वारसा (भाग २)
आधीच्या भागाची लिंक- वारसा (भाग १)
अविनाश रावांना आयसीयू मध्ये आणल्यावर पल्स लागत नव्हती. इसीजी स्क्रीन वर रेषा flat झाली होती. डॉक्टरांनी तातडीने शॉक ट्रीटमेंट दिली आणि अविनाश रावांच बंद पडलेलं हृदय परत धडधडू लागलं. त्या नंतर दोन stent टाकून त्यांच्यावर उपचार केले गेले. अविनाश राव आठवडाभर हॉस्पिटल मध्ये होते. निघताना डॉक्टरनी त्यांना आहार आणि स्ट्रेस ह्यावर नियंत्रण ठेऊन हलका व्यायाम करायला सांगितला. किमान सहा महिने ऑफिस अटेंड करायचं नाही अस सांगून कोंबड्यांच्या संपर्वकात वर्षभर न जायचा सल्ला दिला. कोंबड्याच्या संपर्कात त्यांची पिसे, विष्ठ ह्यांचे सूक्ष्म कण नाकातून फुफ्फुसात जाऊन इन्फेक्शनने तब्बेत खराब होऊ शकते अशी शक्यता डॉक्टरांनी सांगितली. थोडक्यात अविनाश रावांना डॉक्टरांनी वर्षभराच्या सक्तीच्या रजेवर पाठवलं. बिझनेस च पुढे काय होणार ह्याची चिंता त्यांना आता सतावू लागली होती. त्यांनी ती त्यांच्या शेजारी बसलेल्या राधाला बोलून दाखवली. राधा स्वामी समर्थांची भक्त. अविनाश राव ऑपरेशन थीएटर मध्ये असताना त्या स्वामींचा अखंड जप करत होत्या. आताहि त्या म्हणाल्या “काळजी नका करू. स्वामी सगळ बरोबर करतील.”
खाली हॉस्पिटलच्या वेटिंग एरिया मध्ये तेजस laptop वर चार दिवसांच्या नंतरची फ्लाईट शोधत होता. वडिलांच्या आजारपणामुळे त्याला जायला आठवडाभर उशीरच झाला होता. अमेरिकेतील त्याच्या युनिव्हर्सिटी मध्ये लेक्चर्स सुरु झाली होती. त्याने मेल बरोबर वडिलांचे मेडिकल रिपोर्ट पाठवून दहा दिवस उशिरा यायची परवानगी घेतली होती. तो मित्राला म्हणाला-
तेजस- सलील, उद्या बाबांना डिस्चार्ज मिळेल. त्यांना घरी घेऊन जाऊ. दोन दिवस घरी सेटल झाले की मी Sunday च तिकीट काढतो. डायरेक्ट फ्लाईट आयत्या वेळेला महाग आहेत. मी एक मोठा होल्ट वाल्या फ्लाईटच तिकीट काढतो. प्रवास जरा लांबेल. पण फुकट जास्त खर्च नको. आई बाबंनी आधीच खूप खर्च केला आहे माझ्यासाठी.
मग समोर बसलेल्या आशाला तो म्हणाला-
तेजस- आत्या, तुला आठवतो का माझा शाळेचा पहिला दिवस?
आशा- कसा विसरेन मी? दादा, वहिनी, मी आणि हे, आम्ही चौघे तुला शाळेत घेऊन गेलो होतो. इतकी मोठी वरात फक्त तुझी होती संपूर्ण शाळेत. आम्ही निघाल्यावर तू जोरात भोकाड पसरलस.
राजेश- हो. तुला शाळेत जायचच नव्हत.
तेजस- मग केळकर बाई आल्या ना?
अशा- हो. केळकर बाईनी काय जादू केली कोणास ठाऊक. त्यांनी कडेवर घेतल्यावर तू अर्ध्या मिनिटात रडायचा थांबलास.
राजेश- काय रे अस काय सांगितल त्यांनी तुझ्या कानात?
तेजस- माहित नाही. पण त्यांनी उचलून घेतल्यावर मला आईने उचलून घेतल्यासारख वाटलं आणि मी रडायचा थांबलो.
सलील- पण तेजस आपण दहावी होऊन शाळा सोडताना सेंड ऑफला तू केळकर बाईच्या पाया पडलास तेव्हा त्या मात्र स्वतःच रडणं थांबवू शकल्या नाहीत.
आशा- हो ना. खूप क्लोज होता तेजस त्या बाईंना.
तेजस- आत्या, अजूनहि क्लोज आहे मी त्यांना.
सलील- म्हणजे काय? केळकर बाईंनी स्वतः तुला घडवला आहे. पहिल्या इयत्तेपासून जो पहिला नंबर मिळवलास तो दहावी पर्यंत सोडला नाहीस.
राजेश- ते मात्र आहे. तेजस अभ्यासात कोणालाही ऐकत नाही.
आशा- खर सांगू का तर मला ना थोड आश्चर्य वाटत. म्हणजे दादा बिझनेस वगैरे छान सांभाळतो. पण अभ्यासात तो खास नव्हता. बारावी नंतर शिकलाच नाही. मग त्याचा मुलगा असून तेजस अभ्यासात इतका कसा हुशार?
