पुणे…
दिशा ज्ञान आणि माणसांची नाव ह्या बाबतीत माझा मेंदू मंद आहे. माणस आणि ठिकाणाला हृदयात जागा मिळाल्याशिवाय माणसांची नाव आणि ठिकाणाची दिशा मला आठवत नाहीत. पण दोन्ही गोष्टी भेटीच्या रेफरन्स ने डोक्यात जिवंत राहतात. अश्या वेळी माणूस भेटला तर मी सरळ सांगतो की चेहरा लक्षात आहे पण नाव लक्षात नाही. ठिकाणच्या बाबतीत तोही प्रश्न येत नाही. कॅब किंवा ऑटो किंवा ड्राईव्ह करताना गुगल मॅप झिंदाबाद! मग अधिक भेटीतून व्यक्ती आणि ठिकाण हृदयात स्थान मिळवतात आणि मेंदूत नाव आणि दिशा आपोआप कोरल्या जातात!
ह्याला अपवाद पुणे. पुण्याचा माझा भूगोल कच्चा आहे. अगदी वयाच्या तिसऱ्या वर्षांपासून येऊनही कच्चा आहे. त्यातली मेख ही आहे की मीच तो कच्चा ठेवला आहे. मी पुण्यात शक्य असेल तितका आवर्जून चालत किंवा पीएमटी ने फिरतो. अनेकदा चेष्टेचा विषय असलेले पुण्यातील पत्ता सांगणारे लोक मला पत्ता बरोब्बर सांगतात. आणि एखादी गल्ली चुकली तरी मला अजिबात वाईट वाटत नाही. आजही पुणे म्हणजे माझ्या दृष्टीने पुण्याच्या पेठेत, आत्याच्या वाड्यात आम्ही राहायला यायचो त्यावेळी मनात भरलेलं पुण आणि तिथलं वातावरण आहे. त्याचा परीघ खूप छोटा आहे. पेठेतल्या चिंचोळ्या गल्ल्या, वाडे, मंडई, तुळशी बाग, गजबजलेले लक्ष्मी रोड, बाजीराव रोड, श्रीमंत बंगल्याचा प्रभात रोड, कर्वे आणि टिळक रोड, आधुनिक एफसी रोड, पार्वती, सारस बाग, शनिवार वाडा, मॉडर्न आणि जरासा लांब असलेला कॅम्प परिसर तसेच नाव लक्षात नसलेले पण हृदयात अंधुक उरलेले काही रस्ते आणि परिसर! इथे माझ्या हृदयातील पुण संपत!
लहानपणी सायकल घेऊन ह्या भागात अनेकदा हुंदडल्याच आजही आठवत. मंदार, पुलाच्या पलीकडे म्हणजे खूप लांब असं आत्याने मनात कोरून ठेवलं होतं. त्यामुळे सायकल ने पूल ओलांडला की दुसऱ्या देशाची सीमा ओलांडून काहीतरी पराक्रम गाजवल्याचा फील येत असे. तेव्हाही आजच्यासारखाच मी लोकांना विचारात पुण्यात हिंडत असे. त्यामुळे जागांची नाव लक्षात आहेत, रस्त्यांवरच्या खुणा ठाऊक आहेत पण आजही अमुक ठिकाणी जायचं म्हणजे उजवीकडे की डावीकडे हे मी बिनदिक्कत विचारतो आणि अस्सल पुणेकर माझ्याकडे दयायुक्त कटाक्ष टाकून मला दिशा सांगतो. समहाऊ पुण्यातील एखादी जागा किती दूर आहे ह्याचा अंदाज एकाच गोष्टीवरून मी आजही घेतो. माझा प्रश्न असतो गरवारे चौकातून किती किलोमीटर! मी तळवडे आयटी पार्क मधील एका क्लाएंटला “म्हणजे तुमचं ऑफिस गरवारे चौकातून किती दूर आहे?” असं विचारून काही वर्षांपूर्वी मूर्च्छित केल्याचं माझ्या स्मरणात आहे!
मागे एका लेखात मी लिहिलं होतं की मुंबई माझी आई असेल तर पुणे माझी मावशी आहे. वेगळं वातावरण असलं तरी खूप आपलीशी, आईसारखीच उबदार वाटणारी मावशी. जिथे भीती, संकोच, परकेपणा अजिबात जाणवत नाही. वेगळा चेहरा असलेली आईच जणू! त्या मावशीचा लळा लहानपणीच लागला तो आजतागायत आहे. वाद विवादात, फेसबुक वरच्या वादासाठी निर्माण केलेल्या समूहात पुण्यावर एकेकाळी यथेच्छ टीकाही केली. पण ते “तुझ्या आयला” ऐकल्यावर “तुझ्यापण आयला” इतकी प्रतिक्षिप्त क्रिया होती!
