वोटिंगच्या नावाने चांगभलं…

अलार्म किंचाळतोय.
पावणेसहा वाजले असणार.
बर्याच दिवसांनी रवीने सकाळचे पावणेसहा बघितलेले.
डोळे ऊघडून शेजारी बघितलं.
सई नव्हती.
तीही नुकतीच ऊठलेली असावी.
किचनमधनं कपबशांचा खुडबुडाट ऐकू येत होता.
रवी एकदम शहाण्या मुलासारखा ऊठून बसला.
पाऊण तास.
वेळेत आवरायला हवंय सगळं.
साडेसहाला चांदनी चौकात भेटायचं ठरलंय.
तो पटकन् बाथरूममधे शिरला.
ब्रश चावत आरशासमोर ऊभा राहिला.
तेवढ्यात सईची हाक.
‘चहा झालाय.लवकर ये.’
पावणेतीन मिनटांत दोघांनी चहा संपवला.
रवीनं आई आबांच्या खोलीत डोकवून बघितलं.
शांतता.
ती दोघं फिरायला गेली असणार.
त्यांची साडेपाचची वेळ कधी चुकायची नाही.
आज घरी यायला त्यांना ऊशीर होणार.
वाॅक झाल्यावर वोटींग करून येणारेत दोघं जण.
ते येईपर्यंत थांबणं शक्यच नाही.
सईनं कीबोर्डकडे बघितलं.
नीलची सायकलची किल्ली नव्हती.
नील क्लासला गेला असणार.
सहाची ट्यूशन.
तोही साडेपाचलाच घराबाहेर पडतो.
टेन्थला आहे तो.
एकदम दहा वाजता घरी येईल तो.
जेवण करून शाळेत जाईल.
नीलशी भेट एकदम ऊद्याच.
आज किती तरी दिवसांनी दोघांना सुट्टी मिळालेली.
वोटींगची.
हक्काची.
सई एका प्रायव्हेट बँकेत.
रवी एका एमएनसीत.
सिनीयर मॅनेजर,मार्केटींग.
सतत टूरवर.
कालच रात्री ऊशीरा आलाय चेन्नईहून.
खरं तर आज निवांत ताणून द्यायची होती.
बिल्कूल ऊठायची ईच्छा नव्हती.
तरीही..
जरा चेंज हवा होता.
मंग्या.
त्याचा बचपन का दोस्त.
लोणावळ्याला मस्त बंगला बांधलाय त्यानं.
मंग्या- ऊर्वशी, पक्या-वैदेही, पर्या – रेवा आणि रवी- सई.
सगळ्यांनी मिळून ठरवलेलं.
आज फूल टू एंजाॅय.
एकदम पार्टी शार्टी माहौल.
मंग्याच्या फार्म हाऊसला मस्त पूल होता.
लाॅन होतं.
स्टाॅक होता.
सगळी ‘सोय’ होती.
मंग्या म्हणाला,
‘या अकरापर्यंत निवांत….’
पक्याला खाज.
‘लवकरच निघू.
साडेसहापर्यंत.
आठला पोचू लोणावळ्यात.
पूलात डुंबत बसू अकरा वाजेपर्यंत.’
पक्यानं सांगितलेलं रवीला पटायचंच.
लवकर लवकर आवरायला हवं.
सईचं घड्याळ पळत होतं.
तीनं पोळ्या करायला घेतल्या.
‘रवी आटप पटकन्.
पोळ्या झाल्या की मीही आंघोळ ऊरकून घेते.
आई भाजीचं बघतील.
कुकर रेडी ठेवलाय.
नील येईपर्यंत त्यांचा स्वयंपाक होईल.’
आई होत्या म्हणून..
सईला काळजी नव्हती.
रवी आंघोळून बाहेर आला.
टाॅवेलनं डोकं खरवडताना, काल रात्रीचं भांडण आठवलं.
हल्ली जरा कुरबूरी वाढल्याहेत.
बाकी कुणाचं नाही.
रवीचं आणि त्याच्या बाबांचं.
अधूनमधून वाजायचंच.
“लोण्यावळ्याला जाताय ?
आमचं काहीही म्हणणं नाही.
बोटाला शाई कधी लावणार ?
का तिथेही बुट्टी मारणार ?”
”नाही जमायचं.
सकाळी लवकर जायचंय.
तसंही , आमच्या दोन मतांनी काय फरक पडणारेय ?
तुम्ही आहातच.
जबाबदार नागरिक.
ठेवा लोकशाही जिवंत.
माझ्यासाठी हा चॅप्टर कधीच संपलाय.
सगळे सारखेच.
देश विकायला काढलाय सगळ्यांनी मिळून…”
रवीच्या बाबांना अजून बरंच काही सुनवायचं होतं.
रवी पुढचं ऐकायला तिथं थांबलाच नाही.
सई हाताची घडी तोंडावर बोट.
ती काहीच रिअॅक्ट व्हायची नाही.
चालू देत दोघांचं.
तीचंही मत रवीसारखंच.
माझ्या एका मतानं काय फरक पडणारेय ?
सहा वीसपर्यंत दोघं रेडी.
डहाणूकर ते चांदनी चौक.
