अनुराग कश्यप

नुकतीच टेपकास्ट सिजन 2 मधील अनुराग कश्यप आणि कल्कीची मुलाखत पाहिली . मुलाखतीतल्या दोन गोष्टी मला प्रचंड आवडल्या.

पियुष मिश्रा यांनी अनुरागला विचारलं की “In my opinion, you are self destructive person, until you dont destroy yourself you can not create anything new तुझं काय म्हणणं आहे याबाबतीत?”त्यावर अनुरागने उत्तर दिलं.

“मी माझे अनुभव माझ्या मुव्हिजमधून मांडतो.मी मनाने सतत फेस्टिव्हलस, माझ्या मुव्हिजमध्येच असतो.पण नवीन काही निर्माण करण्यासाठी जुनं जग मोडायची गरज मला वाटत नाही.मागे वळून पाहताना मी हल्ली फार प्रेमा बिमात पडत नाही माझ्या कामाच्या (या वाक्यामागे काय बॅकग्राऊंड आहे हे थोडक्यात इथे सांगते ,अनेक पिक्चर रिलीजमध्ये अडकलेले, काही पिक्चरचं शूट पूर्ण होऊन त्या प्रोजेक्टने गाशा गुंडाळणे या प्रकारचं प्रचंड अपयश, निराशा हे सगळं अनुरागने त्याच्या भूतकाळात खूप झेललेलं आहे.हा मनुष्य खूप मोठी वाट चालून आला आहे). तर मी मागे वळून तटस्थपणे पाहतो पुढे चालत राहतो.हे सांगताना अनुरागच्या चेहऱ्यावर एखादी समाधी लागल्याचे भाव होते.जनरली तो हसतो तेव्हा वाइड हसतो म्हणजे त्याचे दात, दातातल्या फटी दिसतात.हे उत्तर देताना तो मोजकं हसला.अनुराग अक्षरशः संतपदी पोचलेला माणूस वाटतो त्या वेळी.एकूणच अशी फेज आपल्याला आयुष्यात कमावता येणं हे प्रचंड फॅसिनेटिंग वाटतं मला. पूर्वीचे लेख,गोष्टी पुन्हा पुन्हा काढून वाचण्याची आपल्यापैकी बऱ्याच जणांना सवय असते.आपल्या पूर्वीच्या कामाच्या मोहात/प्रेमात पडणं सोडण्याची सवय म्हणजे एक तपश्चर्या करण्यासारखं वाटतं मला.हे सगळं तटस्थपणे पाहता येणं म्हणजे तर परिसीमा.हे इतकं सहजसोप नाहीये नाही का?

मुलाखतीतील आवडलेली दुसरी गोष्ट म्हणजे कल्कीने बोलता बोलता सांगितलं की लोकं मला विचारतात-

“तुझा आणि अनुरागचा डिव्होर्स झाल्यानंतर तुला जगणं अवघड वाटतं का? किंवा काय वाटतं?” यावर कल्की आणि अनुराग दोघेही खळखळून हसतात.दोन मित्र एकमेकांची सिक्रेटस माहीत असताना काहीतरी मिश्किली करत असताना कसे हसतील तसे आणि पुढे एका पॉइंटला कल्की अनुरागला छान मिठी मारते.

नात्यात पारदर्शकता, सच्चेपणा असला की नातं कोणतं आहे याला फार महत्व रहात नाही.एखादे चांगले मित्रमैत्रिण चांगले लाईफ पार्टनर होऊच शकतात असं नाही.मला कल्की आणि अनुराग फॉर दॅट मॅटर हृतिक, सुसान या कारणासाठी खूप आवडतात आणि असं नातं असू शकतं यावर माझा पूर्ण विश्वास आहे.तर नात्यातल्या निखळ मैत्रीइतकं, सच्चेपणाइतकं सुंदर, उबदार इतर काही नसावं या जगात बहुदा …काय वाटतं?

