म्हातारी….
सावित्री आणि सत्यजित भेटले की खटकेच उडत हल्ली बहुतेक वेळा. आणि त्याला अगदी लहान लहान कारणं देखील पुरेशी होत. अनेकदा सत्यजित चहा देखील न घेता सावित्रीच्या घरातून निघून जात असे. ही अशी का वागू लागली अचानक ह्याचा सत्यजितला उलगडा होत नव्हता. हवं ते सगळं तर देतोय. पण तरीही? इथे सावित्री म्हणायची सत्या असा नव्हता. आता माझ्यावर हुकूम गाजवायचा प्रयत्न करतो. मी नाही बधणार. सन्मानाने जगले आहे आजवर. पुढेही तशीच जगणार! खर तर चूक कोणाचीच नव्हती. परिस्थिती तशी होती. दोघेही वाईट नव्हते. प्रचंड प्रेम होतं दोघांचंही एकमेकांवर. पण दोघंही मानी होते! थोडे हट्टी होते. सावित्री काकणभर जास्त हट्टी!
सत्यजित घरी आला. जाम वैतागला होता. जेवायचा पण मूड नव्हता. अंघोळ करून तसाच बेडरूम मध्ये गेला. संजना मुलांना त्यांच्या बेडरूम मध्ये झोपवून आली. सत्यजित चिडलेला तिला माहीत होतं. ती त्याच्या शेजारी बसली आणि त्याच्या केसात हात फिरवत म्हणाली-
संजना- परत भांडलात आज?
सत्यजित- मग काय? वेड लावेल ती. किती हट्टी आहे. आणि सगळं तिच्या मर्जीने कसं होईल? मी लहान आहे का आता? मला पंधरा आणि बारा वर्षांची मुलं आहेत आता. काही वर्षांनी पन्नाशी येईल माझी. पण नाही. तिला मी कुक्कुल बाळ वाटतो अजून. इतकं मोठं घर आहे. तिची बेडरूम रिकामी पडली आहे. ये ये म्हणतोय इतकी वर्षे तरी त्या जुन्या दोन खोल्यांच्या घरात राहते. म्हातारी झाली आहे. उद्या पडली, लागलं तर धावायला आपल्यालाच लागेल ना?
संजना- एक सांगू? ऐकशील?
सत्यजित- संजना तिच्या वेडेपणासाठी आणि इगोसाठी मी त्या जागेत नाही राहू शकत. आणि का राहू? झालं ना? तेव्हा परवडत नव्हतं म्हणून राहिलो त्या जागेत. आता इतका मोठा फ्लॅट घेतला तरी का राहायचं तिथे?
संजना- ही भांडण संपावी म्हणून…ऐक माझं. मुलांना सुट्ट्या आहेत. जाऊ आपण…प्लीज…तुझा स्ट्रेस नाही बघवत मला. तुला इतका स्ट्रेस होतो तर त्यांना ह्या वयात किती त्रास होत असेल विचार कर…
रविवारी सत्यजित, संजना आणि दोन्ही मुलं सावित्रीच्या घरी राहायला गेली. चार दिवस थोड्या अडचणीत काढले पण सगळे हसतमुख होते. त्या दिवशी पहाटे सावित्री तिच्या नवऱ्याच्या म्हणजे सत्यजितच्या बाबांच्या तसबिरी समोर उभी होती. त्यांच्या फोटोकडे बघत म्हणाली-
सावित्री- बावन्न वर्ष झाली ह्या घरात येऊन. तुमचं आणि माझं घर. आपलं पहिलं घर. तुम्ही गेलात साथ सोडून लवकर. पण मी आहे ह्या घरात अजून. कारण तुम्ही असता बरोबर सतत. सोनाली लग्न करून अमेरिकेत आहे. आणि सत्यजित त्याच्या घरी सुखी आहे. मला बोलावतोय. पण पाय नाही निघत हो माझा. मग भांडतो आम्ही. आधीच ती जनरेशन गॅप का काय म्हणतात ते आहे. त्यात आम्ही दोघे हट्टी. त्यात माझं म्हातारपण. अनेक गोष्टी विसरते. किती वर्षे बाकी आहेत माहीत नाही. पण तुमच्या आणि माझ्या ह्या घरात माझं अढळ स्थान आहे. इथून मला कोणीही काढू शकत नाही. हे माझं घर आहे. इथे तुम्ही आहात. म्हणून हे सोडायची इच्छा होत नाही हो. सत्यजित कधीच येणार नाही हे माहीत असल्याने त्याला इथे ये सांगायची मी. मी तुझ्या घरी यायच्या ऐवजी तू इथे ये ही माझी पळवाट होती खरं तर! पण तो आलाय खरंच! अडचण होते आहे त्याची, संजनाची आणि पोरांची. काय करू मी? भीती वाटते हो. नाही चांगलं वागवलं काही दिवसांनी तर मी कुठे जाऊ? जीव तुटतो सत्यजितला नाही म्हणताना पण…
मागून आवाज आला-
सत्यजित- नको येऊ तू. तुटू दे जीव. माझ घर छळ छावणी आहे. आलीस तिथे की अतोनात छळ करणार आहे मी. अजिबात येऊ नको. बाबा तुमची ही हट्टी बायको स्वतःच खरं करणार. हिला जरा बुद्धी द्या चांगली.
