गजू…

गजू गेल्याची बातमी दहा एक दिवसांपूर्वी समजली. वाईट वाटलं. त्याच्या मागे बायको आणि एक मुलगा आहेत. मुलगा गेल्याच वर्षी ग्रॅज्युएट होऊन नोकरीला लागला अस ऐकलं होतं गजू कडूनच. त्यामुळे मागे राहिलेल्यांचं काय हा प्रश्न मनात आला नाही. मुलगा कमावता आहे! गजू आमच्यापेक्षा वयाने बराच मोठा खरं तर. पण त्याला सगळेच गजू म्हणत. आम्ही देखील गजू काका म्हणता म्हणता फक्त गजूवर कधी आलो आम्हालाच कळलं नाही. आणि त्यालाही त्याचं काहीच वाटतं नसे. गजानन शेंडे असं नाव होतं त्याचं. अर्थात काही लोक त्याला गजानन राव वगैरे म्हणणारे होते. पण ते त्याला फार “ओळखत” नसलेले. बाकी त्याला ओळखणारे त्याला गजू, गज्या किंवा शेंड्या म्हणत तोंडावर आणि मागेही.

काहींच्या मते गजू मूर्ख होता, काहींच्या मते लबाड होता, काहींना तो झोलर वाटायचा तर काही जणांना अतिशय चाणाक्ष वाटायचा. मला मात्र तो खूप न्यूनगंड असलेला वाटायचा. त्याला लहानपणापासून पासून बघत आलोय. गजू म्हणे एलएलबी झाला होता. म्हणजे वकिली शिकला होता. आमच्या चाळीतील आज्यांना त्याचा केवढा अभिमान होता! गजूची राहणी चकाचक. खिशात चार अणे नसले तरी रुबाब हाजाराची गड्डी असल्यागत! वरून गोरा तांबूस वर्ण, कुरळे काळेभोर केस, मध्यम बांधा आणि भेदक नजर. समोर सावज असेल तर लबाड होणारे आणि समोर आसामी असेल तर लाचार होणारे एक न्यूनगंड दाखवणारे टपोरे घारे डोळे!

गजूने सुरुवातीला काही वर्षे नोकरी केली. वडील लवकर गेले होते त्याचे. म्हणून कदाचित आईच्या लाडात थोडा लाडावला आणि बिघडला असावा गजू. त्याच्या आईने कोकणातली मुलगी बघून लवकर लग्न लावून दिलं त्याचं. म्हणजे त्याच्या वयाची पोरं अजून एक प्रमोशन देखील मिळालं नाही म्हणून झगडत होती तेव्हा गजूला बाप होण्याचं प्रमोशन मिळालं होतं! नर्सिंग कोर्स केलेल्या गजीला (तो गजू म्हणून त्याच्या बायकोला गजी म्हणतात) मुंबईत आल्यावर सरकारी हॉस्पिटल मध्ये नोकरी लागली आणि गजू सुटला. त्या नंतर गजू जो त्याच्या विविध धंद्याच्या वाटेला लागला तो मरेपर्यंत तेच करत राहिला!

गजूने आयुष्यात पन्नास किंवा त्याहून जास्त प्रकारचे धंदे सहज  केले असतील. सगळे बुडीत खात्यात. गजीने स्वतःचे दागिने विकून, bmc च्या पगारातून हप्ते बसवून लोकांची देणी फेडली. अनेकांनी तिच्या रडवेल्या चेहऱ्याकडे बघून गजूने फसवून किंवा उधार घेऊन बुडावलेल्या स्वतःच्या पैशांवर पाणी देखील सोडलं! गजीला सामान्य बाई सारखं सुख कधीच वाट्याला आलं नाही. मुलगा आणि त्याच संगोपन तसेच गजूच्या कर्ज आणि फसवणुकीचे हप्ते फेडण्यात गजी अकाली  म्हातारी झाली! जगासमोर ऑल वेल दाखवणारी गजी कधीतरी ओळखीतल्या बायकांकडे मन मोकळं करत चटकन पदराने डोळे पुसत असे! 

