कुछ तो लोग कहेंगे . . .
प्रसंग 1
कॉलेजच्या मैत्रिणींचे फोन. कुठे तरी गेट टुगेदर करूया. हो ना करता करता एका मैत्रिणीच्या घरी भेटायचे ठरते. तिला पण आग्रहाचे आमंत्रण असते. ती एका कोपऱ्यात कोल्ड ड्रिंकचा ग्लास हाती घेऊन शांत बसलेली असते.
“माझ्या सासूबाई खूप काळजी करतात. छान वाटते पण कधी कधी आईने सारखी काळजी केली तरी राग यायचा ना तसेच होते अगदी. काय करणार? सासूबाई पडल्या . . . बोलता येत नाही आपल्याला”
“अगं माझ्या नवऱ्याने साफ सांगून टाकलंय तू आणि आई परस्पर भांडणे मिटवा काय असतील ती. माझ्यापर्यंत आणूच नका. काय बोलायचे बाई आता?”
“अगं पण म्हणजे त्याला नाही सांगणार तर कुणाला सांगणार?”
“हो ना पण हे त्याला कळायला नको? घरी आला कि बायकोने पुढे पुढे केले नाही तर रुसतो तो चक्क”
इथून पुढे संभाषणाची गाडी नवऱ्याच्या सवयी या रुळावर येते. ती तशीच शांत. फक्त ऐकतेय.
“काय झाले ग तुझ्या केसचे पुढे? काय म्हणाले वकील?” मैत्रीण तिला विचारते. “नीट भरपाई पदरात पाडून घे बाई. माझ्या चुलत नणंदेचे असेच झाले होते.. त्यांना की नाही . . .”
ती पुढचे काही ऐकत नाहीये आता.
“अय्या काही खाल्ले नाहीये तुम्ही अजून. घ्या ना. सासूबाईंनी खास केलीय ही बर्फी. माझ्या मैत्रिणी येणार म्हणून”.
ती आता घड्याळाकडे बघतेय. थोड्या वेळाने ती उठते.
“निघते मी. मला अजून एकांकडे जायचंय”
“अच्छा मग. काळजी घे. काही लागले तर सांग”. तिची मैत्रीण तिचा हात हलकेच थोपटते.
मैत्रिणीला हुश्श झालेले तिला कळते. ती दार ओढून घेते. आतून हसण्याचे आवाज येत राहतात.
प्रसंग 2
तिची नोकरी ती नेटाने करतेय. मन लावून काम करणे, आणि हसरा चेहरा यामुळे ती उत्तम सहकारी म्हणून नाव कमावते. या वर्षी तर तिला उत्तम परफॉर्मन्स साठी बक्षीस जाहीर झालंय. ती खूष आहे. येणाऱ्या बक्षिसाच्या पैशातून ती घरात वॉशिंग मशीन घ्यायचे म्हणतेय. ब्रँड पण तिने पाहून ठेवलाय.
तिचे नाव जाहीर होते. ती स्टेज वर जाते. बक्षीस घेऊन जागेवर येऊन बसते. मागच्या रांगेत बसलेल्या सहकाऱ्यांच्या कुजबुजीचा आवाज येतो.
“बक्षीस न मिळायला काय झालंय? घरी कुणी नाही यांच्या. नवरा, स्वयंपाक, मुलांचे बघ असले काही व्याप नाहीत. थोडा जास्त वेळ देता येतो ऑफिस नंतर. मग काय? परफॉर्मन्स चांगला नसेल तर काय?”
तिच्या डोळ्यात पाणी येते. ती ट्रॉफी पर्स मध्ये टाकते आणि तिथून निघते.
प्रसंग 3
कार्यालयात एका घोळक्यात ती बसलेली असते. आज तिलाही जरा छान आवरायचा मूड आलेला असतो. छान साडी, मॅचिंग पर्स, बांगड्या असा सगळा जामानिमा करून ती बसलेली असते.
“अगं काय छान दिसतेयस . . .” घोळक्यामधले कुणीतरी तिला बघून म्हणते
ती मनापासून हसते
“बरंय तुझे. असं आवरायचे म्हणजे मेहनत घ्यायला वेळ आहे बाई तुला. नाहीतर आम्ही. मुलांचे आवरेपर्यंतच इतके दमायला होते ना की आपले आवरायचे लक्षातच येत नाही बघ. तुला असले तर काही नाही.”
स्मज झालेले काजल पुसायच्या निमित्ताने ती हळूच डोळ्यातले पाणी पुसते.
