मसाल्याचा डबा

त्यांच्या कोर्सच्या शेवटच्या वर्षी एक खूप इंटरेस्टिंग असाईन्मेंट त्या सगळ्या विद्यार्थ्यांना देण्यात आली होती. आपल राज्य सोडून इतर राज्य निवडायचं, तिथे जाऊन तिथल्या पद्धतीचा स्वयंपाक शिकायचा आणि प्रत्येक राज्यातला एक एक मसाला वापरून एक संपूर्ण नवीन पदार्थ बनवायचा.या असाईन्मेंटमध्ये चक्क स्पर्धा होती आणि जिंकणाऱ्या विद्यार्थ्याला हॉटेल ताज मध्ये काम करण्याची संधी होती.

तिला ह्या असाईन्मेंटची कल्पना खूपच आवडली.रंगीतसंगीत वाटली.म्हणजे प्रत्येक राज्यात त्यांच्या पद्धतीचा स्वयंपाक शिकण भारीच होत पण या निमित्ताने ती प्रत्येकवेळी नवीन खाद्य संस्कृतीला जोडली जाणार होती.जिंकण वगैरे नंतरची बात.तिला स्वयंपाक करण म्हणजे कला वाटायची.ते काही काम नव्हत तिच्यासाठी. तिचं स्वप्न होत छोट्याश्या शहरात छोटस स्वयंपाकघर तिच्या मालकीचं..हॉटेल नव्हे.. बॅकग्राऊंडला उत्तम संगीत असावं,  पूर्ण स्वयंपाकघरात मसाल्याचा दरवळ, हातात उत्तम प्रकारची वाईन आणि स्वयंपाकातून वाढला जाणारा आनंद.तिच्यासाठी हे म्हणजेच जगणं होत.

ती 6 महिने वेगवेगळ्या राज्यात राहिली.यातल्या प्रत्येकाकडून ती काही ना काही शिकली.

“खाना खजाना इन्सांन को इन्सांन से जोडती है और ये रास्ता प्यार से जोडना चाहिए” तिला पंजाबमधील खानपान शिकवणारी तिची शेफ म्हणायची.

चव घ्यायला लागलं तर हातावर फटके मारणारा आसाममधील शेफ तिला आठवायचा.त्याच्या मते फक्त वास घेऊन पदार्थ कसा झाला हे ओळखता आल तर ती व्यक्ती खरी शेफ.

केरळातील शेफ स्वयंपाक सुरु करण्याआधी मसाल्याच्या डब्याला मनोभावे नमस्कार करायचा. डोळे मिटून केवळ स्पर्शाने तो मसाले ओळखायचा. तो स्वयंपाक करायला लागला की एखादा चित्रकार सुंदर चित्र काढतो आहे किवा एखादा संगीतातील आवड असणारा माणूस पियानोवर सुंदर धून वाजवतो आहे असं तिला वाटे.

बंगालमध्ये ती एक प्रकारचा मासा शिकताना , मसाल्याचा दरवळ नाकात भरुन घेतांना शेफच्या चेहऱ्यावरचे आनंदी भाव आणि त्याची लागलेली समाधी …खाण किती एन्जॉय करता येऊ शकत हे पुन्हा एकदा शिकवून गेलं.

आज तो दिवस होता. आपण जे काही शिकलो, ज्या ज्या राज्यात गेलो तिथले एकेक मसाले वापरून, ज्ञान पणाला लावून आज एक पदार्थ बनवायचा होता. आता तिच्या मसाल्याच्या डब्यात आसामची भूत जलोखिया मिरचीची पावडर, पंजाबमधील धणे जिरे पावडर, लखनौ यूपी मधील आमचूर पावडर, आंध्रातील गुंटूर मिरच्यांची पावडर असे एक न अनेक हरतऱ्हेचे मसाले होते. तिने या सगळ्या मसाल्यांचा वापर करून एक रेसिपी मनात योजून ठेवली होती.एकेक मसाले कढईत पडत होते आणि त्यासरशी मसाल्यांचा दरवळ सगळीकडे पसरत होता. ती चव न घेता केवळ दरवळ नाकात भरुन घेउन आपल्या कलेची आराधना करत होती.हे सगळं करताना तिच्या एकेक गुरूंचा चेहरा तिच्या डोळ्यासमोरून सरकत होता,  ते जणू तिला मार्गदर्शन करत होते.

त्या असाईन्मेंटमध्ये ही जिंकली की नाही माहीत नाही पण तिने जेवणासोबत प्रेम आणि आनंद वाढणारं स्वयंपाकघराचं सप्न पूर्ण केलं. आता या क्षेत्रात तिचा बराच बोलबाला आहे, तिच्या नावाला वजन आहे.नुकत्याच तिला मिळालेल्या पुरस्कार सोहळ्यात तिने आपल्या या यशाचं श्रेय मसाल्याच्या डब्याला दिलं.कारण अजूनही जेव्हा जेव्हा ती हा डबा उघडते तेव्हा तेव्हा वेगवेगळ्या खाद्य संस्कृतींचा दरवळ तिला तिच्या कामाची, कर्तव्याची , आनंदाची जाणीव करून देत असतो.

Image by andreas N from Pixabay 

Bhagyashree Bhosekar

Bhagyashree Bhosekar

मुळची महाराष्टात जन्म घेऊन इथेच वाढलेली भाग्यश्री सध्या बंगलोर मध्ये आयटी क्षेत्रात नोकरी करते आणि विविध माध्यमात लिखाण पण करते. मराठी लेखनामुळे तिची मराठी मातीशी असलेली नाळ तुटलेली नाही. लिखाणातून तिचा मराठी भाषेशी जोडलेली राहण्याचा प्रयत्न असतो. भाग्यश्रीला लघु कथा, दीर्घकथा लिहायला विशेष आवडतात. आत्तापर्यंत तिने दोन shortfilms साठी पटकथा लिहिली आहे. शिवाय 2017 साली तिचं बॉम्बे बिट्स नावाचं मराठी पुस्तक प्रकाशित झालं आहे. याव्यतिरिक्त अवांतर वाचन हा तिचा छंद आहे.

One thought on “मसाल्याचा डबा

  • July 28, 2019 at 12:11 pm
    Permalink

    हे खूप खास आहे. आम्ही पण जिथे जिथे फिरायला जातो तिथे तिथे जमेल तसं मी विचारत असतो तिथल्या शेफ ना त्या त्या पदार्थाबद्दल.

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!