नवव्या मजल्यावरचं रहस्य(भाग ३ )
“तुला काय म्हणायचं आहे गार्गी? दीक्षित काकांनी माझ्या बाबांना आणि बाकी सगळ्यांना गायब केलं? का? कशासाठी? तुझं डोकं ठिकाणावर आहे ना? बाबा कुठे गेले मला माहिती नाही. पण दीक्षित काकांनी मला आणि माझ्या आईला सावरलं. आज मी जो काही आहे ना तो निव्वळ त्यांच्यामुळे. तू हे जे काही सगळं सांगतेयस ना, त्यावर मी काय इतर कोणीही विश्वास ठेवणार नाही. अग कुठली जागा? कोण बाई? काय बरळतेयस तू मगाचपासून?” डॉ. आदित्य.
“मला माहिती आहे आदी तू या सगळ्यावर विश्वास ठेवणार नाहीस. पण एकदा प्रज्ञा मॅडम काय सांगतात ते ऐकून घ्यायला काय हरकत आहे? प्लिज आदी समजून घ्यायचा प्रयत्न कर. बाकी सगळ्या गोष्टी बाजूला ठेव आणि मला सांग, एवढया मोठया मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा नववा मजला बंद का आहे? तुझे बाब डॉ. शारंगपाणी, इन्स्पेक्टर राघव आणि डॉ. सुबोधन अचानक गायब कुठे झाले? नाही माहिती ना? कोणालाच नाही सांगता येणार. पण या सगळया प्रश्नांची उत्तरं प्रज्ञा मॅडमकडे आहेत. इतकंच काय त्यांना माझ्याबद्दलच्या सगळ्या गोष्टी माहीत आहेत. तुझा विश्वास असो किंवा नको पण मी जे अनुभवलं ते सत्य आहे. मला माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे हवी आहेत. या साऱ्यासाठी तू मदत करणार असशील तर ठीक आहे अन्यथा मी माझ्या मार्गाने त्याचा शोध घेईन”, गार्गी.
“कुठल्या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत तुला गार्गी? डॉ. दीक्षितांचा आवाज ऐकून आदित्य आणि गार्गी दोघेही दचकले. हीच योग्य वेळ आहे त्यांच्याशी बोलायची असा विचार करून गार्गीने अगदी सुरुवातीपासूनची सगळी हकीगत त्यांना सांगितली.
गार्गीचं बोलणं ऐकून डॉ. दीक्षित काहीसे गंभीर झाले. पण तसं न दाखवता, “ठीक आहे. मी तयार आहे त्यांना भेटायला. निदान त्यांच्या मनात असणारा माझ्याबद्दलचा संशय तरी दूर होईल.” असं म्हणून ते तिथून निघून गेले.
डॉ. दीक्षितांच्या घरी त्यांचे संपूर्ण कुटुंब, आदित्य, त्याची आई, गार्गी आणि तिचे वडील सगळेजण प्रज्ञाची वाट बघत होते. आदित्य अजूनही गार्गीवर नाराज होता. डॉ. दीक्षित मात्र एकदम शांत बसले होते. तेवढ्यात प्रज्ञा तिथे आली.
“बोला प्रज्ञा मॅडम तुम्हाला काय बोलायचं आहे ते बोला. मला गार्गीने सगळं सांगितलं आहे.” डॉ. दीक्षित.
“बरं झालं तुम्ही थेट विषयालाच हात घातलात. मला फक्त एवढंच सांगा, सुबोधन कसे आणि कुठे गायब झाले?” प्रज्ञा.
“ते कसे गायब झाले मला माहिती नाही पण ते हॉस्पिटलच्या नवव्या मजल्यावरून गायब झाले.” डॉ. दीक्षित.
“मग ही बातमी तुम्ही लपवून का ठेवलीत?” प्रज्ञा.
“कारण मला त्या मजल्यावर अजून एक बळी जायला नको होता. मला हॉस्पिटलची प्रयोगशाळा करायची नव्हती”, डॉ. दीक्षित.
“म्हणजे तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी हे सारं लपवून ठेवलंत?’ प्रज्ञा.
