बांधवगडचे पोपट

कोण्या एका, म्हणजे फक्त दूरदर्शन असतानाच्या काळची गोष्ट.
तेव्हा लिप्टन टायगर चहाची एक अॅड लागायची.
एक बहादूर शिकारी.
 त्याचं नाव शेरसिंगच असणार.
त्याची रांगडी, उघडी जीप घेवून, जंगलात माॅर्निंग वाॅकला चाललेला.
त्याला वाटेत एक प्रचंड वाघ, मांजरासारखा आडवा जातो.
हा शस्त्रहीन.
पण डरत नाही.
काँग्रेस गवतासारख्या भरघोस वाढलेल्या, आपल्या कुरडयी मिशांना पीळ देत,
 हा खाली ऊतरतो.
त्याच्या नुसत्या नजरेनं घायाळ होवून , वाघ कुत्र्यासारखा शेपूट पायात घालून पळून जातो.
मग ती फेमस टॅगलाईन.
……वाघांसारख्या मर्दांसाठी.
कुठल्याही टायगर सफारीला जाताना माझा आवेश वाघांसारख्या मर्दांसाठी…  असाच असतो.
दोन वर्षांपूर्वी  जिम काॅर्बेट नॅशनल पार्कला जाणं झालं.
दीड तास ऊघड्या जीपमधून हिंडत होतो.
पहिल्या पाच मिनटांतच जीप्सी एकदम थांबवली गेली.
एका बाजूला वाघाचे ताजे ठसे दाखविण्यात आले.
शेर हमसे सिर्फ  पाँच मिनट आगे है ,असा गाजर हलवा दाखविला गेला.
माझ्यावर राज्य असल्यासारखे ते  547 वाघोबाज जंगलात जे दडून बसले होते, ते शेवटपर्यंत  मुँहदिखाईची रस्म अदा करायला बाहेर आलेच नाहीत.
जंगलामधल्या मंदिरात  मॅगी खावून परत आलो.
बहुधा जिप्सीच्या ड्रायव्हरच्या शबनमबॅगेत,  वाघाच्या पंज्याचा रबर स्टॅम्प  असणार.
तोच हे ताजे ठसे मारत असणार.
असो…
मागच्या महिन्यात खुद्द व्याघ्रेश्वराने स्वप्नात येवून दर्शन दिले.
म्हणाले , बांधवगडास जा.
माझे प्रत्यक्ष  दर्शन  होईल.
आलो बांधवगडाला.
ऊतरलो एम. पी.डी. सी.च्या व्हाईट टायगर रिसाॅर्टमध्ये.
दुपारचीच कॅन्टर सफारी बुक केली.
तेव्हा वाटलं , एखादा तरी वाघोबा , लंच करून टम्म फुगलेल्या आपल्या ढेरीवर हात फिरवत, शतपावली करत असणार.
अचानक  सामोरा येवून , कायऽऽऽऽ ? बरं आहे ना ? अशी आपुलकीनं चौकशी करणार.
आणि  जाताजाता , अग ऐऽऽऽ, ती व्याघ्रनखांची केलेली
दातकोरणी दे केळकरांना , अशी मिसेस वाघांना ड़रकाळी बिनती करणार.
मग मिसेस वाघ टायगर प्रिंटचा ब्लाऊजपीस देवून, हिची ओटी भरणार…
डोळ्यात अशी पट्टेरी स्वप्न  घेवून, आम्ही  खुल्या कॅन्टरमधून खतौलीची वाट तुडवू लागलो.
गेल्यागेल्या  जंगलगाणं ऐकू येवू लागले.
अप्रतिम.
अगणित पक्ष्यांचे आवाज ऐकू येत होते.
मधूनच मोराची केकावली.
माकडांचे चित्कार.
सांबराचं खोऽऽक खोऽऽक.
अमर्याद पसरलेलं बांबूचं बन होतं सगळीकडे.
हरणांचे कळप भस्म्या रोग झाल्यासारखे सतत चरत होते.
 चितळ ,सांबर , नीलगाय ढीगाने दिसत होते.
त्यांची ती प्रचंड संख्या बघून , बांधवगडातले वाघोबाज मांसाहार वर्ज करून , फक्त साबुदाण्याच्या खिचडीवर दिवस काढीत असावेत , अशी लघुशंका मनास चाटून गेली.
लंगूर दिसले.
ऊंच झाडावर बसून जिभल्या चाटणारी गिधाडं दिसली.
मल्याऽऽळी  किंगफिशर  दिसले.
मध्येच एक मोर आमच्या कॅन्टरसमोरून आडवा ऊडत गेला.
मोरपिशी  गुदगुल्या झाल्या.
टिटव्या दिसल्या.
इतके सपोर्टिंग अॅक्टर्स येवून गेले ,पण हिरो काही दिसेना.
अचानक  जळकी लाकडं दिसायला लागली.
वणवा लागल्याच्या खुणा.
अब शेर यहा नही आयेगा…
कॅन्टरवाला आमच्या उत्साहाला जाळून गेला.
