मिड लाईफ क्रायसिस…

पालकर बाई गेल्या! वृद्धापकाळाने आणि आजाराने गेल्या. वय माहीत  नाही. त्या आमच्या वर्गाला देखील कधीच नव्हत्या शिकवायला. आम्ही शाळेत असताना त्या लेट चाळीशी किंवा पन्नाशीच्या सहज होत्या. म्हणजे आज ऐंशी प्लस नक्की असतील. तसा माझा काहीच संबंध नाही. पण का कोण जाणे त्या गेल्याची बातमी एक पल्पिटेशन देऊन गेली. गेल्या काही वर्षात आम्हाला शिकवणारे इतर शिक्षक गेल्याच्या बातम्या देऊन गेल्या तेच अभद्र फीलिंग देऊन गेली पालकर बाई गेल्याची बातमी! 

 होतं काय माहित्येय का की माणूस वयाने, बुद्धीने वाढतो, मोठा होतो, क्वचित कोणी प्रगल्भ वगैरे देखील होतो पण त्याची बालपणाची, तरुण वयाची मुळं त्याचं खोड कितीही जुन झालं तरी खोल कुठेतरी हिरवी असतात. त्या जुन्या काळाच्या मातीला घट्ट धरून असतात. झाड कधीतरी उन्मळून पडेल हे माहीत असूनही त्या खोलवरच्या ओल्या मातीत रुतून बसलेली असतात. खालून, मनाच्या आतून हळूच “लहानपण देगा देवा” म्हणत त्या आठवणीत आपलं बाल्य, तारुण्य आणि ते जादुई दिवस जागवत असतात. भुर्रर्रकन उडून जाणारे ते बालपण आणि तरुणपणीचे दिवस भेंचोद चाळीशी नंतर पिंगा घालू लागतात. वाढणाऱ्या प्रत्येक वर्षाबरोबर त्यांचा पिंगा मनात जोर धरू लागतो. त्या दिवसात परत जाता येत नसतं आणि पुढे दिसत असलेल्या दिवसांमध्ये जायचं नसतं! ह्याला एक खूप समर्पक नाव आहे इंग्रजीत. मिड लाईफ क्रायसिस! आयुष्याच्या मध्यावरचा गोंधळ!

 करियर, नोकरी, संसार, मुल हळू हळू सेटल होत असतात. वीशीपासून केलेल्या मेहेनतीला आता कुठे गोड फळं लागू लागलेली असतात. ती फळं चाखायची संधी येते ती अनेकदा डायबेटीस, हायपर टेन्शन ह्यांना बरोबर घेऊन येते. मग पडतात restrictions. एव्हाना सिंगल मॉल्ट खिशाला परवडू लागते पण तब्बेतीला महाग होते! हिमालय साद घालत असतो, फ्लाईट आणि हेलिकॉप्टरचा खर्च आवाक्यात असतो पण तिथे तग धरायला श्वास पुरात नसतो. प्रचंड चिडचिड आणि गोंधळ सुरु होतो. त्यात ह्या अश्या शिक्षक गेल्याच्या बातम्या! साला जिंदगी झाट वाटू लागते!

 आपण लहानपणी आणि तरुणपणी पाहिलेले सिनेमातले हिरो हिरोईन एक एक करत दात पडावे तसे पडत जातात. त्यांची पोरं पडद्यावर येऊन नंतर लग्न करून सेटल देखील झालेली असतात. ‘सलाम ए इश्क’ म्हणत नाचणारी रेखा राकेश रोशनच्या मुलाची आजी म्हणून पडद्यावर येते, रेखा सोडा आपली आपली वाटणारी माधुरी नेन्यांच्या दोन चिरंजीवांना घेऊन फिरत असते, बेकर, आगासी, स्टेफी जुने झालेले असतात, मॅराडोना तर ढगात जातो फक्त साठाव्या वर्षी  आणि मिड लाईफ क्रायसिसची घंटी जोरात वाजते. सचिन…आपला सचु…परवा तर खेळायला लागला. आपल्याच वयाचा पण कुठल्या कुठे गेलेला. साला तो निवृत्त होऊन देखील दहा वर्ष झाली हे राहुल द्रविडचे पिकलेले कल्ले बघून आठवत आणि काळ नावाची गोष्ट किती निष्ठुरपणे स्वतः बरोबर एकेका पिढीचा पाचोळा गोळा करत सावकाश पुढे सरकत आहे ह्याची जाणीव होते आणि आपण देखील त्यातील एक पान आहोत हे लक्षात येऊन जिंदगी झाट वाटू लागते प्रकर्षाने!

