नाती…
आज एका मित्राशी सहज गप्पा मारताना नातेवाईक हा विषय सुरू होता. तो त्याचे नातेवाईक कोण आणि कुठे आहेत हे सांगत होता. मग मी सांगू लागलो आणि सांगताना माझा भूतकाळ डोळ्यासमोर उभा राहिला.
लहानपणी सर्वांचे असतात तसे आमचे नातेवाईक म्हणजे आई आणि बाबांच्या बाजूचे लोक. आईची सख्खी, चुलत, मामे, आते आणि मावस भावंड आणि तशीच बाबांची आणि त्यांची पुढील पिढी म्हणजे आमची भावंड. त्यातल्या त्यात जास्त कनेक्ट आई वडिलांच्या सख्ख्या भावंडांशी आणि त्यांच्या मुलांशी.
त्यावेळी मोबाईल वगैरे उपलब्ध नव्हते. त्यामुळे अर्थात फॅमिलीचे व्हाट्सएप ग्रुप वगैरे नव्हते. लँडलाईन सुद्धा सर्वांच्या घरात नसे. मनोरंजनासाठी नाटक, सिनेमा आणि दूरदर्शन हे पर्याय होते. बाकी लोक चौपाटी, हँगिंग गार्डन अश्या ठिकाणी फिरायला जात. आणि मुख्य म्हणजे एकमेकांच्या घरी बिनधास्त जात. तेव्हा घर लहान होती. घरात कुटुंब मोठी आणि एकत्र सुद्धा होती. पण कोणाकडे जाताना आजच्यासारखी अँपॉइंटमेंट घेऊन जायची गरज पडत नसे. सुट्टीच्या दिवशी बस किंवा ट्रेन ने आजोळी, मावशी, आत्या किंवा काकांच्या घरी सहज जाता यायचं. जाताना मुलांसाठी बिस्किटचा पुडा खाऊ म्हणून चालत असे. गेल्यावर गप्पा, चहा पोहे आणि जेवणाची वेळ असेल तर जेवून पाहुणे परतायचे. आई वडील त्यांच्या पिढीशी बोलताना आम्ही भावंड खेळण्यात मश्गुल असायचो. आमच्याकडेच नाही तर सबंध समाजात हेच चित्र होतं.
मी आजवर पाहिलेला नात्यांचा प्रवास माझ्या आजी आजोबांपासून आमच्या मुलांपर्यंतचा आहे. आजी आजोबांची पिढी ही एकत्र कुटुंबात(च) वाढलेली होती. आमच्या आई वडिलांची पिढी सुद्धा बऱ्यापैकी एकत्र कुटुंब पद्धतीत आयुष्याचा काही काळ जगलेली आहे. पण वेगळे रहात असले तरी नाती आणि नातेवाईकांना घट्ट धरून असलेली ती पिढी होती. आणि आमची पिढी ही पहिली विभक्त कुटुंब पद्धतीत वाढलेली पिढी. आई वडील आणि मुलं अश्या चौकोनी कुटुंब व्यवस्थेत वाढलेली. आणि तरीही नातेवाईकांशी उत्तम कनेक्ट असलेली. नियमित भेटी असणारी.
साधं उदाहरण द्यायचं तर आम्ही सगळी मामे मावस भावंड सुट्ट्या पडल्या की आजोळी जमायचो. कित्येक दिवस तिथे राहायचो. मस्ती करायचो. मामा, मामी, आजी, आजोबा खूप प्रेमाने लाड करत आमचे. आम्हाला आम्ही आमच्याच घरात रहात असल्यासारखं वाटायचं! इतर काका, मामा, आत्या, मावशी ह्यांच्या घरी सुद्धा नियमित येणं जाणं होतं. “आजोळ” ही संकल्पना तेव्हा उत्तम जिवंत होती. एकत्र राहात नसलो तरी नातेवाईक हे कुटुंबाचा हिस्सा होते. नात्यात, भेटीत, वागण्यात कोणतीही औपचारिकता नव्हती. “मायेचा ओलावा किंवा जिव्हाळा” हे आता फक्त फेसबुक पोस्ट मध्ये किंवा जुन्या पुस्तकात वाचायला मिळणारे शब्द तेव्हा “खरी भावना” होते.
