शाळा संपली…..

आजच बातमी ऐकली की गोसावी सर रिटायर झाले. ही बातमी ऐकून मन अनेक वर्ष मागे गेलं. आम्ही शाळेत असताना वर्गात एक सर आले. उंची सवापाच फुटांच्या आत बाहरेची. कुरळे केस, जाड मिशी तसेच घोगरा आणि सामान्य ह्यांच्या मध्ये कुठेतरी फिट होणारा आवाज. आम्ही तेव्हा हायस्कूल मध्ये होतो. आम्हाला शिकवणारे बहुसंख्य सर हे चाळीशी ओलांडलेले असल्याने हा तरुण मुलगा शिक्षक म्हणून आलेला बघून थोडं आश्चर्य वाटलं होतं. त्यांनी आमच्या वर्गाला फार शिकवलं नाही तरी आमची, म्हणजे आमच्या batch च्या मुलांची सरांशी मस्त दोस्ती झाली होती. हो दोस्तीच. कारण आम्ही पौगंडावस्थेत प्रवेश करत असताना शाळेच्या शिस्तबद्ध वातावरणात आमचे विचार समजून घेऊ शकेल असा एक दादा शिक्षकाच्या रुपात गोसावी सरांमुळे मिळाला होता. मग शाळेच्या काही ट्रिप्स असोत, विज्ञान प्रदर्शन असोत. गोसावी सर बरोबर असले की की पोर “बिनधास्त” असत. पण ह्या बिनधास्तपणाने शिक्षक विद्यार्थी ह्यातील रेषा कधीच ओलांडली नाही. फरक इतकाच की इतर शिक्षकांची आम्हाला आदरयुक्त भीती वाटायची आणि गोसावी सरांबद्दल “आदरयुक मैत्री” वाटायची. त्यांनी देखील उगाच मी तुमचा शिक्षक आहे असं भासवत आम्हाला चार हात लांब ठेवलं नाही.  ते मुलांना इतके आपलेसे वाटत की काही मुलं त्यांच्याकडे जाऊन आपल्याला कोण मुलगी आवडते हे देखील मोकळेपणाने  सांगत. मग सर त्यांना प्रेमाने हे वय अभ्यास करायचं आहे, असल्या गोष्टीत सध्या पडू नका असे छान सल्ले द्यायचे आणि best part म्हणजे मुलांना ते पटायचे देखील.

आमची शाळा संपली. शाळेशी संबंध खूप कमी  झाला आणि आणखी कमी होत गेला. फक्त शाळेवरून जाताना नकळत दरवाज्यासमोर हात जोडले जाणे इतकाच तो उरला. आमच्या वेळी असलेले शिक्षक एक एक करत निवृत्त झाले. कालांतराने काही जण गेल्याच्या बातम्या येऊ लागल्या. आमच्या वेळी असलेला ऑफिस स्टाफ, शिपाई देखील निवृत्त झाले. त्यांच्यापैकी अनेकांच्या जाण्याच्या बातम्या ऐकायला मिळाल्या. आता शाळेच्या त्या वास्तूत फक्त गोसावी सर आमच्या तेथील अस्तित्वाचे साक्षीदार होते. कधीतरी शाळेकडे पावलं वळायची. शाळेत सर हसतमुखाने स्वागत करायचे. आता ते प्राचार्य झाले होते. शाळेच्या विकासासाठी त्यांनी माजी विद्यार्थ्यांच्या संपर्कातून आणि सहाय्यातून अनेक उपक्रम यशस्वीपणे राबवले. आमचा शाळेतला दादा आता पद आणि अधिकाराने खूप मोठा माणूस झालेला बघून बर वाटायचं. रस्त्यात कधी भेटले की सर आस्थेने चौकशी करायचे. शाळेत ये रे कधीतरी म्हणायचे. वर्गातल्या इतरांची चौकशी करायचे. त्यांना भेटल्यावर ते म्हणजे शाळेत आमच्या अस्तित्वाच्या खुणा जपणारी शेवटची लिंक आहेत असं वाटून शाळेचे सर्व दिवस सर्रकन डोळ्यासमोरून सरकून भरून यायचं.

काल सर निवृत्त झाले आणि ती शेवटची लिंक तुटली. आता आम्ही पण म्हणू शकतो “आमच्या काळातलं” शाळेत कोणी नाही.  अस्तित्व आणि आठवणी ह्यात हाच फरक आहे. अस्तित्व हे झाडासारख असतं आणि आठवणी त्या झाडाची मूळ असतात. अस्तित्वाच झाड जरी कोसळलं तरी आठवणींची मूळ मनात खोलवर  रुजलेली असतात. ती आयुष्यभर तिथेच टिकून राहतात. आज गोसावी सरांच्या निवृत्त होण्याने आमच्या  शाळेतील अस्तित्वाचा वृक्ष अखेर कोसळला आहे. त्या वास्तूत आता ओळखीच कोणीचं असणार नाहीये. पण शालेय जीवनाच्या आठवणी मनात खोलवर रुजल्या आहेत. त्या तश्याच असतील. आजही मनात शाळा भरली की त्या गोंगाटात आणि कोलाहलात सामान्य आणि घोगरा ह्याच्या मध्ये असलेला एक आवाज ऐकू येईल. मागे वळून पाहिल्यावर साडेपाच फुटांच्या आतला,कुरळ्या केसांचा आणि जाड मिशीवाला एक दादा “ए मस्ती नका करू” म्हणत असेल. आमचं तिथल अस्तित्व सरांच्या निवृत्तीने संपल असलं तरी शाळा मनात मात्र रोज भरेल!

mandar jog

mandar jog

मंदार जोग ह्यांची कटिंग पिनाकोलाडा, वन बाय टू मार्गारिटा आणि कोनिएक कथा ही तीन पुस्तक प्रकाशित झाली असून त्यांच्या साडेचार हजार प्रती छापील आणी इबुक स्वरूपात विकल्या गेल्या आहेत. दृकश्राव्य, प्रिंट तसेच सोशल मिडीयावर मंदार जोग नियमित लिखाण करत असतात. लेखक ऑनलाईन ह्या संकल्पनेला सत्यात आणणाऱ्या टीमचा मंदार जोग एक हिस्सा आहेत.

9 thoughts on “शाळा संपली…..

  • May 1, 2019 at 8:34 am
    Permalink

    Khupach chan. Shalechya saglya junya aathavani jagya zhalya 👌👌👍

    Reply
      • May 1, 2019 at 3:11 pm
        Permalink

        खूप छान शालेय आठवणी 👌👌

        Reply
  • May 1, 2019 at 11:25 am
    Permalink

    mast.. aamhala pan hote maths shikvayla gosavi sir. majhe baba pan chikitsak madhe hote shikvayla khare sir..

    Reply
  • May 1, 2019 at 12:22 pm
    Permalink

    Mast.mazi shala athavali

    Reply
  • May 2, 2019 at 5:25 am
    Permalink

    खरंच रे मंदार , आपल्यावेळचं कोणीच नाही आता शाळेत…… अजूनही ते दिवस आठवले की इतकं छान वाटतं! मस्त. Thank u so much. त्या आठवणी ताज्या केल्याबद्दल…..

    Reply
  • June 23, 2020 at 2:07 pm
    Permalink

    Mandar thanks. Shalechya athavani tazya kelya baddhal. Thanks

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!