२६ जुलै २००५
आज ऑफिसला न जाता मस्त मॅटिनी सिनेमा बघायचं ठरवलं होतं त्यांनी. बाल्कनीची कॉर्नर सीट आणि मॉर्निंग शो म्हणजे ह्या गजबजलेल्या शहरात प्रेमी युगुलांना मिळणारा दुर्मिळ एकांत!
ती राहायला डोंबिवलीला आणि तो वसईला. मुंबईच्या बाहेर दोन टोकांना वसलेल्या उपनगराचे दोघे रहिवासी. ऑफिसात भेट, भेटीतून ओळख, ओळखीतून मैत्री, गप्पा, एकत्र कॉफी, लंच, मारिन ड्राईव्हवर संध्याकाळी फिरणं! अश्याच एका फेरीत तिने त्याचा हात नकळत हातात घेतला. त्याला आश्चर्य अजिबात वाटलं नाही. हे अपेक्षितच होतं. पण तो पुढाकार घ्यायला घाबरत होता. उगाच अंदाज चुकत असेल तर भर मारिन ड्राईव्हवर कानफटात खायची त्याची तयारी नव्हती! तिने हात धरला. दोघे शांतपणे कट्ट्यावर बसले. तिने डोके त्याच्या खांद्यावर टेकले. तिला खूप आधार वाटला. तिचे केस वाऱ्यावर उडत होते..तिच्या ओढणी सारखे. त्याची नजर तिच्या चेहऱ्यावर ठरत नव्हती. तिने मान वळवून त्याच्याकडे बघितलं. खूप दिवसांपासून मनात साठलेलं काहीतरी तिच्या डोळ्यात त्याला दिसलं. त्याने दोन्ही हातांनी तिचा चेहरा हातात धरला. तिने डोळे मिटून घेतले. सूर्य समुद्रात मावळत होता. त्याच्या हातात पौर्णिमेचा चंद्र उगवला होता!
त्या दिवसानंतर त्यांचं आयुष्य बदलून गेलं. घरापेक्षा मन ऑफिसात जास्त रमू लागलं. मारिन ड्राईव्ह वर एकांताचे क्षण वेचत असल्याने परतीच्या गाड्यांच्या वेळा बदलल्या. पण आयुष्य मस्त सुरू होतं. तिने तर लगेच घरी सांगून टाकलं. तो साऊथ इंडियन आणि ही मराठी. पण मुलगा चांगला होता. हिच्या घरच्यांची परवानगी होती. त्याचे आई वडील तामिळनाडू मधल्या एका गावात होते. त्यांनी आक्षेप घ्यायचा सवालच नव्हता. तो परत गावाला तसाही जाणार नव्हता. तिचा अवखळपणा, लोभस रूप, अग्रेसिव्हनेस आणि त्याचा खूप उमदा पण थोडा भिडस्त स्वभाव, सेन्स ऑफ ह्युमर, हुशारी एकमेकांना खूप पूरक होते. त्याच सावळ पण आकर्षक रूप तिला खूप आवडायचं. त्याने मिठीत घेतल्यावर त्याच्या बाहूंमधली ताकद तिला जाणवायची आणि ती सरेंडर करायची!
मग काही महिन्यांनी ऑफिस पिकनिक नावाखाली एका रविवारी दोघे लोणावळ्याला त्याच्या मित्राच्या बंगल्यावर राहून आले. त्या दिवसापासून त्यांच्यातले नाते अधिकच दृढ झाले. अगदी नवरा बायको सारखे. काही दिवसातच तिला पोटात वाढत असलेल्या त्याच्या अंकुराची जाणीव झाली. तिने त्याला सांगितले. त्याने लगेच लग्न करायचा निर्णय घेतला. आज मंगळवार होता. रविवारी देवळात लग्न. दोघे खुश होते. म्हणूनच आज मॅटिनी शो ला आले होते. हातात हात धरून दोघांनी सिनेमा बघितला. ह्याच थिएटरात मॉर्निंग शो ला येऊन एकांतात घालवलेले अनेक क्षण त्यांना आठवले. पण आता अचानक परिस्थिती वेगळी असल्यासारखं वाटत होतं. फक्त हातात हात धरूनही खूप समाधान मिळालं होतं! सिनेमा संपला दोघे बाहेर पडले.