गजूने केलेल्या धंद्यात स्मगल केलेले व्हीसीआर विकणे, जपानी चादर, अनेक प्रकारचे मल्टी लेव्हल मार्केटिंग, एका एग्रो फूड कम रिसॉर्टची फिक्स डिपॉझिट, कॉम्प्युटर, कॉम्प्युटरचे सुटे भाग, विवाह मंडळ कम सल्ला केंद्र, गजीला कामाला लावून सुरू केलेली टिफिन सर्व्हिस, तिकीट बुकिंग, नाटकात अभिनय, ज्योतिष मार्गदर्शन, डायरेक्ट शेतातून आणून शहरात माल विकणे, कुरियर सर्व्हिस, विमा विक्री, आळंबीची शेती अश्या अनेक धंद्यांचा समावेश आहे. त्यातील एकही धंदा सहा महिने ते एक वर्ष ह्या पलिकडे टिकला नाही. आणि जो टिकला तो फक्त गजूच्या बोलण्यातून. वाढला कधीच नाही. प्रत्येक धंद्यात फक्त नुकसान. 

पण गजू प्रत्येक धंद्याबद्दल अगदी मनापासून बोलायचा. आपण करत असलेला धंदा काय सॉलिड आहे आणि आपला तसेच आपल्या गिर्हाईकांचा कसा उत्कर्ष होणार हे छातीठोकपणे सांगायचा. त्यात स्वतःच प्रचंड कौतुक असायचं. टाटा, बिर्ला, अंबानी आणि नंतर फक्त शेंडे अस वाटणारे काही लोक देखील ह्या पृथ्वीतलावर आहेत. विशेषतः संध्याकाळी चार पेग पोटात गेल्यावर गजूने अहं अवांम वयं ने सुरू केलेली बडबड ‘धंदा करायला पैसा नाही जिगर लागते’ वर येताना देशाची आर्थिक स्थिती, नाणेनिधी, रिझर्व्ह बँक, अर्थ मंत्री, परदेशी चलनाची गंगाजळी, शेयर बाजार ह्या सर्वांवर अधिकारवाणीने टीका करत समोरच्याला एखादा धंदा करायला प्रेरित करत किंवा गजूच्या त्यावेळी सुरू असलेल्या धंद्यात “स्टेक घ्यायची” ऑफर देत “मी अर्थमंत्री झालो तर भारत अमेरिका होईल” ह्या भैरवीवर संपत असे. बहुतांश लोक फुकट मनोरंजन झाल्यावर तो बोलला ते विसरून जात. पण काही बिचारे खरच इंप्रेस होऊन पैसे लावत. ही मात्र गजूची खासियत होती.  त्याला प्रत्येक धंद्यात सावजं सापडायची. काही तर आधी फसलेली देखील परत फसवणूक करून घ्यायला यायची! 

गजूचा गिर्हाईकांचा पॅटर्न होता. पाहिले म्हणजे गजूला टाटा बिर्ला समजून त्याच्या धंद्यात पैसे गुंतवून गजूला तो धंदा देखील  न जमल्याने त्याच्या बरोबर स्वतःच नुकसान करून घेणारे आणि दुसरे म्हणजे गजूने हेरलेली सॉफ्ट टार्गेट्स. ह्यांना गजू व्यवस्थित ठरवून टोपी घालायचा. म्हणजे कदाचित गजूचा धंदा चालला असता तरी त्याने ह्यांचे पैसे बुडवलेच असते असे. ज्यांच्या पैशाच्या नशिबी चालणे पेक्षा बुडणे लिहिलेले आहे असे कमनशिबी लोक! आणि गम्मत म्हणजे गजूचा धंदा बुडल्याने इतर लोक त्याच्या घरी तगादा लावत तेव्हा हे लोक आपले पैसे बुडाले पेक्षा बिचार्या गजूच आता काय होणार म्हणत रडायचे! 

