व्हिंटेज…..

बाथरूम मधला नळ तसाच धो धो वाहात होता. तो तसाच अस्ताव्यस्त पडून होता. फक्त पाण्याचा आवाज आणि बाकी शांतता आणि हतबलता. इच्छा असूनही उठता येत नव्हतं. काय झालंय हे कळतच नव्हतं. तो तसाच पडून होता. साधारण पाच मिनिटं! मग ते असह्य होऊन तो उभा राहिला! थंड पाण्याच्या शॉवर खाली पाच मिनिटं डोळे मिटून उभा राहिला. मनात एकच विचार….मी फक्त अनुभव घ्यायचा म्हणून जाणून बुजून ह्या अवस्थेत पडून पाच मिनिटं देखील काढू शकलो नाही तर तिने ह्या अवस्थेत चोवीस तास कसे काढले असतील?

ती म्हणजे साधारण 1931 किंवा 32 च व्हीन्टेज मॉडेल. आज वय 85 च्या पुढे. चार फूट दहा इंचाच्या आतबाहेरची उंची. गोरापान वर्ण. वजन आताशा पस्तीस ते चाळीस किलो. कृश देह, खोल गेलेले डोळे, बसलेली गालफडं, आतील हिरव्या नसा दिसणारे थरथरणारे हात, बोलताना खूप आतून येणारा आवाज, डोक्यावर पिकलेले, एका काळ्या रिबिनीने बांधलेले मेथीच्या जुडी इतके केस आणि डोक्यात सन 1950 नंतरचा काळोख!

काही वर्षांपूर्वी नवरा गेला, त्या आधी काही वर्ष एकुलता एक मुलगा गेला! त्यानंतर हल्ली स्मरणशक्ती पण गेली! हजार फुटांचं, मुंबईच्या मध्यवर्ती भागातलं घर भयाण झालं! आज फोन आला आणि तिला भेटायला गेलो. अपेक्षेप्रमाणे तिने मला ओळखलं नाही. मी ओळख सांगितली. तिने मी रेफरन्स दिलेल्या माझ्या आईला ओळखलं आणि दोनच महिन्यांपूर्वी भेटलेल्या मला म्हणाली “तू अगदी लहान होतास तेव्हा बघितलं आहे म्हणून ओळखला नाही!” मी म्हणालो हरकत नाही. मग माझ्या आईच्या संदर्भाने सुरू झालेलं संभाषण एका क्षणात थेट 1940/45 सालात गेलं. “माझे वडील दहावीत प्रथम आले होते. त्यांचं नाव आजही शाळेच्या बोर्डावर आहे. माझ्या भावांना ते दाखवतात आणि म्हणतात तुमचं नाव पण इथे यायला हवं! माझ गणित कच्चं होत पण बाबा प्रेमाने शिकवायचे! भाऊ चिडवायचे!” ती संदर्भ देत असलेला तिचा एक भाऊ साठच्या दशकात अपघातात गेला होता आणि दुसरा काही वर्षांपूर्वी गेला! चार भावंडात ती एकटी उरली आहे! जगातील करोडो लोकात पण एकटी! 1950 नंतर काहीच आठवत नसलेली जुनी, व्हीन्टेज!

शनिवारी सकाळी ती बाथरूम मध्ये पडली. घरात कोणीच नाही. कामवाली बाई येऊन गेल्याने अजून कोणी येणारही नव्हतं! कामवाली रविवारी सकाळी आली. ही दार उघडत नाही म्हटल्यावर शेजाऱ्याना सांगितलं. त्यांनी जवळच राहात असलेल्या तिच्या भाच्याला फोन लावला. तो आणि त्याची बायको धावत आले. त्यांनी दार उघडलं आणि ही बाथरूम मध्ये पडलेली सापडली. चोवीस तास तशीच पडून होती. अन्न पाण्याशिवाय! वय 85+ ! नशिबाने हाड वगैरे मोडलं नव्हतं. रविवार आणि सोमवार तिला नॉर्मलवर आणण्यात गेले!

