“अभिनय….”

अवघड आहे.

फार तर दोन दिवस.

सगळं कळतंय.

आजी थकलीय.

95 नाॅट आऊट.

सहाजिक आहे.

कधी तरी असं होणारच.

आजी आजारी पडली होती का कधी ?

नाही आठवत.

आजारी पडणं परवडणेबल नव्हतंच तिला.

सुबोधचे आजोबा फार लवकर गेले.

सुबोधचे बाबा तर फक्त सात वर्षाचे होते तेव्हा.

सुबोधची आत्या चार वर्षांची.

आजी खमकी.

पदर खोचून ऊभी राहिली.

ताठ.

खंबीर.

शेवटपर्यंत.

सगळं व्यवस्थित निभावलं.

दोन्ही मुलांचं शिक्षण.

आत्याचं लग्न.

माॅन्टेसरीचा कोर्स केलेला.

घरातच बालवाडी चालवायची सुबोधची आजी.

त्याच्या जीवावरच घर चालायचं.

सुबोधच्या बाबांना चांगली नोकरी लागली.

लवकरच लग्न झालं.

सासू होताच नाही आलं कधी आजीला.

ती आईच राहिली शेवटपर्यंत.

सुबोधची आईही नोकरी करायची.

मग सुबोधचा जन्म.

सुबोध पाच सहा वर्षाचा होईपर्यंत आजीची बालवाडी जोरात.

सुबोध शाळेत जायला लागला अन्,

आजीची बालवाडी बंद.

सुबोधची शाळा, अभ्यास, खेळ, खाऊ, जेवण.. 

सगळं आजीच बघायची.

सुबोधसाठी तर सबकुछ आजीच.

सुबोध.

तोच आता बत्तीशीत पोचलाय.

त्याचा मुलगा निल. 

आता साडेचार वर्षाचा.

लहान मुलासारखा सुबोध आजीचा हात धरून बसलेला.

सुरकुतलेला तिचा हात.

इतका वाळलेला की, त्यापुढं मोरपीस सुद्धा जड वाटावं.

या हाताचं बोट धरून तो मोठा झाला..

शेवटपर्यंत हा हात त्याला सोडायचाच नव्हता.

तिचा हात सुबोधने हलकेच दाबला.

आजीचा हात थोडासा थरथरला.

आजीचा केवढा आधार वाटायचा सुबोधला.

लाईफ विदाऊट आजी..

शक्यच नाही.

तसं काहीच झालं नाहीये तिला.

खूप अशक्त झालीय.

जेवण जात नाहीये.

जगण्याची ऊमेदच नाहीशी झालीय.

दोन पावलं चालण्याची ताकद ऊरली नाहीये अंगात.

आत्ताच डाॅक्टर येवून गेले.

खांदे ऊडवून म्हणाले,…

जेवढा आनंद देता येईल तेवढा द्या.

जाता जाता वर बोट दाखवून म्हणाले,

आपण फक्त वाट बघायची….

अजून एक..

आजीच्या स्मृतीनं दगा दिलाय.

मन अजून भूतकाळात रमलेलं.

बाजीराव रोडवरचं ते जुनं भाड्याचं घर.

पहिला मजला.

दोन खोल्यांची जागा.

बाहेरच्या खोलीतली ती बालवाडी.

चार पाच वर्षांचा सुबोध.

नोकरीवर जाणारे त्याचे आईबाबा.

हेच आठवतंय सगळं तिला कालपासून.

मला माझ्या घरी घेऊन जा..

सारखं हेच.

एकदम रडायलाच लागायची.

सुबोधही एकदम सेंटी व्हायचा.

नेहा.

सुबोधची बायको.

आजीची नातसून.

आजीची अगदी लाडकी..

सध्या आजीच्या मेमरीकार्डातून नेहा गायब.

नेहानं आजीचं मन ओळखलं.

ती कामाला लागली.

सुबोधचे आई बाबा..

पांढरे फट्ट केस झालेले दोघांचे..

तासाभरात..

दोघं लोणी काळभोर करून आले.

नेहानं तिच्या भावाला कामाला लावलं.

रविवारच होता.

निलचे चार मित्र गोळा केले.

सुबोधही प्रसादेंशी बोलला.

नेहाचा भाऊ येईल तुमच्याकडे.

तो सगळं समजावून सांगेल.

घर तुमचंच आहे..

प्रसादेंनी ,असं म्हणलं,..

आणि सुबोध मनापासून रिलॅक्सला.

अर्ध्या तासात अॅम्ब्युलन्स आली.

आजीला हलकेच ऊचललं.

चलो बाजीराव रोड.

रिसबूडांची ती दुमजली चाळ.

अजून तश्शीच आहे..

पहिला मजला.

बाहेरची खोली.

खोलीत भिंतीवर टांगलेला गुंडाळी फळा.

अ आ..बाराखडी गिरवणारा.

मोजकं सामान.

निलचे पाच सहा मित्र.

कोंडाळं करून बसलेले.

पाटी पेन्सिल घेऊन.

आतल्या स्वयपाकघरात गॅसवर फुरफुरणारा कुकर.

प्रसादेंनी भारी सेट अप लावलेला..

अॅम्ब्युलन्स थांबली.

पुन्हा आजीची ऊचलबांगडी.

बाहेरच्या खोलीतली काॅट.

ऊशांच्या कुतुबमिनाराला टेकून, 

आजी कशी बशी बसली.

तिनं समोर बघितलं.

तिचे डोळे जिवंत.

