वारसा….
अण्णा थकून झाडाला टेकून बसले. तशी खडी चढणच होती टेकडीची. वरच्या देवळाचा कळस त्यांना साद घालत होता. अण्णांना त्यांचे तरुणपणीच दिवस आठवून उगीच हसू आले. त्यावेळी ते पळतपळतच टेकडी चढत असत. त्यांचे वडील रामभाऊ गुरुजींची पूजा होईपर्यंत अण्णा वर पोचत. त्यांच्या नैवेद्याच्या वेळेपर्यंत अण्णा वर दहीभात घेऊन पोचत असत. रामभाऊ पंचक्रोशीत विद्वान आणि सज्जन म्हणून प्रसिद्ध होते. अण्णांची आई अनसूयावहिनी तर साक्षात अन्नपूर्णा होती. तिच्या हातचे जेवला नाही असा मनुष्य सापडणे विरळ. अशा सज्जन आणि सालस जोडप्याच्या पोटी आपला जन्म व्हावा हे अण्णांना स्वतःलाच मोठे भाग्याचे वाटे. रामभाऊंच्या शेवटच्या आजारात अण्णांनी त्यांची मनोभावे सेवा केली. ज्यादिवशी सुतक संपले त्या दिवशी त्यांनी पूजेचे तबक उचलले आणि टेकडीवरच्या रामाला अभिषेक केला. न बोलता न सांगता आपसूक ती जबाबदारी त्यांनी उचलली. त्यांचा नित्यनेम झाला. सकाळी घरची पूजा करून ते रामाच्या देवळात येत. देऊळ त्यांच्या वहिवाटीच्या जमिनीवर होते. टेकडी म्हणण्याइतकी उंच टेकडी नव्हती खरेतर ती. पण देवाचे दर्शन सहज कसे व्हावे या न्यायाने अण्णांच्या पूर्वजांनी थोडे लांब जरा उंचावर अशी जागा शोधून ते देऊळ बांधले होते. टेकडी चढतानाचा एक टप्पा मात्र चांगलाच दमछाक करवणारा होता. आज त्याच टप्प्यावर असलेल्या एका आंब्याखाली अण्णा बसले होते. त्या आंब्याच्या खोडावरून त्यांनी मायेने हात फिरवला. सरस्वतीने त्यांच्या पत्नीने लावलेले झाड होते ते. त्याच्या लाल सोनेरी पोपटी लसलसत्या कोंबापासून अण्णांनी त्याचा प्रवास बघितला होता. सरस्वती तू हवी होतीस आता या झाडाकडे बघायला अण्णा स्वतःशीच पुटपुटले. कपाळावर हात घेऊन त्यांनी वर बघितले. नजरेला तीव्र प्रकाश सहन न झाल्याने त्यांनी पटकन मान वळवली. उठायला हवे आता उशीर होईल नाहीतर, त्यांचे त्यांनाच जाणवले. प्रयासाने ते उठून उभे राहिले. एक एक पाऊल उचलत ते देवळात पोचले. रामरायाची पूजा आरती करून ते गाभाऱ्यातून बाहेर आले. वारे सुटले होते. झळा असल्या तरी त्यांना त्या वाऱ्याने बरं वाटले. ते देवळाच्या पडवीत टेकले. खांबाच्या सरळ साध्या रेषांवरून त्यांनी हात फिरवला. शांत डोळे मिटून बसावे आणि इथेच डोळे मिटावेत असे त्यांच्या मनात आले. देवाच्या दारी हे काय मनात आले म्हणून त्यांनी पटकन डोळे उघडून गाभाऱ्यातल्या रामाकडे बघितले. आतमध्ये अंधार असला तरी समईच्या प्रकाशातली रामाची सुहास्य मूर्ती त्यांना दिसली. त्यांनी हात जोडले. माता रामो मत पिता रामचंद्र:… ते पुटपुटले.
किती वेळ गेला असा कुणास ठाऊक? अण्णा एकदम भानावर आले. खाली उतरायला हवे. रमा वाट पाहिल जेवायची. पोर लग्न होऊन घरात आली ती घरचीच झाली. अण्णांच मन मायेने भरून आले. ते उठले. लगबगीने खाली उतरायला लागले.
“अण्णा जपून उतरा”, अर्जुनाचा आवाज आला.