दहा मिनटात नक्की पोचू.
रवी आणि सई दोघं निघाले.
घाईघाईनं रवीनं दार ऊघडलं.
च्या मारी !
दार ऊघडेचना..
लॅचचा काही घोटाळा ?
रवीनं आतनं लॅचची कील्ली फिरवून बघितली.
दार ढिम्म हलेना.
पाच मिनटं.
नुसती खुडबुड, धूसफूस..
तेवढ्यात सईनं शेजारच्या मंजूला फोन लावला.
डोळे चोळत ती बाहेर आली.
ह्यांच्या दरवाजाकडे बघून फोनवरच किंचाळली.
‘बाहेरच्या कडीला कुणीतरी लाॅक लावलंय.’
रवी हताश.
डोकं धरून मटकन् सोफ्यावर बसला.
” नक्की..
आमच्या तीर्थरूपांची करणी असणार ही…
स्वतः कुठं बाहेर पडायचं नाही.
दुसर्या कुणाला सुख ऊपभोगू द्यायचं नाही..”
तावातावानं रवीनं, आपल्या वडलांना कोपरापासून हात जोडले.
” रवी, जरा तोंड आवर.
तुझे वडिल आहेत ते”
‘ तेच तर..
नाईलाज आहे.
आमच्याच नशिबी आहे हे सगळं.
तोंड दाबून बुक्क्यांचा मार..”
रवी चिडला की लालतांबडा होतो.
आत्ता झालाय तसाच.
तेवढ्यात फोन वाजला.
” पक्या , तू पोचलास का चांदनीचौकात ?
तू हो पुढे यार.
मला ऊशीर होईल.
मी पोचतो अकरापर्यंत..”
पक्यानं मनातल्या मनात घातलेल्या शिव्या ,
रवीला मोठ्ठ्यांदा ऐकू आल्या.
काही ऊपयोग नाही.
आई बाबा सेलफोन वापरत नाहीत.
ते आठ वाजता घरी येतील तेव्हाच, आग्र्याहून सुटका.
चिडका रवी सोफ्यावर पसरला.
साडेसात वाजता दरवाज्याशी खुडबूड.
कुणीतरी लाॅक ऊघडतंय.
वाॅचमननं दार ऊघडलं.
एक चिठ्ठी.
“ही चिठ्ठी नीलबाबा देवून गेलेत.
साडेसात वाजता लाॅक ऊघडायला सांगितलेलं.
जाताना किल्ली माझ्याकडे देवून गेल्ते. “
‘ साॅरी माॅम डॅड..
यू मस्ट वोट.
आम्हाला स्कूलमधे स्ट्रीक्ट इन्स्ट्रक्शन्स होत्या.
यूवर पॅरेंटस् मस्ट व्होट.
सो.. प्लीज व्होट.
आणि मगच लोणावळा.
साॅऽऽरी वन्स अगेन..
एंजाॅय दी डे !’
रवीचा आवाज बंद.
पोरगा बाप झालेला.
मनातल्या मनात त्यानं आपल्या पिताश्रींचे पाय धरले.
दिलसे माफी मागितली.
दोघं सटाक निघाली.
बूथवर जाऊन पटाकदिशी वोटींग केलं.
बोटांना लोकशाहीचा कुंकुमतिलक लावला.
आईबाबा तिथंच भेटले.
बूथच्या पुढच्या चौकात चौघांनी मस्त चहा घेतला.
राजकारणावर खमंग चर्चा.
कितीतरी दिवसांनी..
मजा आली.
आई बाबांना घरी ड्राॅप केलं.
रवीच्या गाडीची पावलं, लोणावळ्याकडं सुसाट पळू लागली.
तो चांदनी चौकापाशी पोचलाच असेल..
तेवढ्यात ,पक्याची गाडी ऊल्टी क्राॅस झाली.
क्या हुआ ?
पक्याचा फोन आलाच.
” मंग्याच्या नानाची टांग…!
आत्ता सात वाजता मंग्याचा मेसेज.
बोंटांना शाई असेल, तरच बंगल्यात एन्ट्री मिळेल.
तुझे पता है यार..
मंग्या साला सर्किट आहे.
खरंच पाऊल नाही ठेवू देणार बंगल्यात.
च्या मारी भेंडी…
गहुंजेहून परत फिरलोय.
तू हो पुढे.
मी वोटींग करून आलोच..”
रवीचं हार्ट समाधानानं सुस्कारलं.
बाप रे बाप…!
पोराला आणि बापाला ..
रवीनं दोघांना मनोमनी थँक्सलं..
आनंदानं तो पार्टीवाली शिट्टी वाजवू लागला..
वोटींग न करणार्यांचा ऊद्धार करायला तो आता मोकळा होता..
काहीही असो..
वोटींग करणार्यांचा टक्का ईस साल बढ रहा था !
लोकशाहीला हयातीचा दाखला मिळाला होता..
वोटेगा ईन्डिया..
तोही आगे बढेगा ईन्डिया  !
…..कौस्तुभ केळकर नगरवाला.
Image by Wokandapix from Pixabay 
Kaustubh Kelkar
Latest posts by Kaustubh Kelkar (see all)