बाहेरचं जग बदललं होतं. दुपारी दोन वाजता संध्याकाळ झाल्यासारखा काळोख आणि प्रचंड पाऊस! टॅक्सीवाले दडी मारून बसलेले. ह्यांच्याकडे दोघात एक छत्री! त्या छत्रीच्या आडोश्याने दोघे गुढघाभर पाण्यात चालत कसेबसे बसस्टॉप वर पोहोचले. तासभर बस नव्हती. जी आली ती माणसांनी इतकी फुलली होती की त्यात त्यांनाच नाही तर एखाद्या चिमणीलाही प्रवेश अशक्य होता. आता वाऱ्याचा आणि पावसाचा जोर वाढला होता. इतका की चिंब भिजलेल्या त्या दोघांना भिजत नसल्याचे समाधान देणारी एकमेव छत्री तुटली. पाण्याची पातळी आणि वेग वाढत होता. आता पाण्यातून वाहात येणाऱ्या कचर्यात कुत्री मांजराची पिल्लं आणि झाड दिसू लागली होती. तिने घरी फोन लावला. घरी टीव्ही बघत असलेल्या तिच्या वडिलांनी मुंबईतील पुराची त्यांना कल्पना दिली. तोवर संध्याकाळचे पाच वाजून गेले होते. दोघांना भूक किंवा तहान ह्याची जाणीव नव्हती. रस्त्यावर चालणाऱ्या हजारो लोकांबरोबर चालत त्यांनी स्टेशन गाठायचा निर्णय घेतला. दोघे हातात हात धरून कोसळणाऱ्या पावसात चालू लागले.
थिएटर पासून रेल्वे स्टेशन पाच किलोमीटर. त्यांनी चालायला सुरुवात केली. आता पाणी तिच्या पोटाच्या वर आणि त्याच्या कंबरेच्या वर आले होते. त्यात तिची चप्पल आणि पर्स वाहून गेले. ती त्याचा दंड धरून चालत होती. आता रस्त्यावर अंधार होता. पाण्यातून वाहून येणारे फर्निचर लागून इजा व्हायची भीती होती. आता गर्दी तुरळक झाली होती. त्यांना समुद्राच्या मधोमध उभे असल्याचा अनुभव येत होता. त्यांनी दोन तासात जेमतेम दोन किलोमीटर अंतर कापले. ओळखीच्या इमारती भयाण दिसत होत्या. इतक्यात मागून एका म्हशीचे वाहात आलेले प्रेत तिच्यावर धडकले. ती भीतीने आणि वेदनेने किंचाळली. तिच्या हाताला शिंग लागून मार बसला होता. तिची किंकाळी पावसाच्या गाजेत विरून गेली. त्याने त्याचा रुमाल तिच्या जखमेवर बांधला. आता स्टेशनवर लवकर पोहोचायचे म्हणून त्याने मोठा रस्ता सोडून एका गल्लीचा शॉर्ट कट घायचा निर्णय घेतला. दोघे ठेचकाळत डावीकडच्या गल्लीत वळले.
आधीच अंधार आणि त्यात वीजप्रवाह बंद झाल्याने त्या गल्लीत भीषण काळोख दाटून राहिला होता. गल्ली चिंचोळी असल्याने पाण्याची पातळी वाढत होती. पाण्याला वेगही जास्त होता. आता पाणी तिच्या छातीच्या वर जवळजवळ मानेपर्यंत आले होते. पण पोहोता येत असल्याने तिला थोडा दिलासा होता. अंधारात समोरून वाहात आलेले अजून काहीतरी त्यांच्यावर आदळले. एका बाईचा मृतदेह! तिने थिजून त्याला तिथेच मिठी मारली. त्याने हाताने तो मृतदेह बाजूला सरला. जोरात वाहात असलेल्या पाण्याने आनंदाने तो मृतदेह आपल्याबरोबर पुढे नेला. ते मोठ्या कष्टाने एकेक पाऊल पुढे टाकत होते. तिच्या पायात आता गोळे येऊ लागले. पाण्याची पातळी खूप वाढली होती. तिला चालणे अशक्य होते. ती त्याच्या खांद्याला धरून जवळजवळ तरंगत होती!
….आता गल्लीतून येणाऱ्या पाण्याचा वेग पुरासारखा वाढला होता. समोर अंधार, अंगावर रट्टे काढणारा पाऊस आणि अक्राळ रूप घेतलेलं पुराच पाणी. त्या गल्लीत हे दोघे आणि आजूबाजूला वाहात असलेली प्रेतं…..