 लहान असताना आई, वडील, दादा, ताई, शेजारचे काका काकू, आजी आजोबा, मामा, मामी, आत्या, मावशी, शिक्षक असे अनेक लोक आपल्याला रागवायचे. जाम राग यायचा की मला हे लोक का रागावतात. मला मोठ व्हायचं आहे. आणि मोठं होऊन ह्यांना रागवायचं आहे असे विचार मनात यायचे. मग आता मोठ झाल्यावर लक्षात येत की त्यातले अनेकजण आपला ओरडा खायला ह्या जगात उरलेच नाहीयेत आणि जे आहेत ते त्या मानसिक किंवा शारीरिक अवस्थेत नाहीयेत. ते समोर आले की त्याचं रागवण आठवत नाही. त्यांनी केलेले संस्कार आणि त्याचं प्रेम दिसत आणि भरून  येत. शाळेत हातावर पट्टी मारणार्या, लहानपणी  खूप राग येणार्या बाई गेल्याची बातमी आली की त्यांची पट्टी नाही तर त्यांनी घोकमपट्टी करून पाठ करून घेतलेले आणि आजही मुखोद्गत असलेले पाढे आठवतात. आजही calculator पेक्षा वेगाने आकडेमोड करायची क्षमता त्यांनी आपल्यात निर्माण केली हे आठवून डोळ्याच्या कडा नकळत ओल्या होतात!

 आता खर तर आपल्याला रागावेल, ओरडेल अस आपल्याहून वयाने मोठं फार कोणी उरलेलच नसत. उलट आपण ओरडू, रागावू म्हणून आपला वचक असणारी आपली मुल, त्यांची मित्रमंडळी, ऑफिसात हाताखाली लागलेली तरुण mba मुल असे अनेक असतात. आपला सल्ला मागणारी, तो मानणारी एक पिढी आपल्या समोर असते. पण आपल्याला सल्ला देणारं, प्रसंगी कान ओढणारं कोणीच नसतं. आणि आज खरं तर त्याची गरज वाटत असते. मी मोठा झालो असलो तरी चुकू शकतो, काहीतरी गडबड होऊ शकते ह्या भीतीच्या वेळी “लढ बाप्पू, काही झाल तर मी आहे मागे” अस म्हणणारा बाप, काका किंवा शिक्षक आपल्या पाठीशी नसतात. पूर्वी ते जिथे आपल्या आधाराला उभे होते तिथे आज आपण उभे असतो पुढल्या पिढीचा आधार बनून आणि आपल्या मागे एक अंधारी, खोल पोकळी असते!

 मिड लाईफ क्रायसिस मध्ये मिड आणि लाईफ हे दोन शब्द महत्वाचे आहेत. मिड लाईफ म्हणजे आयुष्याचा मध्य. म्हणजे थोडक्यात अर्धी इनिंग झाली आहे आणि अर्धी बाकी आहे! हे खूप आशादायक नाही का? की अजून अर्धच जगून झालय. जितकं जगलो तितकं अजून जगायचं आहे. पण एक्स्प्रेस वे वरून इतकी वर्ष पळवलेली आयुष्याची गाडी आता थोडी जुनी झालेली असते. आता एक्स्प्रेस वे संपून दोन लेनची कधी खड्डे असणारी वाट आपली वाट बघत असते. अनेक पुरुष ह्या काळात चिडचिडे होतात. आयुष्याचा मध्य असला तरी अर्ध आयुष्य संपल आहे, बालपणातील जोश आणि तारुण्यातील उत्साह आता कमी होत जाणार आहे, शरीर थकणार आहे किंवा ऑलरेडी थोड थकू लागल आहे ही जाणीव पुरुषी इगोला सहज स्वीकार होत नाही. पण त्यामुळे सत्य बदलत नाही!