पण गरीब बिचार्या विश्वास ठेवणाऱ्या लोकांना नाडणारा गजू सुशिक्षित तसेच त्याला ओळखून असणाऱ्या लोकांपासून मात्र लांब राहायचा. म्हणजे गिरगाव नाक्यावर कधी आमच्या गँगला भेटला तरी क्रिकेट, सिनेमा अश्या जनरल विषयांवर बोलायचा. तो त्याचे धंदे, नवीन व्हेंचर्स ह्याबद्दल आमच्याकडे चकार शब्द नाही काढायचा. आम्ही सावज नसल्याने आणि आता नोकरी वगैरे करत असल्याने आमच्याशी बोलताना त्याच्या डोळ्यात तो न्यूनगंड त्याच्याही नकळत तरळायचा! एखाद्याच आणि विशेषतः ओळखीत, नात्यातील कोणाचाही लहानसं यश किंवा प्रगती बघून मत्सर वाटणारे किंवा न्यूनगंड वाटणारे किंवा दोन्ही वाटणारे काही टिपिकल लोक असतात. गजू त्यांच्यापैकी एक होता. मत्सरापेक्षा न्यूनगंड कित्येक पट अधिक होता. जो त्याच्या इतर वेळी प्रचंड कॉन्फिडंट असलेल्या डोळ्यात सावज करता येणार नाही अश्या लोकांशी बोलताना दिसायचा! पण गजू इथेही मागे नसायचा. एखादा टाटा मध्ये नोकरीला आहे हा धागा धरून “अरे तुमच्या रतनला सांग पारंपरिक धंद्या ऐवजी नवीन इंडस्ट्री मध्ये इन्व्हेस्ट कर” असा निरोप तो रतन टाटाला पाठवायचा! गजू वाईट नव्हता पण स्वतःत हरवलेला होता!

पण शेवट पर्यंत तो टेचात जगला. सावजांसमोर प्रचंड आत्मविश्वासाने वावरला. आयुष्यावर बोलू काही, हिम्मत आहे तर यश आहे, डर के आगे जीत है, अपयश हीच यशाची पहिली पायरी आहे ह्या विषयावरील त्याचे तत्वज्ञान त्याने कित्येक स्वस्तिक बार मध्ये आणि स. का. पाटील उद्यानाजवळ अनेक सावजांना ऐकवले असण्याची शक्यता आहे. त्याला व्यवस्थित ओळखत नसलेल्या अनेकांना तो “यशस्वी उद्योजक” वगैरे का वाटत असे ह्यामागे त्याच्या ह्या ज्ञान बिडीचा झुरका हे मोठं कारण असण्याची शक्यताही नाकारता येत नाही. हेच लोक मग त्याचे गिर्हाईक किंवा इन्व्हेस्टर होत.

पण एक मात्र आहे. गजू सारखा बिनधास्तपणा, गोड बोलून समोरच्याला ग्लासात उतरवायची हातोटी, लोकांच्या शिव्या शाप खायची मानसिक तयारी हे गुण किंवा लौकिकार्थाने अवगुण दुर्मिळ असतात. तरीही गजू सारखे लोक ह्या जगात असतात. आपल्याला अनेकदा भेटत, दिसत असतात. फक्त ते पन्नास धंदे करुनही कधीच फार ग्रो होत नाही. आहे त्याच परिघात आयुष्यभर फिरत राहतात. बरेचदा गजू सारखे लोक धंद्यापेक्ष स्वतःच्या प्रेमात जास्त असतात. आणि का माहीत नाही पण त्यामागे बहुतेक वेळेला न्यूनगंड असतो. 

असो गजू आता ह्या जगात नाहीये. गजी काकूंना केव्हातरी जाऊन भेटेन! त्यांचीही यशस्वी उद्योजकाची पत्नी ही ओळख आता संपलेली आहे. आता तरी सामान्य जीवन जगताना त्यांना थोडा आनंद मिळेल अशी आशा करतो! बाकी गजू काय? स्वर्गात देवाला देखील “अरे येड्या ही दुनिया बेकार आहे. तुला बिचाऱ्याला दुनियादारी नाही कळणार. तुझी सिस्टीम आउट डिटेड आहे. हे बघ माझ्याकडे एक सॉलिड प्लान आहे..” असं सांगून आपली ग्यान बिडी त्याला ऑफर करत असेल!©मंदार जोग

mandar jog

mandar jog

मंदार जोग ह्यांची कटिंग पिनाकोलाडा, वन बाय टू मार्गारिटा आणि कोनिएक कथा ही तीन पुस्तक प्रकाशित झाली असून त्यांच्या साडेचार हजार प्रती छापील आणी इबुक स्वरूपात विकल्या गेल्या आहेत. दृकश्राव्य, प्रिंट तसेच सोशल मिडीयावर मंदार जोग नियमित लिखाण करत असतात. लेखक ऑनलाईन ह्या संकल्पनेला सत्यात आणणाऱ्या टीमचा मंदार जोग एक हिस्सा आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!