कृष्णजन्म….(©मंदार जोग)
संध्याने फोडलेला हंबरडा त्या हॉस्पिटलच्या दगडी भिंतींनाही हलवून गेला! गेली दीडशे वर्ष असंख्य आजारी रुग्ण आणि मृत्यू पाहिलेले ते दगड संध्याच्या अक्रोशाने सुन्न झाले! समीर तिच्या पाठीवर हात फिरवत तिला शांत करायचा प्रयत्न करत स्वतः हमसून हमसून रडत होता. लहान मुलांच्या त्या प्रचंड वॉर्ड मध्ये त्याच्या समोर उभे होते हताश डॉक्टर आणि बेडवर होता आठ वर्षांचा त्यांचा मुलगा क्रिदय…निचेष्ट!
मित्रांबरोबर इमारतीच्या गच्चीत खेळताना पाय घसरून उघड्या टाकीत पडला. जुने, गढूळ, शेवाळ भरलेले पाणी नाकातोंडात गेल्याने बेशुद्ध झाला. रविवार असल्याने समीर घरीच होता. पोरांनीं गलका केल्यावर क्रिदयला बाहेर काढून थेट हॉस्पिटल गाठलं! बाहेर सगळे शेजारी, संध्या आणि समीर वाट बघत होते आणि आत डॉक्टर प्रयत्नांची शर्थ करत होते. दुपार सरून संध्याकाळ लांब सावल्या घेऊन आली आणि नंतर रात्रीने तिचे सावट पसरवले! जाणारे प्रत्येक मिनिट संध्याच्या काळजाचा ठोका चुकवत होते. ती एका हाताने समीरचा हात धरून दुसऱ्या हातात धरलेल्या रुमालाने हुंदका दाबून धरत होती! पाऊस जोरात कोसळत होता. सर्वांच्या चेहऱ्यावर चिंता होती! एका अभद्र क्षणी डॉक्टरनी बाहेर येऊन “आय एम सॉरी!” असे म्हणून समीरच्या खांद्यावर हात ठेवला आणि ते ऐकून संध्या मूर्च्छित झाली!
त्या ग्लानीत संध्याला आठ वर्षांपूर्वीचा तो दिवस आठवला. लग्नानंतर चारेक वर्ष अनेक प्रयत्न, उपाय करून शेवटी तिला दिवस राहिले होते. त्या दिवशी तिचे दिवस भरले नव्हते पण अचानक कळा सुरू झाल्या. डॉक्टरनी सुरुवातीपासूनच जरा कॉम्प्लिकेटेड आहे, काळजी घ्या हे सांगितलं होतं. त्या दिवशी समीर नेमका टूरवर होता. थोडी वाट पाहून सासूबाईंनी डॉक्टरना फोन केला. त्यांनी त्वरित ऍडमिट व्हायला सांगितलं. शेजारी आणि संध्याच्या भावाच्या मदतीने ती ऍडमिट झाली. एकंदर परीस्थिती पाहून डॉक्टरांनी संध्याच्या भावाला डिलिव्हरी मध्ये असलेला धोका सांगितला. मुलाला जन्म दिल्यास संध्याच्या जीवाला धोका आहे त्यामुळे चांस घेऊ नये असा सल्ला दिला. पण संध्याला हे कळल्यावर तिने “माझ्या जीवाला काहीही झालं तरी मुलाला जन्म द्यायचा” असा हेका धरला. तिच्या हट्टापुढे सर्वांचा नाईलाज होता. मुख्य म्हणजे चर्चा करण्यात वेळ गेल्यास मूल आणि संध्या दोघांच्या जीवाला धोका होता. तिच्या भावाने कंसेन्ट पेपरवर स्वाक्षरी केली आणि संध्याचा बेड ऑपरेशन थेटरकडे निघाला. तिचे सर्व दागिने, गंडे अगदी मंगळसूत्र देखील काढून ठेवले होते. फक्त तिने मुठीत लग्नात बाबांनी दिलेली बाळकृष्णाची लहानशी मूर्ती धरली होती!
दीड तास गेला. तिचा भाऊ आणि सासू सासरे बाहेर फेऱ्या मारत होते. समीरचे वीस फोन येऊन गेले होते. आता त्याची फ्लाईट टेक ऑफ झाल्याने ते थांबले होते. इथले सगळे मधेच बाहेर येणाऱ्या नर्सला काय झालं विचारत होते. “डॉक्टर सांगतील” अस जुजबी उत्तर देऊन नर्स जात होत्या! दीड तासांनी डॉक्टर बाहेर आले. संध्याच्या भावाने अधीरतेने विचारले “काय झालं डॉक्टर? ऑल ओके?” शांत हसऱ्या चेहऱ्याचे डॉक्टर म्हणाले “I have given birth to a miracle baby! माझ्या इतक्या वर्षांच्या प्रॅक्टिस मध्ये ह्या अश्या इतक्या कॉम्प्लिकेटेड केस मध्ये बेबी आणि आई दोघेही सुखरूप असायची ही पहिली घटना! It’s a baby boy! Congrats!” सर्वांचे डोळे आनंदाने भरून आले! संध्याने शुद्धीवर आल्यावर डोळे उघडले तेव्हा बेडच्या शेजारी असलेल्या टेबलवर हसऱ्या बाळकृष्णाची मूर्ती अंधुक दिसली. मग हळूहळू पूर्ण दिसली. तिने नमस्कार केला आणि तिला बाळाचा रडण्याचा आवाज ऐकू आला! जणू तो बाळकृष्णच रडत होता! नर्सने तिचे बाळ तिच्या हातात दिले! तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले! बाळाला छातीशी कवटाळल्यावर, मातृत्व नामक स्वर्गीय सुखाच्या अनुभूतीत काही मिनिट गेल्यावर तिने बेडला लावलेला चार्ट बघितला. डॉक्टर मेघ:श्याम ह्यांनी चमत्कार केला होता! रात्रीचे बारा वाजले होते! आज गोकुळाष्टमी होती! शेजारच्या देवळातून कृष्णजन्मानंतरचा शंखनाद ऐकू येत होता! तिने बाळकृष्णाची मूर्ती हातात घेऊन तिला अश्रूंचा अभिषेक केला!