“नाही अजिबात नाही. बघता बघता माणसं तिथून गायब होत होती. कळत नव्हतं तिथे नक्की काय होतं? भूत, पिशाच्च या गोष्टींवर माझा कधीच विश्वास नव्हता. पण त्या मजल्यावर काहीतरी अनाकलनीय घडत होतं. हे मात्र खरं. यामागे काहीतरी वैज्ञानिक कारण आहे, याची मला खात्री होती. अखेर माझ्यासारखा विचार करणारी एक व्यक्ती मला तेव्हा भेटली आणि या मजल्यावरचं रहस्य शोधता येईल याची मला खात्री झाली. ती व्यक्ती म्हणजे डॉ.सुबोधन! त्या दिवशी त्या मजल्यावरचं रहस्य सांगायला ते मला त्या खिडकीपाशी घेऊन गेले आणि बघता बघता अचानक माझ्यासमोर गायब झाले. मला प्रचंड धक्का बसला. पण मी स्वतःला सावरलं. आमच्या भेटीबद्दल कोणालाच माहिती नव्हतं. त्यामुळे जे घडलं ते कोणालाच सांगायचं नाही, असा विचार करून मी हा मजला कायमसाठी बंद केला.” डॉ. दीक्षित.
“याचा अर्थ तुम्ही त्या खिडकीजवळच्या रहस्याबद्दल अजूनही अनभिज्ञ आहात तर! मला वाटलं तुम्हाला सगळंच माहिती असेल”, प्रज्ञा.
“नाही सुबोधनने मला काही सांगायच्या आतच तो तिथून गायब झाला आणि त्या मजल्यावरचं रहस्य इतक्या वर्षानंतरही कायम आहे.” डॉ. दीक्षित.
“तिथून लोकं गायब कशी होतात, कुठे जातात हा सगळा शोध सुबोधनने लावला होता आणि त्याने याबद्दल सर्वात आधी मला सांगितलं होतं”, प्रज्ञा.
“काय आहे ते रहस्य?” गार्गी.
“सांगते. आता मी जे सांगणार आहे त्यावर कदाचित कोणाचाच विश्वास बसणार नाही. पण हेच सत्य आहे. मी जे काही सांगणार आहे ते नीट लक्षपूर्वक ऐका. कोणीही मध्ये बोलायचं नाही. तुमचे जे काही प्रश्न असतील ते माझं बोलणं संपल्यावर विचारायचे. आहे मान्य?”
प्रज्ञाच्या या बोलण्यावर सगळ्यांनी होकारार्थी मान हलवली.
“या सगळ्या प्रकरणाची सुरुवात झाली डॉ. शारंगपाणी यांच्या गायब होण्यापासून. त्यांच्यानंतर इन्स्पेक्टर राघव जेव्हा गायब झाले तेव्हा मात्र सुबोधनची खात्री झाली की ही केस पोलीस केस नाही. यामागे तेच कारण आहे ज्यावर तो गेली अनेक वर्षे रिसर्च करतोय. ती गोष्ट म्हणजे समांतर दुनिया अर्थात ‘पॅरलल युनिव्हर्स’!
खिडकीच्या गजाला धरून गोधळलेली रडत असणारी मुलगी दिसल्यावर डॉ. शारंगपाणी धावत बाहेर गेले आणि त्या मुलीला आतमध्ये खेचून क्षणभर तिथेच रेंगाळले कारण त्यांनी त्या क्षणात ती समांतर दुनिया अनुभवली. त्या नवव्या मजल्यावर त्या खिडकी जवळच्या पोकळीत कधीतरी दोन्ही दुनिया एकत्र येतात. त्या पोकळीत शिरलेला माणूस अचानक दुसऱ्या दुनियेत जातो. ती पोकळी डॉ. शारंगपाणीना दिसली. कुतूहलापोटी ते त्या पोकळीत शिरले आणि त्या दुसऱ्या दुनियेत गेले. कधीही परत न येण्यासाठी! हरवलेली सगळी माणसं अगदी याच प्रकारे दुसऱ्या दुनियेत गेली. आता ती परत येणं जवळपास अशक्यच. पण हे प्रत्येक वेळी होतंच असं नाही. आकाशात गोल गोल फिरत असताना एका मितीला दोन वेगवेगळ्या दुनिया एकमेकांच्या अगदी जवळ येतात आणि मग त्त्यांच्यामध्ये जी छोटीशी पोकळी असते ती पोकळीच या दोन्ही दुनियांना जोडणारा दुवा ठरते. पण हा कालावधी खूपच कमी असतो. त्यामुळे एकदा का दोन्ही दुनिया परस्परांपासून लांब गेल्या की त्या दुनियेत गेलेला अथवा तिथून इकडे आलेला माणूस परत आपल्या दुनियेत जाणं जवळपास अशक्यच!