1972 साली गोरखपूर उत्तर प्रदेशात जन्म झालेल्या अनुरागला वैज्ञानिक होण्याची इच्छा होती . वडील विज उत्पादन करणाऱ्या कंपनीमध्ये चीफ इंजिनिअर, आई गृहिणी. अनुरागचे सुरुवातीचे शिक्षण डेहराडून येथे झाले , पुढचे शिक्षण ग्वाल्हेरला झाले. वैज्ञानिक होण्याची इच्छा असल्याने अनुराग पुढे दिल्ली येथे शिक्षणाकरिता आला नि योगायोगाने एका थिएटर गृपशी जोडला गेला.हा ग्रुप पथनाट्य सादर करीत असे, नाव होत जन नाट्य मंच. नियती आपला खेळ कसा खेळत होती पहा कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला असताना  अनुराग आणि त्याच्या मित्रांनी इंटरनॅशनल फिल्म फेस्टीवल बघायचं ठरवलं…एकेक करत अनुरागने 2 दिवसात 55 फिल्म्सचा फडशा पाडला, पैकी बायसिकल थीव्हज ह्या फिल्मने अनुरागच्या मनावर विशेष परिणाम केला नि अनुरागच फिल्ममेकर होण्या विषयीच्या स्वप्नाच बियाण तिथे रुजल गेलं.मग

अनुरागच फिल्म्स विषयीच आकर्षण वाढत गेलं नि त्याने रुपये 5000 खिशात ठेवून मुंबईत धडक मारली.मग अक्षरशः रस्त्यावर राहत, कुठेकुठे कामाच्या शोधात अनुराग काही महिने फिरला, शेवटी त्याच्या प्रयत्नांना यश आल आणि त्याला पृथ्वी थिएटरमध्ये काम मिळाल.साधारण 1995 साली अनुरागच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली ती शिवम नायर यांच्या घरी टॅक्सी ड्रायव्हर हा सिनेमा पाहून. हा सिनेमा पाहिला आणि अनुरगला आपण काहीतरी लिहावं असं वाटू लागलं.योगायोगाने श्रीराम राघवन तेव्हा दोन प्रोजेक्ट्स साठी काम करत होते, त्यांनी एका प्रोजेक्टमध्ये अनुरागला लिखाणाचं काम देऊ केलं.

त्या प्रोजेक्टच पुढे फारस काही झालं नाही, नंतर अनुरागने अजून एका फिल्मचे लिखाण केले, एका मालिकेसाठी लिखाण केलं पण या सगळ्या प्रोजेक्ट्स मध्ये यशाने अनुरागला हुलकावणी दिली.मग सत्या फिल्मसाठी रामगोपाल वर्मा यांनी अनुरागकडून लेखन करून घेतल आणि सत्य च्या रूपाने अनुरागलापहिल्यांदा यशाची चव चाखायला मिळाली.

पुढे 2000 साली पुण्यात जोशी अभ्यंकर खूनावर आधारित पांच नावाच्या फिल्मच दिग्दर्शन अनुरागने केलं पण सेन्सॉर बोर्डाला फिल्म न पटल्याने पुढे त्या फिल्मच काही घडलं नाही. अस प्रत्येक टप्प्यावर यश, अपयश चाखत अनुरागने पैसा वसूल, युवा,मे एैसा ही हुं,ब्लॅक फ्रायडे या चित्रपटांसाठी लेखन, दिग्दर्शनचे काम केले पैकी ब्लॅक फ्रायडे या चित्रपटावर हाय कोर्टाने स्टे दिला.अनुरागच्या बर्याचशा चित्रपटां बाबतीत स्टे येणं, सेसोर बोर्डाला मान्य नसणं अशा गोष्टी घडायच्या कारण अनुराग बिनधास्त आणि बोल्ड लिहायचा किंवा असं लिखाण दिग्दर्शित करू पहायचा.

