देव पावला..
आयुष्यात एवढा हताश, हा कधीच झाला नव्हता.
एखाद्या खोल दलदलीत रूतत चालल्यासारखं वाटत होतं.
स्टिअरींग आता तसूभरही हलत नव्हतं.
याने अॅक्सेलेरेटर दाबला की मागची चाकं जागेवर फिरायची.
गाडी आता पुरती फसली होती.
तसं आयुष्यानंही याला पुरेपूर फसवलं होतं.
पण हा संपला नव्हता.
हार दिसत असूनही यानं, जिंकण्याचे प्रयत्न सोडले नव्हते कधी…
पण आज मात्र हरला.
गाडीतून खाली उतरला.
समुद्राचं लाल पाणी सूर्याला गिळण्यासाठी जिभल्या चाटत होतं.
कधीही अंधार पडेल.
गेली दोन वर्ष यानं खरंच रक्ताचं पाणी केलं होतं.
बारा बारा तास राबला होता रोज.
तिनका तिनका जोडून ही सेकंड हॅन्ड गाडी घेतली होती.
का ?
गाडीतला याचा तो जिगर का टुकडा खिडकीतून बाहेर डोकवत होता.
फक्त त्याच्यासाठी.
बारा वर्षाचा.
चाकं नसलेल्या गाडीसारखा….
चालू शकत नव्हता.
म्हणून याच्या पायात बारा हत्तींचं बळ आलेलं.
आठ दहा वर्ष तो कडेवर घेवून जायचा त्याला.
अगदी एस्टीतूनही.
त्याचा देह वाढला.
याला ओझं पेलवेना आता.
त्याचं फिरणं बंद.
दिवसभर तो घरातच असायचा.
तरीही हसमुख.
त्याचं ते हसणं याचं काळीज चिरत जायचं.
समुद्र खुप आवडायचा त्याला.
पण पुण्याला कुठून आणायचा समुद्र ?
म्हणून तर याला कार हवी होती.
त्याला कुठंही सहज घेवून जाता यावं म्हणून.
म्हणून तर हा इथं आलेला.
दिवेआगरला.
तसा गाडी चालवण्यात अननुभवीच हा.
पण पोरासाठी समुद्राच्या जितका जवळ जाता येईल तितका जवळ गेलेला.
आता मात्र पुरता फसला.
लोक यायचे अन् जायचे.
गाडीतल्या त्या ढोल्याला बाहेर काढा आधी…
फुकटचे सल्ले.
पण कुणीही याच्या गाडीला हातही लावला नाही.
हा जितका बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होता, तितका रूतत चाललेला.
याची बायको गाडीबाहेर हताश ऊभी
रस्त्याच्या बाजूने चित्कार ऐकू येवू लागले.
ते सहा जणांचं टोळकं.
इकडेच येत होतं.
मगाशी फाट्यावरच्या टपरीवजा हाॅटेलपाशी होतं.
खर तर याच्या बायकोला चहा प्यायचा होता.
हे टोळकं बघून, यानं गाडी तशीच पुढे दामटली होती.
हातात बिअरच्या बाटल्या नाचवत ते टोळकं गाडीकडे येवू लागलं.
याचं टाळकं सटकलं.
पण क्षणात याला पोरासारखाच, आपणही पोलीओचे बळी असल्यासारखं वाटू लागलं.
काळजीनं त्यानं बायकोकडे बघितलं.
तिनं ओढणी अंगाभवती लपेटली.
म्होरक्या पुढे आला.
गाडीकडे बघितलं.
मागच्या गँगला ईशारा केला.
काही समजायच्या आत त्यानं स्टिअरिंगचा ताबा घेतला.
त्याच्या गँगनं रेटा लावला.
भुरभुरत्या वाळूचे ढीग करत त्याची गाडी खड्ड्यातून बाहेर पडली.
रस्त्यापाशी पोचली.
पुन्हा बाटल्या हातात धरून ते टोळकं समुद्राच्या दिशेनं.
आपल्याच नशेत चूर.
याला काय चाललंय हे अजून कळतच नव्हतं.
दोनच मिनटात हा भानावर आला.
भानामती झाल्यासारखा मतिमंद झालेला.
गाडीच्या खिडकीतला तो हसरा चेहरा बघितला.
त्याच्या जीवात जीव आला.
समुद्राकडे बघत याने हात जोडले.
‘देव पावला’.
याच्या बायकोनेही आनंदाने हुंकार भरला.
Image by David Mark from Pixabay
Latest posts by Kaustubh Kelkar (see all)
- घरघर….. - October 4, 2021
- ‘स्कूल चले हम ! - September 22, 2021
- चष्मा - July 12, 2021
मस्तच
बघा, मला खूप आवडतात. इतक्या छान कथा कशा सुचतात. एकदम पॉझिटिव्ह.
Kaljala hat ghaltat tumchya goshti…vilakshan 👌🏻👌🏻