आज अठरा वर्षे झाली त्या घटनेला. दर वर्षीप्रमाणे ती आजही व्होयलंट झाली. रघु, रघु असे ओरडत हातातली उशी पुढे करू लागली. हातपाय झाडून गुरासारखी ओरडू लागली! गेली अठरा वर्ष त्या असायलम मध्ये आढ्याला तंद्री लावून निपचित पडून असलेली ती दरवर्षी २६ जुलैला अशीच बेकाबू व्हायची. मग डॉक्टरांनी इंजेक्शन दिलं की परत पुढल्या २६ जुलै पर्यंत निपचित!
पण काय व्हायचं तिला २६ जुलैला? तिला रघु हाक मारायचा! त्या रात्री तिच्या पोटातून नष्ट झालेल्या जीवाचा बाप रघु… तिने ज्याच्यावर जीवापाड प्रेम केलं तो तिचा प्रियकर रघु!
….आता गल्लीतून येणाऱ्या पाण्याचा वेग पुरासारखा वाढला होता. समोर अंधार, अंगावर रट्टे काढणारा पाऊस आणि अक्राळ रूप घेतलेलं पुराच पाणी. त्या गल्लीत हे दोघे आणि आजूबाजूला वाहात असलेली प्रेतं! आता दोघांनाही चालणं अशक्य होतं. तो म्हणाला आता आधार शोधू! समोरून एक लहानसं लाकडी कपाट वाहात आलं! त्याने ते धरलं! दोघांनी धरल्यावर ते बुडू लागलं. तो म्हणाला “तू हे धर आणि दिव्याच्या खांबापर्यंत जाऊन त्याला धर! मी आलोच!” विचार करायला वेळ नव्हता! ती त्या कपाटाच्या आधाराने खांबकडे निघाली! तो आणखी काहीतरी यायची वाट बघत होता! ती खांबापर्यंत पोहोचली. तो मानेपर्यंत पाण्यात गटांगळ्या खात होता. इतक्यात तिला एक अजस्त्र वोर्डरोब त्याच्या दिशेने वाहात वेगाने पुढे सरकत असलेला दिसला. ती ओरडली रघु…रघु…!
त्याला तो वोर्डरोब दिसला. त्याने बाजूला व्हायला पाय उचलले आणि त्याचा तोल गेला. तो पाण्याच्या लोंढ्यात वाहून जाऊ लागला. तिला हाताला लागलेलं एक फळकूट हातात धरून ती ओरडत होती…रघु रघु…पण रघु पाण्यात बुडत होता. इतक्यात ते कपाट त्याच्या डोक्यावर आपटलं. त्याची शुद्ध गेली. तिच्या डोळ्यासमोर रघु बुडून, वाहून गेला! तिच्या पोटात काहीतरी पिळवटल! प्रचंड वेदना जाणवली! पण त्याहून जास्त वेदना तिच्या मनाला होत होती. एक जाणीव तिला उध्वस्त करत होती. तिला पोहोता येत होतं आणि रघूला येत नाही हे तिला माहीत होतं. मग रघुने आधार म्हणून दिलेलं कपाट घेऊन आपण त्याला पुढे पाठवून स्वतः पोहत आलो असतो तर…..? नजरेसमोर रघु गेल्याच्या दुःखाच्या स्फोटकावर त्या विचाराने प:श्चातापाची ठिणगी टाकली. मनात झालेल्या स्फोटाने तिच्या मेंदूची शकलं केली! त्या खांबाला कवटाळलेली ती तशीच दुसऱ्या दिवशी शोध पथकांना सापडली!
तेव्हापासून आजतागायत रघुला मृत्यू आणि तिला मृत्यूपेक्षा भयानक जीवन देणारा तो २६ जुलैचा काळा दिवस आला की ती किंचाळत जागी होते. रघूला हाका मारून त्याचा जीव वाचवायला हाताने फळकूट म्हणून जे हातात येईल ते देते. दुःख आणि पश्चातापाने विव्हळते! इंजक्षन दिलं की परत निपचित होते, थेट पुढल्या २६ जुलैला उठण्यासाठी! तोवर ती तशीच पडून राहणार असते. तिच्या मनात २६ जुलै चा तो पाऊस रोज कोसळत असतो!
२६ जुलै २००५ रोजी आपला आणि आपल्या जीवलगांचा जीव गमावणार्या तसेच त्या प्रसंगी अनेकांची मदत करणाऱ्या समस्त मुंबईकरांना समर्पित!- ©मंदार जोग
- व्हॅलेंटाईन डे- सर्व भाग (१ ते ६) एकत्र - February 18, 2024
- वारसा (भाग ७) - November 27, 2023
- वारसा (भाग ६) - October 30, 2023
कथा वाचली ….अभिप्राय ?
मला मनाला आनंद देणारं वाचन आवडतं .