अभिमान
आज अभिमान सिनेमा प्रदर्शित होऊन पन्नास वर्षे झाली. १९७३ साली आजच्याच दिवशी अभिमान सिनेमा प्रदर्शित झाला होता. हृषिकेश मुखर्जी सारखा प्रतिभावान, खोल विषय तरलतेने मांडणारा दिग्दर्शक, त्यांचे आवडते संगीतकार सचिनदेव बर्मन आणि जया भादुरी अशी बंगाली भट्टी ह्या सिनेमाच्या रूपाने जमली होती. त्यात नायकाच्या भूमिकेत अमिताभ. बरोबर असरानी, बिंदू, हंगल आणि इतर कलाकार.
कथा साधी तरी विषय गहन. अमिताभ प्रचंड लोकप्रिय गायक. असरानी त्याचा मित्र कम सेक्रेटरी. अमिताभ त्याच्या गावाला राहणाऱ्या आणि अप्रतिम गाणाऱ्या जयाच्या प्रेमात पडून लग्न करतो. पुढे योगायोगाने जया गाते आणि प्रचंड लोकप्रिय होते. अमिताभला असूया वाटू लागते आणि पुढे काय होतं हा प्रवास म्हणजे अभिमान! सिनेमा ५० वर्ष जुना असला तरी विषय आजही रिलेव्हन्ट आहे.
बायको करियर मध्ये यशस्वी झाल्यावर, पत पैसा प्रतिष्ठा ह्यात आपल्या पुढे गेल्यावर एक तर न्यूनगंडाने पछाडले जाऊन किंवा प्रचंड असूया वाटून किंवा अनेकदा हे दोन्ही एकत्र वाटू लागून बायकोचा द्वेष किंवा दुस्वास करू लागलेले नवरे आजही सर्वांच्या पाहण्यात आहेत. गिरगावात व्हॉइस ऑफ इंडिया मध्ये एकजण यायचा. आम्ही तेव्हा अठरा वीस वर्षांचे असू. तो तेव्हा पस्तिशीचा होता. मुली, त्यांची करियर वगैरे विषय निघाले की तो अस्वस्थ व्हायचा आणि सिगारेटचा एक कश मारत म्हणायचा “किती पण शिकली आणि साहेब झाली ना तरी बाई आपल्या खालीच राहणार!” तेव्हाही ते ऐकून डोक्यात सणक जायची. हळूहळू आम्ही त्याला अवोईड करत कमी केला. नंतर त्याचा डिव्होर्स झाला. त्याची बायको तेव्हा रिझर्व्ह बँकेत होती आणि तो स्वतः फुटकळ नोकऱ्या करत असे. त्यामुळे असूया आणि गंड निर्माण होऊन तो असली फालतू विधाने करत असे. पुढे त्याच काय झालं माहीत नाही. पण काही पुरुषांमध्ये आढळणारी घाणेरडी वृत्ती आणि पुरुषी अहंकाराच तो उत्तम उदाहरण ठरला आमच्यासाठी! खरं तर पुरुष कसा असू नये ह्याचा परिपाठ होता तो मनुष्य!
बाई म्हणजे चूल आणि मूल ही चिकारभोट संकल्पना सुशिक्षित समाजात बऱ्यापैकी कालबाह्य झालेली असली तरी आजही समाजाच्या अनेक स्तरात ती आढळून येते. एकतर बाईने फक्त घर सांभाळाव किंवा नोकरी केली तरी घरच्या जबाबदाऱ्या सांभाळून करावी आणि नवऱ्यापेक्षा जास्त यशस्वी होऊ नये अशी अपेक्षा असते. मग अश्या बायकांच्या कर्तृत्वाला घरात कौतुक मिळत नाही. उलट हेटाळणी होते आणि अश्या काही स्त्रिया मग हल्ली समाज माध्यमांवर मिळणाऱ्या खोट्या स्तुती आणि प्रशंसेला बळी पडून फुटकळ माणसांच्या नादी लागलेल्या आढळतात. मुळातच कोणाविषयीही वाटणारी ईर्षा किंवा असूया ही अस्वस्थ करणारी, टोचत राहणारी भावना आहे. एखाद्याबद्दल असूया वाटून आपली प्रगती होते का? तर नाही. आपल्याला फक्त त्रास होऊ शकतो. मग अशी भावना बाळगून उपायोग काय? उलट नुकसान होण्याची शक्यता अधिक.