आता आमच्या पुढची पिढी म्हणजे आपल्याच घरात “वेगळ्या बेडरूम” मध्ये राहणारी. आपापल्या आई वडिलांची एकुलती एक किंवा हम दो हमारे दो व्यवस्थेत जन्माला आलेली. नातेवाईक, भावंड ह्यांच्यापेक्षा फ्रेंड्स, मित्रमैत्रिणी, सोशल कॉन्टॅक्ट आणि सोशल मीडियावर नाती शोधणारी, जोडणारी आणि ती जास्त कसोशीने पळणारी आणि जगणारी पिढी!
सुट्टीत आजोळी, काका मामा कडे जाण्यापेक्षा आणि तिथे रमण्यापेक्षा मूव्ही, ट्रेक, हॉबी क्लास, फॅमिली हॉलिडे ला प्राधान्य देणारी. नातेवाईक म्हणजे “फॅमिली फंक्शन” ला भेटणारे आई बाबांचे रिलॅटिव्ह आणि ज्यांना फॉर्मल हाय हॅलो करायचे असे “कझीन्स” अस अनेकदा समजणारी पिढी.
सुट्टीत आजोळी, काका मामा कडे जाण्यापेक्षा मूव्ही, ट्रेक, हॉबी क्लास, फॅमिली हॉलिडे ला प्राधान्य देणारी. नातेवाईक म्हणजे “फॅमिली फंक्शन” ला भेटणारे आई बाबांचे रिलॅटिव्ह आणि ज्यांना फॉर्मल हाय हॅलो करायचे असे “कझीन्स” अस समजणारी पिढी.
शोधांनी, तंत्रज्ञानातील प्रगतीने, संवाद माध्यमांमुळे जग जवळ आलं पण बदलत्या समाज रचनेतून नाती मात्र दुरावली. आपली हक्काची, रक्ताची असलेली लोकं लांब जाऊन बाहेरून आयुष्यात आलेली लोकं जवळची झाली. अर्थात मित्र, कलीग म्हणून चांगली माणसं संपर्कात येणं केव्हाही उत्तमच. पण प्रश्न नातेवाईक तितके जवळचे न राहणे हा आहे.
सख्खे चुलत असे किमान पाच सहा काका, आत्या, मामा, मावश्या आणि सख्खे,आते, मामे, चुलत धरून पंधरा वीस भावंड असलेल्या आमच्या पिढीच्या पुढील पिढीला मुळातच नातेवाईक कमी आहेत. अनेकदा विचार येतो की आज आई वडिलांची एकुलती एक किंवा दोघे असलेल्या मुलांना आई वडिलांनंतर जगात विश्वास ठेवता येईल असे नातेवाईक किती असतील? आणिजे असतील त्यांच्याशी ह्यांचा संबंध किती असेल? बदलत्या सामाजिक परिस्थितीत आणि विरळ होत गेलेल्या नात्यांच्या समीकरणात ही मुलं जगात एकटीच असतील. मित्र परिवार मोठा असेलही. पण नातेवाईक आणि मित्र ह्यात फरक असतोच. अनेकदा मित्र नातेवाईकांपेक्षा जवळचे असतात, माझेही आहेत. पण ते नातेवाईक नसतात.
मला वाटतं आपले नातेवाईक, गोतावळा हे आपण सगळे एका कुटुंब नामक वृक्षाची फळं असतो. त्यात माहेर, सासर, आते, मामे वगैरे फांद्या गुंतलेल्या असतात. पण कुटुंब नावच आपलं सामायिक झाड एकच असतं.
