ती आणि मी…
शाळेत असल्यापासून आमची तशी खुन्नस. ती तिच्या कंपूत आणि मी माझ्या गँग मध्ये. तिचं तोंड बघितलं तरी माझी सणकायची. तरीही ती काही ना काही बहाणे करून संपर्कात यायची. मी तिला टाळायचा प्रयत्न केला तरी कधीतरी ती अशक्य अश्या प्रसंगात भेटून संगतीला असायची!
शाळा संपल्यावर संबंध संपला. ती तिच्या मार्गाने आणि मी माझ्या. तिचे फॅन्स तिची आठवण काढत. एखाद्या ट्रीपला रात्री दोन वाजता चार पेग पोटात गेल्यावर त्यांच्या तोंडून तिचं वर्णन, तिचे बारकावे ऐकताना आपल्या हे कधीच लक्षात नाही आले हे जाणवून कुतूहल वाढायच. मग तिचा मुजोर चेहरा समोर यायचा आणि आपला निर्णय योग्य होता हे जाणवायचं! आता तिचा संबंध असाच एखादया ट्रिपच्या रात्रीपुरता उरला होता!
मग फेसबुकचा जमाना आला. नव्याची नवलाई संपल्यावर सगळेच अनेक वर्षांपूर्वीची ती आता काय करते हे हळूच शोधू लागले. मग त्यातून शाळेचा, कॉलेजचा असे मेसेंजर, फेसबुक आणि व्हाट्सअप्प ग्रुप निर्माण झाले. कुणी हळूच पर्सनल मेसेज मधून सलगी वाढवून पूर्वी हुकलेला चांस आता मारू लागले. मला सहज एकदा फेसबुकवरील एका समूहात ती दिसली. ती अजूनही तशीच होती. डोक्यात जाणारी. आता तर खूप बालिश दिसत होती. मी मनावर संयम ठेऊन तिला पूर्ण इग्नोर मारला. पण तिने मला पाहिले होते बहुतेक!
मग हळू हळू ती क्वचित मेसेज मधून हाय हॅलो करू लागली. मी सभासद असलेल्या अनेक समूहात ती दिसू लागली. तिच्या बालिश, बिनडोक, अस्ताव्यस्त रूपाचे अनेक फॅन्स असलेले पाहून मलाच आश्चर्य वाटू लागले! ती कुठल्याही अवतारात फेसबुकवर आली तरी तिला मिळणाऱ्या लाईक्स आणि कॉमेंट बघून तिच्या फॅन्सच्या भाबडेपणावर हसावे की आपण भाबडे का नाही म्ह्णून वाईट वाटून घ्यावे ह्या संभ्रमात मी पडत होतो!
ती अक्षरशः कोणत्याही अवतारात फेसबुकवर अवतरायची! कधी लहान मुलीच्या वेशात, कधी आईच्या वेशात, कधी सेक्सी बाईच्या वेशात, कधी पोक्त ताईच्या वेशात, कधी हुशार विचारवंतिणीच्या वेशात! पण हे सर्व मुखवटे असत. मूळ चेहरा हास्यास्पद आणि डोक्यात जाणाराच होता!
असेच दिवस जात होते. मग तिचे पुस्तक येत असल्याची घोषणा झाली. मग पाहिले पुस्तक आल्यावर एका मागे एक अशी तिची अनेक पुस्तक येत गेली. बहुतांश पुस्तकांची फार विक्री न झाल्याने ती भेट स्वरूपात वाटली गेली!
मग ती माझ्या जास्तच संपर्कात आली. नको असतानाही मला उगाच तिचं आकर्षण वाटू लागलं. आमच्या क्वचित भेटी होऊ लागल्या. मी स्वतःला समजावत होतो. पण मनावर तिचं गारुड झालं होतं. हा आपला मार्ग नाही, इथे पुढे गेल्यास दरी आहे हे कळत होतं पण वळत नव्हतं. अश्याच एका भेटीत मी तिचा हात हातात घेतला. मला अजूनही आठवतंय आम्ही दोघे आमच्या मारिन ड्राईव्हवर बसलो होतो. एक सुंदर संध्याकाळ होती ती!
मग आमच्या भेटी वाढत गेल्या. मी तिच्यावर हक्काने चांस मारत होतो. पण अजून चारचौघात आमचं नात जाहीर करायची हिम्मत झाली नव्हती. मग पुढे आम्ही क्वचित फेसबुकवर एकत्र सर्वांसमोर आलो. तिला लाज नव्हतीच. पण मी लाजेखातर अश्या पोस्ट लगेच डिलीट केल्या.
मग तो दिवस आला. मी घरी एकटा होतो. लिहायला काही सुचत नव्हतं. एकटेपणा मन पोखरत होता. इतक्यात ती सरळ घरीच आली. मला खेटून बसली. माझ्या मनावरचा ताबा सुटत गेला. मी एक पाऊल पुढे गेलो. तिला जवळ ओढली. ती सराईतपणे मिठीत आली. मग मात्र नको ते झालं! ती नको नको म्हणत होती पण मला थांबण अशक्य होतं! पुढील अर्धा तास माझा माझ्यावर ताबा नव्हता! तिच्या अस्तित्वाने माझ्या मनात, शरीरात, मेंदूत पेटवलेला वणवा शाईचे काही थेंब कागदावर स्त्रावल्यावरच विझला! मी तिच्यावर बलात्कार केला होता!!!! माझं ते रूप बघून माझ्याच मनात खूप अपराधीपणा निर्माण झाला. मी तिची माफी मागितली! पण ती शांत होती! ती म्हणाली “अरे काळजी करू नको. मला हे नवीन नाही. हल्ली सोशल मीडियावर माझ्यावर बलात्कार होणं सवयीचं झालं आहे! तू निदान माफी तरी मागितलीस. अनेकजण ह्या बलात्कारालाच शृंगार समजून क्रिएटिव्ह ऑरगॅजम अनुभवतात!”
डोळ्यात अश्रू घेऊन ती पाडगावकर, कुसुमाग्रज, ग्रेस, शांता शेळके, मर्ढेकर ह्या तिच्या सुपुत्र आणि सुपुत्रीचे स्मरण करत निघून गेली! कवितेची आणि माझी शाळेपासूनची खुन्नस आजही तशीच असल्याची मला जाणीव झाली! फक्त आता मला तिची दया पण येत होती!- मंदार जोग
Image by aliceabc0 from Pixabay
- व्हॅलेंटाईन डे- सर्व भाग (१ ते ६) एकत्र - February 18, 2024
- वारसा (भाग ७) - November 27, 2023
- वारसा (भाग ६) - October 30, 2023
baap re!!