तीच चमक.

नेहमीसारखी.

आजी एकदम अॅक्टिव्हमोडमधे.

निलनं एकदम आजीकडं वळून म्हणलं..

आजी , मनाचे श्लोक म्हणू यात ?

आजीचे थरथरते ओठ मनाचे श्लोक म्हणू लागले.

ऊरलेल्या पोरांची कोरस साथ.

आजी फुल आॅफ एनर्जी.

ठरवून आई बाबा आत शिरले.

दोघांच्या खांद्यावर आॅफीसबॅग आणि डब्याची पिशवी.

केस काळे.

दिवसभर दमवणूक झाल्याचा मुद्राभिनय.

स्वयपांकघराच्या दारातून सुबोध आणि नेहा,

लपूनछपून हा रिअॅलिटी शो बघत होते.

बाहेरच्या खोलीबाहेर पब्लीक गॅलरी.

तेवढ्यात कुकरने मारलेली आनंदी शिट्टी.

सुबोधच्या आईनं वरणभात कालवून आणला.

निलला आजीजवळ बसवला.

निलनं आजीला तो भात घास घास भरवला.

आजीनं निलला.

एक घास चिऊचा.

एक घास काऊचा.

आजी डोळे भरून हे सगळं अनुभवत होती.

टाईमशीन सेट केलेलं.

काळ तीस चाळीस वर्ष मागे रिवाईंड केलेला.

आजीची भूक वाढलेली.

चेहरा प्रसन्न.

सगळे खूष.

बाहेरच्या खोलीबाहेर पब्लीक गॅलरी.

तिथलं पब्लीकही खूष.

लिंबूभर वरणभातानं आजीचं पोट भरलं.

आजी समाधानानं काॅटवर झोपली.

संध्याकाळी आजी परत आपल्या घरी.

तब्येत सुधारल्यासारखी वाटत होती.

डाॅक्टर आले.

एकदम खूष झाले.

सुब्बू , तुझी आजी सेन्च्युरी मारणार..

डोन्ट वरी..

सुबोधनं नेहाकडे बघितलं.

डोळ्यांनी थँक्स म्हणलं.

नेहानं फ्रिझ ऊघडला.

पटापट आईस्क्रीम सर्व्ह केलं..

आई, बाबा, निल, तुमच्या सगळ्यांची अॅक्टींग भारीच.

आजी चाळीस वर्ष मागे जाऊन आली.

आज जागतिक रंगभूमी दिन आहे.

आजचं आईस्क्रीम तुमच्या लाजवाब अभिनयासाठी.

प्रसादेंनाही मी स्पेशल थँक्स आणि आईस्क्रीम देणार आहे.

त्यांनी तशाच्या तसा सेट लावलेला.

निल, तुझ्या मित्रांनाही ऊद्या आईस्क्रीमपार्टी.

सब खुष..

आईस्क्रीम ओरपू लागले.

एकदम आजीच्या खोलीतून आवाज.

सब भागते भागते ऊधर.

मला सोडून आईस्क्रीमपार्टी करताय ?

सुब्बू आजीला विसरलास ?

आजीनं सुद्धा आईस्क्रीम खाल्लं चमचाभर..

बरीच फ्रेश वाटत्येय आता.

खास बात बोलू ?

सगळ्यांना ओळखतेय.

अगदी निल आणि नेहाला सुद्धा.

एकदम तिला काही तरी आठवलं.

या म्हातारीला काय वेडं समजलात काय ?

दुपारी ते साठीतले म्हातारा म्हातारी काय घेऊन आलात,

केस काळे करून…

नुस्ते दम्यानं फुसफुसत होते.

निलला तेव्हाच ओळखलं मी..

तो सुब्बू म्हणून ऊभा केलात.

खरं सांगू ?

जुन्या घरी गेले, खूप आनंद झाला.

मग म्हणलं, थोडी अॅक्टींग आपणही करू.

मीही जुनीच म्हातारी झाले..

आजीनं हळूच डोळा मिचकावला.

आजीच्या अॅक्टींगने सुब्बू वेडा.

तिला लाईफटाईम अचिव्हमेंट अॅवाॅर्ड देवून टाकला.

आनंदीआनंद.

एका आईस्क्रीमनं काय होणार ?

नवीन फॅमिलीपॅक आणायला सुब्बू घराबाहेर पळाला..

हॅप्पी अॅक्टींग डे !

…..कौस्तुभ केळकर नगरवाला

Image by Free-Photos from Pixabay

Kaustubh Kelkar
Latest posts by Kaustubh Kelkar (see all)

Kaustubh Kelkar

कौस्तुभ केळकर ह्यांनी बीई (इलेक्ट्रिकल) तसे बीजे (जर्नालिझम) असे शिक्षण घेतले आहे. गेली अनेक वर्ष ते अहमद नगर येथे भौतिकशास्त्राचे क्लासेस चालवतात. फेसबुकवर कौस्तुभ केळकर नगरवाला ह्या नावाने परिचित असलेल्या कौस्तुभ ने अनेक कार्यक्रमांचे लेखन, निवेदन आणि सुत्रसंचलन केले आहे. हसरी दिवाळी तसेच कथुली ह्या कार्यक्रमांचे सादरीकरण केले आहे. लोकसत्ता, सकाळ, लोकमत अश्या अनेक दैनिकांमधून विपुल लिखाण केले आहे. तसेच त्यांचे कथुली नावाचे पुस्तकही प्रसिद्ध झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!