रविवार ते रविवार
सोमवार सकाळ म्हणजे साठावा वाढदिवस कालच झालेल्या काकांची भावना. बाल्य, तारुण्य, त्या त्या वेळी केलेली धमाल, मजा, आनंद, सुख हे सर्व मागे सोडून पुढील थोड्या निरस आणि क्वचित खडतर पण अटळ प्रवासाला निघायची मानसिक तयारी!
सोमवार संध्याकाळ म्हणजे पासष्ठी गाठलेल्या माणसाची मानसिकता. आयुष्य जगुन झाल आहे पण अजून संपायला अवकाश आहे. तेव्हा जिद्दीने त्याचा सामना करा, पुढील आयुष्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहून त्याचा आनंद घ्यायचा निश्चय करा. ह्याच निग्रहाने मी पुढे उभे ठाकलेले मंगळवार आणि बुधवार ह्यांचा सामना करायला सोमवारी संध्याकाळी तयार होतो.
मंगळवार म्हणजे सत्तरी. एकदम निरस, कंटाळवाणा, न संपणारा काळ. एक निरिक्षण करा. आठवड्यात मंगळवार हा सर्वात लांब भासणारा दिवस असतो. साला संपता संपत नाही. सहा वाजले वाटावे तर काटा चार वर चिकटून राहीलेला असतो!
बुधवार म्हणणे ऐन ऐंशी. गात्र थकलेली. नजर पैलतीराकडे लागलेली पण ऐलतीर संपत नाहीये. खूप आयुष्य जगुन झाले वाटत आहे. जगणे आता दमवत आहे. पण पैलतीर अजून क्षितिजावर कुठेही नाही. प्रवास कंटाळवाणा झाला आहे. दिवस आणि आयुष्य आळसावून ओढत फरफटते आहे….
गुरुवार म्हणजे अचानक आलेली कुमारावस्था. पुढे दिसत असलेल्या शनिवार, रविवार नामक तारुण्याची ओढ. वीक एन्ड समोर दिसत असल्याने पटापट सरणारा दिवस.
शुक्रवार म्हणजे पौगंडावस्था. शनिवार, रविवार नामक तारुण्य दारावर थपडा मारत आहे. त्याचे कुतूहल मनाला गुद्गुल्या करत आहे. त्या वेळी करायचे बेत आणि स्वप्न ह्यांनी मन हुरळून उचंबळत आहे. फ्रायडे ड्रेसिंग म्हणजे पौगंडावस्थेतील मुलांनी हळूच गालावर उगवलेली लव कात्रीने कापून दाढी केल्याचा आनंद त्याच वयात मिळवण्यासारखे मला वाटते. शुक्रवार खूप लवकर जातो. In fact आपण तो लवकर घालवतो. तारुण्यात पदार्पण करायला आसूसलेली जेमतेम मिसरुड फुटलेली मुले जशी तरुण होताना कुमारावस्था लवकर संपवतात तस्साच!!
शनिवार म्हणजे विशी, तीशीचे स्वच्छंदी उनाड दिवस. धम्माल, मजा करायचा वेगवान काळ. त्याला विश्रांतीला, स्थिरस्थावर व्हायला रविवारचा आधार असतो. जसा बेभान तारुण्याला चाळीशीच असतो. शनिवारची धुंदी, सॅटरडे नाईट फीवर उतरायला रविवार मदत करतो. शनिवार ऐन तारुण्याच्या बेभान, बेफिकिर वर्षांसारखा भुरकन उडून जातो. शनिवार म्हणजे आठवड्यातील सर्वात लवकर संपणारा पण सर्वोत्तम दिवस! भले तो नकर्त्याचा असला तरी हरकत नाही….
मग येतो रविवार. संथ स्टेडी चाळीशी सारखा. शनिवारी केलेली पापे निस्तरणारा, थोडा आळसावलेला तरी समंजस आणि सावध. कुटुंबाबरोबर साजरा होणारा, नात्यांची गरज लक्षात येणारा, ती आवर्जून जपणारा, महत्वाचे निर्णय, योजना, चर्चा, कामे हातावेगळी करणारा चाळीशी सारखाच प्रगल्भ रविवार. पुढल्या आठवड्याचे प्लानिंग करणारा…उतार वयाचे प्लानिंग करणाऱ्या चाळीशी सारखा रविवार. रविवारला चाळीशीसारखीच एक संथ पण नियमीत गती असते. तो संपणार आहे हे लक्षात असते. पण दिवस किंवा आयुष्य कधीतरी संपणार हे कळायचा चाळीशी सारखा शहाणपणा रविवारी मनाला आलेला असतो. रविवार दुपार पंचेचाळीशी किंवा पन्नाशी सारखी संथ आणि आळसावलेली जाते. मग रविवार संध्याकाळ नामक एक अंगावर येणारा, नकोसा वाटणारा, न संपणारा, थोडा डिप्रेसिंग काळ सुरु होतो. साधारण पंचावन ते साठीच्या मधल्या काळासारखा. पुढे अटळ सोमवार दिसत असतो….अटळ म्हातारपणासारखा. मन ते स्वीकारायला कुठेतरी तयार नसते. गतस्मृति मनात पिंगा घालत असतात. पण काळ कुणासाठीही थांबत नाही! रविवार संध्याकाळ आणखी भयाण होत रात्रीत बदलते. साठी पूर्ण व्हावी तशीच!
सोमवार सकाळ सुरु होते….काल रात्रीच केक कापून साठावा वाढदिवस साजरा केलेल्या काकांची भावना घेऊन….
…..रविवार ते रविवार मी अख्खे आयुष्य जगत असतो! रविवार मला ते जगल्याचा फील देत असतो…..मंदार जोग
- व्हॅलेंटाईन डे- सर्व भाग (१ ते ६) एकत्र - February 18, 2024
- वारसा (भाग ७) - November 27, 2023
- वारसा (भाग ६) - October 30, 2023
छान लिहिलंय.