मृदगंध….
हा हा म्हणता तो कोसळायलादेखील लागला.मग माझं मनदेखील आवरता आवरेना. एक एक टपोरे थेंब तहानलेल्या धरतीवर कोसळू लागले आणि मग मृदगंधाचा दरवळ मला शांत बसू देईना. खिडक्या उघडून पाऊस अंगावर घ्यायचा प्रयत्न केला पण मन नाही भरलं. मग गेलेच गच्चीत, झोकून दिलं स्वतःला पावसाच्या कुशीत. अनेक खिडकीतल्या नजरा माझ्या पाठीवर खिळून असल्याचं मला समजलं…प्रत्येकाचा आपापला पाऊस.
लहानपणी होड्या करून सोडायचो पण त्याआधी पावसात मनोसोक्त भिजण्याचा, क्वचित गारा गोळा करण्याचा कार्यक्रम असायचा. अनुप आणि मी पावसात सायकल कोण जोरात चालवत याची स्पर्धा लावायचो..मी जिंकले की म्हणायचा-
“जाड असूनही फास्ट चालवतेस गं सायकल” मी हसायचे कसंनुस..पुढे आम्ही 9वि दहावीत गेलो की मला म्हणायचा
“मला तुझ्यासारखी सावळी गर्लफ्रेंड नकोय”
“हा कलर आताची फॅशन आहे” मी फणकारून म्हणायचे..की समजवायचे स्वतःलाच!!?? पण अनुपमुळे मला माझ्या शरीराबद्दल वाटणारी लाज, माझ्या दिसण्याबद्दल,माझ्या रंगाबद्दल असलेला न्यूनगंड संपला. मी स्वतःवर मनापासून प्रेम करायला लागले. काही दिवसांपूर्वी बऱ्याच वर्षांनी मी आणि अनुप भेटलो, तो आश्चर्याने पहात होता माझ्याकडे आणि न राहवून म्हणाला
“आता तू छान दिसायला लागलीस गं, पूर्वीसारखी राहिली नाहीस” त्याच्या नजरेत मला असूया,मत्सर,लालसा सगळं एकाच वेळी दिसलं
मी उत्तरले “तू मात्र अजूनही तसाच आहेस” यावेळी तो कसंनुस हसला.
अहाहा मातीचा वास मी पुन्हा स्वतःत भरून घेतला. अशा वेळी हमीद आठवणार नाही असं होणारच नाही. प्रेम होतं आमचं एकमेकांवर..खूप बीप नाही पण होतं.. जे काही होतं ते मनापासून होतं. हमीदला मी मातीच्या वासासारखी वाटायचे , म्हणायचा
“बहुत नायाब और साफ हो तुम. इस मिट्टी की खुशबू की तरह..खुदा की तरह”..माझ्या गुण दोषांसकट माझ्यावर प्रेम करायचा तो. आहे तशी सामावून घ्यायचा.पण कुठेतरी कुणकुण होती आणि भीती खरी ठरली.
“अपने ही स्वीकार नही करेंगे, धरम की बात तो बाद मे आती है”.चुकीचं बोलत नव्हताच तो. आम्ही ठरवलं तिथेच थांबायचं, काही प्रवासांची लांबी ठरलेली असते.. उंची आणि खोली ती त्या प्रवासातील माणसं ठरवतात.
हमीदच्या विचाराने मी गच्चीत एका कोपऱ्यात डोळे मिटून बसून घेते. माझ्या साडीचा पदर वाऱ्यावर फडफडत राहतो. बाहेर पावसाने थैमान घातलं असलं तरी मला आत शांत वाटतं. मी सयीच्या सरींना कोसळू देते स्वतःमध्ये.मग मला आठवतो तो लंडनमधल्या लायब्ररितील पाऊस.
तो दिवस खूप छान होता.मी माझ्या कोर्सच्या अभ्यासक्रमातील काही रेफरन्स शोधायला लायब्ररीत गेले होते, पाऊस पडत होता (तिकडे पाऊस कोसळत नाही) आणि स्मिथ आला. आम्ही पहिल्या काही भेटीत मुळीच बोललो नाही, पण लायब्ररीत येणाऱ्या नेहमीच्या चेहऱ्यांपैकी स्मिथ होता.मग ओळख झाली,बोलू लागलो.मग आम्हाला समजलं की आमच्या सुखाच्या व्याख्या सेम आहेत.