कृष्णाने त्याच्याच जन्म दिवशी, डॉक्टर मेघ:श्यामच्या हाती जन्म दिलेल्या बाळाचं नाव क्रिदय ठेवलं. त्याच्या कृष्णलीलांनी संध्या आणि समीरच घर गोकुळ झालं! आठ वर्षे आठ दिवसांसारखी निघून गेली! आणि आज हे! क्रिदय असा….गेला? संध्या सत्य स्वीकारायला तयार नव्हती. पण सत्य तिच्या स्वीकारण्यावर अवलंबून नव्हतं! संध्या शुद्धीवर आली आणि संध्याने फोडलेला हंबरडा त्या हॉस्पिटलच्या दगडी भिंतींनाही हलवून गेला! गेली दीडशे वर्ष असंख्य आजारी रुग्ण आणि मृत्यू पाहिलेले ते दगड सांध्याच्या अक्रोशाने सुन्न झाले! समीर तिच्या पाठीवर हात फिरवत तिला शांत करायचा प्रयत्न करत स्वतः हमसून हमसून रडत होता.
दुःखाचा पहिला आघात संपून सत्य स्वीकारण्याची वेळ आली. संध्याचा भाऊ फॉर्मॅलिटी पूर्ण करायला गेला. काही शेजारी पुढची तयारी करायला गेले. संध्याच्या डोळ्यातले अश्रू जणू गोठले होते. तिने क्रिदयच्या केसातून हात फिरवला. त्याचा चेहरा काळानिळा पडला असला तरी शांत आणि लोभस दिसत होता….रोज रात्री झोपल्यावर दिसत असे तसा! संध्याला त्याच्या चेहऱ्याच्या जागी तिने त्याच्या जन्मानंतर त्याला पहिल्यांदा हातात घेतला तेव्हाचा चेहरा दिसत होता! समीर सर्वस्व हरवल्यासारखा हताश उभा होता! संध्याने क्रिदयचा अचेतन हात उजव्या हातात घेतला आणि डाव्या हाताने त्याच्या केसातून हात फिरवू लागली.
अचानक क्रिदयने तिचा हात धरल्याचा तिला भास झाला! तिने अविश्वासाने आपल्या हाताकडे बघितल. क्रिदयने त्याच्या लहानश्या मुठीत तिचा हात धरला होता!!! “स…समीर हे ….हे बघ काय? क्रिदय माझा हात धरतो आहे!” ती अस्पष्ट पुटपुटली! समीर त्याच्याच दुःखात होता! संध्या जोरात किंचाळली ” समीर अरे बघ ना!” समीरने वळून बघितलं! त्याचा डोळ्यावर विश्वास नव्हता! त्याने धावत जाऊन डॉक्टरना बोलावलं! डॉक्टरांनी पल्स बघितली. “This is impossible! सिस्टर सलाईन सुरू करा. Quick!” ते धडाधड सूचना देऊ लागले! बाहेर पाऊस कोसळत होता. आज गोकुळाष्टमी होती. सर्वत्र कृष्णजन्माच्या उत्सवाला उधाण आलं होतं! शेजारच्या देवळातला घंटानाद आणि शंखनाद वातावरण भरून राहिला होता! पण संध्याला मात्र हॉस्पिटलच्या स्वागत कक्षात संगमरवरी मूर्तीच्या रूपात प्रसन्न हसत बासरी वाजवत असलेल्या कृष्णाच्या मुरलीचे स्वर्गीय सूर ऐकू येत होते! हात जोडलेल्या तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहात होते! तिच्या कृष्णाचा आज पुनर्जन्म झाला होता!
Image by arun yadav from Pixabay
- व्हॅलेंटाईन डे- सर्व भाग (१ ते ६) एकत्र - February 18, 2024
- वारसा (भाग ७) - November 27, 2023
- वारसा (भाग ६) - October 30, 2023
Jay Shri Krishna🙏🙏🙏🙏
zakas
भारी! ! ! 🙏 🙏 🙏 🙏
Jai Shree Krishna 🙏
हरे हरे!!
Agaadh Krishna Leela ! Hrudaysparshi katha.
surekh….. vachun angavar shahare aale