स्वप्न…
“सदाशिव विश्वनाथ ब्रह्मांडकर” या भरभक्कम नावाखेरीज सदाकडे भरभक्कम असे काहीही नव्हतं. पाच फूटांच्या आतबाहेरची खुरटी उंची, त्याला साजेशी फाटकी देहयष्टी, गव्हाळ वर्ण आणि एकंदरीतच सामान्य व्यक्तिमत्व! देवकृपेने एका अतिशय बिनमहत्त्वाच्या खात्यात लागलेली निमसरकारी नोकरी मात्र होती. तिच्याच जिवावर लग्न होऊन सदा “मार्गी” लागला होता.
अनेकांना हेवा वाटावा अशी एक गोष्ट मात्र सदाकडे अवश्य होती. हा प्राणी कायम आनंदी असायचा. परिस्थितीचे चटके सतत बसत असताना हा माणूस कायम आनंदी कसा राहू शकतो, याचे त्याच्या बायकोसकट सगळ्यांनाच आश्चर्य वाटायचं.
सगळ्या जगापासून लपवलेलं एक गुपित सदाकडे होतं, ज्याच्या जिवावर तो कायम आनंदी राहू शकायचा, त्याचं ‘स्वप्न’. जागेपणी आणि झोपताना देखील तो रोज ते एकच स्वप्न पाहायचा. स्वप्न अगदी सरळ साधं होतं. ” सदाला सुपरलोटोची दहा कोटींची लॉटरी लागते. टॅक्स कापून सदाच्या हातात सात कोटी मिळतात. एक कोटीचं घर, दोन कोटींची फिक्स डिपॉसिट करून, बाकीचा पैसा सदा शेअर्स मधे गुंतवतो. ते पैसे सहा महिन्यात दुप्पट होतात. त्यातले अर्धे तो परत चित्रपट निर्मितीत घालतो, जे एका वर्षात दहापट होतात. पुढील आयुष्यात सदाला पैश्यांची कधीच चिंता करावी लागत नाही.”
येणार्या सोनेरी भविष्यकाळाचे हे सुंदर स्वप्न, सदाला कायम अमृत प्राशन केल्यासारखे आनंदी ठेवत असे. ह्या स्वप्नाला सत्याशी बांधणारा एकमेव धागा म्हणजे त्याचं दर आठवड्याला दहा रुपयाचं एक सुपरलोटोचं तिकीट घेणं. स्वतःवर सदा आठवड्यात फक्त तेवढाच खर्च करत असे.
आणि एकेदिवशी सदावर देव प्रसन्न झाला. सदाला चक्क बारा कोटींची लॉटरी लागली. एखाद्या वादळात सापडल्यासारखी सदाची अवस्था झाली. महिन्याभरात पैसे हातातसुद्धा आले आणि घरच्यांच्या आनंदाला तर पारावारच उरला नाही. सल्लागार आणि आशाळभूत अशा लांबच्या नातलगांना कटवता कटवता सगळ्यांची पुरेवाट झाली. आयुष्यात कधी पूर्ण होऊ शकणार नाहीत असं वाटणार्या सामान्य इच्छा पूर्ण करून घ्यायला सगळेच धडपडू लागले, फक्त सदा सोडून !
इतकी वर्ष कायम आनंदी असणारा सदा मात्र चिंतांनी झाकोळून गेला. नाही पैशांचा विनियोग कसा करायचा ही चिंता नव्हती.. त्या बाबतीत सदा अतिशय सावधपणे वागत होता. पण आता त्याच्याकडे पाहायला काही स्वप्नच उरलं नव्हतं ! आणि इतकी वर्ष ज्या स्वप्नाच्या जिवावर तो अखंड आनंदी असायचा ते स्वप्नच पूर्ण करून देवाने त्याचा एकमेव आधारच जणू हिराऊन घेतला होता.
उज्ज्वल आणि सुंदर भविष्यकाळाचे स्वप्न त्याला जगण्याचे बळ देत होत. पण आता आलेल्या पैशाच्या जपणुकीच्या काळजीशिवाय डोळ्यापुढे काहीच येत नव्हते. सदाची झोप उडाली, डोळ्याखाली काळी वर्तुळे तयार झाली, हसरा आणि आनंदी सदा, दुर्मुख आणि चिडचिडा झाला. तब्येतीच्या तक्रारी सुरू झाल्या.
घरचे काळजीत पडले, तपासण्या केल्या तर, रोग काहीच नाही. सरते शेवटी सायको ऍनलिस्ट डॉ.जोशींची मदत घ्यायचे ठरले. स्वतःच्या मनाविरुद्ध सदा डॉक्टरांना भेटायला गेला. का कोण जाणे, पण पहिल्याच भेटीत सदाचा डॉक्टरांवर विश्वास बसला. चार-पाच व्हिजीट्स नंतर, सदाने आपल्या स्वप्नाबद्दल आणि स्वप्नपूर्तीने झालेल्या समस्येबद्दल डॉक्टरांना सगळे काही सांगितले. भडाभडा बोलून मोकळं झाल्यावर सदाला जरा-जरा बरं वाटायला लागलं.
आठवडाभर सदाच्या समस्येवर विचार करून डॉक्टर जोशी सदाला म्हणाले, ” सदाशीवराव, तुमची समस्या एकाचवेळी गंभीर आणि सोपी आहे. मी असं म्हणतोय याचं कारण, या समस्येचा उपाय फक्त आणि फक्त तुमच्याजवळच आहे. अहो, एक स्वप्न पूर्ण झालं, म्हणजे स्वप्न पाहण्यावर बंदी तर येत नाही ना? नवीन स्वप्न शोधा, नाहीतर आहे त्याच स्वप्नाला जरा बदलून नव्याने पाहा. हे करायला तुम्हांला कोण बरं अडवणार आहे?”
हॅलोजनचा बल्ब अचानकपणे मेंदूत पेटावा तसा, सदाच्या डोक्यात प्रकाश पडला. तिथेच सदाचं नवीन स्वप्न सुरू झालं. “सदाला मिळालेले सगळे पैसे बुडतात, बॅन्केचं दिवाळं निघतं, शेअरबाजार साफ बुडतो. त्याचं नुकसान भरून काढायला नवीन घर विकायला लागतं. सदा पुन्हा जुन्या परिस्थितीत येतो आणि एक दिवस…
सदाला सुपरलोटोची दहा कोटींची लॉटरी लागते……..”
सदाचा आजार साफ पळाला !!!
Image by jacqueline macou from Pixabay
- मूळ पुरुष- भाग २/२ - March 5, 2020
- मूळ पुरुष- भाग १/२ - March 3, 2020
- करकोचा आणि कादंबरी- प्रशांत पटवर्धन. - February 16, 2020