बाई बाई…

नवरा अनेक दिवसांनी टूर वरून घरी येतो. बायको दरवाजा उघडते. ती फोनवर बोलत असते. नवरा हाय म्हणून आत जातो. बॅग भिरकावून सोफ्यावर आडवा होतो. बायको शेजारी येऊन बसते. खूप खुश असते. चेहर्यावर एक आनंद ओसंडत असतो. बाहेर पाऊस असतो. वातावरणात एक रोमांस असतो. ती स्वतःशी गुणगुणते-

बायको- वक्त सारी जिंदगी में दो ही गुजरे हैं कठीन,

एक तेरे आने से पहले एक तेरे जाने के बाद!

नवरा खुश होतो. आज सुट्टी असल्याने मुलं मित्रांबरोबर दिवसभर खाली खेळणार हे माहीत असत. तो मनातल्या मनात खुश होत तिच्याकडे तिरका कटाक्ष टाकतो. डोळ्यात शक्य तितके कामुक भाव. ती पण अत्यंत आनंदाने त्याच्याकडे बघते.

नवरा- आज एकदम गझल? 

बायको- हम्म

नवरा- इरादा क्या है?

बायको- खूप बरं वाटतंय आज अनेक दिवसांनी.

नवरा- मलाही. पण तू एकदम गझल म्हणजे टू मच.

बायको- आय नो. पण फोन ठेवला आणि आपसूक गझल बाहेर पडली ओठातून?

नवरा- कसला फोन?

बायको- अरे गेला आठवडाभर आपली कामवाली रजेवर होती. तू नव्हतास म्हणून चार भांडी आणि कपडे कमी होते. तू आज येणार म्हटल्यावर काल रात्रीपासून टेन्शन होत. इतक्यात बाईंचा फोन आला की “ताई तब्बेत बरी आहे. आज पासून येते!” म्हणून खुश होऊन गझल म्हणाले. कामवाली नसलेला काळ खरच कठीण असतो.

नवरा डोक्याला हात लावून उठतो. 

नवरा- मी फ्रेश होतो. चहा टाक.

बायको- चहा काय. पोहे पण करते. आज बाई येणार आहे. 

बायको चहा करत गुणगुणत असते “रिमझिम गिरे सावन…” आणि नवरा रोजचे “भीमरूपी महारुद्रा” म्हणत थंड पाण्याचा शॉवर घेत असतो!- © मंदार जोग

mandar jog

mandar jog

मंदार जोग ह्यांची कटिंग पिनाकोलाडा, वन बाय टू मार्गारिटा आणि कोनिएक कथा ही तीन पुस्तक प्रकाशित झाली असून त्यांच्या साडेचार हजार प्रती छापील आणी इबुक स्वरूपात विकल्या गेल्या आहेत. दृकश्राव्य, प्रिंट तसेच सोशल मिडीयावर मंदार जोग नियमित लिखाण करत असतात. लेखक ऑनलाईन ह्या संकल्पनेला सत्यात आणणाऱ्या टीमचा मंदार जोग एक हिस्सा आहेत.

2 thoughts on “बाई बाई…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!