प्रेमरंग (रंग – लाल)

 
ती लगबगीने आवरत होती. तिने घड्याळात पाहिलं 5 वाजून गेले होते, आता निघायला हवं नाहीतर उशीर होईल असा तिने विचार केला. आरशात पुन्हा एकवार स्वतःकडे पाहिलं, तिने (पुन्हा एकदा) तिच्या आवडीचा लाल रंगाचा सुंदर ड्रेस घातला होता. एकदा
कानातल ठीक आहे का हे पाहिलं आणि मनात म्हणाली
” नकार द्यायला इतकं कशाला सजून जायला हवय”
पून्हा एकदा स्वतःच्या निर्णयाची खात्री करून घेत असल्यासारखा लुक तिने स्वतःला दिला आणि पर्स उचलून निघाली. बाहेर नाक्यावर तिने एक रिक्षा पकडली. आता अजून अर्धा तास प्रवासाव्यतिरिक्त आणि रिक्षातली मोठंमोठ्या आवाजातली गाणी ऐकण्याव्यतिरिक्त आपण काही करू शकणार नाही असं तिच्या ध्यानात आल. तिने एकदा व्हॉट्स ऍप चेक केलं, त्याचा मेसेज होता
“मी पोचतो आहे पाचेक मिनिटात. तू तुझ्या वेळेनुसार ये”
तिने एकदा त्याच्या डीपीवर क्लिक केलं, त्याने डीपी बदलला होता. चक्क वाईन रेड रंगाचा शर्ट घातला होता आणि त्याचा फोटो त्याने डीपी म्हणून ठेवला होता.तिला त्यांची पहिली भेट आठवली. एकमेकांचे छंद, आवडीनिवडी असा नेहमीच्या प्रश्नोत्तराचा तास झाल्यानंतर त्याने तिला विचारल
 
“तुमचा योगायोगांवर विश्वास आहे का हो?”
 
“हो, चांगल्या आणि वाईट दोन्ही योगायोगांवर विश्वास आहे माझा” ती उत्तरली.
 
मग काही वेळ शांतता, मग तो म्हणाला
“तुम्हाला माहीत आहे असं वाटतं नाही, म्हणजे माझ्या काकांनी तुम्हाला, तुमच्या घरच्यांना याची कल्पना दिली आहे की नाही माहिती नाही”
 
“कशाबद्दल?” तिने विचारलं
 
“मी रंगांधळा आहे, म्हणजे पूर्णपणे नाही पण काही प्रमाणात” त्याने स्पष्ट केलं
 
तिला ते ऐकुन खूप अवघडल्यासारखं झालं. काय प्रतिक्रिया द्यावी याबाबतीत तिला समजेना. तिने खात्री करून घेण्याच्या दृष्टीने विचारल
“म्हणजे आज मी हा जो काही ड्रेस घातला आहे याचा रंग तुम्हाला सांगता यायचा नाही!!!!”
 
“अगदीच असं नाही. काही प्रमाणात आहे हे व्यंग. तुमच्या आजच्या ड्रेसचा रंग नारिंगी आहे का?”
 
“लाल आहे हा रंग” ती म्हणाली
आणि मग अशा काहीशा अवघडलेल्या नोट्सवर पहिली भेट संपली. हे सोडल्यास तिला तो मुलगा चांगला वाटला होता/वाटत होता आणि हे जे काही व्यंग त्याला होत यात त्याचा काही दोष नव्हता. अजून जाणून घ्यायचं असेल तर चॅटशिवाय प्रत्यक्ष भेटायला हवं अस तिला वाटल मग दुसरी भेटही ठरली.
 
“तुमचा लाल रंग आवडीचा आहे का?” त्याच्या प्रश्नाने तिला अचंबा वाटला कारण लाल रंग तिच्या प्रचंड आवडीचा आणि दुसऱ्याच भेटीत त्याने हे ओळखावं!!
 
