आणि मी तिला मांडीत घेतल…

तस पाहायला गेल तर मी अतिशय सभ्य इसम आहे. म्हणजे मी तरी तसेच मानतो. टेक्सी मध्ये बसल्यावर सिगरेट ओढायची असेल तर आधी ड्रायवर ची परवानगी घेतो, कामवाली लादी पुसत पुसत जवळ आली कि पाय वर घेऊन मांडी घालून बसतो. कोळीण पापलेटच्या तुकड्या कापत असताना फक्त पापलेट कडेच पाहतो, लिफ्ट मध्ये पुढ्यात बाई आली तर पोट शक्य तेव्हडे आत घेतो, एयर होस्टेस कितीही लावण्यवती असली तरी “ दो द्वार विमान के आगे” असे म्हटल्यावर पटकन खिडकीतून बाहेर पाहतो, कोणत्याही स्त्री कडे वाईट नजरेने पाहत नाही.(एखादीच्या सौंदर्याचा आस्वाद चोरट्या कटाक्षाने जरूर घेतो पण थेट डोळे भिडवून बुभुक्षिता सारखा पाहत नाही.) लेट नाईट शो असो वा ओव्हर नाईट पिकनिक, “आशुतोष आहे ना सोबत? मग जा”.. मैत्रिणींच्या आया सुद्धा माझ्या सभ्यपणाच्या brand ambassadors होत्या.
थोडक्यात काय? तर मर्यादा पुरुषोत्तम रामाचा कलियुगातला अवतार म्हणजे मीच आणि माझ्या सारख्या ‘सभ्योत्त्मावर’ विनयभंगाचा आरोप होण म्हणजे अशक्य पराकोटीतील गोष्ट. पण तो प्रसंग नुकताच माझ्यावर ओढवला..
त्याच अस झालं…..
माझे आणि माझ्या मुलीचे जिभेचे चोचले फार आहेत. चिनी, इटालियन, कॉंटीनेंटल, मेक्सिकन, इथियोपियन, पर्शियन, अरबी, आफ्रिकी इत्यादी सर्व प्रकारचे शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थ आम्ही खातो. सदर पदार्थ हॉटेलात जाऊन खाणे हे अंमळ खर्चिक असल्यामुळे त्यातले बरेचसे पदार्थ मी घरीच बनवतो. त्यासाठी लागणारे विविध जिन्नस आणायला परवा क्रॉफड मार्केट मध्ये गेलो होतो. खरेदी संपवून साधारण तीन बाय दीड फुट उंचीची आणि अंदाजे साडेसात किलो वजनाची पिशवी घेऊन बाहेर आलो, तर मार्केट च्या बाहेरचा रस्ता वाहनांनी दुथडी भरून होता…वाहत नव्हता कारण सर्व वाहने वेडी वाकडी एकमेकात अडकून वाहतुकीचा बट्याबोळ झाला होता. या परिस्थितीमध्ये तिथे टेक्सी मिलने अशक्य म्हणून कमिशनर ऑफिस समोर येऊन थांबलो. तिथे आधी पासूनच काही भाभ्या हातात पिशव्या घेऊन taxi ची  वाट पाहत उभ्या. हात दाखवून सुद्धा एकही taxi थांबत नव्हती, थांबलीच तर तुम्हाला जिथे जायचं आहे तिथे जायची तयारी नव्हती. अश्या परिस्थितीत त्या भाभ्यांना  मदत करायची तीव्र इच्छा झाली होती पण आधीच खूप वेळ झाला होता, आणि साडेसात किलोची पिशवी उचलून माझेही हात भरून आले होते. मलाही टेक्सी मिळत नव्हती..थोड पुढे, थोड पुढे करता करता मेट्रो च्या सिग्नल पर्यंत आलो.
चीराबाजारातून चालत गेलो तरी फार तर एक दीड किलोमीटर वर ठाकूरद्वार ला माझं घर, पण साडेसात किलो घेऊन चालण कंटाळवाण होत म्हणून तिथेच बस ची वाट पहात थांबलो. तेव्हड्यात ६६ आली. बावीस रुपयाच काम पाच रुपयात झालं या आनंदात बस मध्ये चढलो. बस तशी मोकळीच होती.
दोन स्टोप नंतर उतरायचे आहे म्हणून बस च्या पुढच्या भागात जाऊन बसलो. उजव्या बाजूला स्त्रियांसाठी राखीव असलेल्या रांगेतल्या शेवटचे बाकडे होते. लक्षात आले होते पण आता काय उतरायचेच आहे, असे म्हणून बसलो. आता हा काही अपराध नाहीये. तश्या इतर राखीव खुर्च्या सुद्धा रिकाम्याच होत्या.