राजेश- त्या बाबतीत तो आमच्या ताईवर गेलाय. ताई पापड होती अभ्यासात.
तेजस- हो आईची हुशारी आलीच असेल माझ्यात. पण खर सांगू का? माझ्या पहिल्या इयत्तेपासून बाबांच्या डोळ्यात मी खूप शिकावं, अभ्यासात पाहिलं याव. परदेशात शिकायला जाव आणि तिथेच सेटल व्हाव हे स्वप्न मी बघत आलोय. बोलताना देखील ते नेहमी त्याची आठवण करून द्यायचे. मी फक्त त्यांच स्वप्न पूर्ण करतोय इतकंच. त्यासाठी बाबांनी अपार कष्ट घेतलेत.
आशा- हम्म…तुझ्या आजोबांची ती इच्छा होती. पण पूर्ण नाही होऊ शकली.
तेजस- पण मी बाबांची इच्छा नक्की पूर्ण करेन. येत्या Sunday ला युएसला गेलो की एमएस करून पीएचडी पण करणार आहे आणि तिथेच सेटल होणार आहे. मग तुम्हाला सर्वाना तिथे बोलावतो. मस्त रहा. फिरा.
सलील- हो. पण त्यासाठी तिकीट लागेल. ते काढ आधी.
तेजस- काढतो रे. ब्लॉक केल आहे तिकीट. बाबांना एकदा डिस्चार्ज मिळाला कि पेमेंट करतो.
तेवढ्यात राधा तिथे आली आणि तेजसला म्हणाली-
राधा- तेजस, आज डिस्चार्ज दिलाय डॉक्टर नी. तू ते कॅशलेस च बघ काय होत ते. आणि राजेश तू आमच्या घरी यशवंतला कळव की आम्ही संध्याकाळ पर्यंत साहेबांना घेऊन येतोय. तो आमची रूम व्यवस्थित तयार करून ठेवेल. तुम्ही रात्री आमच्याकडेच रहा, जेवा आणि उद्या सकाळी जा. हव तर कल्पेशला पण बोलवून घ्या आमच्याकडे.
राजेश- नको ताई. कल्पेश आम्हाला पिक अप करायला येतोय. तो मित्राकडे अभ्यासाला गेलाय. उशिरापर्यंत अभ्यास करेल आणि मग आम्हाला पिक करेल.
राधा- बर ठीक आहे.
तेजस आणि सलील कामाला लागले. सगळ्या formality पूर्ण करण्यात दोन तास गेले. अविनाश रावांना डिस्चार्ज मिळाला. सगळे घराकडे निघाले. वाटेत अविनाशराव फार बोलत नव्हते. शांत होते. तेजस ने विचारलं देखील की बर वाटत नाहीये का. तर “तस काही नाही” अस उत्तर दिल त्यांनी. अविनाश राव डोळे मिटून रिक्लाईन केलेल्या सीटवर बसलेले होते. आता वर्षभर बिझनेसच काय करायचं ह्या विचारात होते. त्यांना त्यांनी कर्ज काढून शून्यातून सुरु केलेला बिझनेस आठवत होता. त्यात आलेले अनेक चढ उतार, एकदा कसल्याश्या रोगाने सगळ्या कोंबड्या अचानक मेल्यावर कोसळलेल आर्थिक संकट, त्यातून पुढे तीन वर्षात बाहेर पडून परत एकदा नव्याने उभारलेला त्यांचा बिझनेस! अजूनही खूप करायचं होत त्यांना आणि म्हणूनच इतक्या लवकर साथ सोडणाऱ्या शरीराचा त्यांना राग येत होता. पण नाईलाज होता. अर्थात त्या बिझनेस मधून मिळालेल्या पैशातूनच त्यांनी तेजसला गावातील सर्वोत्तम शाळेत घातला होता. त्या नंतर कॉलेजात शिकायला पुण्यात ठेवला होता. तेजस उत्तम मार्कांनी इंजिनियरिंग उत्तीर्ण होऊन अमेरिकेच्या विद्यापीठाची परीक्षा पास झाला होता. अविनाश रावांनी तेजसच्या माध्यमातून स्वतःच आणि त्यांच्या वडिलांच स्वप्न पूर्ण केल होत. त्यांचा विचार होता की तेजस अमेरिकेला गेला की आणखी काही वर्ष व्यवसाय करायचा आणि मग निवृत्त होताना कोणाला तरी विकून टाकायचा. ओळखीतले काही लोक त्यांचा तयार बिझनेस घ्यायला उत्सुक होते हे त्यांना माहित होत. पण आता बिझनेस बहुतेक लगेचच विकावा लागणार की काय ह्याची त्यांना चिंता लागून राहिली होती.