मग दुसऱ्या भेटीत बऱ्याच मोकळ्या गप्पा झाल्या. तुम्ही वरून ते दोघेही अरे तुरे वर आले. पुढे लग्न झाल नाही तरी चांगले मित्र तर नक्कीच बनून राहू अशा हॅपी नोटवर दुसरी भेट संपली.
 
आजची ही तिसरी भेट होती. रिक्षाने आता वेग पकडला होता आणि तिच्या डोक्यातल्या विचारांनी देखील.मुलगा छान आहे, त्याच्या वागण्या बोलण्यात अदब आहे, तो समोरच्याला आदर देतो मुख्य म्हणजे तो चिपकु नाहीये. त्याच्या डोक्यात विचार स्पष्ट आहेत आणि याचा त्याला दुराभिमान नाहीये शिवाय त्याच्याकडे ऐकण्याची उत्तम क्षमता आहे. तिच्या मनात त्याच्याबद्दल विचार सुरू होते. काय करावं? नकार द्यावा की होकार? घरातून तर नकार देण्याच्या इराद्याने आपण बाहेर पडलो होतो.त्याला नकार द्यायला तिला ठोस कारण सापडत नव्हत आणि मन एकीकडे होकार द्यायला सांगत होत.
 
तिची रिक्षा इच्छित स्थळी पोचली. पैसे देऊन ती कॅफेमध्ये आत चालत गेली. तो एका टेबलवर तिची वाट बघत बसला होता. तो लाल रंगाच्या गुलाबाची खूप फुलं घेऊन आला होता आणि त्याच्या चेहऱ्यावर तेच स्माईल. त्याने तिला फुलं दिली
“हे आपल्या मैत्रीसाठी. फुल दिली म्हणून होकार द्यावा अस काही प्रेशर नाही बरं का”
 
तिने हसत ती फुलं स्वीकारली. ते दोघं बसले, त्यांच्यात गप्पा सुरू झाल्या. ती थोडी अस्वस्थ होती, तिची चुळबुळ सुरू होती.
 
“तुला काही सांगायचं आहे का?”
 
“नाही काही नाही”
 
“हाच विचार करते आहेस ना? होकार दिला तर लग्न झाल्यावर शॉपिंगसाठी जाऊ तर आधीच आम्हा पुरुषांचा उजेड असतो तिथे.त्यात माझ हे व्यंग तू लाल रंगाचा ड्रेस घेशील आणि मी नारिंगी म्हणेन. “
 
तिच्या मनात आल की तो रंगांधळा असला तरी आयुष्यातला प्रेमाचा रंग मात्र त्याने बरोबर ओळखला होता आणि यामुळे त्यांचं लग्न ठरलं तर त्यांचा संसार पण रंगीत संगीत होणार होता.
 
ती मनापासून हसली नि म्हणाली
“नाही…तू नारिंगी म्हणशील तर मी तो लाल रंग आहे हे समजून घेईन”
 
त्याने स्तिमित होऊन तिच्याकडे पाहिलं आणि विचारता झाला
“म्हणजे मी होकार समजू?”
तिने हसत हो असं उत्तर दिलं.त्या दोघांनीही एकमेकांकडे प्रेमाने पाहिलं आणि त्यांच्या चेहऱ्यावर गुलाबी हास्य उमटलं.
 
“एक मिनिट मी नाही म्हणाले असते तर या गुलाबाच्या फुलांच काय करणार होतास?” तिने निघताना 
विचारलं
 
“गुलकंद बनविला असता” तो हसत म्हणाला आणि तिला हसू फुटलं. 
 
दृष्टीमध्ये व्यंग असल म्हणून काय झालं त्याच्या मनातल्या प्रेमरंगाने तिच्या मनावर राज्य केलं हे काही वेगळ सांगायला हवं?
 
 
लेखिका- भाग्यश्री भोसेकर बीडकर
 
 
 
 
Image by SUMITKUMAR SAHARE from Pixabay 

12 thoughts on “प्रेमरंग (रंग – लाल)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!