गजरा…
तिची बाजू- पहिल्यांदा तो आला तेव्हा डोळे तांबारलेले होते, माझ्या हातात गजरा ठेवला अन शांत कोपऱ्यात बसून राहिला.मी पाणी दारू विचारलं, काहीच नको म्हणाला. मग मी पण गप्प बसून राहिले. गजऱ्याचा घमघमाट सुटला, मला छान वाटलं.पुढच्या वेळी पण तेच,आला , गजरा हातात ठेवला नि काहीच करायला तयार नाही मग मी न राहवून म्हंटल
“न्हाई म्हंनजे, तुमचे पैशे वाया जातात”
त्यावर उत्तरला
“पैसे कागदी असतात, माणसाचं मन नाही.इथं तुमचे डोळे वाचायला येतो. बाकी काहीही करण्यात इंटरेस्ट नाही मला”
“अन मग हा गजरा कशासाठी?” मी विचारलं
“तुमचा ठेका जी घेते तिने सांगितलं तुम्हाला आवडतो गजरा.तिचा सांगण्याचा उद्देश वेगळा होता, पण तुम्हाला फक्त आनंद वाटावा म्हणून घेऊन येतो मी गजरा”
माझ्या मनात गजऱ्याचा दरवळ नि विचारांचं वादळ. त्याच्या मनात काय हे त्याचं त्यालाच माहीत.
मी विचारात पडते. अजीब मानुस आहे!! माझे डोळे वाचायला येतो म्हनजे??? पण तो गजरा घेऊन येतो हे मला खरंच भारी वाटतं. लहानपणी आमचे नाना आमच्या मायसाठी, आम्हा बहिणींसाठी गजरे आणायचे.मला माझं बालपण आठवतं , कधीकाळी मी चार बायांसारखी नेहमीचं आयुष्य जगत होते ते आठवतं.तेवढंच मनात गार वाटतं.
पन हा मानुस वेगळाच आहे नाहीतर वेश्येला शिव्या देण्याऐवजी गजरा दिलाय अन तिचे डोळे वाचलेत असं ऐकलय का कधी?
त्याची बाजू- नवीन लग्न झालं होतं, माझ्या बायकोला गजरा खूप आवडायचा.एके संध्याकाळी तिला गजरा घेतला, आणि लॉंग ड्राइव्हला गेलो.माझ्या चुकीमुळे एकसिडेंट झाला नि मी माझ्या बायकोला गमावून बसलो. काही महिने गेले.माझी आयुष्यातली जगण्याची गम्मत केव्हाच निघून गेली होती. एके दिवशी मित्रांच्या फोर्स करण्याने मित्रांबरोबर बुधवार पेठेत गेलो. एक बाई मला असाईन करण्यात आली.तिच्या डोळ्यात पाहिलं नि वाटलं नको काहीच नको करायला.आमच्या महाराजांची शिकवण आठवली
‘परस्त्री, माते भगिनिसमान’
तिला गजरा दिला, गजऱ्याचा दरवळ पूर्ण खोलीभर पसरला.त्या दरवळाच्या वासाने माझी बायको मला भेटायला आल्याचा भास झाला.
अजूनही मी अधूनमधून तिथे जातो.ती गजऱ्याच्या दरवळात काय शोधते माहीत नाही..मी माझी बायको शोधतो.
Image by andreas N from Pixabay
- सासूबाई will you be my valentine?- भाग्यश्री भोसेकर - February 23, 2020
- तुमचं आमचं प्रत्येक वेळी सेम नसत- भाग्यश्री भोसेकर - February 20, 2020
- गोष्टी लेखकांच्या –गौरी शिंदे - November 13, 2019
……………
प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार 😃
आधीही हा दरवळ वाचून निःशब्द झालेलो आताही काही जास्त बोलवत नाही. 🙏
speechless…