सल…
बऱ्याच दिवसांपासून मनात सलत असलेलं बोलायचं म्हणून त्याने तिला शेवटी ऑफिसच्या लिफ्टमध्ये गाठलंच.
“कॉंग्रेच्यूलेशन्स! आता काय कंपनीत पार्टनर झालीस म्हणे तू.”
“थँक्स. पण पार्टनर म्हणजे जास्त काम, जास्त जबाबदारी, हे विसरू नकोस.”
“छे ग. ते कसा विसरेन. पण तुम्ही काय बाबा, सुपरवूमन असता ना! मल्टीटास्किंग रक्तात असतं तुमच्या. आजकाल प्रत्येक वूमन्स डे, मदर्स डे वगेरेला ऐकतोच की आपण गुणगान. मग कसली चिंता?”
“बरोबर. चिंता कसली? घरून निघताना कामवाल्या बाईला हजार सूचना, लेकाच्या प्रोजेक्टची तयारी अस सगळं बघून निघावं लागतं इतकंच. नुसतं “येतो” म्हणून निघता येत नाही.”
“ते काय सांगू नकोस काय मला! तशी पहिल्यापासून हुशार आहेसच तू. म्हणूनच इतकी पटापट प्रमोशन मिळतात तुला!”
“कंपनीत पार्टनर व्हायला नुसती हुशारी कामी येत नाही मिस्टर.”
“अर्थात. नुसती हुशारी नाही, इमेज बिल्डिंग फार स्ट्रॉंग लागतं त्यासाठी आणि ते तुझ्याकडे आहे. सगळ्या कामांमध्ये पुढे पुढे करणे, स्वतः एखादं काम पूर्ण केलं की जगाला ते ओरडून सांगणे, केलेल्या कामाचा सतत उल्लेख कसा होईल आणि स्वतःला क्रेडिट कसं घेता येईल हे व्यवस्थित समजतं तुला.”
“त्याच काय आहे ना, सगळ्या कामांमध्ये पुढे पुढे करायला आधी ते काम थोडंफार तरी स्वतःला यावं लागतं. ते अंगावर घेतलं की शिकावं लागतं, तेच काम आपण मन लावून पूर्ण केलं की आपल्याला कौतुकामागे धावायला लागत नाही, कौतुकच आपोआप आपल्यामागे धावतं. यालाच कदाचित तू जगाला ओरडून सांगणे आणि क्रेडिट घेणे असं म्हणत असशील. आणि घेतलं क्रेडीट तरी माझ्या कष्टांचं घेते.
“मग कष्ट काय आम्ही घेत नाही का? पण आम्ही ते सतत दाखवत बसत नाही. आम्ही किती चांगले याचे झेंडे फडकावत नाही.”
“अरे जे चांगलं असतात त्यांचे झेंडे आपोआप फडकतात. अजून एक ऐक, सातत्याने चांगलं काम करणे, कामाशी आपली निष्ठा असणे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्वतःशी प्रामाणिक असलं की यश आपोआप तुमच्याकडे येतं. पण हे तुला समजणार नाही. सतत दुसऱ्यातले दोष बघायची सवय लागली की स्वतःची प्रगती खुंटते आणि त्यातली वाईट बाब अशी आहे की हे आपल्या लक्षातही येत नाही.”
“ते काही असो, तुझ्या इमेज बिल्डिंगचा फायदा मात्र तुला जबरदस्त झाला.”
“अगदी बरोबर. पण एक लक्षात ठेव, इमेज बिल्ड करायला आधी स्वतःची एक इमेज असावी लागते. ती माझी आहे. तुला मात्र स्क्रॅचपासून सुरुवात करावी लागेल. कालच अनंत चतुर्दशी झाली. जमल्यास सगळ्या बाप्पांंबरोबर तुझ्या द्वेषाचंही विसर्जन कर, Get well soon buddy” म्हणत, हलकेच त्याच्या खांद्यावर थापटत ती लिफ्टमधून बाहेर निघून गेली.
Image by Lars_Nissen_Photoart from Pixabay
Latest posts by Gauri Brahme (see all)
- समीर – अनयाच्या वॉट्सऍप गोष्टी - September 26, 2022
- कच्चा लिंबू - June 20, 2022
- आई - January 21, 2022
मस्तच
👍👌👌
Wah chanch
Can very much relate… too good… … these type of people only know to disappoint others instead of improving their standards … really very difficult to tackle such mentality
Bhari. Good observation
perfect!!