 स्त्रियांसाठी तर हा काळ आणखी जास्त पेनफुल असू शकतो. शारीरिक बदल, मेनोपॉज, मूड स्वीन्ग्स ह्या गोष्टी थोड्याफार फरकाने प्रत्येक स्त्री ह्या वयात अनुभवत असते. अनेकींनी अजून “आंटी” हे संबोधन स्वीकारलेलं नसत. म्हणजे मुलांच्या शाळेतील आणि मुलांच्या batch मधील मुलांनी आंटी म्हटलं तर चालत पण आपल्याच बिल्डींग मध्ये राहणाऱ्या पंचविशीच्या पिळदार handsome ने लिफ्टमध्ये “गुड मॉर्निंग आंटी” म्हटलं की लक्ष आपोआप लिफ्टच्या आरशात जाऊन स्वतःचा राग येऊ लागतो.

 आपल्या लोकांचा, शिक्षकांचा, नातेवाईकांचा एक परीघ असतो. लहान असताना ते आपलं protection असतात. तरुण असताना ते आपले साथीदार असतात. आपल्या मिड लाईफ मध्ये त्या परिघाच्या कुंपणाच्या अनेक विटा पडलेल्या असतात आणि उरलेले आपली जबाबदारी बनलेले असतात! आपली अनेक श्रद्धा आणि स्फूर्तीस्थानं आपल्या नजरेसमोर काळाच्या ओघात नष्ट होत असतात. उगाच “हल्ली मृत्युच्या फार बातम्या येतात” अस फिलिंग येत असतं. खर तर तसं काहीच नसत. सगळ नॉर्मल असत. फक्त मनात आता सावल्या थोड्या लांब झालेल्या असतात!

 मग शाळा आणि कॉलेजातील मित्र मैत्रिणींची संमेलनं हा मोठा आधार असतो. आपल्याच वयाचे आपलेच batch mate पाहून, त्यांना भेटून आपल्याला इतके दिवस उगाचच जो एकाकीपणा वाटत असतो तो कमी होतो. आपल्यासारखे अजून देखील आहेत हे जाणवून थोडा दिलासा मिळतो. त्या भेटीत वर्गातल्या सर्वात सुंदर मुलीने “मी आता केस डाय करते” अस सांगितल की पुढल्या रविवारी केस डाय करायचा आपला अनेक वर्षाचा नियम सहज तोडला जातो.

 संसार, मुल, मित्र, नोकरीधंदा हे सर्व जमेस धरलं तरी त्या पलीकडे जाणारी प्रत्येक माणसाची एक ‘मी स्पेस’ असते. जिथे तो एकटा असतो आणि प्रचंड अलिप्त असतो. विशेषतः ह्या मिड लाईफ क्रायसिसच्या निमित्ताने माणूस त्या एकांतात जास्त वेळा प्रवेश करतो. त्यावेळी “माझ्या नंतर काय?” हा प्रश्न स्वतःला विचारून मनातल्या मनात पुढली तजवीज करू लागतो. त्यावेळी तो सगळ्या जगापासून प्रचंड detached होतो काही क्षणापुरता…त्या स्पेस मध्ये असेपर्यंत.

 ह्या वयात लोचा असा असतो की अर्ध आयुष्य जगून, अनुभवून झाल्यामुळे आता इन जनरल सगळ्याच भावना थोड्या बोथट झालेल्या असतात. एखाद्याचा मृत्यू किंवा जन्म, एखादा फायदा किंवा नुकसान कशानेच प्रचंड आनंद किंवा टोकाचं दु:ख होत नसत. ह्या वयातील माणसं आयुष्य आपल्या stride मध्ये घ्यायला शिकलेली असतात. तरीही आयुष्य अजूनही सरप्राईज देत असतं, काहीतरी शिकवत असत आणि उरलेलं आयुष्य स्वतःच एक आव्हान बनून पुढे उभं ठाकलेलं असतं!

