सोल्जरअंकल…

जावं की नको ?

शेवटपर्यंत ठरत नव्हतं.

खरं तर तीन महिन्यापूर्वीच प्लॅनींग झालेलं.

निनाद.

माझा सख्खा मावसभाऊ.

दिल्लीला आहे.

गेली सात आठ वर्ष.

त्याचंच लग्न.

मुलगी मराठीच आहे.

पण तिचं लहानपण दिल्लीत गेलेलं.

लग्नही जरा दिल्ली वळणाचं.

दोन तीन दिवस चालणारं.

जावं तर लागणारच होतं.

जाताना बाय ट्रेन.

येताना प्लेन.

मोजून चार दिवस.

मी, ही, आई -बाबा आणि कनू.

कनू आता फिफ्थमधे.

खरं तर हा एक्झॅम सीझन.

पंधरा दिवसावर परीक्षा.

त्यात पोरगी अभ्यासाच्या बाबतीत, बापावर गेलेली.

चार दिवस दिल्लीत ऊधळणार.

पुण्याला परत गेल्यावर,

दोन चार दिवस तिचा अभ्यासाचा,

मूड लागायचा नाही.

थोडक्यात टेन्शन ‘पाचवी’ला पूजलेलं.

हिचा नन्नाचा पाढा चाललेला.

‘तुम्ही सगळे जाऊन या.

मी आणि कनू राहतो पुण्यात…’

मागच्याच आठवड्यात निनादचा फोन.

हिच्याशी बोलला.

कनूशी बोलला.

आठवडाभर कनूची रेकाॅर्ड वाजत होती.

‘मला जायलाच पाहिजे दिल्लीला.

ननूकाकानं सांगितलंय, मी नाही गेले 

तर तो लग्नाला ऊभा नाही राहणार.

त्याची बायको रडत बसेल मग.

फुलमार्कस् सिक्स्थमधे मिळवीन.’

कनूचा सिक्स्थसेन्स भलताच भारी होता.

त्यात पुन्हा गेले दोन तीन दिवस जरा टेन्समधे गेलेले.

शेवटी ठरवलं.

काय होईल ते होईल.

चलो दिल्ली.

पुण्याला केके एक्स्प्रेस पकडली.

एसी कम्पार्टमेंट होतं.

समोरासमोर पाच बर्थ मिळालेले.

गाडी बुला रही है..

सिटी बजा रही है..

नगर आलं..

तोवर कनूचं खिडकीतून बाहेर बघून झालेलं.

कनूचा पेशन्स संपत चाललेला.

मग तिला घेवून लंबी ड्राईव्ह.

या डब्यातून त्या डब्यात.

सगळी गाडी फिरून झाली.

कनू अस्वस्थ.

श्रीरामपूर आलं.

अन् तो गाडीत चढला.

बहुतेक आमच्याच डब्यात.

वीस पंचवीस वर्षांचा.

सहा फूटाच्या आसपास ऊंची.

काटक शरीर.

बारीक कापलेले केस.

काळे बूट.

त्याची ती मोठी ट्रंक.

गाडी सुटली.

कनूला घेऊन ‘शुक्रीये’साठी टाॅयलेटपाशी.

दरवाजापाशी तो दिसला.

त्याच्या मोठ्या काळ्या ट्रंकवर बसलेला.

कनूनं त्याला बघितलं.

ती एकदम खूष.

‘जयहिंद.’

तोही लगेच म्हणाला.

‘ जयहिंद’

कनूनं त्याला एक मस्त सॅल्यूट मारला.

त्यानंही तसाच रिप्लाय सॅलूट दिला.

कनू प्रचंड खूष.

‘ कहा जा रहे हो ?’

मी ऊगाचच हिंदीत विचारलं.

‘ दादा, काश्मीरला चाललोय.

इथंच बेलापूरजवळ गाव आहे माझं’

तो छान मराठीत बोलला.

‘ रिझव्हर्वेशन नाही मिळालं ?’

मी विचारलं.

‘ कधी मिळतं, कधी नाही.

सुट्टीवर आलो होतो.

सुट्टी कॅन्सल झाली.

ताबडतोब निघालो.

मिळेल ती गाडी, मिळेल तो डबा.’

काय बोलणार ?

कनू मात्र अखंड बडबड करत होती.

“सोल्जरअंकल….”

त्या ट्रंकवर कनूनं बस्तान ठोकलेलं.

दोघांच्या गप्पा रंगलेल्या.

मी ऊभं राहून ऐकत होतो.

“कनू, सोल्जरअंकलला घेवून, आपल्या कंपार्टमेंटमधे जाऊ यात.

मग निवांत गप्पा मारू.”

तो नको नकोच म्हणत होता.

कनूपुढे कुणाचं चालतंय ?

तो आमच्या कंपार्टमेंटमधे आला.

बाबांशीही त्याची छान गट्टी जमली.

जेवणाची वेळ झालीच होती.

आम्ही फूड पॅक करून आणलेलं.

आमच्याबरोबर तोही जेवला.

अगदी मनापासून.

कुठल्या परिस्थितीत तो ड्यूटी करत होता….

रोज जीवाशी खेळ..

तरीही आपण खूप वेगळं काही करतोय , असं त्याला वाटतंच नव्हतं.

