अप्पा…
अप्पा हल्ली फारच डोक्यात जायला लागले होते. आई गेल्यापासून तर खूपच. सतत कुठे जातोस, कधी येणार ह्या चौकश्या. बाप असला म्हणून काय झालं? विवेक वैतागायचा. वंदना समजूतदार होती म्हणून बरं. दुसरी कोणी सून असती तर पळून गेली असती. ह्यांना रोज चार ते पाच वेळा चहा लागतो. रात्री ब्रांडी घेतात हळूच. ती पण गरम पाण्यातून. ते गरम पाणी पण वंदना देते. अप्पांचा घसा साफ करायला म्हणून! विनीतच आजोबांवर प्रेम आणि त्यांचा पण त्याच्यावर जीव. पण त्याच्याही चौकश्या. अभ्यास झाला का, शाळेत काय झालं, कोणाच्या वाढदिवसाला जातो आहेस? विनीत वैतागायचा. पण अप्पांना कोण बोलणार ह्या विचाराने आई बाबांसारखा गप्प बसायचा.
आज विवेक रोजच्यासारखा उठला. अप्पांच्या खोलीतून आंघोळ केल्यावर ते रोज म्हणत असलेल्या रामरक्षेचा खणखणीत आवाज आला नाही म्हणून जरा थबकला. वंदनाला विचारलं-
विवेक- अप्पा उठले नाहीत का?
ती डबे बनवण्यात व्यस्त. म्हणाली-
वंदना- आवाज तरी नाही आला.
इतक्यात विनीत शाळेत जायला तयार होऊन आला. रोज अप्पा त्याला गेट जवळ स्कुल बस मध्ये बसवायला जायचे. त्याने विचारलं-
विनीत- डॅडी अप्पा कुठे आहेत?
विवेकाने चाहूल घेत अप्पांच्या खोलीचं दार उघडलं. आत कसलीच हालचाल नव्हती. त्याने दिवा लावला. अप्पा बेडवर शांत पडून होते. डोळे मिटलेले. पांढरे केस, पांढऱ्या मिश्या, अंगावर मलमलची मऊ बंडी, खाली लेंगा. अप्पा पालथे पडले होते. दोन्ही हात छातीशी धरून. ते बघून विवेकच्या छातीत धस्स झालं. वाईट विचार मनात आला. त्याने पुढे होऊन अप्पांना हाक मारली. प्रतिसाद नाही! त्याने त्यांच्या हाताला स्पर्श करून त्यांना हलकेच हलवलं! हात जीव नसल्यासारखा त्यांच्या अंगापासून बेडच्या बाजूला लटकू लागला. दारात उभी असलेल्या वंदनाला आणि विवेकला काय घडलं आहे ह्याची कल्पना आली. विनीतने विचारलं-
विनीत- आई, अप्पा का उठत नाहीत?
विवेकाने त्याला पोटाशी कवटाळला. तिघे बाहेर आले. वंदना म्हणाली-
वंदना- विवेक, मी सरपोतदार डॉक्टरना फोन करते!
ती फोन लावायला आत गेली. विनीत तिच्या मागे गेला.
विवेकला अप्पा आठवू लागले. त्याला लहानपणी हवं ते आणून देणारे अप्पा, त्याचे सर्व हट्ट पुरवणारे अप्पा, त्याची इंजिनियरिंगची फी भरायला गावचं घर विकणारे अप्पा, ह्या मोठ्या घरासाठी त्यांच्या fd मोडून दहा लाख पुढे करणारे अप्पा, तो आणि वंदना बाहेर जाणार असतील तेव्हा विनीतला आनंदाने सांभाळणारे अप्पा, घरातील वाणी, दूधवाला, इस्त्रीवाला, पेपरवाला, गाडी पुसणारा ह्यांचे हिशोब ठेवणारे अप्पा, दर महिन्याला घरातील सर्वांची पासबुक अपडेट करून आणणारे, विम्याचे हप्ते भरायची आणि फिक्स डिपॉझिट मॅच्युअर झाल्याची आठवण करून देणारे अप्पा, सगळ्या नातेवाईकांशी संबंध ठेऊन विवेक आणि वंदना खूप बिझी असतात हे सांगून त्यांच्या संबंध न ठेवण्याच्या स्वभावावर पांघरूण घालणारे अप्पा!