अभिमान सिनेमातही अमिताभ ह्याच असुयेमुळे नैराश्याचा शिकार होतो, त्यांचं वैवाहिक जीवन तणावपूर्ण होतं. हृषिकेश मुखर्जी ह्यांनी हीच असूया, त्यातून बदलत जाणारी वागणूक, त्याचे नात्यावर होणारे परिणाम ह्या सर्व गोष्टी सिनेमात प्रभावीपणे मांडल्या आहेत.
बाकी जया मला व्यक्ती म्हणून, नटी म्हणूनही अजिबात आवडत नसली तरी अभिमान मध्ये तिने उत्तम काम केलं आहे हे मी मान्य करेन. अमिताभ तर अमिताभ आहे. तो अँग्री यंग मॅन म्हणून प्रस्थापित व्हायच्या आत बाहेरचा सिनेमा असेल हा. अमिताभने अविवाहित गायक ते लग्न आणि नंतर जळकुटा नवरा हा प्रवास लीलया साधला आहे.
अभिमानची अत्यंत महत्वाची आणखी एक बाजू म्हणजे त्यातली गाणी! आहाहा असं आजही तोंडून येतं इतकी अप्रतिम आणि अजरामर गाणी आहेत अभिमानची. अभिमान मधील लताची गाणी हा एक लेखनाचा वेगळा विषय होऊ शकेल इतकी चोपली आहेत लताने अभिमानची गाणी! लुटे कोई मन का नगर, अब तो है तुम से हर खुशी, नदिया किनारे, पिया बिना, तेरे मेरे मिलन की ये रैना, तेरी बिंदीया रे, मीत ना मिला रे मन का ही गाणी मी आजही लूप करून ऐकतो! आहा!
आम्ही अभिमान रिलीज नंतर खूप वर्षांनी टीव्हीवर पहिला. नंतर अनेकदा पहिला. प्रत्येक वेळी जास्त जास्त आवडत गेला. ऋषीदांच्या सिनेमांची हीच खासियत आहे. जितके जास्त वेळा बघू तितके अधिक भावतात. अभिमानच्या गाण्यांची भुरळ पडत गेली ती आजतागायत आहे. अभिमान खूप मोठा हिट नव्हता. पण जयाला अभिनयाच आणि एसडीना संगीताच फिल्मफेयर पारितोषिक देऊन गेला. अभिमान अर्थात इगोचे जिवंत उदाहरण बनून राहिलेली जया सध्या पापराझी लोकांवर ओरडत रस्त्यात आणि क्वचित विधान भवनात उर्मट अभिनय करते. एसडी केव्हाच गेले. पण अभिमानची गाणी अजरामर आहेत. उत्तुंग कर्तृत्व असूनही डाऊन टू अर्थ असलेला अमिताभ अनेकांचा ऑन स्क्रीन तसेच ऑफ स्क्रीन वर्तणुकीचा आदर्श बनून राहिला आहे. आणि अभिमान सिनेमा एक असं उदाहरण बनला आहे की आजही नवरा आणि बायको मध्ये इगो येतो तेव्हा “त्यांच्यात अभिमान सुरू आहे” असं सहज म्हणतात. किंवा एखाद्या सिनेमात किंवा मालिकेत नवरा बायकोच्या किंवा हिरो हिरॉईनच्या नात्यात इगो येणार अशी सिच्युएशन लिहायची असल्यास फक्त इथून “अभिमान ट्रॅक” इतकं म्हटल की कथा कुठे जाणार हे लक्षात येत! चॉकलेट म्हणजे कॅडबरी, टूथपेस्ट म्हणजे कोलगेट, करियर म्हणजे फेडेक्स, फोटोकॉपी म्हणजे जसं झेरॉक्स आहे तेच स्थान गेली पन्नास वर्षे नवरा बायकोतील इगो वॉर मध्ये अभिमानचं आहे आणि पुढेही टिकून राहील ही खात्री आहे.
- व्हॅलेंटाईन डे- सर्व भाग (१ ते ६) एकत्र - February 18, 2024
- वारसा (भाग ७) - November 27, 2023
- वारसा (भाग ६) - October 30, 2023