मंडई

‘ऊगाच डोक्याची मंडई करू नकोस..’

असं कुणी म्हणलं की,

मला राग येतो.

माझी सटकते.

मंडई माझी आवडती जागा.

आयुष्याकडनं माझ्या काही मिनीमम अपेक्षा आहेत.

किराणा, दूध, भाजी, औषधं वगैरे गोष्टी आणण्यासाठी माझा जन्म झालेला नाहीये…

संसारातल्या या छोट्या छोट्या गोष्टीत अडकून पडण्यासाठी मी अवलेबल नाहीये…

माझ्याकडनं काही तरी मोठं कार्य होणार आहे..

वगैरे वगैरे.

या वचनांवर फक्त माझा आणि माझाच विश्वास आहे.

सहसा मला या गोष्टीत कुणी गुंतवत नाही.

कारण एकच.

मी माझ्याच धुंदीत असतो.

बेस्ट आऊटगोईंग स्टुडन्टसारखा मी घरातून निघतो.

एका हातात पिशवी.

एका हातात किल्ली.

सांगितलेली लिस्ट मनोभावे ऐकून घेतो.

‘राहिल ना लक्षात ?

का लिहून देऊ ?’

नाॅट अॅप्लीकेबल.

माझ्या बरोबर लक्षात असतं.

किक मारताना मी एकदा रॅपीड रिव्हीजनही करतो.

नाक्यापाशी पोचलो की एखादा बिछडा दोस्त भेटतो.

चलो टपरी.

दिल , दोस्ती, दुनियादारी अर्ध्या तासात संपते.

आणि सगळंच संपतं.

मी एकदम ब्लँकच.

याद्दाश खो जाती है.

पुन्हा फोन करून लीस्ट विचारणं,

शान के खिलाफ वाटता है..

मग शेवटी काय ?

घोटाळा.

नग चुकतात, ब्रॅन्ड चुकतात, आणि..

खरं तर मीच चुकतो.

ऊद्धार..

आई, बायको आणि लेक..

मी नेहमीच सगळ्यांचा कूल कस्टमर होतो.

मी असा फेमस असल्यामुळे ,

बर्याच हाऊसकीपींग, होमसायन्सी, कामातून माझी सुटका होते..

एक काम मात्र माझ्या गळ्यात पडतंच पडतं.

” अहो, जरा ऐकलंत का ?”

आमच्या पिढीनं हे आदरार्थी बहुवचन कधी ऐकलंच नाही.

“ए घोर्या, काय लोळत पडलायेस सोफ्यावर..? 

जरा हात पाय हलव.

जा जरा भाजी घेवून ये.

लीस्ट वाॅटस्सप केलीये.”

माझा एकदम कुंभकर्ण होतो.

सहामाही झोपेनंतर आत्ता कुठं जाग आलेली.

मनाच्या कानात ऊत्साहाचे नगारे वाजू लागतात.

मी ऊठतोच..

पायात स्लीपर.

गाडी नकोच.

इथंच तर जायचंय.

हातात पिशवी.

भाजी घ्यायची आमच्या घरची एक पुश्तैनी पिशवी आहे.

तीच घेतो.

आमच्या घराण्याची परंपरा आहे ती..

भाजी हे प्रकरणच मला ऐतिहासिक वाटतं.

पुश्तैनी पिशवी, पुश्तैनी मंडई, पुश्तैनी भाजीवाला.

मीच तेवढा नव्या मनूचा, नव्या दमाचा ,

शूर शिपाई आहे…

पाऊले चालती मंडईची वाट.

मंडईत जाणं हा एक अनुपम सोहळा असतो.

पावलं संथ.

मन प्रसन्न.

मुखातून शिट्टीसूर पाझरू लागतात.

रमत गमत मी मंडईत पोचतो.

मंडई जागीच असते.

ती झोपते की नाही कुणास ठाऊक..?

मी लगेचच मंडीला गुडी माॅर्नींग म्हणतो.

मंडी हे मी मंडईला ठेवलेलं लाडाच नावं.

ईथं येणं म्हणजे निसर्गाला ढुशा मारण्यासारखं असतं.

सुंदर निसर्ग समोर असतो.

सक्काळी सक्काळी मंडईत जावं.

बर्याच नवविवाहिता या वेळी भाजी घ्यायला येतात.

ताज्या नवर्यासाठी, ताजी भाजी.

ताजा स्वयंपाक, ताजा डबा.

वाह ताजा !

असतं एकेकाचं नशीब.

काही दिवस….

नव्याची नवलाई.

बांगड्यांची किणकिण.

मंडईत जायचं झालं तरी लिपस्टीक वगैरे रंगरंगोटी.

नाजूक चेहर्यावर दिसणारी आनंदी स्वप्नं.

सदा हसमुखी हसीन चेहरा..

माझ्यासारख्या सभ्य माणसाला सहज दिलेलं ओळखीचं स्माईल.

दिवसाची अशी भारी सुरवात करायची असेल तर रोज सकाळी मंडईत जायला हवं.

माॅर्नींग वाॅक वगैरे सब झूठ .

हा हसरा निसर्ग मी ऊपाशी डोळ्यांनी पोटभर बघतो

एकदम आरडाओरडा.

मंडईवर पोसलेला एक बैल मला मागनं ढुशी मारतो.

आला अंगावर , घेतला शिंगावर..

मी थोडक्यात तो शिंगाट हल्ला चुकवतो.

समोरची बांगडी किणकिण नाजूक हसते.

मी कसंनुसं हसतो.

