भेटी लागे जीवा
आमच्या कोल्हापूरच्या दगडी वाड्यात, मुख्य दरवाज्यापाशी काळ्या कभिन्न पाषाणात कोरलेली विठ्ठल रखुमाईची मोठी मूर्ती आहे.मोठी म्हणजे हातभर उंचीची. वाड्याबाहेर विस्तिर्ण परिसर. मुख्य दरवाज्याबाहेरच सोनचाफ्याचा बुंधा, त्याच्या बाजूला गुलाब आणि त्याच्याही पलीकडे खुललेला निशिगंध, थोडंसं पुढे चालत गेलं की केळीची एकदोन झाड आणि गेटजवळ रातराणी. आमच्या दादांना (आमचे वडील) विठ्ठलाची भक्ती करण्याची खूप आवड.त्यामुळे मुख्य दरवाजातच नव्हे तर देवघरात, मागच्या अंगणात
तुळशीवृंदावनाजवळ सगळीकडे विठुराया विसावलेले. आता विठुराया म्हंटल की दादा आले तसेच ज्ञानु काका पण आलेच की.
ज्ञानु काका म्हणजे आमच्या घरातलं पुंडलिकाचे रूप. ते विठ्ठलाचे परमभक्त .आमचे ज्ञानु काका
बाहेरच्या ,आतल्या विठुरायाची भारी बडदास्त ठेवायचे. मुर्तिजवळ, तसबीरी जवळ कायम धूप,उद याचा दरवळ असायचा, निशिगंधाची ताजी फुलं असायची, तुळशीची माळ आणि एक नंदादीप सतत तेवत असायचा.बागेची काळजी तर काकांना एवढी की एखादा दिवस काका मूडमध्ये नसले की समजून जायचं बागेतला गुलाब कोमेजला असावा किंवा केळीने मान टाकली असावी.ज्ञानु काकांच सगळीकडे लक्ष.घरातली डाळ संपली, माळ्यावर उंदीर झाले, किंवा एखाद्या खोलीतला फॅन दुरुस्तीला आला की एकच हाक द्यायची की ज्ञानु काका हजर. पण बाकी त्यांच्या सकाळच्या पूजेत आणि संध्याकाळच्या आरतीत व्यत्यय नको. कोणी तसं केलंच तर करवादायचे म्हणायचे “बसू द्या रे २ घटका मला माझ्या विठ्ठलापाशी”. काका फार शिस्तीचे.सकाळी ४ ला उठायचे. फेरफटका मारून यायचे कधी आमच्या शेतावर, कधी गावात.मग मागच्या विहिरीच्या पाण्याने अंघोळ. मग बागेत जाऊन फुलं गोळा करायचा कार्यक्रम, तुळशीची ताजी माळ बनवण्याचा कार्यक्रम.मग कानडा राजाची काकडआरती, साग्रसंगीत पूजा. अहा हा सगळीकडे चंदनाचा परिमळ, फुलांचा, धुपाचा दरवळ सुटायचा.आम्ही मुलं कोणी काकडआरतीला हजर असू तर ज्ञानु काकांची शाबासकी आणि खास प्रसाद ठरलेला.मग ते दिवसभर बाकीची काम, शेतातली काम करायचे आणि रात्री ठरलेल्या वेळेला शेजारती, प्रसाद वाटप आणि मग रात्रीची जेवणं.आमचे दादा ज्ञानु काकांपेक्षा वयाने मोठे असले तरी पूजा, काकडआरतीचा मान काकांचाच होता.फार तर कधी कधी शेजारती दादा करायचे, म्हणायचे
“ज्ञानाने पूजा केली नाही की विठ्ठल हुप्प करून बसतो. त्याने काकड आरती केली नाही तर विठ्ठलाला जाग येत नाही” .एकादशीचा उपवास सोडायचा म्हंटल की ज्ञानु काकांनी स्वतःच्या हाताने केलेला लुसलुशीत शिरा केळीच्या पानावर वाढायचा तर आणि तरच उपास सुटला असं वाटायचं.मला लहानपणी ज्ञानु काकांनी शिरा वाढला की मागे विठ्ठल गोडस हसतो आहे असा भास होई.खरच!! शप्पथ हो!! या सगळ्या गोष्टींमागे कारणही तसंच होत.आमचे दादा आणि आई त्यांचं लग्न झाल्यावर विठ्ठलाच्या वारीला गेले होते.याबाबत गमतीशीर आठवण अशी की आई म्हणते
“आमच्या काळी नव्हत ते हनिमून बिनिमुन, वारीला गेलो तोच आमचा हनिमून” तर झालं असं आई दादा वारीला गेले होते तेव्हा त्यांना तिथे ज्ञानु काका भेटले.त्यावेळी काकांचं वय 20-21 वर्षे असावं.त्यांची दादांची गट्टी जमली.काकांची आणि आईची तर खास दोस्तीच झाली, दादांना कोणीतरी घरी, व्यवसायात, शेतीत हातभार लावणार हवच होत.ज्ञानु काका त्यांना कुटुंब, फारसे नातेवाईक नसल्याने तयारही झाले आणि ते विठ्ठलभक्त म्हणून दादांना खूप भावले.तर अशा पद्धतीने ज्ञानु काका कोल्हापुरात आले आणि आमची शेतीची, घराची काम ते पाहू लागले.त्यांची फक्त एकच अट होती ती म्हणजे आषाढी यात्रेत ते दरवर्षी सहभाग घेणार, त्या काळात घर, संसार शेती मुळीच नाही.आमच्या दादांना काय तेच हव होत मग दोघे मिळून हरसाल वारीला जायचे.
