कच्छी…(©मंदार जोग)
तिच्या वडिलांना म्हणजे नरेशला कच्छी बाजाची प्रचंड आवड. ती अगदी दोन तीन वर्षांची होईपर्यंत नरेश तिला खांद्यावर घेऊन दर वर्षी अनंत चतुर्दशीला वाडीच्या गणपती विसर्जन मिरवणुकीत बेभान नाचत असे. ते बाळकडू तिच्यात इतकं भिनलं की वयाच्या चौथ्या वर्षांपासून ती स्वतः देखील नरेश आणि वाडीतल्या इतर काका लोकांबरोबर विसर्जनाच्या कच्छीत नाचू लागली.
वर्ष सरत गेली. ती शाळेतून कॉलेजात गेली. नरेश आणि काका लोक गणपतीच्या काका (कार्यकारी) मंडळातून निवृत्त झाले. आता नाचताना सभोवार गोतावळा तिच्या वयाच्या पोरांचा असे. एखादी मुलगी क्वचित येऊन दोन मिनिटं थिरकून जात असे. पण पोरांच्या खांद्याला खांदा लावून, पोरांप्रमाणे तोंडात दहाची नोट धरून कच्छीवाल्याला देणारी ती एकटीच होती. तिच्या लहानपणीच्या निरागस नाचाची जागा आता आकर्षक अदांनी घेतली होती. पण त्यात फक्त ग्रेस होती. अश्लीलपणा कुठेही नव्हता. पण ते सौंदर्य पाहणाऱ्याची नजरबंदी निश्चित करत असे. तिचा नाच बघायला आजूबाजूच्या वाडीतील पोरं मुद्दाम त्यांच्या विसर्जन मिरवणुकीला येऊ लागली होती. पण निवृत्त झाले असले तरी नरेश आणि बाकी काका मंडळींची करडी नजर तिच्यावर असे हे माहीत असल्याने कोणीही वाकड्यात शिरत नसे. आणि काही वर्षांपूर्वी दारू पिऊन नाचत तिच्या अंगलट जाणाऱ्या एकाला तिने जो तुडवला होता ते सर्वांनी पाहिलं होतं. त्यामुळे तिचा नाच बघणारे बघण्यावाचून बाकी काही करायला घाबरायचे.
“बाबा मी तरुण आहे. मी आपल्या वाडीत कच्छीवर नाचते तर पोर बघणारच ना? पण मग म्हणून मी नाच बंद करू? मी आता मोठी आहे. फालतू लोकांना handle करू शकते. आणि तुम्ही पण आहातच ना लक्ष ठेवायला?” असं तिने नववीत असताना नरेशला विचारल्यावर पोरगी मोठी झाल्याचं लक्षात येऊन नरेश म्हणाला “मी आहे तोवर नाच बिनधास्त. नंतर मात्र मला माहित नाही!”
अशीच वर्ष भुर्रकन उडून गेली. गेल्याच वर्षी तिचं लग्न झालं आणि दोन दिवसात नरेश अचानक गेला! ती चार्टर्ड अकाउंटंट होऊन मोठ्या नोकरीत होती. नवऱ्याची स्वतःची मोठी CA प्रॅक्टिस होती. यंदा अनंत चतुर्दशीला दोघे महाआरतील तिच्या वाडीत आले. गणपतीच्या मांडवात नरेशचा हसरा फोटो लावला होता. तिने आधी त्याला नमस्कार केला आणि मग बाप्पाला. हे पाहून बाप्पा देखील खुश झाला असावा असं त्याच्या चेहऱ्यावरील हास्यावरून तिला वाटलं. महाआरती झाली. प्रसाद झाला. वाडीतल्या सर्वांच्या भेटी झाल्या. इतक्या मोठ्या जावई बापूंच काका लोकांनी स्वागत केलं. तिच्या बरोबरची पोरं “लग्नानंतर अजून सॉलिड दिसते ना?” ह्या विचाराने तिच्या नवऱ्यावर मनातल्या मनात जळत होती.