“हो रे” अण्णा हसले
“ती वाट हलकी झालीय. पाय घसरायचा तुमचा. या इकडे. मी हात देतो”.
“अरे नको रे पायाखालची रोजची वाट माझी. उतरेन मी”
“हो अण्णा तुम्ही उतराल वो. तिकडून वैनी मला बोल लावतील त्याचे काय?”.
अण्णांचा हात धरून अर्जुनाने त्यांना उतरायला मदत केली.
“चल बाबा. रमा थांबली असेल जेवायची”.
“धाकले धनी बी आलेत”. अर्जुनाने नजर टाळली अण्णांची.
अण्णांच्या कपाळाला नकळत आठी पडली. श्रीरंग का आलाय असा अचानक? गेल्या वेळी भांडण करून निघून गेला. त्याच्या नावावर सगळे करून द्या म्हणून केव्हढा जीव काढला त्याने आपला. अण्णांच्या डोळ्यात पाणी आले. रामभाऊंच्या सज्जनपणाची ख्याती अजून लोक आपल्याला सांगतात. आला गेला पै पाहुणा सरस्वतीनेही पाहिला. कधी हसू मावळले नाही तिचे संसार करताना. श्रीरंग मुळातच हुशार म्हणून कोण कौतुक होते तिला. शाळेत पहिला येत होता, चांगला वकील व्हावे त्याने अशी तिची इच्छा होती. पुढच्या शिक्षणासाठी शहरात गेला. सुरुवातीला दर आठ पंधरा दिवसांनी घरी चक्कर टाकणारा मुलगा तीन महिने झाले तरी घरी आला नाही एकदा. सरस्वतीने देव पाण्यात घातले. मुद्दाम त्याला बघायला आपण शहरात गेलो. दार उघडले त्याच्या खोलीचे तर तर्रर्र होऊन नको त्या अवस्थेत सापडला आपल्याला. त्याच पावली मागे वळलो. घरी जाऊन सरस्वतीला काय सांगावे हा पेचच उभा राहिला आपल्यापुढे. पण तशी वेळच आली नाही. आपल्या पाठोपाठ श्रीरंग घरी येऊन धडकला. त्याने हातापाया पडून आपली माफी मागितली. रड रड रडला त्या दिवशी. सरस्वतीने पदराने डोळे पुसले त्याचे. मायेने पोटाशी धरला त्याला. नजरेनेच आपल्यालाही सोडून द्या हो म्हणून विनवणी केली. त्याच रात्री तिचे दागिने घेऊन पळून गेला तो. गेलीच सरस्वती नंतर महिन्याभरात. अण्णा थांबले. अर्जुनाच्या हातावरची पकड घट्ट झाली.
त्यांनी घाम पुसला. लग्न करून दिले म्हणजे जबाबदारी पडेल आणि मुलगा मार्गावर येईल म्हणून लग्न करून दिले श्रीरंगचे. नक्षत्रासारखी मुलगी मिळाली त्याला बायको म्हणून. तिच्यासाठी सुद्धा कधी श्रीरंगचा पाय अडकला नाही घरात पण. अबोल होत होत शांतच झालीय ती तर. काही बोलत नाही काही सांगत नाही. नाहक लोटले तिला या सगळ्यात आपण. अण्णांचा जीव तुटला. तशीच त्यांनी भरभर पावले उचलली. घर दृष्टीपथात आल्यावर त्यांना हायसे वाटले. मागील दराने ते घरात शिरले. हातापायावर पाणी घेऊन ते स्वयंपाकघरात आले. दोन पाट मांडले होते. पानं वाढली होती. श्रीरंग आधीच येऊन बसला होता. अण्णा पाटावर येऊन बसले. त्यांनी चित्राहुती घातली. ताटाभोवती पाणी फिरवून त्यांनी हात जोडले.
“अण्णा काय ठरवले मग तुम्ही?” श्रीरंगचा चिडका आवाज आला.
“अहो त्यांना जेऊ तर द्या”
“तू मध्ये बोलू नकोस. अण्णा मला पैसे हवेत. मला द्यायचे आहेत एकाला”.
“ते तुझे तू बघ श्रीरंग. त्या एकाकडून पैसे घ्यायला मी तुला सांगितले नव्हते”, अण्णांनी शांतपणे उत्तर दिले.