सावित्री- अहो पाहिलं ना कसा बोलतो मला ते? ते पण माझ्या घरात. उद्या ह्याच्या घरी गेले तर माझं कसं पोतेर करेल ह्याची कल्पना आली असेल ना ह्यावरून? म्हणून जात नाही मी ह्याच्या घरी. माझ्याच घरात मेलेली बरी मी.
हे ऐकून सत्यजित डोक्यावर हात मारून बाहेर गेला. सावित्री तसबिरीकडे बघत होती. तिच्या म्हाताऱ्या डोळ्यात अश्रू होते.
सावित्री- काय करू हो? तुम्ही गेल्यावर सगळे निर्णय माझे मी घेतले. पण हा निर्णय कित्येक वर्षे घेता येत नाहीये.
……………
सत्यजित त्यांच्या बेडरूम मध्ये मुलांना सांगत होता-
सत्यजित- त्या दिवशी आजी ने आजोबांच्या फोटोला प्रश्न विचारला आणि मी दारातून आजोबांचा आवाज काढत “जा” अस म्हणालो आणि आजी इथे राहायला आली.
………
सावित्रीच्या बेडरूम मध्ये सावित्री संजनाला सांगत होती-
सावित्री- मी ह्यांच्या तसबिरी समोर उभी होते आणि काल रात्री वाहिलेलं फूल खाली पडलं. जणू ह्यांनी मला जा असं सांगितलं. मला तर त्यांचा आवाज आल्याचा भास झाला!
…………..
सावित्री घरी येऊन आता वर्ष झालं होतं. संजना मुलांबरोबर हसत बाहेर सुरू असलेलं भांडण ऐकत होती.
सत्यजित- आई मी लहान आहे का? मला कळत ना पाऊस आहे म्हणजे छत्री न्यायाची ते? आणि गाडी आहे माझी आता.
सावित्री- वय वाढलं की अक्कल वाढतेच असं नाही. भिजून आजारी पडलास तर ऑफिसला खाडा होईल. मला आणि संजनाला कामाला लावशील. त्यात डॉक्टर कडे जायला भितोस इतका मोठा झालास तरी. आई आहे मी तुझी. मला अक्कल नको शिकवू. छत्री घे बरोबर आणि टॉवेल पण ने. ऑफिसात केस पूस व्यवस्थित. कळतंय का?
सत्यजित वैतागून छत्री आणि टॉवेल घेऊन निघाला! सावित्री त्याने ऐकलं म्हणून खुश होती. इतक्यात नातवंड आणि संजना बाहेर आले. आज वरिष्ठ नागरिक दिवस म्हणून नातवंडांनी सावित्रीला ग्रीटिंग दिलं. त्यात लिहिलं होतं “आजी, सिनियर सिटीझन डे च्या शुभेच्छा! ह्यातला सिनियर हा शब्द वयानेच नाही तर मानाने देखील सिनियर असलेल्या लोकांसाठी आहे हे आम्ही लक्षात ठेउ. बाबा तुझ्यावर जितकं प्रेम करतो तितकंच आम्ही पण तो सिनियर सिटीझन झाला की त्याच्यावर करू.” ते वाचून सावित्री खुश झाली. नातवंडांना जवळ घेऊन लाड करू लागली. म्हणाली-
सावित्री- संजना ही इतकी गुणी पोरं सत्याचीच आहेत ना?
संजना हसली.
सावित्री- नाही. हे मला शुभेच्छा देत आहेत. पण सत्या भांडून गेला.
इतक्यात सावित्रीला हल्लीच घेऊन दिलेल्या मोबाईल मध्ये सत्यजित चा मेसेज आला.
मेसेज- म्हातारे, सिनियर सिटीझन दिनाच्या शुभेच्छा! निघताना भांडलीस म्हणून द्यायला विसरलो. संध्याकाळी तयार राहा. तुझं आवडत चायनीज खायला नेणार आहे. आणि हो. केस पुसून कामाला बसलोय!
सावित्रीने डोळ्यातले अश्रू पुसत संजनाला म्हणाली-
सावित्री- सत्या ना वेडा आहे…शेवटी माझाच मुलगा. माझ्यावर गेला आहे! – ©मंदार जोग
- व्हॅलेंटाईन डे- सर्व भाग (१ ते ६) एकत्र - February 18, 2024
- वारसा (भाग ७) - November 27, 2023
- वारसा (भाग ६) - October 30, 2023
सुंदर लिहिलंय… माझ्या आईची आठवण आली. असाच हट्टीपणा करायची. आता फक्त आठवणी मागे राहिल्या.
केवळ अप्रतिम सध्या आम्ही उंबरठ्यावर आहोत म्हणजे मी उंबरठा ओलांडला आहे साठीचा पत्नी अजून उंबरठ्यावर उभी आहे रुक्मिणी सारखी आणि मुलगा आणि पत्नी हे अगदी आपल्या सावित्री आणि सत्यजित सारखेच आहेत अगदी हुबेहूब मला शंका येतेय की तुम्ही घरात डोकावले कि तुमचे खबरी आजुबाजूला रहातात ….. 😂
सुरेख कथा, खरच म्हातारपणी कसं वागावं हे उमगत नसावं, आता मी पण ज्येष्ठ नागरिक झाल्ये, पण घरात कोणीच लहान नसल्यानेच सध्या तरी प्रश्न उपस्थित होत नाहीत. आवडलंय कथा मनापासून
मस्त ! म्हाताऱ्या छे वयस्कर लोकांचं खरं खरं चित्र . प्रत्येक पिढी हाच खेळ खेळते . याला जीवन ऐसे नाव.