तर ज्ञानु काका आमच्याकडे रुळले.आम्हा मुलांसाठी ते आमचे सख्खे काकाच. मला म्हणायचे
“मुक्ताई (माझ नाव मुक्ता असूनही ते मला कायम मुक्ताई म्हणत असत) ऐकलं का? ज्ञानोबातुकोबाची ज्ञानाची गाथा आपल्याला पुढे चालवायची आहे.खूप खूप शिका, वाचन करा,शिक्षणाचा उपयोग करा”.ते आम्हाला रामायण, महाभारत, विठ्ठलाच्या अनेक कथा सांगायचे.अभंग, कबिराचे दोहे शिकवायचे.त्यांनी लग्न केलं नाही कधी.लग्नाचा विषय काढला की विषयाला फाटे फोडायचे.आई त्यांना भाऊ मानायची दर राखी पौर्णिमेला राखी बांधायची, मग आईला फार वाटे ज्ञानु काकांचं लग्न व्हावं, आईला त्यांची चेष्टा
करण्याची लहर आली की ती मला म्हणायची
“जा ज्ञानु भाऊंना म्हण की आम्हाला काकी कधी आणणार म्हणून” .पुढे त्यांना काशी यात्रेला जाण्याच्या वेडाने झपाटल होत मग अबीर दादाने (माझा मोठा भाऊ)
‘ विमानाची तिकीट करून देतो, वेळ वाचेल तुमचा’ म्हंटल्यावर ज्ञानु काका म्हणाले
‘नको हो, आमच्या मते विमान एकच पुष्पक विमान आणि त्याचा मान मला नको” शेवटी हट्टाला पेटून ट्रेनने गेले.तिकडून फोन करून दर्शन छान झाल्याचं आधी अबीर दादाला सांगितलं. पुढे अबीर दादा आणि वहिनीला मुलगी झाली तेव्हा आईने ज्ञानु काकांना विचारलं
“ज्ञानु भाऊ, काय नाव ठेवायचं तुमच्या नातीच?”
काका उत्तरले
“मीरा ठेवा” त्यांना संत मीराबाईंची भजन तोंडपाठ होती.
मागच्या वर्षी दादांना काही कारणामुळे ज्ञानु काकांसोबत वारीला जायला जमल नाही आणि दर्शन घेऊन परतताना ज्ञानु काकांना हृदयविकाराचा झटका आला नि ते कोसळले. शरीर आणि आत्म्या सकट वारीला गेले नि परत आले ते फक्त शरीर घेऊन.समाधान एकच की त्यांना हव होत तसच मरण आल.त्यांचं शरीर त्यांच्या इच्छेप्रमाणे त्यांच्या विठुरायासमोर निशिगंधा च्या फुलांमध्ये, तुळशीची माळ घालून ठेवल होत.तोच चेहरा, गळ्यात नेहमीची रुद्राक्षाची माळ, तेच समाधानी भाव,तेच स्मितहास्य पण त्या दिवशीचा चंदन, धूप, निशिगंधाचा दरवळ मात्र वेगळा होता.त्या दिवशी विठ्ठल खरच हूप्प करून बसला आहे असं वाटतं होत पण ज्ञानु काका मात्र हसत हसत ‘ भेटी लागी जीवा ‘ गात गात वैकुंठवासी झाले.त्या दिवशी आई आणि दादांना पहिल्यांदा एवढं रडताना पाहिले मी.
आताशा दादा रोज विठ्ठलाची पूजा, आरती करतात,अबीर दादा रोज तुळशीची माळ करतो, आई एकादशीला शिऱ्याचा नैविद्य बनवते , पाणावलेल्या डोळ्यांनी त्याच केळीच्या पानावर तो नैविद्य वाढते , वहिनी बागेची खूप काळजी घेते, मीरा रोज विठुरायाला निशिगंध वाहते, मी रोज धूप लावते पण …..
पण या सगळ्यात विठ्ठल पूर्वीसारखा हसत नाही.
Image by andreas N from Pixabay
- सासूबाई will you be my valentine?- भाग्यश्री भोसेकर - February 23, 2020
- तुमचं आमचं प्रत्येक वेळी सेम नसत- भाग्यश्री भोसेकर - February 20, 2020
- गोष्टी लेखकांच्या –गौरी शिंदे - November 13, 2019
सुंदर व्यक्तिचित्र
खूप आभार आपलं😊
Sundar katha👌👌👌
Aabhar 😀
मला दिसले ज्ञानू काका. 🙏
👌