श्रीरंग धुमसला. त्याने मान खाली घालून भात चिवडायला सुरुवात केली. पुढच्याच क्षणात त्याचा स्फोट झाला
“इतके सगळे जमवलेले वर घेऊन जाणार आहेत का अण्णा तुम्ही? फक्त एक एकर विकायची म्हणतोय मी जमीन. देशमुख शहाणे निघाले तुमच्यापेक्षा. एक कोट रुपये मिळाले त्यांना नदीलगतच्या तुकड्याचे”.
“मग जा देशमुखांकडून घे पैसे. मी देणार नाही आणि मी जमीनही विकणार नाही”
श्रीरंग उठला. त्याने ताटाला लाथ मारली.
“अहो” रमाचा आवंढा घशात अडकला.
अण्णा उठून उभे राहिले. त्यांना रागाने थरथर सुटली होती.
“श्रीरंग आताच्या आता घरातून चालत हो”
“जाणार नाही. माझे पण घर आहे. तुम्हाला पण वारशाने मिळाले आहे. तुमच्याइतकाच माझाही हक्क आहे यावर. मला बऱ्या बोलणे पैसे द्या नाहीतर मला कोर्टाचा मार्ग मोकळा आहे.”
अण्णा हतबुद्ध होऊन त्याच्याकडे बघत राहिले. इतका विखार कुठून आला या मुलात हेच त्यांना कळेना.त्यांनी स्वतःला सावरले.
“श्रीरंग तुझा मार्ग तुला मोकळा आहे. मी तुला अडवणार नाही. तुझ्या दुर्दैवाने तुला वारशाचा अर्थच कळला नाही. अजूनही मनात आणशील तर या सर्वावर तू राज्य करशील. पण ते तुझ्या नशिबी नाही. तुझे म्हणणे बरोबर आहे. मलाही हे सगळे माझ्या वाडवडिलांकडूनच मिळाले आहे. पण मी त्यात भर घातली. मी याचा राखणदार आहे. राखण करावी लागतेच तुझ्यासारख्या वारसापासून. त्याहीपेक्षा मोठा वारसा मला माझ्या वडिलांनी दिला. तो म्हणजे सद्वर्तनाचा. आम्हीही तुला तोच दिला. विचार दिले. रामरायाचा आदर्श शिकवला. जमीनजुमला, पैसे संपत्ती यापेक्षाही मोठी इस्टेट तुला दिली. माझे दुर्दैव तुला ती नाही सांभाळता आली. आता तू मागशील तरी मी तुला काही देऊ शकणार नाही. सरस्वती गेलीच पुढे. मी ही जाईनच. कुणाला चुकलंय मृत्यू? माझ्या नंतर तू पूजा करशील देवळात अशी माझी इच्छा अपेक्षा होती. पण ते होणे नाही हे मला कळून चुकलंय. माझी सेवा नाकारली त्याने. बेवारस झाला राम माझा आणि मलाही पोरके केले त्याने”.
अण्णा मटकन खाली बसले. ते ढसाढसा रडू लागले. रमा कडे एकदा, एकदा अण्णांकडे असा बघत राहिला श्रीरंग. त्याच्या नजरेत एक क्षण पाणी तरळले. आणि पाठ फिरवून तो खोलीतून निघून गेला. रमाने अण्णांना उठवले. त्यांचे डोळे पुसले. त्यांना आधाराने तिने त्यांच्या खोलीत पोचवले. समोरच सरस्वतीबाईंचा मोठा फोटो होता. अण्णा बिछान्यावर पडले. ग्लानीत, विचारांनी थकून कधीतरी त्यांचा डोळा लागला. तिन्हीसांजा झाल्या तशी ते उठले. डोळ्यांच्या कडेला जमा झालेले पाणी त्यांनी टिपले. बाहेर येऊन ते दिवाणखान्यात येऊन बसले. रमाने त्यांना न मागता चहा आणून दिला. तिचे सुजलेले डोळे त्यांच्या नजरेतून सुटले नाहीत. तिच्या डोक्यावर त्यांनी हलकेच थोपटले. दूर शून्यात नजर लावून ते बराच वेळ बसून होते. थोड्या वेळाने रमा बाहेर आली. चहाचा कप गार झाला होता. अण्णा तसेच बसून होते. तिने अण्णांच्या खांद्याला हात लावला. अण्णा कोसळले.