मनातला, न विझणारा निराशेचा वैशाखवणवा बरोबर घेवून आम्ही  खालमानेनं परत आलो.
रिसाॅर्टवर परतलो.
नवीन नवीन माहिती  मिळत गेली.
इथे तीन सेक्टर आहेत.
मगधी , ताला आणि  खतौली.
खतौली वाघ दिसण्याची शक्यता शून्य टक्के.
मगधीला सगळ्यात जास्त.
पण तिकीट काढताना आपल्याला चाॅईस नसतो.
नशिबात येईल तो सेक्टर घ्यायचा.
आॅनलाईन बुकींगविषयी वाद होता.
पुण्याच्या एम.पी डी.सी. वाल्यांनी  आम्हाला  ही माहिती  नीट पुरवली नाही ,हे मात्र  खरं.
द्युताची नशा चढावी तसं झालेलं.
पुन्हा  जुगार खेळलो.
दुसर्या दिवशीची सफारी बुक केली.
मगधी सेक्टर मिळावा म्हणून सगळ्या  देवांना फ्रेन्ड रिक्वेस्ट  पाठवल्या.
पर…नऽऽऽही.
पुन्हा  खतौलीच.
ऊम्मीद के सहारे आम्ही  पुढे निघालो.
आमचा ड्रायव्हरही पेटलेला.
वाघोबा जिथं जिथं वाॅटरबॅग भरून घेत होता ,त्या त्या सगळ्या पाणवठ्यावर जाऊन आलो.
तेवढ्यात एक जीप्सीवाला म्हणाला , अभी आधे घंटे पहिले शेर दिखा था, इधर…
च्यायला माझं नशीब नेहमीच लेट असतं , निदान अर्धा तास तरी.
तासभर हिंडून पुन्हा  एका जंगली टपरीवजा हाॅटेलपाशी आलो.
तिथली भजी हादडली.
इधर भी शेर आता है… कभी कभी.
हाॅटेलवाल्यांनं मेरी जख्म पें मिरच्या चोळल्या.
पुन्हा  एकदा  फायनलमध्ये  वर्ल्ड  कप हारल्यासारखे आम्ही  रिसाॅर्टवर  परत आलो.
तिथे पोचलेल्या प्रत्येकाला वाघ दिसला होता.
आम्ही  त्याचं काय घोऽऽडं मारलं होतं कुणास ठाऊक?
शेवटी हा नशीबाचा भाग आहे..
वाघ बघणं भाजी घेण्याईतकं ईझी नसतं…
त्याला खूप पेशन्स लागतो…
असलं काहीही सांगू नका.
घाईची लागलेला , तुमचं  आनंदी जीवनाचे लेक्चर ऐकण्यात उत्साह दाखवेल..?.
निराशेच्या खोल डोहात डुबक्या मारत पुण्यात परतलो.
पोरींचा वाघोबाचा फार हट्ट चालला होता , म्हणून कात्रजला गेलो.
आणि  तो दिसला.
चट्टेरी , पट्टेरी , डामरट साला.
मिशा फेंदारून फिस्सकन हसला.
आपल्या बिरादरीकडून झालेल्या ,अक्षम्य गुन्ह्याची कुठलीही लाज त्याला वाटत नव्हती.
दिलगीरी वगैरेची बातच नस्से.
अशा निर्लज्ज  प्राण्यापुढे ऊभं राहण्याईतकी माणुसकी, माझ्याकडे शिल्लक  नव्हती.
मी पुढे सरकलो.
दुसर्या दिवसापासून  लोकांच्या झुंबडी आमच्या दाराशी.
लोक पक्षी पहायला आमच्या  घरी.
जोरदार अफवा पसरलेली.
आमच्या इथे, बांधवगडचे  पोपट आले आहेत म्हणे….
माहित्येय मला.
हे साला त्या वाघोबाचंच काम असणार.
पुढच्या  वर्षी  चंद्रपूरला येतो.
आणि  बघतोच तुला…
ताडोबा…
वाघांसारख्या  मर्दांसाठी. ….
Kaustubh Kelkar
Latest posts by Kaustubh Kelkar (see all)

Kaustubh Kelkar

कौस्तुभ केळकर ह्यांनी बीई (इलेक्ट्रिकल) तसे बीजे (जर्नालिझम) असे शिक्षण घेतले आहे. गेली अनेक वर्ष ते अहमद नगर येथे भौतिकशास्त्राचे क्लासेस चालवतात. फेसबुकवर कौस्तुभ केळकर नगरवाला ह्या नावाने परिचित असलेल्या कौस्तुभ ने अनेक कार्यक्रमांचे लेखन, निवेदन आणि सुत्रसंचलन केले आहे. हसरी दिवाळी तसेच कथुली ह्या कार्यक्रमांचे सादरीकरण केले आहे. लोकसत्ता, सकाळ, लोकमत अश्या अनेक दैनिकांमधून विपुल लिखाण केले आहे. तसेच त्यांचे कथुली नावाचे पुस्तकही प्रसिद्ध झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!