शिवनेरी..
वेळ- सकाळी ६.१५
स्थळ- स्वारगेट स्टॅण्ड.
एक पस्तिशीची टाकाटक बाई आणि तिच्या बरोबर त्याच वयाचा चुणचुणीत बाप्या शिवनेरी मध्ये चढतात आणि माझ्या पुढल्या सीटवर बसतात.
बाप्या- घेतलं ना सगळं?
बाई- हो.
बाप्या- छत्री?
बाई- हो.
बाप्या- मध्ये कुठेही उतरू नको. रस्त्यात खाऊ नको. हल्ली मिक्स बिक्स करतात.
बाई- हो.
बाप्या- पाण्याची बाटली घेतली का?
बाई- हो.
बाप्या- सुट्टे पैसे? हे कंडक्टर लोक वालमारेगिरी करत सुटे देत नाहीत. आपण ठेवायचे सुट्टे. आहेत ना?
बाई- हो..
बाप्या- एक्स्प्रेस वे ला लागलीस की इमर्जन्सी नंबर लिहिलेला बोर्ड दिसेल. त्याचा व्हिडीओ काढ. फोटो नको. हलत्या गाडीतून काढलेला फोटो हलेल आणि वेळेला दिसणार नाही.
बाई- हो.
बाप्या- फोटो आयडी आहे ना काहीतरी? पोलिसांना ओळख पटवायला सोपं जातं अपघात झाला, हॉस्पिटल मध्ये ऍडमिट करायची वेळ आली तर…
बाई- हो..
बाप्या- पोहोचलीस की एक मेसेज टाक.
बाई- हो..
बाप्या- जे रिक्षावाले बस जवळ येतील त्यांच्या रिक्षात बसू नको. त्यांचे मीटर सेट असतात. चालत लांब जा आणि चालत असलेली रिकामी रिक्षा पकड.
बाई- अरे जड बॅग आहे माझ्याकडे.
बाप्या- व्हील आहेत. मुद्दाम खर्च करून व्हील वाली घेतली ती कशाला? व्हील अश्या वेळीच वसूल होतात.
बाई- बर…
बाप्या- नलू आत्याकडे पोहोचलीस की तिला मला फोन करायला सांग.
बाई- हो..
बाप्या- नीट जा. येऊ मी?
बाई- हो..
बाप्या तिला सोडून निघाला. दारापर्यंत जाऊन परत येत म्हणाला-
बाप्या- परत येताना सुट्टे पैसे जवळ ठेव, छत्री विसरू नको..
बाई- त्या पेक्षा तू का येत नाही माझ्या बरोबर. मी झोपते. तू बघ ना हे सगळं.
बाप्या- चिडू नको. काळजी वाटते म्हणून सांगतो.
इतक्यात कंडक्टर बाई आल्या. बाप्या ने सांगितलं-
बाप्या- एक ठाणे.
बाई ने पाचशे ची नोट दिली. कंडक्टर ने तिकीट दिलं आणि पन्नासची नोट दिली.
बाप्या- दहा रुपये?
कंडक्टर- सुटे नाहीयेत. आले की देते.
बाप्या- आमच्याकडे आहेत सुट्टे. ए दे ग तू चाळीस रुपये.
तिने पर्स मध्ये शोधाशोध केली.
बाई- वीस आहेत फक्त.
बाप्या- (वैतागून) काय? मी सांगितलं होतं ना सुट्टे ठेव म्हणून.
कंडक्टर इतर लोकांना तिकीट द्यायला पुढे गेली.
बाप्या- का नाही ठेवलेस सुट्टे?
बाई- मला वाटलं आहेत. काल रिक्षाला दिले बहुतेक. देईल ती उरलेले दहा रुपये परत.
बाप्या- पण का हा केअरलेसनेस?
बाई- सॉरी रे….आता जाताना सडू चेहऱ्याने जाऊ नको. प्लीज एक स्माईल दे आणि जा.
बाप्या अजूनही रागाने बघत होता तिच्याकडे. तिने डोळ्यांनी काय सांगितलं मला मागे असल्याने दिसलं नाही. पण बाप्याचे एक्सप्रेशन चेंज. पुढे होत त्याने तिच्या कपाळाच चुंबन घेतल आणि कानात पुटपुटला. ते देखील मला ऐकू आलं.
बाप्या- वेडी आहेस तू…
बाप्या बस मधून उतरला आणि बाहेर तिच्या खिडकीखाली उभा राहिला. कंडक्टर बाई ने तिला दहा रुपये परत दिले. तिने नोट काचेवर लावून त्याला दाखवली. तिने नोट दाखवताना त्याला डोळ्यांनी काहीतरी सांगितलं असणार कारण काचेबाहेर तर्जनी डोक्याला लावत ‘वेडी आहेस तू’ अशी खूण करून तो हसला. आणि अचानक पाऊस पडू लागला. ड्रायव्हर बस रिव्हर्स घेऊ लागला. मी रिमझिम गिरे सावन ऐकत डोळे मिटून घेतले. एक नवीन दिवस, एक नवीन आठवडा एका गोड नोटवर सुरू झाला होता! © मंदार जोग
- व्हॅलेंटाईन डे- सर्व भाग (१ ते ६) एकत्र - February 18, 2024
- वारसा (भाग ७) - November 27, 2023
- वारसा (भाग ६) - October 30, 2023
वधू परीक्षा मस्तच . हलकं फुलकं ,वास्तवाशी जुळणारं , लिखाण .
लिहीत राहा . माझ्यासारख्या परदेशांत वास्तव्य करणाऱ्या, वयस्कर व्यक्तीला हा एक विरंगुळा