‘ये तो अपनी ड्यूटी है..’

बस एवढंच म्हणायचा.

दोन वर्षापूर्वी लग्न झालंय म्हणाला.

वर्षाची मुलगी आहे त्याला.

‘आता पुन्हा घरी कधी ?’

मी नसता आगाऊपणा केला.

‘पता नही..’

कनूची आणि तिच्या आबांची खुसूरफुसूर चाललेली..

दोघांनी एकमेकांना अंगठे मारले.

” सोल्जरअंकल, आप मेरे बर्थ पे सो जाना.

मी आणि बाबू .

हम अॅडजस्ट कर लेंगे”

मन की बात..

तो नाही म्हणूच शकला नाही.

बर्थ आडवे टाकले.

झोपायची तयारी झाली.

एवढ्यात आई अस्वस्थ.

तिच्या बॅगा ऊचकू लागली.

सापडली एकदाची.

तिच्या पर्समधली अंगार्याची पुडी.

ती ऊघडली.

त्याला जवळ बोलावलं.

त्याच्या कपाळाला अंगारा लावला.

“काही होत नाही तुला.

स्वामी पाठीशी आहेत तुझ्या”

आईचे डोळे भरून आले.

तो मनोभावे पाया पडला.

लाईट बंद करून आम्ही झोपलो.

पहाटे जाग आली.

शेजारी कनू नव्हती.

खडबडून जागा झालो.

प्राण कंठाशी आलेले.

खुडबूडत लाईट लावला.

कनू मधल्या बर्थवर शांत झोपलेली.

तो ?

तो कुठं गेला ?

मी दरवाजापाशी पळालो.

दिल्ली जवळ आलेली.

तो सगळं आवरून तयार.

रात्रीच तो इथं परत येऊन झोपला असणार.

त्या ट्रंकवर मुटकूळं करून.

” अरे इथं..?”

तो फक्त हसला.

मी सहज त्याचा छातीवरची नेमप्लेट बघितलं.

“एम. एस. शेख”

मला अपराधी वाटलं.

माझा चेहरा त्यानं घडाडा वाचला.

“दादा, आईच्या मायेचा कुठला धर्म असतो काय ?”

कॅटोन्मेंट स्टेशन आलं.

तो ऊतरला.

मला काही सुचेना.

भयंकर अस्वस्थ वाटलं.

मीही खाली ऊतरलो.

मनापासून त्याला मिठी मारली.

“बेस्ट लक.

काळजी घे..”

मला बोलवेना.

” दादा , गोड पोरगी आहे तुमची.

तिच्या लग्नाला नक्की बोलवा मला”

तोही थोडा सेंटी झालेला.

“नक्की बोलावणार.

तिच्या सोल्जरअंकलशिवाय कनू, लग्नाला ऊभीच राहणार नाही.”

तेवढ्यात गाडीनं शिट्टी मारली.

तो दिसेनासा होईपर्यंत मी हात हलवत राहिलो.

कनू जागी झाली.

भोकाड पसरलं…

चालायचंच…

लग्नाच्या धामधूमीत दोन दिवस गेले.

चार दिवसांनी पुण्यात परत.

काल सकाळी पेपर वाचत होतो.

” काश्मीरमधे पुन्हा चकमक.

नगर जिल्ह्यातील दोन जवान शहीद”

मी पेपर फाडून टाकला.

दिवसभर अस्वस्थ.

आॅफीसमधनं लवकरच घरी आलो.

आल्याआल्या आई म्हणाली.

“आज कुणाचा फोन आला होता माहित्येय ?

कनूच्या सोल्जरअंकलचा.

काश्मीरहून .

मजेत आहे तो”

या दोघांनी एकमेकांचे नंबर कधी शेअर केले..

मला घेणंदेणं नव्हते.

चपला अडकवल्या.

सारसबागेत गेलो.

देवाला पेढ्यांचा नैवेद्य दाखवला.

घरी आलो.

सगळ्यांना प्रसाद दिला.

कनूलाही.

“बाबा कशाचा पेढा ?”

मला ऊत्तर सुचेना.

आयुष्य गोड झाल्यासारखं वाटत होतं.

कायमचं…

……कौस्तुभ केळकर नगरवाला.

Image by Amber Clay from Pixabay

Kaustubh Kelkar
Latest posts by Kaustubh Kelkar (see all)

Kaustubh Kelkar

कौस्तुभ केळकर ह्यांनी बीई (इलेक्ट्रिकल) तसे बीजे (जर्नालिझम) असे शिक्षण घेतले आहे. गेली अनेक वर्ष ते अहमद नगर येथे भौतिकशास्त्राचे क्लासेस चालवतात. फेसबुकवर कौस्तुभ केळकर नगरवाला ह्या नावाने परिचित असलेल्या कौस्तुभ ने अनेक कार्यक्रमांचे लेखन, निवेदन आणि सुत्रसंचलन केले आहे. हसरी दिवाळी तसेच कथुली ह्या कार्यक्रमांचे सादरीकरण केले आहे. लोकसत्ता, सकाळ, लोकमत अश्या अनेक दैनिकांमधून विपुल लिखाण केले आहे. तसेच त्यांचे कथुली नावाचे पुस्तकही प्रसिद्ध झाले आहे.

3 thoughts on “सोल्जरअंकल…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!