प्रेमपत्र

परकीय भाषेची पाठ्यपुस्तकं कधी पाहिली नसतील तर एकदा  मजा म्हणून जरुर पहा. डोळ्यांना पर्वणी असते ती अनेक प्रकारची. अतिशय सुंदर व विचारपूर्वक बनवलेली असतात, कारण ती त्या भाषेच्या मार्केटिंगच्या दृष्टीने मुद्दाम विशेष आकर्षक असावी लागतात. त्यामुळे या पाठ्यपुस्तकांमध्ये जगभरातील अनेक इंटरेस्टिंग गोष्टी बघायला मिळतात, तसंच अनेक मजेशीर किस्सेही पहायला, वाचायला मिळतात.

आमच्या जर्मनच्या एका पाठ्यपुस्तकात अगदी सुरुवातीच्या धड्यात एक छोटंसं प्रेमपत्र आहे. पत्र आना नावाच्या मुलीला उद्देशून आहे. जर्मन भाषेत Anna चा उच्चार, इंग्रजीसारखा “ऍना” असा न करता “आना” असा करावा लागतो. अनेक विद्यार्थ्यांना सुरुवातीला हे एकदम लक्षात येत नाही. शब्द जोडून जमेल तसे ते वाचत असतात. त्यात त्यांचाही दोष नाही. अनेक विद्यार्थी जर्मनी हा देश नकाश्यावर नक्की कुठे आहे हे ही धड माहीत नसताना, ही भाषा शिकायला आलेले असतात. अश्या कोऱ्या पाट्यांकडून योग्य उच्चारांची फारशी अपेक्षा करता येत नाही. त्यासाठी शिक्षकांना सतत विशेष  प्रयत्न करत रहावे लागतात.

तर एकदा एका विद्यार्थ्याला मी हे आनासाठीचे प्रेमपत्र वर्गात मोठ्याने वाचायला सांगितलं. तरुण पोरांना भर वर्गात प्रेमपत्र वाचायला न आवडेल तर काय!! पत्राची सुरुवात लीsबs आना, म्हणजे “प्रिय आना” अशी आहे. त्या विद्यार्थ्याने आधी एक मोssठा पॉज घेतला. मग सावकाश पत्र वाचायला सुरुवात केली,

लीsबs आण्णा…….

माझ्या आतापर्यंतच्या शिक्षकी पेशात मी त्या दिवशी सर्वात जास्त हसले आहे. कोण म्हणतं, शिक्षकी पेशात राम नाही? शिक्षकी पेशात रामा!शिवा!गोविंदा! सगळं काही आहे!
🙈😁

Image by Tumisu from Pixabay 

Gauri Brahme
Latest posts by Gauri Brahme (see all)

Gauri Brahme

गेली वीस वर्षे पुणे विद्यापीठाच्या परकीय भाषा विभागात जर्मन भाषेची अध्यापिका म्हणून काम करते. अमराठी लोकांना मराठी शिकवते. भरपूर लिहिते, वाचते, कलाकुसरीच्या वस्तू बनवते, खादाडी करते, इतरांना खिलवते. लेखिका म्हणून नावावर २ पुस्तकं जमा आहेत.

One thought on “प्रेमपत्र

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!