विवेकच्या डोक्यात आठवणींचं काहूर माजलं होतं. त्याला काल रात्रीच भांडण आठवत होतं. “अप्पा you please mind your own business. आमच्या आयुष्यात प्लीज ढवळा ढवळ करू नका. तुमच्या सतत प्रश्नांनी वेड लागत आम्हाला. तुमच्या रूम मध्ये बसा आणि टीव्ही बघा. Please leave us alone!” काल घरी यायला उशीर झाल्यावर अप्पांनी विचारलेल्या “काय रे ऑफिसची पार्टी का?” ह्या प्रश्नावर विवेक फाडफाड बोलला होता त्यांना! अप्पा शांतपणे त्यांच्या रूम मध्ये गेले आणि त्यांनी दार लावून घेतलं होतं.
प्रचंड गिल्ट आलेला विवेक त्यांच्या खोलीत गेला. अप्पा तसेच निपचित पडून होते. हात तसाच लटकत होता. विवेक त्यांच्या पायाशी बसून ओक्साबोक्शी रडू लागला. म्हणाला
विवेक- अप्पा मला माफ करा. प्लीज. मी खूप वाईट वागलो!
तो अप्पांच्या पायावर डोकं ठेऊन रडत होता. त्याला अचानक अप्पांचा पाय थरथरल्याची जाणीव झाली. त्याने अविश्वासाने वर बघितलं तर अप्पा त्याच्याकडे बघत होते. ते म्हणाले-
अप्पा- अरे माझ्या पायाला गुदगुल्या का करतो आहेस? हे बोलून नेहामीसारखे जोरदार हसले. विवेक डोळे पुसून अत्यानंदाने म्हणाला-
विवेक- अप्पा तु… तुम्ही…
अप्पा- हो मी? तुला व्याडेश्वर वाटला का पाय धरायला?
इतक्यात डॉक्टर आले. त्यांना बघून अप्पा आश्चर्याने म्हणाले-
अप्पा- डॉक्टर, तुम्ही इथे कसे?
विवेक सावरून घेत म्हणाला-
विवेक- काही नाही अप्पा. मगाशी तुमच्या डोक्याला हात लावला तेव्हा तुम्हाला थोडा ताप आहे असं वाटलं म्हणून त्यांना बोलावलं आम्ही!
अप्पा- मला आणि ताप? अशक्य!
डॉक्टर चहा घेऊन गेले. विवेक ऑफिसला निघाला. अप्पानी सवयीने विचारल-ं
अप्पा- काय रे? आज वेळेवर येणार की उशीर होईल? विवेक हसून म्हणाला-
विवेक- अप्पा, आजपासून येणार वेळेवर पण झोपायला थोडा उशीर होईल आता.
अप्पा आश्चर्याने म्हणाले-
अप्पा- उशीर? का?
विवेक हसून म्हणाला-
विवेक- अप्पा, मी पण आजपासून तुमच्या बरोबर गरम पाण्यातून ब्रांडी घेईन म्हणतो. ताप अजिबात येत नाही आणि माणूस ठणठणीत राहतो.
हे ऐकून अप्पा, विवेक आणि वंदना हसू लागले. अप्पा म्हणाले-
अप्पा- सून बाई…
वंदना- चहा टाकते. तुम्ही विनीतला बस मध्ये बसवून या.
अप्पा आणि विनीत गेले. विवेक आणि वंदना एकमेकांना बघत होते. बोलण्यासारखं काहीच नव्हतं. त्यांना अप्पा नव्याने गवसले होते. मुख्य म्हणजे ते जिवंत असताना….
©मंदार जोग
- व्हॅलेंटाईन डे- सर्व भाग (१ ते ६) एकत्र - February 18, 2024
- वारसा (भाग ७) - November 27, 2023
- वारसा (भाग ६) - October 30, 2023
अरे यार तू माझ्या हार्टबिट वाढवल्या होत्या खूप रे खूप छान माझे अब्बाच आठवले रे अजूनही अश्याच चौकश्या करतात पण मी काय माझे भाऊ सुद्धा अजून तुम्ही शांत बसा असे म्हणायचे धाडस करू शकलो नाही पण तू धडा शिकवला मला अंजन घातले डोळ्यात काही चुकलं असेल तर आज पासून तुझा लेख डोळ्यासमोर आणेल धन्यवाद बंधू
खूप छान ❤️
सुंदर