कल्टी डाॅट काॅम.

चालत चालत आमच्या पुश्तैनी भाजीवाल्याकडे.

तिथं काही अजून चांगल्या नैसर्गिक गोष्टी असतातच.

” काय पांडुरंगराव ?”

मी ऊगाचच ईम्प मारतो.

खरं तर इथं माझी स्वतःची ओळख शून्य.

आधी केळकरबाईंचा मुलगा,

नाहीतर निलाक्षीचा नवरा,

कधी कधी कुहूचा बाबा..

पांडुरंग म्या पामराकडे बघून न बघितल्यासारखं करतो.

” द्या तो मोबील हिकडं.

वैनीसायबानं दिलेली लीष्ट दावा..”

मी चेहरा फिरवतो.

पांडुरंग लिस्टप्रमाणे भाजी भरू लागतो.

पांडुरंगाचं काम एकदम सिस्टीमॅटीक.

तीन वाजता त्याचं दुकान सुरू होतं.

गुलटेकडीतनं आलेली भाजी निवडणं.

ऊतरंडीनं मांडून ठेवणं.

एकदम भारी डिस्प्ले.

कलरफुल मनमोहक.

बघितलं की मेंदूचं भरीत.

भाजी घ्यावीशी वाटणारंच.

माझं ठरवून सहज समोर लक्ष जातं.

समोरची सुंदरा मनात ठसते.

मन पेटून ऊठतं.

ईम्पमारी भावना ऊंचबळून येतात.

मी ऊगाचच शिमलाढीगातून एक भोपळी मिर्ची वर खाली बघू लागतो.

आमच्या पांडुरंगाला देवानं हजार डोळे दिले असावेत.

कुठून तरी तो हे बघतो.

खेकसतोच.

” सायेब ऊगाच हात लाऊ नगा.

ढीग कोसळंल.

माझं काम डबल हुईल.

गपचीप हुभं रहा.

पिशवी भरली की देतो तुमास्नी.”

समोरची सुंदरा खौट मांजरीसारखी फिस्सकन हासते.

मी पर्शियन बोका होतो.

तिला एकदा डोळे भरून बघतो.

आणि तोंड फुगवून मान फिरवतो.

नुसते सुस्कारे.

पांडुरंग पिशवी देतो.

दोन मिनटं ती खाली ठेवतो.

शेजारी ऊभ्या त्या सुंदरेला मनातल्या मनात बाय बाय करतो.

पाकीटातनं पैसे काढून देतो.

इथं भाव विश्वासाचा.

पन्नास वर्ष घरोबा आहे आमचा पांडुरंगाच्या दुकानी.

इतकं असून माझा भाव पडलेला असतो.

पंकज ऊधास होवून मी मंडईतून बाहेर पडतो.

भाजीचं ओझं जड झालेलं.

रस्ता खिन्न मागे ढकलत मी घरी पोचतो.

चपला काढतच असतो..

तेवढ्यात सेल बोंबलतो.

पांडुरंग प्रसन्न.

” सायब, कुठं ध्यान आसतंय ?

त्या शेजारच्या बाईसायेबांच पिश्वी घेऊन गेलं तुमी.

त्या वेट करून राहिल्याती.

या बिगीबिगी.”

वाळवंटी मनाला एकदम टिळक टँक दिसावा तसं होतं.

दिल या डुम्बा डुम्बा करू लागतो.

पायर्या खात मी जिना ऊतरतो.

गाडी ऊडवत शून्य मिनटात मंडई.

पांडुरंगचरणी लीन.

तिथं एक आडदांड बाॅडीबिल्डर.

चांदोबातली गोष्ट आठवते.

मायक्रोसेकंदात अप्सरेचा राक्षस.

” यांच्या मिशीशचं पिश्वी घेऊन गेलात तुमी”

तो माझ्याकडं खाऊ का गिळू टाईप बघतो.

तणतणत निघून जातो.

क्षणभर मला एल आय सी आठवते.

जीव मुठीत धरून मी मंडईबाहेर.

आज मात्र खरंच डोक्याची मंडई झालेली असते.

तरीही मी रिस्क घेतोच लाईफमधे.

भेटू ऊद्या.

माझ्या लाडक्या मंडीमध्ये…

……कौस्तुभ केळकर नगरवाला.

Image by Elvira Groot from Pixabay

Kaustubh Kelkar
Latest posts by Kaustubh Kelkar (see all)

Kaustubh Kelkar

कौस्तुभ केळकर ह्यांनी बीई (इलेक्ट्रिकल) तसे बीजे (जर्नालिझम) असे शिक्षण घेतले आहे. गेली अनेक वर्ष ते अहमद नगर येथे भौतिकशास्त्राचे क्लासेस चालवतात. फेसबुकवर कौस्तुभ केळकर नगरवाला ह्या नावाने परिचित असलेल्या कौस्तुभ ने अनेक कार्यक्रमांचे लेखन, निवेदन आणि सुत्रसंचलन केले आहे. हसरी दिवाळी तसेच कथुली ह्या कार्यक्रमांचे सादरीकरण केले आहे. लोकसत्ता, सकाळ, लोकमत अश्या अनेक दैनिकांमधून विपुल लिखाण केले आहे. तसेच त्यांचे कथुली नावाचे पुस्तकही प्रसिद्ध झाले आहे.

One thought on “मंडई

  • April 30, 2019 at 11:39 am
    Permalink

    जादूई लिखाण, प्रसंग हुबेहुब डोळ्यासमोर उभा राहतो, मंडई असो की angry young man.

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!