हे सर्व आज आठवायचं कारण म्हणजे आता मावशीचा घर खूप मोठं आणि अद्यावत झालंय. आता आईच्या घरात आलेत तसे अनेक लांबचे नातेवाईक, ओळखीचे, अनोळखी लोक तिच्या घरात देखील येऊन राहू लागलेत. एक्सप्रेसवे वर होर्डिंगच्या रूपाने दिसणारे टुमदार इमले एक्सप्रेसवे सोडला की मूर्त रुपात “पुणे” म्हणून दिसू लागलेत. पेठांमधले वाडे शनिवार वाड्यासारखेच फक्त इतिहासाची साक्ष म्हणून भग्नावस्थेत उरले आहेत. ज्या एफसी रोडवर कधी मलमली तारुण्य माझे म्हणत साधा सुंदर रोमांस बहरला असेल तिथे आता जपून दांडा धर छापाचे झिंगट बघायला मिळू लागले आहे. दुकानाच्या जागी मॉल आलेत, सायकलींची जागा बुंगाट दुचाक्यांनी घेतली आहे. गर्दी, ट्रॅफिक ह्यांनी झपाट्याने पुण्याचीही मुंबई होत आहे. Pseudo पुणेकरांच्या गर्दीत “पुणेकर” आता शोधावा लागतो आहे. नऊवारी नेसणाऱ्या सात्विक मावशीलाही स्पॅगिटी टॉप आणि हॉट पॅन्ट घालून सजवायचा प्रयत्न जोरात सुरू आहे. पुण्यातल माझ्या हृदयात कोरलेल, जपलेल पुणेरीपण कुठेतरी अस्ताला जात आहे. एक नवं, चकचकीत शहर एकीकडे आकार घेत असताना एक संस्कृती नामशेष व्हायच्या पंथाला लागली आहे. काळाबरोबर बदलणे वगैरे मान्य. पण माझ्या हृदयात कोरलेली माझ्या मावशीची, पुण्याची प्रतिमा वेगळीच होती, आहे आणि तशीच जपून ठेवायला आवडेल. मावशीला स्वतःलाही हे फारसे रुचत नसावे परंतु कालौघासमोर ती पण आमच्या आईसारखीच लाचार, हतबल असावी!
असो. मी ह्या बदलत्या वातावरणात अजूनही मनात जपलेल्या, हृदयात कोरलेल्या “जुन्या” पुण्यातच जास्त रमतो. अजूनही इथून राईटला की लेफ्टला जायचं अस विचारात बिनधास्त फिरतो. “जुन्या” हॉटेलात जेवतो. मावशीच्या टुमदार घराचा आता मोठा कॉम्प्लेक्स झाला असला तरी एक कोपरा अजूनही त्या जुन्या देवघराचा आहे. जिथे लखलखाट नाही तर समईचा मंद प्रकाश, उदबत्त्या आणि धुपचा दरवळ अजून जरासा उरला आहे. मी त्या मनात कोरलेल्या पुण्यात मनसोक्त हिंडतो, त्याला मनात भरून साठवून ठेवतो. काही वर्षांनी देवघरही जाईल. तिथेही पाहुण्यांचा मॉल उभा राहील. काळ पुण्याचा भूगोल बदलून टाकेल. पण मी तो कधीच विसरणार नाही. कारण पुण फक्त माझ्या मनात आहे. पुण्याचा भूगोल मी मुद्दामून कधीच न शिकल्याने माझ्या लक्षातच नाही. आणि जे लक्षात नाही ते विसरणं अशक्य आहे. जे मनात कोरलय ते पुसण अशक्य आहे. अगदी माझ्या मनावर कोरल्या गेलेल्या “जुन्या” पुण्यासारखं!- मंदार जोग
- व्हॅलेंटाईन डे- सर्व भाग (१ ते ६) एकत्र - February 18, 2024
- वारसा (भाग ७) - November 27, 2023
- वारसा (भाग ६) - October 30, 2023
CHHAN LIHITA TUMHI SUHAS SHIRWALKAR AWADATE LEKHAK AHET KA TUMCHE
thanks. maze barech avadate lekhak ahet. su shi tyapaiki ek nakkich ahet.
Mast