रात्री साडे दहाच्या सुमारास सगळे घरी पोहोचले. राजेश आणि आशा जेऊन त्यांचा मुलगा कल्पेश बरोबर घरी गेले. अविनाश राव आणि राधा त्यांच्या रूम मध्ये होते. अविनाश रावांनी त्यांच्या मनातली चिंता बोलून दाखवली. व्यवसाय लवकर बंद करावा लागणार ह्याच त्यांना वाईट वाटत होत. पण इलाज नव्हता. बिझनेस आणि तब्बेत ह्यात तब्बेतीची निवड अनिवार्य होती. दुसर्या दिवशी तेजस त्यांना भेटायला आला. त्याने चौकशी केली. बर वाटतंय ना विचारलं. खर तर तो तिकीट काढण्याआधी त्यांच्या तब्बेतीचा अंदाज घ्यायला आला होता. पण तस सरळ न विचारता आडून आडून अंदाज घेत होता. ते अविनाश रावांच्या लक्षात आल. मग तेच म्हणाले-
अविनाश- अरे तुझ्या तिकिटाच काय झाल? कधीच काढलं आहेस?
तेजस- अजून काढलं नाही बाबा. तुमची तब्बेत…
अविनाश- मी बरा आहे. तू आधी तिकीट काढ आणि जा. आधीच कॉलेज बुडत असेल तुझ.
तेजस- म..मी रवीवार च तिकीट ब्लॉक केलय बाबा…
अविनाश- मग काढून टाक लगेच.
तेजस- ठीक आहे बाबा.
हे बोलून तेजस बाहेर आला. आपल्या रूम मध्ये जाऊन त्याने तिकीट कन्फर्म केलं. पुढले दोन तीन दिवस तेजस जायच्या तयारीत होता आणि अविनाश आपल्या बिझनेसच्या डील साठी interested buyers शी बोलत होता. मांजरेकर म्हणून एक माणूस होता. त्याला अविनाशच्या बिझनेस मध्ये interest होता. मांजरेकरचा धंदाच होता की गरजू लोकांकडून बिझनेस, घर, प्रोपर्ती भाव पाडून विकत घेऊन पुढे ते भरपूर नफा घेत विकून टाकायचे. त्याला अविनाशने एकदा सहज फोन केल्यावर मांजरेकर त्याच्या मागे लागला. लाइव्ह स्टोक म्हणजे किती रिस्की आहे, सध्या कसे पक्ष्यांचे आजार पसरत आहेत, उद्या त्याला काही झाल तर सगळंच हातून जाईल वगैरे वेगवेगळ्या गोष्टी सांगून तो अविनाशला खच्ची करत होता. त्यातच त्याने एक बायर आला आहे. लगेच फुल पेमेंट करेल अस सांगितल. पण भाव पाडून ऑफर दिली. अविनाशनेही विचार केला की आता बायर घरी चालून आलाय तर व्यवहार करून टाकावा. उद्या खरच आपली तब्बेत ढासळली तर हा सगळा पसारा कसा आवरणार आणि कोण? मांजरेकर मागे लागला होता आता पेपर्स साईन करुया. बाकी formalities करू नंतर म्हणून. पण अविनाशला तेजस घरी असताना काहीही करायचं नव्हत. त्याने मांजरेकरला सोमवारी सकाळी साईन करू अस सांगितलं.
रविवारी संध्याकाळी तेजस निघाला. सलील आणि कल्पेश त्याला सोडायला त्याच्या बरोबर मुंबईला जाणार होते. निघताना त्याने आई वडिलांना नमस्कार करून आशीर्वाद घेतला. तेजस गाडीत बसला. सलील आणि कल्पेश पण बसले. गाडी निघाली. दिसेनाशी झाली. अविनाश आणि राधा खुश होते की त्याचं स्वप्न आता पूर्ण होणार होत पण त्याच वेळी चांगला चाललेला बिझनेस विकावा लागणार ह्याच दु:ख सुद्धा होत.
रात्रीचे दोन वाजले असतील. अविनाश झोपेतून दचकून उठला. राधा पण उठली.
राधा- काय झाल हो?
अविनाश- काही नाही. विमानाचा आवाज ऐकला. तेजस गेला. एक काम कर. आपण आत्ता फार्म वर जाउया.
राधा- आत्ता? ह्या वेळी?
अविनाश- हो. आजची रात्रच ते आपलं असणार आहे. उद्या सह्या केल्या की आपण मालक राहणार नाही त्याचे. चल.
दोघे तसेच निघाले. फार्मवर आल्यावर अविनाश रावांनी ऑफिस, पिंजरे डोळे भरून पाहून घेतले. काही वेळ ते तिथेच बसले. तिथला तो वास नाकात आणि मनात भरून घेतला आणि निघाले. घरी यायला पहाटेचे पाच वाजले होते. घरी येऊन दोघे झोपले. सकाळी आठलाच मांजरेकर बायरला घेऊन आला. सगळे पेपर्स तयार होते. अविनाश रावांनी एकदा राधाकडे पाहिलं आणि सही करणार इतक्यात आवाज आला, “बाबा थांबा.”
क्रमश:
पुढील भागाची लिंक- वारसा (भाग ३)
- व्हॅलेंटाईन डे- सर्व भाग (१ ते ६) एकत्र - February 18, 2024
- वारसा (भाग ७) - November 27, 2023
- वारसा (भाग ६) - October 30, 2023
Pingback: वारसा (भाग ३) – LekhakOnline – Excellent Marathi Articles