 वर म्हणालो त्यानुसार मुळं खूप खोलवर भूतकाळाला धरून असतात आणि बुंधा मात्र वर्तमानाच्या ओझ्याने वाकलेला असतो. सुगीच्या भूतकाळात सकस जमिनीवर मजा केलेल्या शरीर आणि मनाला भविष्य काळातील नापीक, अवाढव्य कातळ भीती घालत असतो. खर तर तो कातळ चढून जायची उमेद मन आणि शरीरात असते पण त्यापलीकडे असलेली एक  अंधारी दरी जिथे सर्वाना एक दिवस जायच आहे तिचं अस्तित्व जाणवलेलं असतं! मिड लाईफच्या एका टोकाला आपला जन्म झाला तो दिवस असतो आणि दुसर्या टोकाला काळाचा अंध:कार मृत्यू बनून शेवटच्या दिवसाच्या रूपाने आवासून उभा असतो. ती जाणीव फार टोचणी लावणारी असते. भले अजून चाळीस पन्नास वर्षांनी तो दिवस येईल हे माहित असलं तरी आपल्याला नको असताना आपण काळाच्या त्या गाडीत बसून त्याच्या दिशेने आपसूक जातो आहोत ही भावना डोक्यात ठुसठुसत असते खोलवर कुठेतरी! 

 मग पालकर बाई गेल्या, आम्ही शाळेत असताना बीएड होऊन नवीनच लागलेले गोसावी सर त्याच शाळेचे प्रिन्सिपल बनून निवृत्त देखील झाले, ह्या बातम्या उगाच मनात विचारांचा राखाडी, अपारदर्शक धूर तयार करतात. त्यात अनेकदा लहानपणी ज्यांच्या अंगाखांद्यावर खेळलो, ज्यांच्या छडीचा मार खाऊन अभ्यास शिकलो असे आणि आता जगात नसलेले नातेवाईक, शेजारी, काका, मामा, आत्या, शिक्षक असे लोक दिसत राहतात… बराच वेळ आठवत राहतात.

 ही जी “मी स्पेस” असते ना ती फार वाईट असते.  माणूस अगदी थोडा वेळ तिथे व्यतीत करतो. पण तो वेळ कासावीस करणारा असतो. मिड लाईफची जाणीव करून देणारा असतो. मग आपलं लहानपण समृद्ध करणारे बुरुज कोसळल्याच्या अश्या बातम्या मन विषण्ण करतात. पालकर बाई गेल्याच दु:ख आहेच आणि काळाचं काय? तो तर युगानयुग सोकावलेला आहे! अनेक पिढ्यांचा पाचोळा गोळा करत पुढे पुढे सरकतो आहे! नव्या नव्हाळीच्या पालवीला जुनं, जीर्ण पान बनून, सुकून पाचोळा बनून काळाच्या पोटात एक दिवस गुडूप व्हायचंच आहे! 

आता ना हे असले चिकारभोट विचार मनात आणणारं मिडलाईफ खूप हलकट आहे! दोन्ही बाजूंनी ओढले जाण्याची ही स्टेज आहे. ह्यात तारुण्याची बेफिकीरी नाहीये आणि वार्धक्याची विरक्ती नाहीये! म्हणूनच मिड लाईफला “क्रायसिस” म्हणजेच गोंधळ ह्या शब्दाची जोड लावली असेल का? पण हा गोंधळ देखील सरेल! समोर असलेला राखाडी, अपारदर्शक पडदा बाजूला होऊन वर्धक्याकडे जाणारा, उताराचा पण संथ लयीचा रस्ता सापडेल. पण त्यालाही वेळ आहे!

तोवर जे आहे आणि जसं आहे ते एन्जॉय करावं. मिड लाईफ मधून क्रायसिस हटवण्याचा प्रयत्न करून ते दिवसही एन्जॉय करावे. काळाच्या वावटळीत पाचोळा असलो तरी आपल्या पाचोळ्याचा आवाज दणकट असावा! भविष्यात आपलं पान गळून गेलं तरी त्याचा सुगंध इतका निर्माण करावा की त्याचा विसर पुढील अनेक पिढ्यांना पडणार नाही! ते नक्कीच आपल्या हातात आहे! चियर्स!- ©मंदार जोग

mandar jog

mandar jog

मंदार जोग ह्यांची कटिंग पिनाकोलाडा, वन बाय टू मार्गारिटा आणि कोनिएक कथा ही तीन पुस्तक प्रकाशित झाली असून त्यांच्या साडेचार हजार प्रती छापील आणी इबुक स्वरूपात विकल्या गेल्या आहेत. दृकश्राव्य, प्रिंट तसेच सोशल मिडीयावर मंदार जोग नियमित लिखाण करत असतात. लेखक ऑनलाईन ह्या संकल्पनेला सत्यात आणणाऱ्या टीमचा मंदार जोग एक हिस्सा आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!