तिला बघून आणि तिच्याशी बोलून माझ्या डोळ्यात पाणी तराळल! मी बिल्डिंग मधून खाली उतरलो. मला फोन केलेल्या तिच्या भाच्याबरोबर चहा पीत होतो. तिचा निरागस गोरा चेहरा आणि खंगलेल्या आवाजात ती पंधरा मिनिटं सांगत असलेली तिच्या लहानपणीची गोष्ट मनातून पुसली जात नव्हती! साला हे म्हातारपण हा खरच शाप आहे. पैसा, प्रॉपर्टी, बँक बॅलन्स सगळं झूट! माणूस परावलंबी होतो! तेव्हा गरज असते ती फक्त “आपल्या” माणसांची! भाडोत्री नोकर मिळतही असतील पण प्रेम ही गोष्ट आजही भाड्याने किंवा विकत घेता येत नाही आणि म्हातारपणी फक्त तेच हवं असत!

ती ज्या पिढीची आहे त्या पिढीतील आताशा दुर्मिळ झालेल्या पुण्यवान, पापभिरू, प्रेमळ लोकांवर इतर लोकांच्या बाबतीत अत्यंत क्रूर असलेली नियती निव्वळ त्यांच्या पुण्यांमुळे थोडी दया दाखवते! आजच्या पिढीवर त्या वयात नियती इतकीच दया दाखवेल ह्याबाबत मी जरा साशंकच आहे! नवरा, मुलगा, भावंड आणि आता स्मृतीही हिरावून नेलेल्या नियतीने तिला प्रेम देणारी दोन माणसं तिच्या भाच्यांच्या रूपाने तिच्याजवळ ठेवली आहेत! एक ज्याने दार उघडून तिला परत उभी केली आणि दुसरा तोच बाथरूम मध्ये स्वतः अनुभव घ्यायला पडून राहिलेला वेडा, जो तिला आई मानतो! दोनच दिवसात तो येऊन तिला फ्लाईटने कायमची आपल्या घरी नेणार आहे! आता परत आमची भेट मी त्याच्या शहरात गेलो की होईल! म्हणून आज तिला भेटून आलो!

ह्या स्वार्थी झालेल्या जगात, समाजात अगदी नगण्य संख्येने उरलेल्या पुण्यवान पिढीच्या त्या व्हीन्टेज प्रतिनिधीला भेटून खूप सुखावलो. ह्या बाईच्या गाठीला फक्त पुण्य असल्याने तिला बघायला तिचा भाचा आहे आणि आयुष्यभर ती आता त्याच्या जवळ राहील पण आपले म्हातारपण कसे असेल ह्या विचाराने माझ्या पोटात खोलवर काहीतरी पिळवटले! क्षणभर! मग “पुण्य संचय किती होईल माहीत नाही पण निदान जाणीवपूर्वक पाप न करण्याचा” माझा मार्ग ह्यापुढेही सुरू ठेवायचा निश्चय केला आणि निघालो! ती 1950 च्या आधीच्या तिच्या काळात मश्गुल होती. ती पडल्याचेही तिला आठवत नव्हते! दोनच दिवसांनी एका नव्या शहरात, प्रेमळ लोकांच्या सहवासात, आलिशान घरात ती पुढचे आयुष्य शांतपणे व्यतीत करायला निघणार आहे! फक्त माझ्या मनात काहीतरी कायमचे तुटत असल्याची भावना आहे!😢

Image by Sabine van Erp from Pixabay 

mandar jog

mandar jog

मंदार जोग ह्यांची कटिंग पिनाकोलाडा, वन बाय टू मार्गारिटा आणि कोनिएक कथा ही तीन पुस्तक प्रकाशित झाली असून त्यांच्या साडेचार हजार प्रती छापील आणी इबुक स्वरूपात विकल्या गेल्या आहेत. दृकश्राव्य, प्रिंट तसेच सोशल मिडीयावर मंदार जोग नियमित लिखाण करत असतात. लेखक ऑनलाईन ह्या संकल्पनेला सत्यात आणणाऱ्या टीमचा मंदार जोग एक हिस्सा आहेत.

2 thoughts on “व्हिंटेज…..

  • April 21, 2019 at 1:34 pm
    Permalink

    वास्तव! जाणून बुजून चुका न करणं या आणि try to be a good human being, at least just a human being is what we can try for our own good. (म्हंजे तिथेही आपण स्वार्थीच 😐)

    Reply
    • April 21, 2019 at 2:40 pm
      Permalink

      thanks

      Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!