वाडीतल्या लोकांनी त्या दोघांना अनेक गिफ्ट दिली. गणपतीचा हार आणि प्रसादाचा पुडा पण तिच्या हातात होता. सर्वांशी बोलत असताना कच्छीवाल्याच्या सनईचा आणि ढोलाचा आवाज तिला ऐकू आला. आता कच्छी सुरू झाली होती. वाडीतली पोर बेभान होऊन नाचत होती. तिची पावलं आपसूक थिरकू लागली. पण हातात सामानाचं आणि मनावर असलेलं लग्नाचं, नव्या प्रतिष्ठेचं वजन तिला जागेवर खिळवून होतं. पाचेक मिनिटं डोळे बंद करून कच्छीचा आवाज मनात साठवून ठेवल्यावर ती नवऱ्याला म्हणाली-
ती- चला निघुया का?
नवरा- कुठे?
ती- घरी.
नवरा- इतक्यात?
ती- हो. आता विसर्जन मिरवणूक. गणपती संपला वाडीतला.
नवरा- वाडीतला संपला असेल पण तुझ्या मनातला संपलेला नाही.
तिने आश्चर्याने त्याच्याकडे बघितलं. त्याने शांतपणे स्मित करून ड्रायव्हरला फोन लावला. ड्रायव्हर येऊन त्यांच्या दोघांच्या हातातील वस्तू घेऊन गेला. नवऱ्याने तिच्याकडे प्रेमाने बघितलं आणि म्हणाला-
नवरा- कच्छीवर नाचल्याशिवाय विसर्जन होईल का तुझ्या मनातल्या बाप्पाचं?
ती काहीच बोलली नाही. मान खाली घालून उभी राहिली.
नवरा- आता तू नाचली नाहीस ना तर ते फोटोत आहेत ना ते रागावतील मला. म्हणतील माझ्या पोरीची इच्छा मारलीस. मी त्यांना लग्नात तुला सुखी ठेवायचं वचन दिल तेव्हाच त्यांनी कन्यादान केलंय हे विसरलीस का?
ती- पण…
नवरा- आता ते नाहीत पण मी आहे ना? जा बिनधास्त आणि नाच.
तिच्या डोळ्यात अश्रू होते. तिने नवऱ्याला बिनधास्त मिठी मारून गालावर एक पापी घेऊन नाचायला सुरुवात केली. कच्छीची लय वाढत गेली आणि ती बेभान होऊन नाचू लागली. नवऱ्याने तिच्या तोंडात दहाची नोट सरकवली कच्छीवाल्याला देण्यासाठी. तिने सराईतपणे ती नोट कच्छीवाल्याच्या तोंडात सरकवली. ते केल्यावर तिने हसत नवऱ्याकडे पाहिलं. आज कधी नव्हे तो तिचा नवरा दोन्ही हातांचे अंगठे उंचावून दाखवत तिला थम्स अप दाखवत होता…तिच्या लहानपणापासून तिने नाचताना हसून नरेशकडे बघितल्यावर तो दाखवत असे तसा! तिने चरकून मांडवात लावलेल्या नरेशच्या फोटोकडे पाहिलं! त्याच्या डोळ्यात आनंदाश्रू असल्याचा भास तिला झाला! आता ती बेभान नाचत डोळ्यातील अश्रूंमध्ये विसर्जन करू लागली…मनातल्या बाप्पाचं आणि मनातल्या बापाचं देखील! गाडीवर विराजमान होऊन स्वगृही निघालेला बाप्पा आता गालातल्या गालात हसत होता!©मंदार जोग
Latest posts by mandar jog (see all)
- व्हॅलेंटाईन डे- सर्व भाग (१ ते ६) एकत्र - February 18, 2024
- वारसा (भाग ७) - November 27, 2023
- वारसा (भाग ६) - October 30, 2023
सुरेखच 👌🏻👌🏻
Class