पुढच्या स्टोप वर एक अंदाजे ५५ वर्ष्याच्या आणि ऐशी किलोच्या आसपास असलेला स्त्री ऐवज बस मध्ये चढला. राखीव पैकी अनेक खुर्च्या रिकाम्या असल्यामुळे मी सुधा लक्ष न देता बसून होतो. पुढच्या स्टोप ला उतरायचे होते म्हणून एक मांडी बाहेर काढून उठायच्या तयारीतला माझा स्टान्स.
८० किलोचा ऐवज बस मध्ये चढताच, घ्यंग घ्यंग घ्यंग करत बस सुटली होती. मागचे दिसणाऱ्या आरशात, पायरी वरून शेवटचा माणूस आत लुप्त झाला कि ड्रायवरला बास असत…त्याचा तोल जाईल,पडेल याची फिकीर न करता बस रेटायची अशीच प्रथा आहे. त्या प्रथे प्रमाणे बस निघाली..८० किलोचा ऐवज स्वतःच्या हातातला दोन चार किलोचा ऐवज सांभाळत(पिशवी) बस च्या हिंदोळ्यांवर स्वार झाला होता. बसचे ग्यंग घ्यंग घ्यंग आणि गचके, ब्रेक या जुगलबंदी मध्ये, कधी सीटची तर कधी वरची दांडी धरत, हातातले समान आणि शरीराचा पसारा सावरत, चार पावलं पुढे..दोन पावलं मागे असे ग्यानबा तुकाराम करत हळू हळू पुढे सरकत होता…
माझा एक डोळा पुढच्या स्टोप कडे आणि दुसरा डोळा मागून येणाऱ्या संभाव्य धोक्याकडे होता. खर पाहता मागच्या भागात सुद्धा काही सिटा रिकाम्या होत्या. स्वतःचे एव्हडे वजन, सोबत समान अश्या परिस्थितीमध्ये तिथेच बसेल तर ती बाई कसली?… आमच्या हक्काच्या…राखीव जागा असताना मी का बसू तिकडे?..पुर्षांच्या सिट वर?….काय पण ऐटीट्युड असतो नाही काही बायकांचा? अहो बस मधली सीट आहे ती… जेन्ट्स टोयलेट नव्हे…बसा कि…
पण या बाईला सगळ्यात पहिल्या रांगेतली ड्रायवरच्या मागची सिट खुणावत होती. आणि कितीही अडथळे आले तरी ती सीट मी पटकविनच अश्या आवेशात ती निघाली होती..वरचे दात खालच्या ओठात रुतले होते, कपाळावर घर्म बिंदूंची गर्दी झाली होती, फ्री स्टाईल स्विमिंग करतात तसे एकदा हा आणि एकदा तो..असे हात पुढे टाकत ती निघाली होती..करता करता मझ्या थोडी पुढे गेली आणि तेव्हड्यात ड्रायवर ने करकचून ब्रेक दाबला…गचका बसला..तोल ढळला आणि पाहता पाहता ८० किलोचा ऐवज माझ्या मांडीत कोसळला…
काही सेकंद कुणाला काही कळलेच नाही…(त्या काही सेकंदात कुणी फोटो काढला असता तर मी त्या बाईला मांडीत घेऊन बसलो आहे असा फोटो आला असता) धक्का ओसरताना आपली डावी मांडी दुखत असल्याची जाणीव मला झाली..कारण त्याच मांडीवर हाताने जोर देऊन ती बाई उठायचा प्रयत्न करत होती आणि त्याच वेळ बस पुन्हा सुरु झाली..पुन्हा एकदा धक्का..गचका आणि अर्धवट उठलेला ऐवज धप्पकन पुन्हा माझ्या मांडीत..
फार तर ५ किंवा सात सेकंदात घडलेला हा अपघात…शरीरावर फार नाही पण मनावर फार खोल जखम करून जाणार आहे याचा अंदाज त्यावेळी आला नव्हता..
