क्लास.

गेला महिनाभर ही भयंकर बिझी होती.
ही छोटीशी परी.
सोनपरी.
हिच्या मावशीचं लग्न होतं.
मावशीईतकंच हिच्याकडेही सगळ्यांचं लक्ष असणार.
तीनशे चार वेळा  फोटोंचे फ्लॅश ऊडणार.
नऊशे एक्कावन्न वेळा  सेल्फी घ्यावा लागणार.
वो सब समझती थी.
खास लालेलाल भरजरी डिझाईनर लेहंगा चोली आणली होती, हिच्यासाठी.
चार म्हातार्यांची बोटं कडाकड मोडून फ्रॅक्चर  होतील,ईतकी क्युटी दिसणार होती ही, त्या ड्रेसमध्ये.
मावशीईतकाच ,थोडासा जादाही, वेळ खाल्ला होता हिनं, सिलेक्शनसाठी.
पण मनासारखा मिळाला एकदाचा.
लग्नाची गडबड सुरू झाली.
ही मावशीला जी चिकटली ती चिकटलीच.
मावशीचं शेपूटच.
फेविकॉल  का मजबूत जोड .
छूटेगा नही.
आपला घागरा पायानं जरासा वर ऊचलत ही हाॅलभर हुंदडायची.
हिच्या नाजूक पायातल्यांनी सनईच्या मंजुळ सुरांना साथ द्यावी.,
हिच्या निरागस हसण्यानं कुठल्याही फोटोला चार चाँद लागावेत ,
 असं सगळं चाललेलं.
मावशीईतकीच ही फोकसमधे.
ही ‘मिरव’णूक तिला भारीच आवडलेली.
मंगलाष्टकं सुरू झाली.
हार घालण्याच्या वेळी  काकाला त्याच्या फ्रेन्डस्नी ढगाएवढा ऊंच केला.
मग काय ?
मामा पण काय कमी नाही.
त्यानं मावशीला राॅकेटसारखी वर नेली.
ढगांपेक्षाही ऊंच.
खूप ऊंच.
फूल टू कल्ला.
हीनं बाबाला ईशारा केला.
बाबानं हिला पण वर ऊचलली.
वाकून वाकून ही तो स्वर्गीय आनंदसोहळा ,डोळे  भरून पाहू लागली.
शेवटी काका हारला.
एकमेकांना हार घातले.
मगच ही बाबाच्या खांद्यावरून खाली ऊतरली.
 लग्न लागलं.
मावशीला नेम धरून अक्षता हाणल्या.
काकाला नाही हं.
तो हिचा बेस्ट  फ्रेंड  झालेला.
किलोभर तांदूळ गोळा करून झाले.
मग कॅमराचा लखलखाट.
 स्टेजवर काय भारी चेअर आणून ठेवलेल्या.
काका एका चेअरवर बसलेला.
मावशी चेंज करायला गेलेली.
मी माझ्या लग्नात  दहा वेळा  चेंज करण्यात  टाईम वेस्ट  करणार नाही.
हिनं आत्ताच ठरवलं.
काका बिच्चारा.
एकटाच स्टेजवर.
थोडासा नर्व्हस  वाटतोय.
शादी का टेन्शन.
ही शेजारच्या  चेअरवर जावून बसली.
काकाच्या मांडीवर रेलून ,त्याच्या कानात कानगोष्टी  करू लागली.
लगोलग दहा फ्लॅश लखलखले.
हिनेही काकाचा हात हातात घेत,
एकशे ऐकोणतीस स्माईल्स देत,
चारशे दहा वेगवेगळ्या  पोझेस  घेवून, मस्त  मिरवून घेतलं.
तेवढ्यात मावशी टपकली.
दुसर्यांदा ब्युटी पार्लरवालीचा जीव घेवून.
पण भारीच दिसत होती.
अर्थात  हिच्याएवढी नाही.
चिनी कम.
खडूस आई.
….
…माँ मेरी.
ही, अपनी माँको ये घिनौने अपराध के लिए कभीभी माफ करनेवाली नही थी.
हिला खसकन्  बाजूला ओढली.
काकाशेजारी मावशी बसली.
दहा दिवस ऊपाशी असल्यासारखं, कॅमेरानं दोघांना खाल्लं.
हिच्याकडे कोणाचं लक्षच नव्हतं.
बाबानं हळूच तिच्यासाठी शेजारी खुर्ची आणून ठेवली.
तिच्यावर बसण्याचं हिला पटत नव्हतं.
एकदम क्लास हरवल्यासारखं वाटत होतं.
लो ईकाॅनाॅमी.
नाय, नो ,
नेव्हर  !
मुँह लटकाके ही तशीच ऊभी राहिली.
तेवढ्यात , तिचा बेस्ट  फ्रेंड  ,
काकाचं हिच्याकडे लक्ष गेलं.
हिचा दर्द त्यानं समजून घेतला.
सच्चा हमदर्द.
पटकन् ऊठला.
हिला मांडीवर घेवून बसला.
कॅमेरा आता त्रिकोणी फोटू टिपू लागला.
ही जाम खूष.
ऐकदम एक्झिक्युटिव्ह  क्लासमध्ये  आल्यासारखं वाटलेलं.
तिनं पटकन् काकाला एक स्वीट पापा दिला.
मोठ्यांदा ओरडली.
मावशी , मीच काकाला कीस केलं. , सबसे पहिले !
मावशी लाजून त्रिफळाचूर्ण.
हिला काही समजलं नाही.
जाऊ  दे.
हिचा “क्लास”च वेगळा  होता.
Image by Sonam Prajapati from Pixabay 
Kaustubh Kelkar
Latest posts by Kaustubh Kelkar (see all)

Kaustubh Kelkar

कौस्तुभ केळकर ह्यांनी बीई (इलेक्ट्रिकल) तसे बीजे (जर्नालिझम) असे शिक्षण घेतले आहे. गेली अनेक वर्ष ते अहमद नगर येथे भौतिकशास्त्राचे क्लासेस चालवतात. फेसबुकवर कौस्तुभ केळकर नगरवाला ह्या नावाने परिचित असलेल्या कौस्तुभ ने अनेक कार्यक्रमांचे लेखन, निवेदन आणि सुत्रसंचलन केले आहे. हसरी दिवाळी तसेच कथुली ह्या कार्यक्रमांचे सादरीकरण केले आहे. लोकसत्ता, सकाळ, लोकमत अश्या अनेक दैनिकांमधून विपुल लिखाण केले आहे. तसेच त्यांचे कथुली नावाचे पुस्तकही प्रसिद्ध झाले आहे.

6 thoughts on “क्लास.

  • September 12, 2019 at 7:51 am
    Permalink

    कौस्तुभ काय काॅमेंट देउ. तुमच्या कथा ईतक्या छान असतात ,की नो कॉमेंट.

    Reply
  • September 16, 2019 at 7:43 am
    Permalink

    मस्तच, तुमचा क्लासच वेगळा आहे कौस्तुभ

    Reply
  • September 17, 2019 at 10:36 am
    Permalink

    Wow….. Class apart…. ☺️☺️

    Reply
  • October 4, 2019 at 12:38 pm
    Permalink

    मस्त नेहमी प्रमाणे

    Reply
  • October 20, 2019 at 2:17 am
    Permalink

    Mastach….

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!