लिफ्ट करा दे…..
सोमवारची बिझी सकाळ. ऑफिसच्या इमारतीच्या लिफ्टसाठी पीक अवर रांग लागलेली. दोन रूपगर्वीता रांगेत उभ्या राहून आरशात आपल्या रूपाबरोबर आपल्याकडे पहाणार्यांची मुद्रा आरशात हळूच पाहून, इनफ ऑडियंस आहे ह्याची खातारजमा करत मनातल्यामनात खुश होणाऱ्या. इतक्यात एक लिफ्ट खाली येते. रांग सरकू लागते. त्या दोघी असलेल्या लिफ्टमध्ये आपला नंबर लागून त्यांचे “जवळून” दर्शन होणार की नाही ह्या काळजीत अनेक पुरुष. आपल्या क्षमतेइतके लोक आत घेतल्यावर लिफ्ट कोकलते. आशाळभूतपणे आत घुसून दरवाज्याकडे पाठ करून त्या दोघींकडे तोंड करून उभे असलेल्या दोघांना बाहेर जावे लागते. आतले इतर “नशीबवान” एकमेकांकडे बघुन विजयी हास्य करतात. काहीजण त्या दोघींकडेही एक हास्यकटाक्ष टाकतात. त्या दुर्लक्ष करतात.
त्यातली एक लिफ्टच्या बटणांजवळ उभी असते. दोरीने गळ्यात अडकवलेल्या मोबाईलमधील मेसेज नाकावर लावलेल्या चष्म्यातून वाचण्यात मशगूल असलेले एक साधारण साठीचे काका “जरा नौ माला दबाना” असे तिला बिनधास्त सांगतात. ती अविश्वासाने त्यांच्याकडे पहात नवव्या मजल्याचे बटण दाबते. लिफ्ट बंद होऊन वर जाऊ लागते. त्या दोघींच्या ऊंची,इम्पोर्टेड परफ्यूमचा गोडट मिश्र वास लिफ्टमध्ये पसरतो. मंद गतीने काही क्षणांची आनंदयात्रा सुरु होते.
लिफ्ट तिसऱ्या मजल्यावर उघडते. काहीजण उतरतात. दरवाजा काही क्षण उघडाच रहातो. ते काका बहुतेक घाईत असावे. त्यांना तो विलंब सहन होत नाही. ते लिफ्टजवळच्या सुंदरीला हाताने डोअर क्लोज चे बटण दाबायचा इशारा करतात. ती चरफडत बटण दाबते. लिफ्टमध्ये हलकीशी खसखस पिकते.
लिफ्ट चौथ्या मजल्यावर परत थांबते. परत दरवाजा उघडा रहातो. ह्यावेळी काका बोलतात ” अरे ‘बहेनजी’ वो लिफ्ट बंद करनेका बटण दबाओ ना.” आता मात्र आतील सर्वांचा संयम सुटतो. लिफ्ट हास्याने फूटते. त्या दोघी देखिल त्यात सामील होतात. काका मात्र नक्की काय झाले ह्याचा विचार करत स्वतः पुढे वाकून लिफ्ट बंद करायचे बटण दाबतात. काही क्षणांपूर्वीचा तो मंद सुगंध, कोझी वातावरण सगळे पळून जाते. लोक आपापल्या कामाला लागायला तयार होतात. सोमवार सुरु झालेला असतो!!!
- व्हॅलेंटाईन डे- सर्व भाग (१ ते ६) एकत्र - February 18, 2024
- वारसा (भाग ७) - November 27, 2023
- वारसा (भाग ६) - October 30, 2023
😂😂😂😂👌👌