पत्र क्रमांक ७ आणि ८
पत्र क्रमांक 7,
प्रिय गौती,
तुला आज आयुष्यात पहिल्यांदा पत्र लिहितेय..म्हणजे कधी वेळच आली नाही ना तशी..आणि हे पत्र पाहिल्यावर तुझी प्रतिक्रियाही माहितेय मला…म्हणशील “आता हे काय नवीन खूळ..पत्र बित्र किती गर्लिश वाटतंय हे”..असू दे…तरीही पत्र पूर्ण वाच..पत्राला उत्तर देण्याची जबरदस्ती नाही पण उत्तर द्यावस ही इच्छा.
तुला आठवतंय? मी तुझ्या आधी तब्बल 45 सेकंद आधी जन्माला आले म्हणून लहानपणी मी तुला म्हणायचे की तू मला ताई म्हंटल पाहिजे..आणि मी जेवढ्या वेळा असं म्हणायची तेवढ्या वेळा तू माझ्या नावाची वाट लावून मला चिडवायचास.. मारामारीही व्हायची आपल्यात..बाबा आणि आजी माझ्या बाजूने..तुझ्या बाजूने कोणी नाही असं व्हायला नको म्हणून आई तुझ्या बाजूने
फार भराभर मोठे झालो नाही आपण? असं वाटतंय आत्ता आत्तापर्यंत गोरे सरांकडे टेनिस प्रॅक्टीसला जायचो..तू अजूनही जातोस..असं वाटतंय आत्ता आत्तापर्यंत आपण बर्फाच्या गोळ्याच्या फ्लेवरसाठी भांडायचो. आधी मी म्हणायचं ब्लॅक करंट तू म्हणायचं मँगो..मग माझी जीभ जांभळी आणि तुझी जीभ पिवळी झालेली असायची.मग नेहमीप्रमाणे आपल्याला स्वतःचे सोडून एकमेकांच्या जिभांचे रंग आवडायचे. मग मी म्हणायचं मँगो त्यावर तू म्हणायचं माझी कॉपी करू नको पण तुलाही त्याच वेळी ब्लॅक करंट हवं असायचं मग आपली भांडण ठरलेलीच.
इकडे म्हणजे बंगलोरला आल्यापासून भांडायला कुणी नाही..तुझी आठवण येते..तुलाही येत असणार माझी पण तू मान्य करणार नाहीस हा भाग निराळा.
ए गौती, काल ऑफिसमध्ये तुझ्या त्या मैत्रिणीसारखी …अगदी तशीच दिसणारी मुलगी दिसली होती. काय रे तुझ्या मैत्रिणीच नावं.. अमायरा की समायरा..पण ग्राड्यूएशनला तुम्ही एकत्र नव्हतात मला वाटतं. सध्या काँटॅक्ट मध्ये आहात का? तुला अजूनही आवडते का रे ती? मध्येच तू तिच्याविषयी बोलणं अचानक बंद करून टाकलं होतंस. विषय झटकून दूर जायचास. मीही किती बावळट आहे…प्रश्न तर असे विचारतेय जसं काही तू सगळ्या प्रश्नांची खरीखुरी उत्तरं देणार आहेस.
या आठवड्यात आपला वाढदिवस आहे. मला वाटतं हे पहिलंच वर्ष असं आहे की केक कापायला आपण एकत्र नाही आहोत. So
Happy Birthday in advance Gautam see you soon
तुझी (ताई)
गार्गी
******************************
पत्र क्रमांक 8,
प्रिय आज्जीssss,
आज्जी कशी आहेस? मी मजेत आहे इकडे आणि तू विचारण्या आधीच सांगते की मी खाण्या पिण्याची काही अबाळ होऊ देत नाही इकडे. आजी तुझं माहेर कर्नाटक असल्यामुळे मी इकडे येत असताना तुला असं वाटत होतं की मी तुझ्या माहेरी चाललेय. पण तुझं माहेर खूप बदललंय म्हणतात सगळे. पूर्वीचे बंगलोर, अनेक तलावांचा साठा असलेलं, खूप बागबगीचे असलेलं बंगलोर आता राहिलं नाही. बंगलोर आता पक्की आय टी सिटी झालंय. हो पण भरपूर मंदिर आणि जागोजागी असणारी हिरवळ बऱ्यापैकी तशीच आहे.
काल मला सुट्टी होती , तू मला बुल टेम्पलला जाऊन यायला सांगितलं होतंस. मी जाउन आले. इथे साऊथ मध्ये ना सगळंच असं भव्य दिव्य आहे. मंदिरांच्या घंटा घ्या, प्रवेशद्वार घ्या, आणि काय सुंदर सजवतात इथल्या मुर्त्या बाप रे..आपल्याकडे गुरुपौर्णिमा किंवा दसरा, दिवाळीला सजवतात ना अगदी तसं. रोज मोठमोठाले हार, भरगच्च माळा, वेगवेगळी सुवासिक फुलं.इथले बागबगीचेही मोठे मोठे आहेत.मी काल कबन पार्कलाही जाऊन आले..फार छान वाटलं..आपल्या पुण्यात येऊंनजाऊन एकुलती एक सारसबाग.कबन पार्कला गेल्यावर मला सारस बागेची आणि तिथल्या गणपती मंदिराची आठवण आली.
आज्जी तू इथे ये तुला फार आवडेल. सगळ्या बायका रोज डोक्यात किमान एक तरी फुल माळतात काही बायका गजरा. पण एकूणच फुलांना फार महत्व आहे इकडे तुलाही खूप आवडतात ना. तुला आजोबा गजरा घेऊन यायचे ,वेणी घेऊन यायचे ती आठवण तू आम्हाला नेहमी सांगायचीस.तुला इथे तुझी लाडकी मंदिरं मिळतील. इथे दर 20 पावलांवर एक तरी मंदिर असतंच काही नाही तर छोटीशी देवळी तरी असते. तुला इडलिही खूप आवडते ना. मला तुझी आठवण आली की मी इडली खाते. पण तुझ्या हातच्या निर डोश्याची चव इकडे नाही. तुझ्या हातच्या खोबऱ्याच्या वड्या तर मी इतक्या मिस करते म्हणून सांगू.
हं आता सांग मला पिरियड्स यावे म्हणून कोणकोणत्या देवाना नवस बोलली आहेस? एका तरी देवाला सोडलंस का? रागात नाही सहज विचारतेय. मी परवा घरी फोन केला होता तर तू चतुःश्रुंगीला गेली होतीस त्या आधी प्रति बालाजीला म्हणजे नवस फेडणं सुरू आहे असं दिसतंय असं मी ताडलं…असो. नवस फेडण्यातून वेळ मिळेल तेव्हा पत्राचं उत्तर नक्की दे.
तुझीच,
गार्गी
Image by Ralf Kunze from Pixabay
- सासूबाई will you be my valentine?- भाग्यश्री भोसेकर - February 23, 2020
- तुमचं आमचं प्रत्येक वेळी सेम नसत- भाग्यश्री भोसेकर - February 20, 2020
- गोष्टी लेखकांच्या –गौरी शिंदे - November 13, 2019