आँखीयोंसे गोली मारें !

 
वेळ भरत आलेली. भर दुपारी  बारा. स्थळ डेक्कनचा , छोटेखानी  गरवारे पूल पायथा. टळटळीत दुपारी .गार नाही, खारा नाही , फक्त मतलबी वारा वाहता. मी गाडीत. माझी वरात. हिच्या कुठल्या तरी मैत्रीणीकडे. हिच्या मते मी आज काल धरती पें बोज झालेलो. हा बोज कमी व्हावा म्हणून, ही अवजड वाहतूक रविवारी वामकुक्षी  कुर्बान करत , कर्वे रोडी चाललेली.
 
ती आली. शेजारीच ऊभी ठाकलेली. स्वच्छ चमकदार. नितळ . कुठलाही डाग नाही. नाजूक. कमनीय. पाहता क्षणी प्रेमात पडावं असा लुक.  नजरेत ऊघड आव्हान. अचानक  तिचा तोल जातो. माझ्या म्हणजे , गाडीच्या  गळ्यात पडणार  बहुतेक. हा , स्कुटीचा वर्णनात्मक निबंध…… संपला .
 
आता मुद्द्याचं बोलू यात. गाडीची मालकीण भन्नाटच.  सन्नाट. माझं मन सैरभैर  सैराट झालेलं. गुलाबी  टाॅप. काळी स्लॅग. मन करा रे प्रसन्न !!. मला लगेच प्रसन्न  वाटाया लागलं. मंद वार्याची धुंदगार झुळूक यावी तसा गारवा. चेहरा झाकलेला. डोळ्यावर गाॅगल. माझ्या दिलात हुरहुर वाढलेली.  हीचा चेहरा बघायला मिळाला तर सारसबागेत नारळ फोडीन. बाप्पांनी ऐकलं. हळूच तिनं चेहर्यावरचा स्कार्फी मेकअप  ऊतरवला. आहाहा ! काय तो तिचा चेहरा. सात्विक.  शालीन सौंदर्य.  बायको असावी तर अशी. आपल्या नशिबी नाही म्हणून  ज्या चेहर्यामुळे ह्रदयपीडा होते , असलं  अस्सल  कातील सौंदर्य.  चालतंबोलतं प्रेक्षणीय पुणे.  जन्मोजन्मीचं पुण्य जोडलं की असा नजारा पहायला मिळतो. तिचे ते भुरूभुरू ऊडणारे कुरडयी कुरळे केस. मी गुंतत चाललो. टप्पोर्या मोत्यांसारखे तीचे स्मायली दात. आरशात बघत तीने मानेला असा काही झटका दिला की घाव वर्मी बसला. मी हिटविकेट. मध्येच तिनं तिच्या स्टेपकटी केसांत हात गुंतवला. मी स्टेप बाय स्टेप तिच्याकडे खेचला गेलेलो. आरशात बघत तिने ओठांची मोहक हालचाल केली. ओठांवरचं फेअरनेस क्रीम अॅडजस्ट केलं. ती स्वतःतच हरवलेली. कस्तुरीमृगाला स्वतःच्या मोहक सुगंधाचा गंध नसावा तसं काहीतरी. हे सगळं घडत होतंते लाल हिरव्यामधल्या साठ सेकंदात.
 
 मला कससंच वाटू लागलं. विलक्षण  अपराधी. शेजारी बायको बसलेली. तरीही मी असा खिडकीतून बाहेरख्यालीपणा करावा ? घोऽऽऽर कलियुग. हळूच तिरकस व्युत्क्रमकोनातून  बायकोकडे बघितलं. ती तिची नेलपेंटी नखं मनातल्या  मनात कुरतडत बसलेली. मेरे दिल का बोझ हलका हो गया.बेधडक बाहेर  बघितलं. माझ्यासारखीच अनेकांची ब्रह्मानंदी टाळी  लागलेली. खर्या सौंदर्याची कदर करावी तर पुण्यातल्या पब्लिकनेच.  मी निर्लज्ज विनयाने बाहेर बघू लागलो. तीला समजलं. ऊमगलं. एक तुच्छ  झटका देवून तिनं स्वतःला स्कार्फमध्ये लपवलं. पिक्चर  संपला.
 
