चेतना…

काल एका मैत्रिणीशी बोलताना सहज विषय निघाला आणि एक जाणीव झाली. म्हणजे आपण सर्वांनीच अनुभवलेली एक गोष्ट अधोरेखित झाली. विषय तिची सासू वारल्यावर पुण्यात एकटे राहणाऱ्या सासऱ्यांचा होता. ती म्हणाली की तिची सासू होती तेव्हा त्यांचं पुण्याला नियमित जाणं, राहणं होत असे. पण ती गेल्यापासून तिथे जाणं खूप कमी झालं. आणि ते ठरवून नाही तर जायची इच्छा कमी होत गेल्याने कमी होत गेलं.
त्यावर मी म्हणालो की अगदी बरोबर आहे. स्त्री घराला घरपण देते, तिचा घरातील वावर घराला एक वात्सल्याचा स्पर्श देतो, तिचं घरातील अस्तित्व चार भिंतींच्या आत राहणाऱ्या माणसांचा एक संसार फुलवतं! आणि त्यामुळेच ज्या घरात स्त्री असेल तिथे गेल्यावर चैतन्य जाणवतं आणि तिथे पाहुणे येत राहतात. पण ज्या घरात स्त्री नसेल ती घरं अपूर्ण, स्वतःच आधार शोधणारी वाटतात!
हे मी बोलण्याच्या ओघात बोलून गेलो आणि मला माझ्याच ओळखीतील “स्त्री पात्र विरहित” अशी काही घरं आठवली. त्यातील काही घरात स्त्रिया असताना आणि त्या नसताना असा दोन्ही वेळा मी गेलो आहे. त्यातली काही घर मित्रांची, काही नातेवाईकांची तर काही शेजाऱ्यांची. बाई असताना ज्या घरात अगदी प्रेमाने विचारपूस व्हायची, जेवायचा आग्रह व्हायचा, सणवार मोठ्या उत्साहाने साजरे व्हायचे, कोणत्याही वेळी गेलं तरी काही ना काही खाऊ चहा बरोबर समोर ठेवला जायचा, जिथे माझ्या  घरच्यांची आस्थेने चौकशी व्हायची त्या घरात आता शांतता जाणवते. म्हणजे त्या घरातील पुरुष असलेले माझे नातेवाईक, मित्र किंवा शेजारी आजही तिथे असतात. पण तिथलं वात्सल्य, घरपण हरवलेलं असत. ते लगेच जाणवत. एक भकासपणा असतो त्या वस्तुत…अगदी कितीही नीटनेटकी ठेवलेली असली तरीही! आता ते घर घर कमी आणि हॉस्टेल जास्त वाटतं. त्या घरात कामवाल्या साफसफाई करतात, स्वयंपाक करतात पण त्यात घरातील लक्ष्मीचा स्पर्श नसतो. बाईच अस्तित्व असलेल्या घरातील धुळीतही मला स्त्रीच अस्तित्व जाणवतं जे घरात ओलावा टिकवून ठेवत. आणि म्हणूनच स्त्री नसलेल्या घरातील चकचकीत फर्निचर, स्वच्छ पडदे सुद्धा शुष्क आणि निर्जीव भासतात!
स्त्री कोणत्याही वयाची असो. घरातील पुरुषांची ती आई, आजी, बायको, बहीण किंवा मुलगी असो. ती संवेदनशील असते. तिच्यात उपजत माणसाना एकत्र धरून ठेवण्याच एक कौशल्य असत. तिच्या अस्तित्वाने घरात चैतन्य, ओलावा, शिस्त, प्रेम आणि घरपण रुजत…वाढत! आणि स्त्रीचं अस्तित्व घरातून संपल्यावर घरच्यांना आणि पाहुण्यांनाही ते सर्व ओसरल्याच जाणवतं! पण त्याला उपाय नसतो. स्त्री शिवाय ते घर इतकं एकाकी होतं की तिथे जायची इच्छा होत नाही. मग पूर्वी ज्या घरात पाहुण्यांची वर्दळ असायची तिथे आता पार्टी करायला किंवा पत्ते खेळायला मित्र, सोसायटीची कामं करायला मेंबर्स अशी मंडळी दिसू लागतात. तिथे हॉटेल, होस्टेल किंवा ऑफिस अस काहीही असू शकत. पण तिथे घर कमी उरत.
स्त्रीला घरची लक्ष्मी म्हणतात ते यथायोग्य आहेच. पण त्याच्या पुढे जाऊन मी म्हणेन की स्त्री ही घराची चेतना असते. ती असते तोवर तिला जपा, तिचा आदर करा, तिला प्रेम द्या…कारण ती घरातून गेली की घराची चेतना संपते आणि उरतात चार भिंती आणि त्यांच्या मध्ये राहणारे पुरुष!- मंदार जोग
mandar jog

mandar jog

मंदार जोग ह्यांची कटिंग पिनाकोलाडा, वन बाय टू मार्गारिटा आणि कोनिएक कथा ही तीन पुस्तक प्रकाशित झाली असून त्यांच्या साडेचार हजार प्रती छापील आणी इबुक स्वरूपात विकल्या गेल्या आहेत. दृकश्राव्य, प्रिंट तसेच सोशल मिडीयावर मंदार जोग नियमित लिखाण करत असतात. लेखक ऑनलाईन ह्या संकल्पनेला सत्यात आणणाऱ्या टीमचा मंदार जोग एक हिस्सा आहेत.

3 thoughts on “चेतना…

  • August 28, 2023 at 11:06 am
    Permalink

    What you say is true .However would this lady have gone more often if her father in law had died and mother in law was living alone. I feel there are two issues here .First as you say woman’s presence in house is always noticeable and very pleasing too.Second is loneliness when a partner dies.Loneliness is same for both.Woman tries to cover it up and man can’t .

    Reply
  • August 28, 2023 at 1:36 pm
    Permalink

    खरयं….दोन वर्षापुर्वी माझी सख्खी लहान बहिण करोना मुळे गेली .अता माझे मेव्हणे एकटेच एकाकी जीवन जगत आहेत.त्यांना माणसांची आवड कधीच नव्हती ,माझी बहिण मात्र सगळ्यांशी मिळुन मिसळून रहायची .अता त्यांना जाणवतयं की एकटेपणा किती भयानक आहे ते.

    Reply
  • August 28, 2023 at 3:27 pm
    Permalink

    अगदी बरोबर ,,,

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!