समांतर दुनिया म्हणजे जणू आपल्या दुनियेचं प्रतिबिंब. या दुनियेसारखीच दुसरी दुनिया. जिथे सगळं इथल्यासारखं; झाडं, पर्वत, नदी, सागर, शहरं आणि कदाचित माणसंही. या दोन्ही दुनिया कुठे आणि कुठल्या वेळी एकत्र येतात यावर सुबोधन रिसर्च करत होता. या दोन दुनियांना एकत्र जोडणारा एक रस्ता तयार करण्याचे त्याचे प्रयोग चालू होते. पण यामध्ये त्याला अर्धच यश मिळालं होतं. त्याने तयार केलेल्या यंत्रणेद्वारे माणूस दुसऱ्या दुनियेत जाऊ शकत होता पण या दुनियेत परत येणं मात्र त्याला शक्य होत नव्हतं.या दुनियेला त्या दुनियेशी जोडण्याचा त्या अर्धवट प्रयत्नामुळे आमचं घर आणि हळूहळू त्याभोवतीचा परिसर अचेतन झाला. हॉस्पिटलमध्ये घडलेल्या प्रकाराचा त्याने अभ्यास केला आणि त्याची खात्री झाली की त्या दुनियेतूनही या दुनियेत माणसं येऊ शकतात. पण त्याचं गणित चुकलं आणि तो कायमचा त्या दुनियेत गेला.”
प्रज्ञा बोलायची थांबली. तिने जे काही सांगितलं ते सगळ्यांसाठीच अनपेक्षित आणि धक्कादायक होतं.
“पण या सगळ्याचा माझ्याशी काय संबंध? कोण आहे ती मुलगी? आणि ती मलाच का दिसते?” गार्गी.
यांवर मंद हसत प्रज्ञा म्हणाली, “हे रहस्य तुझ्यापासूनच सुरू झालं गार्गी आणि तुझ्यापाशीच येऊन संपणार आहे. शेवटी ‘दुनिया गोल है’ म्हणतात ते काही खोटं नाही. या दुनियेचा पसारा खूप मोठा आहे. पण या पसाऱ्यात तू कुठेच नव्हतीस गार्गी! कारण तू या दुनियेतलीच नाहीयेस. मुळात तू गार्गीच नाहीयेस. तू फक्त गार्गीसारखी आहेस. त्यावेळी डॉ. शारंगपाणीनी ज्या मुलीला वाचवलं ती मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून तू आहेस गार्गी.
हे ऐकून गार्गीला प्रचंड मानसिक धक्का बसला. लहानपणी खेळताना एका मुलीने, “ए तू आमच्या ग्रूपमधली नाहीस तू नाही यायचं खेळायला”, असं म्हणून चिडवलं होतं तेव्हा किती वाईट वाटलं होतं तिला आणि आता प्रज्ञा सांगत होती की ती या दुनियेतलीच नाही. ज्या दुनियेत तिचं बालपण गेलं. शिक्षण, करिअर, आदित्यची भेट झाली ती दुनिया तिची नाही? हे सगळं तिच्या आकलनापलीकडलं होतं.
तिची अवस्था बघून आदित्य चिडून म्हणाला, “व्हॉट रबिश? हे काय बोलताय तुम्ही? आणि तुम्ही सांगताय त्यावर आम्ही का विश्वास ठेवायचा?”
“मला माहिती होतं मी कितीही सांगितलं तरी हा प्रश्न येणार. आदित्य तुझ्या बाबांनी त्या दिवशी ज्या मुलीला वाचवलं ती मुलगी गार्गीच होती. आता प्रश्न हा आहे की ती तिथे कशी आली? या प्रश्नाचं उत्तर कदाचित कोणीच देऊ शकत नाही. पण हेच सत्य आहे आणि याचे पुरावेही मी देऊ शकते”, प्रज्ञा.