“अण्णा……..” रमाची किंचाळी ऐकून अर्जुन धावत आला. श्रीरंग त्याच्या खोलीतून पळत बाहेर आला. अण्णांच्या निष्प्राण देहाकडे बघून त्याच्या चेहऱ्यावर एकच क्षण कुत्सित हसू उमटले. पण दुसऱ्याच क्षणी वास्तवाची भयाण जाणीव त्याला झाली. रमा त्याच्याकडेच सुन्न होऊन पाहत होती. तो अण्णांच्या पायावर पडून हमसाहमशी रडू लागला. एकदा तिच्याकडे नजर गेली श्रीरंगची. तिच्या नजरेत तिरस्कार पुरेपूर उतरला होता. ती नजर बघून तो चपापला. झटक्यात त्याने अण्णांच्या पायावरचा हात काढला.
दिवसकार्य झाले. गाव लोटला तेराव्याला. देऊळ अण्णांच्या घरातले असले तरीही कुणाला दर्शनासाठी आडकाठी नव्हती. उत्सव, कीर्तने यांचा जागर देवळात कायम असायचाच. सगळ्यांच्या नजर चुकवत श्रीरंग एका कोपऱ्यात उभा होता. रमा मात्र शांत होती. आलेगेले बघणे यात तिचा दिवस जात होता. होता होईतो श्रीरंगसमोर ती उभी राहत नव्हती. आठ दिवसांनी श्रीरंगने तिला गाठलेच
“अण्णांच्या तिजोरीच्या किल्ल्या कुणाकडे आहेत? “
“मला माहित नाही”
“असे कसे होईल?”
“मला खरंच माहित नाही”
“माहित नाही का सांगायचे नाही?”
रमाने यावर त्याच्याकडे एक जळजळीत कटाक्ष टाकला आणि ती तिथून निघून गेली. असाच उद्रेकी शांततेत आठवडा गेला.
एके दिवशी दारात आलेल्या बाळाजी वकिलांना रमाने बसायला पाट दिला. त्यांच्यासमोर पाणी ठेवले.
“रमा तुझा सासरा माझा मित्र. श्रीरंगची काळजी त्याने मला कित्येकदा बोलून दाखवली. माझ्याच सांगण्यावरून त्याने मृत्युपत्र केले. हे सगळे आता तुझे आहे. मृत्युपत्र करताना तो म्हणला मला. याने तरी मी रमाचा थोडा उतराई होईन. पोटच्या पोरापेक्षा जास्त माया लावली तिने मला. या घरात न येती तर सुखाने कुणाचा संसार सजवला असता तिने. कसे होईल तिचे माझ्या नंतर? तिला कुठे काही कमी पडू नये हीच इच्छा.”
बाळाजी वकिलांनी डोळे पुसले. रमाच्या हातात त्यांनी कागदपत्र ठेवली.
रमाने पदराने डोळ्यातले पाणी पुसले.
“काका एक विनंती होती. त्यांची कर्जे आहेत बाहेर ती तुम्ही स्वतः मिटवा. त्यांच्या हातात पैसे देऊ नका. आणि मग त्यांना सांगा इथे कधीही आले नाहीत ते तरी चालेल मला. राखणदार व्हायचे म्हणजे एव्हढे केले पाहिजे मला आता”
कधी न बोलणाऱ्या त्या मुलीच्या तोंडून इतके ऐकताना बाळाजी हादरलेच.
जशी तुझी इच्छा पोरी पुटपुटत ते उठले.
रमा देवघरात गेली. पूजेचे तबक पदराखाली झाकून तिने टेकडीची पायवाट चढायला सुरुवात केली. का कुणास ठाऊक आंब्याची पाने जरा जास्तच सळसळली ती जवळून जात असताना
©प्राजक्ता काणेगावकर
- Kaleidoscope- मुझे तुमसे मुहोब्बत है दिवानगी की हद तक - May 28, 2021
- Kaleidoscope- लव्ह ऍक्चुअली - April 29, 2021
- Kaleidoscope- दिल तो आखिर दिल है ना - April 14, 2021
👍👍👍
Farach sunder
एकच नंबर प्राजक्ता 👌🏻👌🏻
thanks
👌👌
APATIM
Great
खूप सुंदर👌👌 पाणी आले डोळ्यात
thanks
अप्रतीम व ह्रदय स्पर्शी ..
thanks
छान आहे.
Khup chan
Sundar👌👌
sundar
Khoop chhan Katha.
👍👍
apratim….