच असतो. असो. आमची फेरी तवसाळ जेट्टी वर पोहोचली. आता तासभर प्रवास आणि गुहागरला पोहोचायचं. मामाचा मेसेज येतच होता. मामा वाट बघत होते. आम्ही निघालो. परत एकदा patches मध्ये चांगला आणि खराब असलेल्या रस्त्यावर प्रवास करत आम्ही गुहागरला पोहोचलो. मी आयुष्यात पहिल्यांदा गुहागरला जात होतो. अगदी लहानपणापासून आईचय तोंडून गुहागरच्या, तिथल्या लोकांच्या असंख्य कथा ऐकल्या होत्या. माझ्या डोळ्यासमोर त्या गुहागरच एक चित्र होत. आम्ही अंगणात गाडी लावून मामाच्या घरात गेलो. मामा खास आमच्यासाठी चिपळूण वरून आला होता. हा मामा आता चिपळूणला असतो. त्याचा व्यवसाय सुद्धा तिथेच आहे. आजोबा गेल्यावर मामाने ते जुन घर अद्यावत केल आहे पण मूळ ढाचा तसाच ठेऊन. त्यामुळे कोकणातील घरांच्या ओटी, पडवी, माजघर वगैरे संकल्पनेला आणि रचनेला धक्का न लावता तेच घर आणखी मजबूत आणि आधुनिक सुखसोयींनी सज्ज केल आहे. पूर्वी बाहेर संडास होते. आता घरात कमोड आहे. घरी गेल्याबरोब्बर मामाने माझ्या बायकोला सांगितल हे किचन. ह्याचा ताबा तुझ्याकडे. चहाच समान आहे. कॉफी आहे. हव तेव्हा करून घ्या. मामा एकटाच आला असल्याने जेवणाची सोय बाहेर हे निश्चित होत. आम्ही जरा सेटल झालो तर शेजारीच राहणारी मावशी आणि तिचे यजमान आले. आम्हाला त्यांच्या घरी घेऊन गेले. तिथे तिने इडली खायला घातली. सर्वांची चौकशी केली. तिथे पोहोचेपर्यंत आमच्या गाडीच्या एका टायर मध्ये हवा कमी झालेली आमच्या लक्षात आली होती. आम्ही गाडी घेऊन टायरच्या दुकानात गेलो आणि त्यात हवा भरून तो टायर काढून त्याच्या जागी स्टेपनी बसवून वाटेत जेवून घरी आलो.
दुपारी जरा डुलकी काढून संध्याकाळी मामा बरोबर गुहागर फिरलो. वरचा पाट, देवाचा पाट आणि खालचा पाट अस पसरलेलं गुहागर. तिथली देवळ. वेगवेगळी घर. आम्हाला मामाने त्यांच जून घर दाखवलं. आजही ते तसच उभ आहे. किमान दोनशे वर्ष जुन! कोकणचा ट्रेडमार्क असलेल लाल दगडांच आणि लाकडाच मजल्याच घर. आता तिथे राहणारे सांगत होते की त्या घराच्या पहिल्या मजल्यावर दिसत असलेला रंग त्यांनी कधीच बदलेला नाही. तो वर्षनुवर्ष तसाच आहे. मामा आम्हाला जुन्या जुन्या आठवणी, आमचे आजोबा, त्यांची भावंडे ह्याविषयी सांगत होता. त्यातील अनेक लोकांबद्दल आईकडून ऐकून माहित असल्याने मी ते सर्व रिलेट करू शकत होतो. आम्ही आमच्या आजीची शाळा पाहिली. गुहागर म्हणजे माझ्या आईच्या आईच माहेर. माझ्या आईच आजोळ. आमची आजी ही गुहागर मधील शाळेत जाणारी पहिली मुलगी होती. ती घरून शाळेत निघाली की दुतर्फा असणाऱ्या घरातून लोक आश्चर्याने बघत असत आणि आजीला फार लाज वाटे. म्हणून ती हाता छत्री घेऊन स्वतःला लपवत शाळेत जात असे अशी गम्मत आम्ही आईकडून आणि स्वतः आजीकडून ऐकलेली होती. ती शाळा पाहिल्यावर मला मामाच्या घरापासून शाळेपर्यंतच्या त्या रस्त्यावर हातात छत्री धरून, पुस्तक छातीशी कवटाळून शाळेत येत असलेली माझी आजी डोळ्यासमोर दिसत होती! तिथून मग काही देवळात द्दर्शन घेऊन गावाचा फेरफटका मारून घरी आलो. संध्याकाळी घरच्याच मागे असलेल्या प्रचंड वाडीतून चालत समुद्र किनारी गेलो. शांत, अजिबात गजबजाट नसलेला समुद्र किनारा. खूप प्रसन्न वाटलं. छान सूर्यास्त पाहिला. काही फोटो काढले आणि परत आलो.
