अतर्क्य…(भाग 1)
तो.
बारीकसा.
खारीकच.
कोणीही दात लावून चघळून फेकून द्यावा असा.
नगण्य.
लेस दॅन झीरो.
वजन पंचेचाळीस किलो.
वय पंचावन्नच्या आसपास.
मळखाऊ रंगाची पॅन्ट.
चौकडीचा शर्ट.
दोघेही स्वच्छ.
पण ईस्त्री न केलेले.
फालतू लाड करून घ्यायची सवय त्यालाही नव्हती अन् त्याच्या कपड्यांनाही.
तेलकट चेहरा.
तुकतुकीत टक्कल.
नजर लागू नये म्हणून मोजता येतील ईतक्या केसांची झालर.
अर्थात नजर लागावं असं काही त्याच्याकडे नव्हतंच.
हाताचं सहावं बोट असल्यासारखी सावलीसारखी छत्री तो सदैव मिरवायचा.
ती रंगहीन छत्री.
लांबच लांब.
त्याच्या कमरेपर्यंत येणारी.
त्याच्यासारखीच आयुष्याला विटलेली.
तिचं ते यू शेप हॅन्डल कधीच मोडलेलं.
हे उद्ध्वस्त छत्र सदासर्वदा त्याच्या सोबतीला.
ती छत्री कधी ऊघडलेली कुणी बघितली नव्हती.
तोंडातल्या तोंडात बोलायचा तो.
ऊपकार केल्यासारखा.
शक्यतो त्याचं चॅनल म्युटच रहायचं.
गंजपेठेतली जगनशेठची ती मोठी हवेली.
हवेलीच्या मागच्या बाजूला असणार्या दोन छोट्या खोल्या.
बोळीत गुपचूप ऊघडणार्या.
डाॅ. वर्मांना सोयीच्या.
गुपचूप डिस्पेन्सरी चालवण्यासाठी.
सिव्हिल सर्जन डाॅ . वर्मा रोज संध्याकाळी ईथं प्रॅक्टिस करायचे.
गंजपेठेतली हमाल मंडळी त्यांचं मोठं गिर्हाईक.
हाताला गुण होता डाॅक्टरच्या.
फीज पण परवडणेबल.
सगळाच चोरीचा मामला.
पण ही वरप्रॅक्टीस चांगली चालायची.
हा तिथला कंपाऊंडर.
आपल्या कामात हुश्शार.
बाकी डोक्याचा वापर बेताचाच.
दोन तासच तेवढं काम असायचं.
बाकी दिवस रिकामा.
दवाखान्यातच रहायचा.
मग दिवसभर हा हातात छत्री घेवून गावभर हिंडायचा.
एका हातात छत्री.
खांद्यावर शबनम.
दुसर्या हातात करंगळी वर करून धूर ओकणारी सिगरेट.
तो काय खायचा कुणास ठाऊक ?
बहुतेक धूर ओकूनच त्याचं पोट भरायचं.
त्याचं नाव कुणाला माहित नव्हतं.
त्याला पास्ट टेन्स नव्हताच.
ऊद्याचा भरवसा नव्हता.
तो फक्त ‘आज’मध्ये जगायचा.
त्या दिवशी सकाळी सात वाजता हा कुलूप लावून परेडला निघालेला.
धप्प…..
रस्त्यानं आपल्या अंगावरची धूळ झटकली.
तिसर्या मजल्यावरनं, जगनशेटच्या जानलेस बाॅडीनं खाली ऊडी मारलेली.
जमिनीवर लाल रंगाचा सडा.
याचे तोतरे शब्द घशातच अडकलेले.
कोपर्यावरचा चहाचा टपरीवाला पळत पळत आला.
पोलीस.
पंचनामा.
पी. एम.
सगळे सोपस्कार पार पडले.
तोंडावरची माशी मारताना जीव जाईल याचा.
जगनशेटच्या खुनाशी याचा संबंध ?
पोलिसांनाही याच्यात फारसा इन्टरेस्ट नव्हता.
नो चान्स.
आत्ता तर कुठे फाईल ओपन झालीय .
तपास चालू आहे.
(क्रमशः)
Image by Gerd Altmann from Pixabay
Latest posts by Kaustubh Kelkar (see all)
- घरघर….. - October 4, 2021
- ‘स्कूल चले हम ! - September 22, 2021
- चष्मा - July 12, 2021