अचानक  बायकोची मान 360अंशातून वळली. माझं ह्दय बेडुकऊड्या मारू लागलं. छातीचा पिंजरा फोडून बाहेर पडणार बहुतेक.  तेवढ्यात डोळ्यावरच्या गाॅगलची आठवण झाली.  गाॅगली फायदा आठवला. मी कुठे बघतोय हे बायकोला कसं कळणार  ? सरळ बोट दाखवून  म्हणलं…..
 हे दिसतंय ना …….ते …….ईन्टरनॅशनल बुक हाऊस. ईथे… भारी भारी…… पुस्तकं मिळतात. जाऊ यात एकदा…. “प्रसंगावधान”  का काय ते हेच…
पंधरा वर्षांनी बायकोला पुन्हा  पटवली. माझं “फेसबुक” प्रकरण तिला टॅन्जंट गेलेलं. वाचलो.गाॅगलच्या शोधकर्त्याचे मनोमन पाय धरले. बाईच्या जन्माला असतो तर खणानारळानी ओटी भरली असती.
 नंतर तासभर पत्ता शोधत हिच्या मैत्रीणीचं दक्षिण ध्रुवावरचं घर शोधलं.लिफ्ट बंद. पडलेली की पाडलेली. धुसफुसत बेल दाबली.
दार ऊघडलं गेलं…. अचानक गरगरायला लागलं. जग आपल्याभोवती झिम्मा  खेळतंय असा फील. दरवाज्यात तोच मनमोहक चेहरा….
अंग चोरून सोफ्यात टेकलो. टप्पोरी दात खिदळत  हसले. बायकोनं ओळखपरेड करून दिली. डोळ्याच्या डोरेमाॅन  कोपर्यातून ,फक्त मलाच समजेल अशा भाषेत  ती म्हणाली. …
…..तुम्हाला  कुठे  तरी पाहिल्यासारखं वाटतंय……
 
लाजून चुरमा होत मी पुटपुटलो…. मुझें भी ऐसाच वाट रहा है!….ही  वाट दूर जाते…..
 
 Men will be men……
 
आपण ठरवलंय. बारीक व्हायचं. …..
काय करणार ?…… रेग्युलर  फाॅलोअपला जावं लागतं…..
यायचं असेल तर सांगा !
….. आनंद वाटून खावा…….और क्या ?
 
….. कौस्तुभ  केळकर  नगरवाला
 
 
Image by Andreas Lischka from Pixabay 

Kaustubh Kelkar
Latest posts by Kaustubh Kelkar (see all)

Kaustubh Kelkar

कौस्तुभ केळकर ह्यांनी बीई (इलेक्ट्रिकल) तसे बीजे (जर्नालिझम) असे शिक्षण घेतले आहे. गेली अनेक वर्ष ते अहमद नगर येथे भौतिकशास्त्राचे क्लासेस चालवतात. फेसबुकवर कौस्तुभ केळकर नगरवाला ह्या नावाने परिचित असलेल्या कौस्तुभ ने अनेक कार्यक्रमांचे लेखन, निवेदन आणि सुत्रसंचलन केले आहे. हसरी दिवाळी तसेच कथुली ह्या कार्यक्रमांचे सादरीकरण केले आहे. लोकसत्ता, सकाळ, लोकमत अश्या अनेक दैनिकांमधून विपुल लिखाण केले आहे. तसेच त्यांचे कथुली नावाचे पुस्तकही प्रसिद्ध झाले आहे.

6 thoughts on “आँखीयोंसे गोली मारें !

  • July 3, 2019 at 9:01 am
    Permalink

    पुण्यातील हिरवळ

    Reply
  • July 6, 2019 at 11:55 am
    Permalink

    चला उद्याचा रविवार सत्कारणी लावायला हवा 😉

    Reply
  • June 19, 2020 at 6:35 am
    Permalink

    तुमची लिहिण्याची स्टाईल भन्नाट आहे

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!