रात्री दुसऱ्या मामाने त्याच्या घरी बोलावलं होत. आम्ही तिथे गेलो. तिथे तिघे मामा आणि मावशी असे सगळे जमले होते. सगळे गप्पा मारत होतो. मी त्या सर्वाना आयुष्यात पहिल्यांदा भेटत होतो! गुहागर ही माझ्यासाठी एक दंतकथा होती. आईने “मामाची गोष्ट” म्हणून लहान असताना मला आणि माझ्या भावाला अनेकदा सांगितलेली एक कथा. त्या कथेतील पात्र म्हणजे आईचे मामा, आजी , ते घर, आईच्या मामांचे आणि आजीचे किस्से, मुंबई ते गुहागर प्रवास. थोडा प्रवास बोटीने. बोटीचे हेलकावे, फिरकीचा तांब्या, आजी आणि आई मामा वगैरेना कोकणात सोडायला आलेले कोट टोपी घातलेले आईचे वडील, लाल मातीने माखलेले रस्ते म्हणजे गुहागर. अर्थात आता कालानुरूप बदल झाले आहेत. आईची मामा मंडळी, माझी आजी सगळेच स्वर्गवासी झाले आहेत! आईच्या कथेतील गुंडू, बाबी, श्री वगैरे मुल आज त्यांच्या वयाच्या सत्तरीत माझ्यासमोर बसलेली पाहून खूप मजा वाटत होती. माझ्या मनात ती मुल अजूनही लहान होती आणि त्या घरात मस्ती करत होती. खर तर आई तिच्या लग्नानंतर आजोळी गेलीच नाहीये. तिची नोकरी, संसार ह्यात इतकी अडकली होती की मुंबईत असलेल्या स्वतःच्या माहेरी सुद्धा नियमित जाता येत नसे. सगळ्याच स्त्रियांच्या बाबतीत थोड्याफार फरकाने हे असच घडत. त्यामुळे आईच आजोळ, तिथे रहात असलेली आईची मामे मावस भावंड आमच्या पिढीला भेटली नाहीत. म्हणजे आमच्या आठवणीत तरी नाही. कदाचित आम्ही लहान असताना एखाद्या लग्न समारंभात वगैरे भेटले असतील. पण ती पण शक्यता नाही. अर्थात जे मुंबईत होते ते मात्र नियमित भेटले. असो. तर माझ्या मनातील कथेत असलेली ती लहान मुल आज सत्तरी पार केलेले ज्येष्ठ नागरिक बनून माझ्याशी गप्पा मारत होती. तास दीड तास झकास गप्पा झाल्या. अनेक नातेवाईक, जुन्या आठवणी ह्यांना उजाळा मिळाला. मामा म्हणालेच की” नाती असतात. फक्त आपण ती जपायाची आणि जोपासायची असतात. येत जा रे मध्ये मध्ये. इथे स्वागतच आहे. मस्त जास्त दिवस वस्तीला या.”. मामा मंडळीनी बजावून सांगितल आहे की लवकरच आई, मुंबईत असलेली आईची सख्खी बहिण आणि भाऊ ह्या तिघांना चार दिवस गुहागरला घेऊन ये. बघू कधी जमत. आम्ही गेलो त्या दिवशी योगायोग असा की आम्ही ज्याच्याकडे वस्तीला होतो तो मामा एकटाच आला होता. दुसऱ्या मामाचे मुलगा आणि सून घरी नव्हते. मावशीकडे आधीपासून तिच्या सासरचे पाहुणे होते. तिसर्या मामाची बायको नेमकी बाहेरगावी होती. त्यामुळे आम्ही रात्री सुद्धा जेवायला बाहेर जायचा प्लान केला होता. मामा म्हणत देखील होते की नेमके अश्या दिवशी आला आहात की घरात जेवायला वाढता येत नाहीये! आम्ही वसुधा जोग काकूंकडे जेवायला गेलो. एकशे साठ रुपयात अनलिमिटेड रुचकर आणि जबराट थाळी. दोन भाज्या. कोशिंबीर. पोळ्या, आमटीभात, लोणचे, फोडणीची मिरची आणि चटण्या. हवे असल्यास मोदक वेगळी किंमत देऊन. पण लाजवाब चव. गुहागरला गेल्यास जोग काकूंकडे अवश्य जेवा. फक्त तिथे आधी कळवून जाव लागत. Walk in नसावं. ९१५८१५८३१६ वर संपर्क साधून चौकशी करू शकता. अर्थात शाकाहारी(च) जेवण मिळेल. पोटभर आणि सात्विक जेऊन तृप्त होत आम्ही घरी आलो. बायको आणि कन्या झोपल्या. दुसर्या दिवशी सकाळी साडेसहाला मुंबईकडे कूच करायचं होत. मी परत दुसर्या मामाच्या घरी गेलो. तिथे परत समस्त मामा लोकांशी दोनेक तास गप्पा मारून मला झोपायला अकरा वाजले.
सकाळी मामाचा निरोप घेऊन मुंबईकडे निघालो. निघायला सात वाजले. हायवे च काम जोमाने सुरु आहे. सहा पदरी कॉंक्रीट रस्ता बनतो आहे. रस्ता संपूर्ण बनायला काही महिने अथवा वर्ष लागतील. पण बनला की कोकण प्रवास सुद्धा मुंबई पुणे इतका सुखकर होईल. कशेळी घाटानंतर आम्ही माणगाव वरून पाली मार्गे मुंबईला आलो. दुपारी सवा दोनच्या सुमारास घरी पोहोचलो. देवदर्शन खूप सुंदर झाल. माझ्या मनात असलेल्या गुहागर नामक कथेला आणि त्यातील काही पात्रांना समक्ष भेटलो. ह्या कोकण ट्रीपने नाती दृढ केली, देवाशी आणि नातलगांशी सुद्धा!
– मंदार जोग
Latest posts by mandar jog (see all)
- व्हॅलेंटाईन डे- सर्व भाग (१ ते ६) एकत्र - February 18, 2024
- वारसा (भाग ७) - November 27, 2023
- वारसा (भाग ६) - October 30, 2023