प्रसंग 4
तिचे वाचन उत्तम आहे. सुरेख गाते. कुणाला फारसे माहित नाही याबद्दल खरेतर. ती सांगतही नाही कधी. एकदा पुस्तक सभेच्या कुठल्या तरी फंक्शन मध्ये ती सामील होते. तिला बोलायचा आग्रह होतो. ती स्टेज वर जाते. अनेक संदर्भ देऊन, ती विषयाचे वेगवेगळे पैलू खूप छान मांडते. टाळ्यांचा गजर होतो. ती खाली उतरते. थोड्या वेळाने सगळ्यांसाठी चहा येतो.
“वा मॅडम, सुंदर बोललात तुम्ही.”
“थँक यू” ती सस्मित उत्तरते.
“कसा काय इतका वेळ मिळतो तुम्हाला एव्हढा अभ्यास करायला?”
“नाही मिळत. काढावा लागतो”, तिला झटकन अंदाज येतो.
“ते आहेच हो. पण तुम्हाला काय नोकरी एके नोकरी. बाकी काळज्या नाहीत ना फारश्या. त्यामुळे जमतंय”
ती काही बोलत नाही. थोड्या वेळाने बसल्यासारखे करून ती तिथून निघते.
प्रसंग 5
नातेवाईकांपैकी कुणाकडे तरी कार्य निघते. ती आठवड्याची रजा टाकते. मनापासून कार्यात काम करते. ऐन कार्याच्या दिवशी नव्या जोडप्याला ओवाळायला बाकी सुवासिनी पुढे होतात. ती सगळ्यांच्या मागे उभे राहून पाहात असते.
एक वयाने वडील नातेवाईक बाई तिच्या खांद्यावर हात ठेवतात.
“वाईट नको वाटून घेऊस ग . . . सुवासिनी लागतात ओवाळायला”
ती मानेने हो म्हणते. तिथून वळते. पाठीमागून खालच्या पट्टीतला आवाज येतो.
“काय सांगायचे आता. हिचं हे असे. काही चूक नाही म्हणा त्या मुलाची पण. हिलाच जरा सहनशक्ती कमी पडली. इतका कसला आलाय स्वाभिमान म्हणते मी. माझा मुलगा असता तर मी करूनच घेतली नसती हिला सून म्हणून”
ती हॉलच्या बाहेर येते. आवारातल्या झाडाखाली शांत बसते. थोड्या वेळाने कार्याचे न जेवताच तिथून निघून येते.
प्रसंग 6
“चल उठ बाई. आवर. त्या काकूंनी खूप प्रेमाने बोलावलंय तुला”.
“आई मी नाही येणार. तू जा. सांग मला बरं वाटत नाही म्हणून.”
“अगं असं काय करतेस? आताशा तुला कुठे यायला जायला नको असते. चार माणसांना धरून रहावे अगं. शिष्ठ म्हणतात लोक तुला आजकाल”
ती डोळे विस्फारून आईकडे बघते आणि हसायला लागते.
© प्राजक्ता काणेगावकर
- Kaleidoscope- मुझे तुमसे मुहोब्बत है दिवानगी की हद तक - May 28, 2021
- Kaleidoscope- लव्ह ऍक्चुअली - April 29, 2021
- Kaleidoscope- दिल तो आखिर दिल है ना - April 14, 2021
कथा खुपच छान. वेगळे प्रसंग मांडुन, संक्क्षिप्त पणे एका स्त्री ची व्यथा छान दर्शविले आहे. अभिनंदन.
लोकांना कळत देखील नाही की नकळत आपण काय बोलून जातो ते.. प्रगल्भता असून अशा प्रसंगांत थिटी पडते..
धन्यवाद 🙏
Very true…yaat gharache lok pan asatat ….. Same feeling people give to the married lady who is not having kids after long time of marriage ….. mansanchi khari olakh ashyach prasangatun ghadate…
किती सहजपणे दुसऱ्यावर कमेंट करतात ना!! थोडक्यात पण चपखलपणे मांडलय
Written really well…
किती सहजतेनं माणसं गृहित धरतात गोष्टी. जावे त्यांच्या वंशा तेव्हां कळे. स्वत:च्या हिंमतीवर जगणारी स्त्री तिला भावभावना नसतील का?
समाजमनाचं यथार्थ चित्रण करणारं लिखाण
Kharach khup Yogya chitran kela aahet tumhi. Yashasvi independent strip lokanchya pachanich padat nahi.
वा अप्रतिम… शब्द तोकडे पडत आहेत प्रतिक्रिया द्यायला