Kaustubh Kelkar

कौस्तुभ केळकर ह्यांनी बीई (इलेक्ट्रिकल) तसे बीजे (जर्नालिझम) असे शिक्षण घेतले आहे. गेली अनेक वर्ष ते अहमद नगर येथे भौतिकशास्त्राचे क्लासेस चालवतात. फेसबुकवर कौस्तुभ केळकर नगरवाला ह्या नावाने परिचित असलेल्या कौस्तुभ ने अनेक कार्यक्रमांचे लेखन, निवेदन आणि सुत्रसंचलन केले आहे. हसरी दिवाळी तसेच कथुली ह्या कार्यक्रमांचे सादरीकरण केले आहे. लोकसत्ता, सकाळ, लोकमत अश्या अनेक दैनिकांमधून विपुल लिखाण केले आहे. तसेच त्यांचे कथुली नावाचे पुस्तकही प्रसिद्ध झाले आहे.

5 thoughts on “वोटिंगच्या नावाने चांगभलं…

  • April 22, 2019 at 10:30 am
    Permalink

    Vote for future of our children

    Reply
  • April 26, 2019 at 5:42 pm
    Permalink

    अगदी बरोबर. मस्त कथा

    Reply
  • July 6, 2019 at 11:50 am
    Permalink

    आयडिया ची कल्पना मस्त आहे

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!