“कोणते पुरावे?” गार्गी.
“मला माफ करा. हे सगळं ऐकून तुम्हाला धक्का बसणं स्वाभाविक आहे पण गार्गीचं बाबा, तुम्हाला आठवतंय का, काही वर्षांपूर्वी सुबोधन तुम्हाला भेटला होता?” प्रज्ञा.
गार्गीच्या बाबांनाही खूप मोठा धक्का बसला होता. काय बोलावं त्यांना काहीच कळत नव्हतं.
“मी तुमची अवस्था समजू शकते.मला माफ करा पण हे सत्य सगळ्यांना पटवून द्यायचं असेल तर तुम्हाला बोलावंच लागेल. बरं ठीक आहे तुम्ही तुमचा वेळ घ्या. फक्त गार्गी लहानपणी हरवली होती, हे तरी तुम्हाला आठवत असेल ना? सांगाल त्या दिवसांबद्दल?” प्रज्ञा.
“हो. आठवतंय ना! सगळं सांगतो. एक दिवस पार्कमधून गार्गी बेपत्ता झाली. चार महिने शोध घेऊनही सापडली नाही. पण त्या दिवशी अचानक आम्हाला पोलीस स्टेशनवरून एक फोन आला, “तुमची मुलगी सापडली आहे ताबडतोब पोलीस स्टेशनला या.” पोलिसांनी गार्गीला आमच्या ताब्यात दिलं. गार्गी मिळाल्याचा आम्हाला खूप आनंद झाला होता. ती कुठे मिळाली असं विचारल्यावर पोलिसांनी हॉस्पिटलमध्ये घडलेली सगळी घटना सांगितली. त्यांनतर आम्ही गार्गीला घरी घरून गेलो. आम्ही तिला त्या नवव्या मजल्यावर कशी पोचलीस? हे विचारलं तेव्हा ती म्हणाली, “मी बाहुलीसोबत खेळत होते आणि अचानक जोराचा वारा आला आणि माझी बाहुली पडली. तिला उचलायला गेले तेव्हा मला फुलपाखरू दिसलं आणि मी धावत त्याच्यामागून गेले अचानक मी पडेन असं वाटलं म्हणून त्या खिडकीजवळ आले आणि खिडकीला घट्ट धरून उभी राहिले. त्या काकांनी मला हात धरून आत ओढलं.” बाकी तिला धड काही सांगता येईना. अवघी चार वर्षांची होती तेव्हा ती. तिचे मेडिकल रिपोर्ट्ससुद्धा अगदी नॉर्मल होते. त्यामुळे आम्हीही फार विचार केला नाही. पण तिचं वागणं थोडं विचित्र होतं. ती तिच्या आईला लगेच बिलगली पण मला बाबा म्हणून स्वीकारायला तयार नव्हती. ती म्हणायची, ‘हे माझे बाबा नाहीत माझे बाबा तर वेगळेच दिसतात’. तिच्या आवडी निवडीही थोड्याफार बदलल्या होत्या. दूध नको म्हणणारी गार्गी दूध आवडीने पीत होती. तिच्या आवडत्या सायकलकडे ती बघतही नव्हती. अचानक एक दिवस विचारू लागली, “आपण घर का बदललं?” आपलं पहिलं घर तर किती मोठं आणि छान होतं. ती बरेचदा दचकून उठायची, घाबरायची म्हणायची घरी जाऊया. हरवल्यानंतर चार महिने ती कुठे होती? या प्रश्नाचं उत्तर ना पोलिसांना सापडलं ना आम्हाला. पण कदाचित ती एका चांगल्या घरात राहत असावी असं समजून आम्ही त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं. कालांतराने तिने मला वडील म्हणून स्वीकारलं. आणि आमचं आयुष्य पुन्हा पाहिल्यासारखे चालू झालं. तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. डॉ. सुबोधनना मी ही सगळी माहिती सांगितली होती. पण सत्य इतकं भयंकर आहे या गोष्टीची तेव्हा मला कल्पनाही नव्हती. माझा अजूनही विश्वास बसत नाहीये की माझी गार्गी ही माझी मुलगी नसून ती हुबेबूब माझ्या गार्गीसारखी दिसणारी दुसऱ्याच कुठल्यातरी दुनियेतली गार्गी आहे…. बोलता बोलता गार्गीच्या बाबांचे डोळे भरून आले होते.
