Red dot- 1
पत्र क्रमांक 1
प्रिय मी,
स्वतःला या लढाईत ..हो लढाईच म्हणा ना असं झुंजवत ठेवणं कठीण काम होतं… ते मी केलं म्हणून पहिलं पत्र स्वतःलाच…
तर आजचा दिवसच बाप आहे!!! एकदम कडक!!.सकाळी सकाळी माझ्या जन्माचं सार्थक झालं…आईला समजलं तसं ती अत्यानंदाने वेडी झाली..आजी देवापुढे दिवा लावून ,साखर ठेवून ठेवून दमली…तिने सकाळपासुन तीन तीन वेळा माझी दृष्ट काढली ..हे कमी की काय म्हणून आईने माझ्या आवडीचा पाईनऍपल शिरा करायला घेतलाय..आईने सकाळी बाबांना फोन करून कळवलं तसं त्यांनी सोडलेला सुटकेचा निश्वास फोनवर न बोलताही मला सहज ऐकायला आला. गौतमला कळलं तसं मिश्किल हसला मला टपली मारली आणि म्हणे “आई मीना मावशीला कळवत होती कि गार्गीला एकदाचा कावळा शिवला म्हणे …खिक खिक…चला आता तुझ्यासाठी एक कावळासंशोधन अररर सॉरी वरसंशोधनाची तयारी सुरू…खिक खिक”
माझ्या मेंदूची शिर वळवळली. मी ताडकन उठले, तोंडावर पाण्याचा हबका मारला, कपडे बदलले, स्कुटीची चावी घेतली तसं आईने विचारलं “काय गं कुठे? आता चार दिवस आराम कर बेटा”
“रशम्याकडे जाऊन येते जरा… बरं वाटेल”
“काय गरज आहे? बस की जरा घरात, सतत पायाला भिंगरी लागलेलीच असते तुझ्या” इति मातोश्री.
मी निग्रहाने उंबरठ्याबाहेर पाऊल टाकलं.
“बरं आत्ताच हे सगळं कुठे बोलू नको…नजर नको लागायला कुणाची” आईचा केविलवाणा प्रयत्न.
मी स्कुटी घेऊन वेगात सोसायटी बाहेर पडले. नाक्यावर गेल्यावर एक आगाऊ विचार मनात आला. स्कुटी कडेला लावली.एका मेडीकलच्या दुकानात शिरले. ऐकू जाईल अशा आवाजात बोलले
“एक सॅनिटरी पॅडसचं पॅकेट द्या”
दुकानदार चमकला पण काही बोलला नाही. त्याने काळ्या प्लास्टिक बॅगेत पटकन काहीतरी गुंडाळून दिलं. मला हसायला आलं, मी पैसे टेकवले नि चालू पडले. स्कुटी पुन्हा सोसायटीच्या दिशेने वळवली.सोसायटीत शिरले, ती प्लॅस्टिकची काळी बॅग काढली आतलं पॅडसचं पॅकेट वेगळं काढून ती काळी प्लॅस्टिकची बॅग कचऱ्यात टाकून दिली आणि सॅनिटरी पॅडस मिरवत निघाले.
बागेतले बाकडे म्हणजे टेहाळणी बुरुजच तिथे पक्षीनिरीक्षक उर्फ हिरवळ संशोधक, आजची तरुणाई अर्थात उद्याचा उज्वल भारत, कालचे तरुण उर्फ आजचे रिटायर्ड समाजसेवक इत्यादी इत्यादी आपापल्या स्थानावर स्थानापन्न. मी लिफ्टमध्ये शिरले आणि काय हा योगायोग म्हणायचा!!!नामजोशी काकू होत्याच आणि त्यांच्या डोळ्यातले आश्चर्याचे भाव माझ्या नजरेतून सुटले नाहीत. बॅग्राऊंडला लिफ्टच्या म्युझिकचा आवाज…काकूंच्या नजरेत वाढलेली चाळवाचाळव…त्या काय विचार करत असतील हा विचार करून माझ्या चेहऱ्यावर उमटलेल छद्मी हास्य..माझा फ्लोर आला…मी बाहेर पडले..घराच्या दाराशी आले. बेल वाजवली , सॅनिटरी पॅडस नाचवत घरात शिरले.
“तू रश्मीकडे गेली होतीस ना?” आईच्या प्रश्नात प्रश्नार्थक भाव कमी आणि किती जणांनी हिला पाहिलं असं ही भीती जास्त “प्लॅन कॅन्सल केला, हे करावंसं वाटलं” आणि हसत, शीळ मारत माझ्या रूममध्ये शिरले. पोटात दुखत होतं बरंच. पडावस वाटत होतं. आडवी झाले. ओटीपोटात जोरात कळ गेली. पोटावर पडले आणि मुलीची बाई झाल्याच्या आनंदात डोळे मिटले…
फक्त तुझीच,
गार्गी.
Image by Ralf Kunze from Pixabay
- सासूबाई will you be my valentine?- भाग्यश्री भोसेकर - February 23, 2020
- तुमचं आमचं प्रत्येक वेळी सेम नसत- भाग्यश्री भोसेकर - February 20, 2020
- गोष्टी लेखकांच्या –गौरी शिंदे - November 13, 2019
कमी अधिक प्रमाणात सगळ्या मुलींच्या घरी हीच परिस्थिती असते.
फक्त प्रत्येकीला या tabu मधून बाहेर येणे जमत नाही.
Agadi khare aahe
होय…म्हणूनच मी.यावर लिहायचं ठरवल आहे. प्रतिक्रिये बद्दल आभार…पुढेही वाचत राहा
आभार