भाषेच्या गमती जमती
तुम्हाला कोणती भाषा येते?
चित्रातल्या वाक्याचा अर्थ असा आहे की मला तीन भाषा येतात,
व्यंगात्मक,
उपरोधिक
आणि द्वयर्थी.
संवाद साधणे हे जरी भाषेचं मुख्य काम असलं तरी निव्वळ संवादापलीकडे जाऊन बोलायचं असलं, योग्य भावना पोचवायच्या असल्या की या तीन भाषा कामी येतात. कोणत्याही भाषेवर तुम्हाला प्रभुत्व केव्हा गाजवता येतं असं समजावं? जेव्हा तुम्हाला त्या भाषेत व्यंगात्मक, उपरोधिक आणि द्वयर्थी बोलता येतं तेव्हा. उदाहरणार्थ, मराठीमध्ये ‘चल, जरा शाळा घेऊया त्याची’, ‘आज बसूया का? ‘हाती काय आलं? घंटा! ‘भारी मेतकूट आहे तुमचं!’ याचे अर्थ समजायला ती भाषा तितकीच चांगली यावी लागते. यातला मजेचा भाग सोडून देऊ, पण त्या त्या भाषेत व्यंगात्मक, उपरोधिक आणि द्वयर्थी बोलता येणं हे अवघड काम आहे. ज्याला ते जमलं, त्याला आपल्या भाषिक ज्ञानाचा अभिमान वाटायला हरकत नाही असं मला वाटतं.
भाषेशी खेळायला मजा येते. काही भाषा वळवू तितक्या वळतात, काही भाषांचा कणा ताठ म्हणजे ताठ. काही भाषांमध्ये आदरार्थी वचनांचा दुष्काळ (उदा. इंग्रजी) तर काहींमध्ये सुकाळ (उदा. जपानी)! फ्रेंच बोलताना जीभ जितकी हलकी ठेवता येईल तितकं चांगलं, हेच जर्मन भाषा बोलताना जीभ, पडजीभ, घसा, ओठ, अगदी थायरॉईड ग्रंथींसकट सगळ्याचा वापर करावा लागतो. आपण म्हणतो संस्कृत ही सर्वात प्राचीन भाषा आहे, परवा मी यू ट्यूबवर चक्क संस्कृतमध्ये बिर्याणीबद्दलचं रॅप ऐकलं. याचाच अर्थ किती रसपूर्ण आहे ही भाषा! भाषांतर करता येणार नाही असे शब्दच नाहीत हिच्यात.
काही वर्षांपूर्वी आम्ही चीनमध्ये काही महिने राहिलो होतो. ज्या भागात (ख्वाचाव) आम्ही रहायचो तिथे इंग्रजी बोलणारे जवळजवळ नव्हतेच. पण लोकं सगळी चांगली होती. आमचे मोठेमोठे डोळे पाहून फार औत्सुक्याने आमच्याशी बोलायला यायची. भाषा यायची नाही, बऱ्याचदा खाणाखुणांनी बोलायला लागायचं, पण काम व्हायचं. आमची मुलं तेव्हा अनुक्रमे पाच आणि तीन वर्षांची होती. म्हणजे त्यांची नुकतीच भाषेशी, संवादाशी तोंडओळख व्हायला सुरुवात झाली होती. चिनी भाषेत ‘निहाऊ’ म्हणजे हॅलो किंवा नमस्कार. आमच्या सोसायटीच्या दारापासचा रखवालदार आम्ही जेव्हा जेव्हा गेटपाशी जाऊ तेव्हा आम्हाला अतिशय अदबीने आणि हसऱ्या चेहऱ्याने ‘निहाऊ’ म्हणायचा. मुलांना घेऊन मी जितक्या वेळा त्या गेटपाशी घेऊन जायचे तितक्या वेळा तो आम्हाला ‘निहाऊ’ म्हणायचा. आम्हीपण उत्तरादाखल त्याला ‘निहाऊ’ म्हणायचो. म्हणजेच थोडक्यात आमच्यात नमस्कार, चमत्कार व्हायचे. आमच्या मुलांचा त्यामुळे तोपर्यंत एक समज (की गैरसमज?!) पक्का झाला की चिनी भाषेत एकच शब्द आहे तो म्हणजे निहाऊ. त्यांना वाटायचं सर्व चिनी लोकांना हा एकच शब्द येतो.
एकदा मी मुलांना तिथल्या बागेत खेळायला नेलं होतं. एक चिनी मुलगा आधीच तिथे बॉलशी खेळत होता. मुलगा साधारण आमच्याच लेकाचा वयाचा होता. आमचा लेक त्याच्याकडे गेला आणि बॉलकडे हात दाखवत त्याने विचारले, ‘निहाऊ? (म्हणजे आपण एकत्र खेळूया का?) चिमूला (चिनी मुलगा) मजा वाटली. तो म्हणाला, ‘निहाऊ (म्हणजे, चालेल की) मग दोघांनी खेळायला सुरुवात केली. प्रत्येक बॉलला फटके मारताना दोघेही ‘निहाऊ’ म्हणत होते. चिमूला बहुदा समजलं असावं की या मोठ्या डोळ्यांच्या मुलाला ‘निहाऊ’ शिवाय दुसरं काहीही येत नाही. किक बसली की आनंदी चित्कारात ‘निहाऊ!, नाही बसली की उदास आवाजात ‘निहाऊ’, गोल झाला की जल्लोषात ‘निहाऊ’ असा मस्त खेळ सुरू होता त्यांचा. हे ‘निहाऊ’ इतकं जोरात व्हायला लागलं की अख्खी बाग त्यांच्याकडे पाहू लागली. काही मुलं तर खेळाला प्रोत्साहन द्यायला ‘निहाऊ’ म्हणत टाळ्या पिटू लागली. फार छान प्रसंग होता तो. शेवटी सर्व लहान मुलांच्या खेळाचा होतो तसा याही खेळाचा शेवट भांडणात झाला आणि एक रागावलेलं चिडकं ‘निहाऊ’ दोघांच्या तोंडून बाहेर पडलं. आम्ही बघ्यांनी मात्र या ‘निहाऊ’ खेळाचा पुरेपूर आनंद लुटला.
जिथे आपल्याला एकमेकांशी संवाद साधायला भले भले मोठे शब्दही कमी पडतात, तिथे या मुलांनी फक्त एका शब्दाच्या साहाय्याने एक उत्तम दुवा तयार केला. कधीकधी वाटतं, आपण संवाद साधण्यासाठी कितीसाऱ्या शब्दांचे खेळ करत बसतो, अगदी उटारेटा मांडतो. कधी समोरच्यापर्यंत पोचतं, कधी नाही. तरीही आपण संवादाचे पूल रचत बसतो.
लहान मुलांना या वरच्या तीनही भाषांमधील एकही भाषा येत नाही ही मात्र एक छान गोष्ट आहे.
©गौरी ब्रह्मे
Attachments area
Latest posts by Gauri Brahme (see all)
- समीर – अनयाच्या वॉट्सऍप गोष्टी - September 26, 2022
- कच्चा लिंबू - June 20, 2022
- आई - January 21, 2022
👌
Mastach