“जशी गार्गी या दुनियेत आली आणि इथलीच झाली तसंच इथून गायब झालेली सगळी माणसंही कदाचित तिथलीच होऊन राहिली असणार.” प्रज्ञा.
हे सगळं ऐकून गार्गी हतबल होऊन खाली बसली. आदित्यने आणि तिच्या बाबांनी तिला सावरलं समजावलं. सत्य काहीही असलं तरी तू आमचीच गार्गी आहेस आणि राहशील, हा विश्वास तिला दिला. पण गार्गीची मनःस्थिती समजण्याच्या पलीकडली होती. ज्या दुनियेत ती राहात होती ती दुनिया तिची नव्हती. ती उपरी होती. या भावनेनेच गार्गी खचून गेली होती.
हॉस्पिटलच्या त्या अकराव्या मजल्यावरून खाली येताना गार्गी लकबकीने जिना उतरत होती. आज तिच्या आईला डिशचार्ज मिळणार होता. पण गेल्या काही दिवसांत ती अंतर्बाह्य बदलून गेली होती. आपले आई बाबा आपले खरे आई बाबा नाहीत, ही दुनिया इथली कुठलीच गोष्ट आपली नाही. हे सगळं कुठल्यातरी दुसऱ्या गार्गीचं आहे. मग माझं काय आहे? कुठे आहे? आणि आदित्य…? आदित्य तरी माझा आहे ना???…का तो ही?..
जिने उतरताना ती नवव्या मजल्यावर थबकली. ती दरवाज्याजवळ गेली. तिथे लवकरच अध्यात्म सेंटर चालू होणार होतं. नकळत तिची पावलं ‘त्या’ खिडकीकडे वळली. खिडकीच्या गजाला धरून उभी राहिली. इथूनच मी या दुनियेत आले. पण ही दुनिया माझी दुनिया नाही. कशी असेल माझी दुनिया? ज्या दुनियेत मी जन्माला आले त्या दुनियेत मी पुन्हा जाऊ शकेल का? निदान ती दुनिया बघू तरी शकेन का मी? कोण असतील माझे आई बाबा? मुळात कोण आहे मी? अचानक तिच्या भोवतीचे वातावरण बदलू लागले काही कळायच्या आत तिच्यासमोर एक वेगळीच दुनिया दिसू लागली. नकळतपणे ती त्या दुनियेकडे ओढली गेली. ती टेरेसमध्ये गेली. समोर दिसणारी दुनिया तिला बोलावत होती. तिला तिच्या हक्काची दुनिया तिच्या समोर दिसत होती. गार्गीने एक पाऊल पुढे टाकलं पण त्याच वेळी तिच्या हाताला एक जोरदार हिसका बसला. आणि काही कळायच्या आतच ती नवव्या मजल्यावरच्या खोलीत ओढली गेली. तिच्या समोर आदित्य उभा होता. तिला आपल्याजवळ ओढून तो म्हणाला, ” तू कुठूनही आली असलीस तरी आता तू माझी आहेस. मी तुला कुठेही जाऊ देणार नाही. त्या दुनियेत जाणारा रस्ता मी आता कायमचा बंद करणार आहे. तुला आता याच दुनियेत राहावं लागेल, माझ्याबरोबर!”
समाप्त
Image by Emre Akyol from Pixabay
- माझी होशील का? - October 1, 2021
- काव्यांजली- शेवटचा भाग - February 12, 2021
- काव्यांजली- ४ - February 2, 2021
खूप मस्त वेगळी होती कथा
Interesting
chhan
Too innovative.. khup awdli katha!
छान आहे कथा
NICE SUSPENSE
Is it inspired by A place called here by Cecilia Ahern?
खुप छान वेगळीच कथा.
खुप छान वेगळीच कथा.असेच लीहीत रहा.
Superb story
Ultimate
Nice
उत्सुकता ताणणारी एक वेगळी कथा