‘बाहेर पाऊस, एखादं गुंतवून ठेवणारं पुस्तक, छानसं संगीत, आणि कॉफीचा एक मग’ . आवडीनिवडी जुळल्या मग मनंही जुळली.स्मिथ माझा खूप छान मित्र आहे, सोलमेट् आहे. त्याने माझ्याकडे केवळ बाई या नजरेने कधीच पाहिलं नाही.माझ्या आयुष्यातील पहिला असा पुरुष ज्याने मला हक्क न दाखवता हक्काने मैत्री दिली. एकदा तो म्हणाला
“प्रेमातील सर्वात झूठ वाक्य कोणतं माहितीय?”
मी नकारार्थी मान हलवली
“मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही” स्मिथ उत्तरला आणि आम्ही दोघे मनापासून हसलो.मी त्याला त्याच्या भूतकाळाबद्दल किंवा त्याने मला माझ्या भूतकाळाबद्दल कधीही विचारलं नाही.आमच्यातील अलिखित करार होता तो. नंतर तो एकदा म्हणाला.
“मी तुझ्याकडे त्या नजरेने पाहत नाही ..माहितीय ना तुला?”
“मी पण स्वतःकडे आणि तुझ्याकडे त्या नजरेने पाहत नाही” मी उत्तरले.पुन्हा एकदा आम्ही मनापासून,मनमोकळं हसलो. आमच्या अशा अनेक हास्यमैफिली पाहिल्या आहेत या पावसाने, लंडनच्या मातीच्या वासाने.
माझा कोर्स संपला, निघण्याच्या आदल्या दिवशी स्मिथला भेटायला गेले.आम्ही कडाडून भेटलो एकमेकांना.बाय केलं तेव्हा पुन्हा पाऊस कोसळतच होता. मी लंडनच्या मातीतुन माझ्या मातीचा वास घेण्याकरता निघाले होते.
मी भारतात परतले,माझं काम पुन्हा नव्या जोमाने सुरू केलं. या सगळ्यात कधीही लग्न करावसं वाटलं नाही. स्मिथ म्हणतो तसं ती वाक्य फार खोटी असतात आणि दो जिस्म एक जान वगैरे संकल्पनेवर माझाही विश्वास नव्हता कधी.
किती नि काय काय आठवांचा पाऊस. आता बाहेरचा पाऊस थांबलेला असतो,माझ्या मनातील पाऊस ओसरत असतो. मी चिंब भिजते, मी निघते.समोरच्या खिडकीतील काही पुरुषी नजरा पुन्हा सटपटतात, त्यांना त्यांच्या बायकांची कांदा भजिचा आस्वाद घेण्यासाठी हाक आलेली असावी. मी माझ्या घरात येते.केस पुसून,कपडे बदलून माझ्या आवडीचं पुस्तक उघडते. मातीचा वास अजूनही माझ्या अंतरंगात दरवळत असतो.
‘पाऊस, मृदगंध आणि माझ्या आयुष्यातील पुरुष’ अशा नावाचं पुस्तक लिहावं की काय असा गंमतीशीर विचार मनात येऊन मी स्वतःशीच हसते😊
Image by andreas N from Pixabay
- सासूबाई will you be my valentine?- भाग्यश्री भोसेकर - February 23, 2020
- तुमचं आमचं प्रत्येक वेळी सेम नसत- भाग्यश्री भोसेकर - February 20, 2020
- गोष्टी लेखकांच्या –गौरी शिंदे - November 13, 2019
सुंदर.. मीच मला आठवले!!!
किती सुंदर प्रतिक्रिया 😃
छानच, टिपीकल नात्याच्या पलीकडली नाती…
कमाल. प्रत्येक नात्यांची लांबी ठरलेली असते. काय वाक्य आहे हे. 👍