आज सगळे नातेवाईक आठवताना मला ह्या गोष्टीची प्रकर्षाने जाणीव झाली. आज आमची पिढी आता आपापल्या आयुष्यात व्यस्त असल्याने फक्त कौटुंबिक समारंभाला भेटी होतात. फॅमिली ग्रुप्स वर शुभेच्छा आणि अभिननंदन केलं जातं. सणासुदीला किंवा कोणी आजारी वगैरे पडल्यास किंवा वृद्ध व्यक्तींच्या निधनाच्या निमित्ताने भेटी होतात. लहानपणी मनात आलं केव्हाही एकमेकांच्या घरी जाणाऱ्या आम्हाला आता भेटी फोन वगैरे करून प्लान कराव्या लागतात. पूर्वी एकमेकांच्या लहानश्या घरात देखील बिनधास्त वावरणारे आम्ही आज एकमेकांच्या मोठाल्या घरात वावरताना जरा फॉर्मल असतो. तेव्हा यजमान पाहुण्याला घरचा समजत असे, आज पाहुणा कितीही घरचा असला तरी तो बऱ्यापैकी पाहुणा असतो. म्हणजे मित्रांच्या घरी बिनधास्त फ्रीज उघडून पाणी पिणारा माणूस सख्ख्या, चुलत किंवा कोणत्याही भांवंडाच्या घरी गेल्यावर “जरा पाणी मिळेल का?” असं विचारतो!
मला वाटतं ह्याच मुख्य कारण म्हणजे हल्ली कमी झालेला नातेवाईकांचा सहवास. सहवास वाढला की कम्फर्ट फॅक्टर वाढतो. कोणी म्हणेल आता परिस्थिती वेगळी आहे. लोक बिझी आहेत. पण मग आमचे आई वडील, आजी आजोबा काम करत नव्हते? त्यांची भावंड तर दुसऱ्या गावात राहत होती अनेकदा. पण जाणं येणं नियमित होत. भेटीगाठी होत्या. त्यात औपचारिकता नव्हती. एका झाडाची फळ वेगवेगळ्या फांदीवर असली तरी मुळाला धरून होती.
“काळ बदलला, आयुष्य वेगवान झालं, वेळ कमी मिळतो, कामाचं प्रेशर असतं” ही आपण नाती विरळ होण्याला दिलेल्या सबबी आहेत असं मला वाटतं. तसं नसतं तर हीच कारण मैत्रीच्या बाबतीत लागू झाली असती. कदाचित असं असेल का की जन्मतः by default आपल्याला मिळणारी नाती आपण गृहीत धरतो? आणि आपण स्वतः आपल्या मर्जीने निर्माण केलेली मैत्रीची नाती आपली जबाबदारी म्हणून जास्त जोपासायचा प्रयत्न करतो का?
जे असेल ते असेल. पण ही नाती कुठेतरी जपायला हवी असं वाटतं. सोशल सर्कल खूप मोठं असलं तरी नातेवाईक नातेवाईक असतात. दोन्ही सारखेच महत्वाचे. पण हल्ली नातेवाईक आणि त्यांच्या बरोबर असलेल्या नात्यांना प्राधान्य दिलं जात नाही. वर म्हटल्याप्रमाणे कदाचित त्यांना गृहीत धरलं जात असेल. “विश्वची माझे घर” म्हणताना आपण आपलं स्वतःच घर विसरून “फक्त विश्व माझं घर” असं तर वागू लागलो नाही आहोत ना? विश्वविहार केल्यावर घरी परत आल्यावर घर घरासारखं वाटायला हवं ना? घर बनत लोकांनी, माणसांनी आणि नात्यांनी. ती जीवित ठेवली, पुनर्जीवित केली तर विश्वात भ्रमण करताना जेवढा आनंद मिळतो तितकाच आनंद घरातही मिळेल! फक्त प्रयत्न करायला हवा!- ©मंदार जोग
- व्हॅलेंटाईन डे- सर्व भाग (१ ते ६) एकत्र - February 18, 2024
- वारसा (भाग ७) - November 27, 2023
- वारसा (भाग ६) - October 30, 2023