घडलेला प्रसंग तिला बर्यापैकी ऑकवर्ड करणारा होता, त्यात बस मधले इतर प्रवासी हा सोहळा पाहून खुदू खुदू हसले होते आणि तिच्याच कडे पाहत होते. राग येण स्वाभाविक आहे पण हा अपघात होता हे समजून घेण्या एव्हडी प्रगल्भता ८० किलोच्या मेंदूत नव्हती, त्यातून ती एका भांडकुदळ समाजाची प्रतिनिधी सुद्धा होती त्यामुळे घडल्या घटनेचा दोष तिच्या नशिबाला न लावता तो मला लावण्याचा निर्णय तिने घेतला….आणि ऐसा कैसा लेडीज सीट पे बैठता है तुम?..इथून.. तुम जैसे लोगोको सबक सिखना पडेगा इथपर्यंत तिच्या तोंडाचा पट्टा सुरु झाला….
तसा माझा फार दोष नव्हताच..म्हणजे लेडीज साठी राखीव असलेल्या आसनावर बसणे हा काही दखलपात्र गुन्हा असू शकत नाही. पण झालेल्या फजितीचे खापर माझ्यावर फोडण्या वाचून तिला सुद्धा फार काही पर्याय नव्हताच…मी सुद्धा बारीक आवाजात सॉरी म्हटले..कंडक्टर ..इतर प्रवासी सुद्धा जान दो ना भाबी वगैरे माझ्या समर्थनात आले होते..पण हि ऐकायला तयार नव्हती..तेव्हड्यात माझा स्टोप आला..मी उठलो आणि पुढे जायला लागलो तर हिने मागुन माझी कॉलर धरली.. “ अरे भागता किधर है?”…. अस म्हणत माझ्या सोबत ती सुद्धा खाली उतरली..आता माझ्याच एरीआत हि माझी इज्जत उतरवणार होती, इतकी वर्ष जपून ठेवलेला माझा सभ्यतेचा आरसा खळकन फोडणार होती….मला तर टीव्ही वर बातमी सुद्धा दिसायला लागली होती…. बस मध्ये स्त्रियांची छेड काढणारा नराधम गजाआड….सभ्यतेच्या बुरख्या मागचा हिंस्त्र जनावर…वगैरे वगैरे….
आता मी, ती, बस स्टोप वरचा टीसी, ड्रायवर, कंडक्टर,काही प्रवासी, एरीयातले माझी केवळ तोंड ओळख असलेले काही बघे….
भाबिजी क्या हुआ?…
अरे क्या बताऊ?..इस आदमीने मुझे भरी बस में अपनी गोद में लिया..
या वाक्यावर पब्लिक मध्ये जोरदार हश्या..सगळे तिला समजवायचा प्रयत्न करत होते पण ती ऐकायला तयार नव्हती..
पोलिसात जायची भाषा करत होती..आम्ही जिथे उतरलो होतो तो स्टोप व्हीपी मार्ग पोलीस स्टेशन च्या हद्दीत येत होता…चलो पोलीस स्टेशन…..
तेव्हड्यात कंडक्टर माझ्या मदतीला धावला. म्हणाला.. “मेडम…जेव्हा घटना घडली तेव्हा बस चीराबाजारात होती..म्हणजे गुन्हा एल.टी. रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडला आहे. तुम्हाला तक्रार करायची असेल तर तिकडे जावे लागेल.”
हि मात्रा मात्र चालली. तिच्या मनासारखा राडा घालून झाला होता..पब्लिक जमल होत..पण तिला हवी तशी पब्लिसिटी मिळाली नव्हती.. “इसने मुझे गोद में लिया” या वाक्याने तिचा घात झालं होता…आणि उलटा प्रवास करून एल.टी.मार्ग.पोलीस स्टेशन ला जा वगैरे उपद्व्याप करण्यात फार अर्थ नाही हे लक्षात आल्यावर तिने शेवटी माघार घेतली…
थांबवून ठेवलेली बस पुन्हा निघाली…जाम झालेला ट्रेफिक मोकळा झाला…गर्दी पांगली…आणि स्त्री लंपट, रोड रोमिओ, लिंग पिसाट, इत्यादी पैकी एक पदवी मला मिळता मिळता राहिली…
Image by Ana_J from Pixabay 

5 thoughts on “आणि मी तिला मांडीत घेतल…

  • August 20, 2019 at 1:48 pm
    Permalink

    अशक्य वाईट आहे हे 🤣🤣🤣🤣

    Reply
  • October 16, 2019 at 4:56 pm
    Permalink

    Ha ha ha ekdam bhari

    Reply
  • July 5, 2020 at 12:51 pm
    Permalink

    🤦🤦🤣🤣🤣

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!