जवळपास 8-9 वर्षे खूप स्ट्रगल केल्यानंतर आली देव डी फिल्म जी अनेक अर्थांनी खूप गाजली, या फिल्म मुळे अनुरागच नाव प्रकाशझोतात आल.या फिल्ममुळे अनुरागचा स्ट्रगल काही काळापूरता तरी संपला असं म्हणायला हरकत नाही. मग गुलाल नावाचा चित्रपट आला, मग द गर्ल इन यल्लो बुट्स नावाची आगळीवेगळी फिल्म अनुरागने केली.ही फिल्म प्रेक्षकांमध्ये फारशी गाजली नाही पण अनेक फिल्म फेस्टीव्हल मध्ये दाखविली गेली. नंतर 2012 ला गँग ऑफ वासेपूरच्या निमित्ताने अनुरागने मोठा हिट दिला, याच फिल्मचा सिक्वलही खूप गाजला हे सर्वश्रुत आहेच.या काळात अनुराग शॉर्टफिल्म देखील लिहायचा, दिग्दर्शित करायचा या शॉर्टफिल्म देखील नावाजल्या गेल्या.पुढे अग्ली सारखी समीक्षकांनी नावाजलेली फिल्म आणि बॉम्बे वेल्वेट सारखी साफ आपटलेली फिल्म अनुरागने दिली यानंतर अनुराग वेब सिरीज मध्ये देखील घुसला.

लस्ट स्टोरिज आणि सेक्रेड गेम्सचे यश आपल्या सर्वांना माहीत आहेच. 2011 साली अनुरागने फँटम फिल्म्स या कंपनीची निर्मिती केली जी 2018 साली काही दुर्दैवी कारणांमुळे बंद पडली. अनुरागच्या करिअरचा ग्राफ पाहिला तर तो सतत चढता उतरता आहे. अनुरागने करिअर मधल्या सर्व फेजेस चाखून झाल्या आहेत.

त्याचं वैयक्तिक आयुष्यदेखील काय कमी गुंता गुंतीच नाही.अनुरागच पहिलं लग्न आरती बजाज या फिल्म एडिटरशी झालं. त्यांना एक मुलगी देखील आहे.  त्यांच्यात काही कारणामुळे बेबनाव झाला आणि 2009साली त्यांनी घटस्फोट घेतला.त्यानंतर 2011 पासून अनुराग कलकी कोचलीन या अभिनेत्री समवेत प्रेम संबंध राखून होता आणि त्यांनी 2013 साली विवाह केला. पण हेही लग्न फार काळ टिकू शकल नाही आणि दोन वर्षातच त्यांचा घटस्फोट झाला. अनुराग काही वर्षांपूर्वी व्यसनाधीन झाला होता,चेन स्मोकर बनला होता यातच त्याला गंभीर आजाराने गाठल पण अनुराग हिम्मत हरला नाही उलट त्यातून वर आला आणि नुकतीच त्याने सगळी व्यसने सोडून आरोग्यदायी जीवनशैली आपलीशी केली.

अवघ्या 46 वर्षांच्या अनुराग ने आयुष्यात इतके उतारचढाव पाहिले आहेत की कधी कधी वाटतं एखाद्या शांत संध्याकाळी निवांत बसल्यावर अनुराग काय विचार करत असेल? हा विचार की आपण सुरुवातच फूटपाथ वर झोपून केली नि आज त्याच लोकांवर आपण सिनेमा बनवतो आहोत की हा की व्यावसायिक यश मिळांल पण वैयक्तिक आयुष्यात त्याला कधी एकट वाटत असेल का? अनुराग म्हणजे एक कोड आहे हेच खरं.

Image by Free-Photos from Pixabay 
Bhagyashree Bhosekar

Bhagyashree Bhosekar

मुळची महाराष्टात जन्म घेऊन इथेच वाढलेली भाग्यश्री सध्या बंगलोर मध्ये आयटी क्षेत्रात नोकरी करते आणि विविध माध्यमात लिखाण पण करते. मराठी लेखनामुळे तिची मराठी मातीशी असलेली नाळ तुटलेली नाही. लिखाणातून तिचा मराठी भाषेशी जोडलेली राहण्याचा प्रयत्न असतो. भाग्यश्रीला लघु कथा, दीर्घकथा लिहायला विशेष आवडतात. आत्तापर्यंत तिने दोन shortfilms साठी पटकथा लिहिली आहे. शिवाय 2017 साली तिचं बॉम्बे बिट्स नावाचं मराठी पुस्तक प्रकाशित झालं आहे. याव्यतिरिक्त अवांतर वाचन हा तिचा छंद आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!